ज्ञानेश्वरी / अध्याय पहिला : संत ज्ञानेश्वर
ॐ नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या।जय जय स्वसंवेद्या, आत्मरुपा ॥१॥
देवा तूंचि गणेशु, सकलमति प्रकाशु।
म्हणे निवृत्ति दासु, अवधारिजो जी ॥२॥
हें शब्दब्रह्म अशेष, तेचि मूर्ति सुवेष।
तेथ वर्णवपु निर्दोष, मिरवत असे ॥३॥
स्मृति तेचि अवयव, देखा अंगिकभाव।
तेथ लावण्याची ठेव, अर्थशोभा ॥४॥
अष्टादश पुराणे, तीचि मणिभूषणे।
पदपद्धती खेवणे, प्रमेयरत्नांची ॥५॥
पदबंध नागर, तेचि रंगाथिले अंबर।
जेथ साहित्यवाणे, सपूर उजाळाचे ॥६॥
देखा काव्यनाटका, जे निर्धारिता सकौतुका।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका, अर्थध्वनी ॥ ७॥
नाना प्रमेयांचि परी, निपुणपणे पाहता कुसरी।
दिसती उचित पदे माझारी, रत्नें भली ॥ ८॥
तेथ व्यासादिकांच्या मति, तेचि मेखळा मिरवती।
चोखाळपणे झळकती, पल्लवसडका ॥ ९॥
देखा षड्दर्शने म्हणिपती, तेचि भुजांची आकृती ॥
म्हणऊनि विसंवादे धरिती, आयुधे हाती ॥ १०॥
तरी तर्क तोचि परशु, नीतिभेदु अंकुशु।
वेदांतु तो महारसु, मोदकाचा ॥ ११ ॥
एके हाति दंतु, जो स्वभावता खंडितु।
तो बौद्धमत संकेतु, वार्तिकांचा ॥ १२ ॥
मग सहजे सत्कारवादु, तो पद्मकरु वरदु।
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु, अभयहस्तु ॥ १३ ॥
देखा विवेकमंतु सुविमळु, तोचि शुंडादंडु सरळु।
जेथ परमानंदु केवळु, महासुखाचा ॥ १४ ॥
तरी संवादु तोचि दशनु, जो समताशुभ्रवर्णु।
देवो उन्मेषसुक्ष्मेक्षणु, विघ्नराजु ॥ १५ ॥
मज अवगमलिया दोनी, मीमांसा श्रवणस्थानी।
बोधमदामृत मुनी, अलि सेविती ॥ १६ ॥
प्रमेयप्रवाल सुप्रभ, द्वैताद्वैत तेचि निकुंभ।
सरिसे एकवटत, इभ मस्तकावरी ॥ १७ ॥
उपरि दशोपनिषदे, जिये उदारे ज्ञानमकरंदे।
तिये कुसुमे मुगुटी सुगंधे, शोभती भली ॥ १८ ॥
अकार चरणयुगुल, उकार उदर विशाल।
मकार महामंडल, मस्तकाकारे ॥ १९ ॥
हे तिन्ही एकवटले, तेथ शब्दब्रह्म कवळले।
ते मियां गुरूकृपा नमिले, आदिबीज ॥ २० ॥
आतां अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थकला कामिनी।
ते शारदा विश्वमोहिनी, नमिली मियां ॥ २१ ॥
मज हृदयी सद्गुरू, तेणे तारिलो हा संसारपूरु।
म्हणऊनि विशेष अत्यादरू, विवेकावरी ॥ २२ ॥
जैसे डोळ्यां अंजन भेटे, मग दृष्टीसी फांटा फुटे।
मग वास पाहे तेथ प्रकटे, महानिधी ॥ २३ ॥
का चिंतामणी जालया हाती, सदा विजयवृत्ति मनोरथी।
तैसा मी पूर्णकाम निवृत्ती, ज्ञानदेवो म्हणे ॥ २४ ॥
म्हणोन जाणतेनो गुरू कीजे, तेणे कृतकार्य होईजे।
जैसे मूळसिंचने सहजे, शाखापल्लव संतोषती ॥ २५ ॥
का तीर्थे जिये भुवनी, तिये घडती समुद्रावगहनी।
ना तरी अमृतरसास्वादनीं, रस सकळ ॥ २६ ॥
तैसा पुढतपुढती तोची, मियां अभिवंदिला श्रीगुरूचि।
जे अभिलषित मनोरुची, पुरविता तो ॥ २७ ॥
आता अवधारा कथा गहन, जे सकळां कौतुका जन्मस्थान।
की अभिनव उद्यान, विवेकतरूचे ॥ २८ ॥
ना तरी सर्व सुखांची आदि, जे प्रमेयमहानिधी।
नाना नवरससुधाब्धि, परिपूर्ण हे ॥ २९ ॥
की परमधाम प्रकट, सर्व विद्यांचे मूळपीठ।
शास्त्रजाता वसिष्ठ, अशेषांचे ॥ ३० ॥
ना तरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिव्हार।
लावण्यरत्नभांडार, शारदियेचे ॥ ३१॥
नाना कथारूपे भारती, प्रकटली असे त्रिजगती।
आविष्करोनी महामती, व्यासाचिये ॥ ३२॥
म्हणोनी हा काव्यां रावो, ग्रंथ गुरुवतीचा ठावो।
एथुनि रसां आला आवो, रसाळपणाचा ॥ ३३॥
तेवींचि आइका आणिक एक, एथुनि शब्दश्री सच्छास्त्रिक।
आणि महाबोधि कोवळीक, दुणावली ॥ ३४॥
एथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले।
आणि सौभाग्य पोखले, सुखाचे एथ ॥ ३५॥
माधुर्यी मधुरता, शृंगारी सुरेखता।
रूढपण उचितां, दिसे भले ॥ ३६॥
एथ कळाविदपण कळा, पुण्यासी प्रतापु आगळा।
म्हणऊनि जनमेजयाचे अवलीळा, दोष हरले ॥ ३७॥
आणि पाहता नावेक, रंगी सुरंगतेची आगळीक।
गुणां सगुणतेचे बिक, बहुवस एथ ॥ ३८॥
भानुचेनि तेजें धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळले।
तैसे व्यासमती कवळले, अवघे विश्व ॥ ३९॥
कां सुक्षेत्रीं बीज घातले, ते आपुलेयापरी विस्तारले।
तैसे भारतीं सुरवाडले, अर्थजात ॥ ४०॥
ना तरी नगरांतरी वसिजे, तरी नागराचि होइजे।
तैसे व्यासोक्तितेजे, धवळित सकळ ॥ ४१॥
कीं प्रथमवयसाकाळीं, लावण्याची नव्हाळी।
प्रकटे जैसी आगळी, अंगनाअंगी ॥ ४२॥
ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वनशोभेचि खाणी उघडे।
आदिलापासोनि अपाडे, जियापरी ॥ ४३॥
नाना घनीभूत सुवर्ण, जैसे न्याहाळितां साधारण।
मग अलंकाती बरवेपण, निवाडु दावी ॥ ४४॥
तैसे व्यासोक्ती अळंकारिले, आवडे ते बरवेपण पातले।
ते जाणोनि काय आश्रयिले, इतिहासी ॥ ४५॥
नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं, सानीव धरुनी आंगी।
पुराणे आख्यानरूपे जगीं, भारता आली ॥ ४६॥
म्हणऊनि महाभारतीं जे नाही, ते नोहेचि लोकी तिहीं।
येणे कारणे म्हणिपे पाहीं, व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७॥
ऐसी सुरस जगीं कथा, जे जन्मभूमि परमार्था।
मुनि सांगे नृपनाथा, जनमेजया ॥ ४८॥
जे अद्वितीय उत्तम, पवित्रैक निरुपम।
परम मंगलधाम, अवधारिजो ॥ ४९॥
आता भारतीं कमळपरागु, गीताख्यु प्रसंगु।
जो संवादिला श्रीरंगु, अर्जुनेसी ॥ ५०॥
ना तरी शब्दब्रह्माब्धि। मथिलेया व्यासबुद्धि।
निवडिले निरवधि, नवनीत हे।। ५१॥
मग ज्ञानाग्निसंपर्के, कडसिलें विवेके।
पद आले परिपाकें, आमोदासी ॥ ५२॥
जे अपेक्षिजे विरक्ति, सदा अनुभविजे संतीं।
सोहंभावे पारंगती, रमिजे जेथ ॥ ५३॥
जे आकर्णिजे भक्ती, जें आदिवंद्य त्रिजगतीं।
ते भीष्मपर्वीं संगती, सांगीजैल ॥ ५४॥
जें भगवद्गीता म्हणीजे, जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे।
जे सनकादिकीं सेविजे, आदरेसीं ॥ ५५॥
जैसे शारदियेचे चंद्रकळे-, माजीं अमृतकण कोंवळे।
तें वेंचती मवाळें, चकोरतलगें ॥ ५६॥
तियापरी श्रोतां, अनुभवावी हे कथा।
अति हळुवारपणे चित्ता, आणूनियां ॥ ५७॥
हे शब्देविण संवादिजे, इंद्रियां नेणता भोगिजे।
बोलाआधि झोंबिजे, प्रमेयासी ॥ ५८॥
जैसे भ्रमर परागु नेती, परी कमळदळे नेणती।
तैसी परी आहे सेविती, ग्रंथी इये ॥ ५९॥
का आपुला ठावो न सांडिता, आलिंगिजे चंद्रु प्रकटता।
हा अनुरागु भोगितां, कुमुदिनी जाणे ॥ ६०॥
ऐसेनि गंभीरपणे, स्थिरावलेनि अंत:करणे।
आथिला तोचि जाणे, मानूं इये ॥ ६१॥
अहो अर्जुनाचिये पांती, जे परिसणया योग्य होती।
तिहीं कृपा करून संतीं, अवधान द्यावे ॥ ६२॥
हे सलगीं म्यां म्हणितले, चरणां लागोनि विनविलें।
प्रभू सखोल हृदय आपुलें, म्हणऊनियां ॥ ६३॥
जैसा स्वभावो मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा।
तरी अधिकचि तयाचा, संतोष आथी ॥ ६४॥
तैसा तुम्हीं मी अंगीकारिलां, सज्जनीं आपुला म्हणितला।
तरी सहज उणें उपसाहला, प्रार्थूं कायी ॥ ६५॥
परी अपराधु तो आणिक आहे, जें मी गीतार्थ कवळुं पाहें।
ते अवधारा विनवूं लाहें, म्हणऊनियां ॥ ६६॥
हे अनावर न विचारितां, वायांचि धिंवसा उपनला चित्ता।
येर्हावीं भानुतेजीं काय खद्योता, शोभा आथी ॥ ६७॥
का टिटिभू चांचूवरी, माप सूये सागरी।
मी नेणतु त्यापरी, प्रवर्तें येथ ॥ ६८॥
आइका आकाश गिंवसावे, तरी त्याहूनि थोर होआवें।
म्हणऊनि अपाडु हें आघवें, निर्धारिता ॥ ६९॥
या गीतार्थाची थोरी, स्वयें शंभू विवरी।
जेथ भवानी प्रश्नु करी, चमत्कारोनी ॥ ७०॥
तेथ हरू म्हणे नेणिजे, देवी जैसें का स्वरूप तुझें।
तैसें नित्यनूतन देखिजे, गीतातत्व ॥ ७१॥
हा वेदार्थसागरू, जया निद्रिताचा घोरू।
तो स्वयें सर्वेश्वरू, प्रत्यक्ष अनुवादला ॥ ७२॥
ऐसें जें अगाध, जेथ वेडावती वेद।
तेथ अल्प मी मतिमंद, काय होय ॥ ७३॥
हें अपार कैसेनि कवळावे, महातेज कवणें धवळावे।
गगन मुठीं सुवावे, मशके केवीं ॥ ७४॥
परी एथ असे एक आधारु, तेणेचि बोलें मी सधरु।
जे सानुकूळ श्रीगुरु, ज्ञानदेवो म्हणे ॥ ७५॥
येर्हनवीं तरी मी मुर्खू, जरी जाहला अविवेकु।
तरी संतकृपादीपु, सोज्वळु असे ॥ ७६॥
लोहाचे कनक होये, हे सामर्थ्य परिसींच आहे।
की मृतही जीवित लाहे, अमृतसिद्धी ॥ ७७ ॥
जरी प्रकटे सिद्धसरस्वती, तरी मुकया आथी भारती।
एथ वस्तुसामर्थ्यशक्ति, नवल कायी ॥ ७८॥
जयातें कामधेनू माये, तयासी अप्राप्य काही आहे।
म्हणऊनि मी प्रवर्तों लाहे, ग्रंथी इये ॥ ७९॥
तरी न्यून ते पुरतें, अधिक ते सरते।
करून घ्यावे हें तुमते, विनवीतु असे ॥ ८०॥
आता देईजो अवधान, तुम्हीं बोलविल्या मी बोलेन।
जैसे चेष्टे सूत्राधीन, दारुयंत्र ॥ ८१॥
तैसा मी अनुग्रहीतु, साधूंचा निरोपितु।
ते आपुला अलंकारितु, भलतयापरी ॥ ८२॥
तंव श्रीगुरू म्हणती राहीं, हे तुज बोलावे न लगे कांही।
आता ग्रंथा चित्त देईं, झडकरी वेगा ॥ ८३॥
या बोला निवृत्तिदासु, पावूनि परम उल्हासु।
म्हणे परियेसा मना अवकाशु, देऊनियां ॥ ८४॥
धृतराष्ट्र उवाच।
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ॥ १॥
तरी पुत्रस्नेहे मोहितु, धृतराष्ट्र असे पुसतु ॥
म्हणे संजया सांगे मातु, कुरुक्षेत्रींची ॥ ८५॥
जें धर्मालय म्हणिजे, तेथ पांडव आणि माझे।
गेले असती व्याजें, झुंजाचेनि ॥ ८६॥
तरी तिहीं येतुला अवसरीं, काय किजत असे येरयेरीं।
तें झडकरी कथन करी, मजप्रती ॥ ८७॥
संजय उवाच।
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा।
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥ २॥
तिये वेळी तो संजय बोले, म्हणे पांडवसैन्य उचलले।
जैसें महाप्रळयीं पसरले, कृतांतमुख ॥ ८८॥
तैसे तें घनदाट, उठावले एकवाट।
जैसें उसळले कालकूट, धरीं कणव ॥ ८९॥
ना तरी वडवानलु सादुकला, प्रलयवाते पोखला।
सागर शोषूनि उधवला, अंबरासी ॥ ९०॥
तैसे दळ दुर्धर, नाना व्यूहीं परिकर।
अवगमले भयासुर, तिये काळीं ॥ ९१॥
तें देखिलेयां दुर्योधनें, अव्हेरिले कवणे माने।
जैसें न गणिजे पंचाननें, गजवटांते ॥ ९२ ॥
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम्।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥ ३॥
मग द्रोणापासी आला, तयाते म्हणे हा देखिला।
कैसा दळभारु उचलला, पांडवांचा ॥ ९३॥
गिरिदुर्ग जैसे चालते, तैसे विविध व्यूह संभवते।
हे रचिले आथि बुद्धिमंते, द्रुपद्कुमरें ॥ ९४॥
जो का तुम्हीं शिक्षापिला, विद्या देऊनी कुरुठा केला।
तेणे हा पाखरिला, देखदेख ॥ ९५॥
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ: ॥ ४॥
आणिकही असाधारण, जे शस्त्रास्त्रीं प्रवीण।
जे क्षात्रधर्मीं निपुण, वीर आहाती ॥ ९६॥
जे बळें प्रौढी पौरुषें, भीमार्जुनांसारिखे।
ते सांगेन कौतुकें, प्रसंगेचि ॥ ९७॥
एथ युयुधानु सुभटु, आला असे विराटु।
महारथी श्रेष्ठु, द्रुपद वीरु ॥ ९८ ॥
धृष्टकेतुश्चेकितान: काशिराजेश्च वीर्यवान।
पुरुजित् कुंतिभोजश्च शैब्यश्च नरपुंगव: ॥ ५॥
युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान्।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथ: ॥ ६॥
चेकितान धृष्टकेतु, काशिश्वरु विक्रांतु।
उत्तमौज नृपनाथु, शैब्य देख ॥ ९९ ॥
हा कुंतिभोजु पाहे, एथ युधामन्यु आला आहे।
आणि पुरुजितादि राय हे, सकळ देखे ॥ १००॥
हा सुभद्रहृदयनंदनु, जो अपरु नवा अर्जुनु।
तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु, देखे द्रोणा ॥ १०१॥
आणिकही द्रौपदीकुमर, के सकळही महारथी वीर।
मिती नेणिजे अपार, मीनले आथि ॥ १०२ ॥
अस्माकं तु विशिष्टा ये तान् निबोध द्विजोत्तम।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते ॥ ७॥
भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समिंतिंजय:।
अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्तिस्थैव च ॥ ८॥
आतां आमुचां दळीं नायक, जे रूढ वीर सैनिक।
ते प्रसंगे आइक, सांगिजती ॥ १०३॥
उद्देशें एक दोनी, जायिजती बोलोनी।
तुम्हीआदिकरूनि, मुख्य जे जे ॥ १०४॥
हा भीष्मु गंगानंदनु, जो प्रतापतेजस्वी भानू।
रिपुगजपंचाननु, कर्ण वीरु ॥ १०५ ॥
या एकेकाचेनि मनोव्यापारें, हे विश्व होय संहरे।
हा कृपाचार्य न पुरे, एकलाचि ॥ १०६॥
एथ विकर्ण वीरु आहे, हा अश्वत्थामा पैल पाहें।
याचा अडदरु सदा वाहे, कृतांतु मनीं ॥ १०७॥
समितिंजयो सोमदत्ति, ऐसे आणिकही बहुत आहाती ॥
जयाचिया बळा मिती, धाताही नेणे ॥ १०८॥
अन्ये च बहव: शूरा मदर्थे त्यक्तजीविता:।
नानाशस्त्रप्रहरण: सर्वे युद्धविशरद: ॥ ९॥
जे शस्त्रविद्यापारंगत, मंत्रावतार मूर्त।
हो कां जे अस्त्रजात, एथूनि रूढ।। १०९॥
हे अप्रतिमल्ल जगीं, पुरता प्रतापु अंगी।
परी सर्व प्राणें मजचिलागी, आराइले असती ॥ ११०॥
पतिव्रतेचे हृदय जैसे, पतीवांचूनि न स्पर्शे।
मी सर्वस्व या तैसे, सुभटांसी ॥ १११॥
आमुचिया काजाचेनि पाडें, देखती आपुलें जीवित थोकडें।
ऐसे निरवधि चोखडे, स्वामिभक्त ॥ ११२॥
झुंजती कुळकणी जाणती, कळे कीर्तीसी जिती।
हे बहु असो क्षात्रनीती, एथोनियां ॥ ११३॥
ऐसें सर्वापरी पुरते, वीर दळी आमुतें।
आतां काय गणूं यांतें, अपार हे ॥ ११४॥
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम्।
पर्याप्तं त्विदमेषां बलं भीमाभिरक्षितम् ॥ १०॥
वरी क्षत्रीयांमाजि श्रेष्ठु, जो जगजेठी गा सुभटु।
तया दळवैपणाचा पाटु, भीष्मासी पैं ॥ ११५॥
आतां याचेनि बळें गवसलें, हें दुर्ग जैसे पन्नासीलें।
येणे पाडे थेंकुले, लोकत्रय ॥ ११६॥
आधींच समुद्र पाहीं, तेथ दुवाडपणा कवणा नाहीं ॥
मग वडवानळु तैसेयाही, विरजा जैसा ॥ ११७॥
ना तरी प्रलयवह्नि महावातु, या दोघां जैसा सांघातु।
तैसा हा गंगासुतु, सेनापति ॥ ११८॥
आतां येणेंसि कवण भिडे, हे पांडव सैन्य कीर थोडें।
ओइचलेनि पाडे, दिसत असे ॥ ११९॥
वरी भीमसेन बेथु, तो जाहला असे सेनानाथु।
ऐसें बोलोनि हे मातु, सांडिली असे ॥ १२०॥
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥ ११॥
मग पुनरपि काय बोले, सकळ सैनिकांते म्हणितलें।
आता दळभार आपुलाले, सरसे करा ॥ १२१॥
जिया जिया अक्षौहिणी, तिये तिये आरणी।
वरगण कवणकवणी, महारथिया ॥ १२२॥
तेणे तिया आवरिजे, भीष्मातळीं राहिजे।
द्रोणाते म्हणिजे, तुम्हीं सकळ ॥ १२३॥
हाचि एकु रक्षावा, मी तैसा हा देखावा।
येणें दळभारु आघवा, साचु आमुचा॥ १२४॥
तस्य सनरयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः।
सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान् ॥ १२॥
या राजाचिया बोला, सेनापति संतोषला।
मग तेणे केला, सिंहनादु ॥ १२५॥
तो गाजत असे अद्भुतु, दोन्ही सैन्यांआंतु।
प्रतिध्वनि न समातु, उपजत असे ॥ १२६॥
तयाचि तुलगासवे, वीरवृत्तिचेनि थावें।
दिव्य शंख भीष्मदेवें, आस्फुरिला ॥ १२७॥
ते दोन्ही नाद मिनले, तेथ त्रैलोक्य बधिरभूत जाहलें।
जैसें आकाश कां पडिलें, तुटोनियां ॥ १२८॥
घडघडीत अंबर, उचंबळत सागर।
क्षोभलें चराचर, कांपत असे ॥ १२९॥
तेणें महाघोषगजरें, दुमदुमताती गिरिकंदरें।
तंव दलामाजि रणतुरें, आस्फारिलीं ॥१३०॥
ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखः।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥१३॥
उदंड सैंघ वाजतें, भयानकें खाखाते।
महाप्रळयो जेथें, धाकडांसी ॥ १३१ ॥
भेरी निशाण मांदळ, शंख काहळा भोंगळ।
आणि भयासुर रणकोल्हाळ, सुभटांचे ॥ १३२॥
आवेशें भुजा त्राहाटिती, विसणैले हांका देती।
जेथ महामद भद्रजाती, आवरती ना ॥ १३३॥
तेथ भेडांची कवण मातु, कांचया केर फिटतु।
जेणें दचकला कृतांतु, आंग नेघे ॥ १३४॥
एकां उभयतांचे प्राण गेले, चांगांचे दांत बैसले।
बिरुदांचे दादुले, हिंवताती ॥ १३५॥
ऐसा अद्भुत तूरबंबाळु, ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु।
देव म्हणती प्रळयकाळु, ओढवला आजि ॥ १३६॥
ऐसी स्वर्गीं मातु, देखोनि तो आकांतु।
तंव पांडवदळा आंतु, वर्तलें कायी ॥ १३७॥
हो कां निजसार विजयाचे, कीं ते भांडार महातेजाचे।
जेथ गरुडाचिचे जावळिये, कांतले चार्ही ॥ १३८॥
ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ।
माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः ॥ १४॥
की पाखांचा मेरु जैसा, रहंवरु मिरवितसे तैसा।
तेजें कोंदटलिया दिशा जयाचेनि ॥१३९॥
जेथ अश्ववाहकु आपण, वैकुंठीचा राणा जाण।
तया रथाचे गुण, काय वर्णूं ॥ १४०॥
ध्वजस्तंभावरी वानरु, तो मूर्तिमंत शंकरु।
सारथी शारङधरु, अर्जुनेसीं ॥ १४१॥
देखा नवल तया प्रभूचें, प्रेम अद्भुत भक्तांचे।
जे सारथ्य पार्थाचें, करीतु असे ॥ १४२॥
पाईकु पाठीसीं घातला, आपण पुढां राहिला।
तेणें पांचजन्यु आस्फुरिला, अवलीळाचि।। १४३॥
पांचजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनंजयः।
पौंड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदरः ॥ १५॥
परी तो महाघोषु थोरु, गाजत असे गंहिरु।
जैसा उदैला लोपि दिनकरु, नक्षत्रांते ॥ १४४॥
तैसें तुरबंबाळु भंवते, कौरवदळी गाजत होते।
ते हारपोनि नेणों केऊते, गेले तेथ ॥ १४५॥
तैसाचि देखे येरें, निनादें अति गंहिरे।
देवदत्त धनुर्धरे, आस्फुरिला ॥ १४६॥
ते दोनी शब्द अचाट, मिनले एकवट।
तेथ ब्रह्मकटाह शतकूट, हों पाहत असे ॥ १४७॥
तंव भीमसेनु विसणैला, जैसा महाकाळु खवळला।
तेणें पौंड्र आस्फुरिला, महाशंखु ॥ १४८॥
अनंतविजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः।
नकुलः सहदेवश्चं सुघोष्मणिपुष्पकौ ॥ १६॥
तो महाप्रलयजलधरु, जैसा घडघडिला गंहिरु।
तंव अनंतविजयो युधिष्ठिरु, आस्फुरित असे ॥ १४९॥
नकुळें सुघोषु, सहदेवे मणिपुष्पकु।
जेणें नादें अतंकु, गजबजला असे ॥ १५०॥
काश्यश्च परमेश्वासः शिखंडी च महारथः।
दृष्टद्युम्नो विराटश्च सातकिश्चापराजितः ॥ १७॥
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वेशः पृथिवीपते।
सौभद्रश्च महाबाहुः शंखान् दध्मुः पृथक् पृथक् ॥ १८॥
तेथ भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदेयादिक।
हा काशीपती देख, महाबाहु ॥ १५१॥
तेथ अर्जुनाचा सुतु, सात्यकि अपराजितु।
दृष्टद्युम्नु नृपनाथु, शिखंडी हन ॥ १५२॥
विराटादि नृपवर, जे सैनिक मुख्य वीर,
तिहीं नाना शंख निरंतर, आस्फुरिले ॥ १५३॥
तेणें महाघोषनिर्घातें, शेषकूर्म अवचिते।
गजबजोनि भूभारातें, सांडूं पाहती ॥ १५४॥
तेथ तिन्हीं लोक डंडळित, मेरु मांदार आंदोळित।
समुद्रजळ उसळत, कैलासवेरी ॥ १५५॥
स घोषो धार्त्रराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्।
नभश्च पृथिवींश्चैव तुमुलो व्यनुनादयन् ॥ १९॥
पृथ्वीतळ उलथों पाहत, आकाश असे आसुडत।
तेथ सडा होत , नक्षत्रांचा।। १५६॥
सृष्टि गेली रे गेली ॥ देवां मोकळवादी जाहली।
ऐशी एक टाळी पिटिली, सत्यलोकीं, १५७ ॥
दिहाचि दिन थोकला, जैसा प्रलयकाळ मांडला।
तैसा हाहाकारु उठिला, तिन्हीं लोकीं ॥ १५८॥
तंव आदिपुरुषु विस्मितु, म्हणे झणें होय पां अंतु।
मग लोपला अद्भुतु, संभ्रमु तो ॥ १५९॥
म्हणोनि विश्व सांवरले, एर्हतवीं युगांत होतें वोडवले।
जै महाशंख आस्फुरिले, कृष्णादिकीं ॥ १६०॥
तो घोष तरी उपसंहरला, परी पडिसाद होता राहिला ॥
तेणें दळभार विध्वंसिला, कौरवांचा ॥ १६१॥
तो जैसा गजघटाआंतु, सिंह लीला विदारितु।
तैसा हृदयातें भेदितु, कौरवांचिया ॥ १६२॥
तो गाजत जंव आइकती, तंव उभेचि हिये घालिती।
एकमेकांते म्हणती, सावध रे सावध ॥ १६३॥
अथ व्यवस्थितान् दृष्टवा धार्तराष्ट्रानं कपिध्वजः।
प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः ॥ २०॥
तेथ बळें प्रौढीपुरते, जे महारथी वीर होते।
तिहीं पुनरपि दळातें, आवरिलें ॥ १६४॥
मग सरिसपणें उठावले, दुणावटोनि उचलले।
तया दंडी क्षोभलें, लोकत्रय ॥ १६५॥
तेथ बाणवरी धनुर्धर, वर्षताती निरंतर।
जैसे प्रलयांत जलधर, अनिवार का ॥ १६६॥
तें देखलिया अर्जुनें, संतोष घेऊनि मने।
मग संभ्रमे दिठी सेने, घालितसे ॥ १६७॥
तंव संग्रामीं सज्ज जाहले, सकळ कौरव देखिले।
मग लीला धनुष्य उचलिले, पंडुकुमरें ॥ १६८॥
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते।
अर्जुन उवाच - सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ २१।
ते वेळीं अर्जुन म्हणतसे देवा, आतां झडकरी रथु पेलावा।
नेऊनि मध्यें घालावा, दोहीं दळां ॥ १६९॥
यावदेतान् निरिक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान्।
कैर्मया सह योद्धव्यस्मिन् रणसमुद्यमे ॥ २२॥
योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागतः।
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकिर्षवः ॥ २३॥
जंव मी नावेक, हे सकळ वीर सैनिक।
न्याहळीन अशेख, झुंजते जे ॥ १७०॥
एथ आले असती आघवे, परी कवणेंसी म्यां झुंजावे।
हे रणीं लागे पहावें, म्हणऊनियां ॥ १७१॥
बहुतकरुनि कौरव, हे आतुर दुःस्वभाव।
वाटिवांवीण हांव, बांधिती झुंजीं ॥ १७२॥
झुंजाची आवडी धरती, परी संग्रामी वीर नव्हती।
हे सांगेन रायाप्रती, काय संजयो म्हणे, १७३॥
संजय उवाच: एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥ २४॥
आइका अर्जुन इतुकें बोलिला, तंव कृष्णें रथु पेलिला।
दोहीं सैन्यामाजि केला, उभा तेणें ॥ १७४॥
भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्।
उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति ॥ २५॥
तत्रापश्यत् स्थितान् पार्थः पितृनथ पितामहान्।
आचार्यान् मातुलान् भ्रातृन् पुत्रान् पौत्रान् सखींस्थता ॥ २६॥
श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि।
तान् समीक्ष स कौंतेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् ॥ २७॥
जेथ भीष्माद्रोणादिक, जवळिकेचि सन्मुख।
पृथिविपति आणिक, बहुत आहाति ॥ १७५॥
तेथ स्थिर करूनि रथु, अर्जुन असे पाहतु।
तो दळभार समस्तु, संभ्रमेसी ॥ १७६॥
मग देवा म्हणे देख देख, हे गोत्रगुरु अशेख।
तंव कृष्णा मनीं नावेक, विस्मो जाहला ॥ १७७॥
तो आपणयां आपण म्हणे, एथ कायि कवण जाणे।
हें मनीं धरिले येणें, परि कांही आश्चर्य असे ॥ १७८॥
ऐसी पुढील से घेतु, तो सहजें जाणे हृदयस्थु।
परि उगा असे निवांतु, तिये वेळीं ॥ १७९॥
तंव तेथ पार्थु सकळ, पितृपितामह केवळ।
गुरू बंधु मातुळ, देखता जाहला ॥ १८०॥
इष्टमित्र आपुले, कुमरजन देखिले।
हे सकळ असती आले, तयांमाजि ॥ १८१॥
सुहृज्जन सासरे, आणिकही सखे सोईरे।
कुमर पौत्र धनुर्धरें, देखिले तेथ ॥ १८२॥
जयां उपकार होते केले, कां आपदीं जे राखिले।
हे असो वडील धाकुले -, आदिकरुनि ॥ १८३॥
ऐसे गोत्रचि दोहीं दळीं, उदित जालें असे कळीं।
हें अर्जुने तिये वेळीं, अवलोकिलें ॥ १८४॥
कृपया परयाऽऽविष्टो विषीदन्नमब्रवीत।
तेथ मनीं गजबज जाहली, आणि आपैसी कृपा आली।
तेणें अपमानें निघाली, वीरवृत्ति ॥ १८५ ॥
जिया उत्तम कुळींचिया होती, आणि गुणलावण्य आथी।
तिया आणिकींते न साहति, सुतेजपणें ॥ १८६॥
नविये आवडीचेनि भरें, कामुक निजवनिता विसरे।
मग पाडेंविण अनुसरें, भ्रमला जैसा ॥ १८७॥
कीं तपोबळें ऋद्धी, पातलिया भ्रंशे बुद्धी।
मग तया विरक्ततासिद्धी, आठवेना॥ १८८॥
तैसें अर्जुना तेथ जाहले, असतें पुरुषत्व गेले।
जें अंतःकरण दिधले, कारुण्यासी ॥ १८९॥
देखा मंत्रज्ञु बरळु जाये, मग तेथ कां जैसा संचारु होये।
तैसा तो धनुर्धर महामोहें, आकळिला ॥ १९०॥
म्हणऊनि असता धीरु गेला, हृदया द्रावो आला।
जैसा चंद्रकळीं सिंपिला, सोमकांतु ॥ १९१॥
तयापरी पार्थु, अतिस्नेहें मोहितु।
मग सखेद असे बोलतु, अच्युतेसी ॥ १९२॥
दृष्ट्वेनं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थिताम्।।२८॥
सीदन्ती मम गात्राणि मुखं च परिशुष्यति।
वेपथुश्च शरीरे मे रोमाहर्षश्च जायते ॥ २९॥
गांडीवम् स्त्रंसते हस्तात् त्वक् चैव परिदह्यते।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥ ३०॥
तो म्हणे अवधारी देवा, म्यां पाहिला हा मेळावा।
तंव गोत्रवर्गु आघवा, देखिला एथ ॥ १९३॥
हे संग्रामीं अति उद्यत, जाहाले असती कीर समस्त।
पण आपणपेयां उचित, केवीं होय ॥ १९४॥
येणें नांवेंचिं नेणों कायी, मज आपणपें सर्वथा नाहीं।
मन बुद्धी ठायीं, स्थिर नोहे ॥ १९५ ॥
देखें देह कांपत, तोंड असे कोरडें होत।
विकळता उपजत, गात्रांसी ॥ १९६ ॥
सर्वांगा कांटाळा आला, अति संतापु उपनला।
तेथ बेंबळे हातु गेला, गांडीवाचा ॥ १९७ ॥
तें न धरताचि निष्टलें, परि नेणेंचि हातोनि पडिले।
ऐसे हृदय असे व्यापिलें, मोहें येणें ॥ १९८ ॥
जें वज्रापासोनि कठिण, दुर्धर अतिदारुण।
तयाहून असाधारण, हें स्नेह नवल ॥ १९९ ॥
जेणे संग्रामी हरू जिंतिला, निवातकवचांचा ठावो फेडिला।
तो अर्जुन मोहें कवळिला, क्षणामाजि ॥ २०० ॥
जैसा भ्रमर भेदी कोडें, भलतैसें काष्ठ कोरडें।
परि कळिकेमाजीं सापडें, कोवळियें ॥ २०१ ॥
तेथ उत्तीर्ण होईल प्राणें, परीं ते कमळदळु चिरूं नेणे।
तैसे कठीण कोवळेंपणे, स्नेह देखा ॥ २०२ ॥
हे आदिपुरुषाची माया, ब्रह्मेयाहि नयेचि आया।
म्हणऊनी भुलविला ऐकें राया, संजयो म्हणे ॥ २०३ ॥
अवधारीं मग तो अर्जुनु।देखोनि सकळ स्वजनु।
विसरला अभिमानु, संग्रामींचा ॥ २०४ ॥
कैसी नेणों सदयता, उपनली येथे चित्ता।
मग म्हणे कृष्णा आता, नसिजे एथ ॥ २०५ ॥
माझें अतिशय मन व्याकुळ, होतसे वाचा बरळ।
जे वधावे हे सकळ, येणें नांवे ॥ २०६ ॥
निमितानि च पश्यामि विपरीतानि केशव।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ ३१ ॥
या कौरवां जरी वधावें, तरी युधिष्ठिरादिक कां न वधावे।
हे येर येर आघवे, गोत्रज आमुचे ॥ २०७ ॥
म्हणोनि जळो हें झुंज, प्रत्यया न ये मज।
एणें काय काज, महापापें ॥ २०८ ॥
देवा बहुतं परीं पाहता, एथ वोखटें होईल झुंजतां।
वर काहीं चुकवितां, लाभु आथी ॥ २०९ ॥
न काङक्षे विजयं कृष्ण न च राज्य सुखानि च।
किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा ॥ ३२ ॥
येषामर्थे काङक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च।
ते इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥ ३३ ॥
तया विजयवृत्ती कांही, मज सर्वथा काज नाहीं।
एथ राज्य तरी कायी, हें पाहुनियां ॥ २१० ॥
यां सकळांते वधावे, मग जे भोग भोगावे।
ते जळोत आघवे, पार्थु म्हणे ॥ २११ ॥
तेणें सुखेविण होईल, तै भलतेही साहिजेल।
वरि जीवितही वेंचिजेल, याचिलागीं ॥ २१२ ॥
परीं यासी घातु कीजे, मग आपण राज्य भोगिजे।
हे स्वप्नींही मन माझे, करूं न शके ॥ २१३ ॥
तरी आम्ही का जन्मावें, कवणालागीं जियावें।
जें वडिलां यां चिंतावें, विरुद्ध मनें ॥ २१४ ॥
पुत्रातें इप्सी कुळ, तयाचें कायि हेंचि फळ।
जे निर्दाळिजे केवळ, गोत्र आपुले ॥ २१५ ॥
हें मनींचि केवि धरिजे, आपण वज्राचेयां बोलिजे।
वरी घडे तरी कीजे, भले एयां ॥ २१६ ॥
आम्हीं जें जें जोडावें, तें समस्तीं इहीं भोगावें।
हे जीवितही उपकारावें, काजीं यांचां ॥ २१७ ॥
आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडूनि सकळ।
मग संतोषविजे कुळ, आपुलें जें ॥ २१८ ॥
तेचि हे समस्त, परी कैसें कर्म विपरीत।
जे जाहले असती उद्यत, झुंजावया ॥ २१९ ॥
अंतौरिया कुमरें, सांडोनियां भांडारें।
शस्त्राग्रीं जिव्हारें, आरोपुनी ॥ २२० ॥
ऐसियांते कैसेनि मारुं, कवणावरी शस्त्र धरूं।
निज हृदया करूं, घातु केवीं ॥ २२१ ॥
आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहः।
मातुलः श्वशुराः पौत्राः श्यालाः संबंधिनस्तथा ॥ ३४॥
हे नेणसी तूं कवण, परी पैल भीष्म द्रोण।
जयांचे उपकार असाधारण, आम्हां बहुत ॥ २२२ ॥
एथ शालक सासरे मातुळ, आणी बंधु कीं हें सकळ।
पुत्र नातू केवळ, इष्टही असती ॥ २२३ ॥
अवधारीं अति जवळिकेचे, हे सकळही सोयरे आमुचे।
म्हणोनि दोष आथि वाचे, बोलतांचि ॥ २२४ ॥
एतान्न हन्तुमिछामि घ्नतोऽपि मघुसूदन।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं न महीकृते ॥ ३५ ॥
हे वरी भलतें करितु, आंताचि एथें मारितु।
परि आपण मनें घातु, न चिंतावा ॥ २२५ ॥
त्रैलोक्यींचे अनकळित, जरी राज्य होईल एथ।
तरी हें अनुचित, नाचरें मी ॥ २२६ ॥
जरी आज एथ ऐसें कीजे, तरी कवणांचा मनीं उरिजे।
सांग मुख केवीं पाहिजे, तुझे कृष्णा ॥ २२७ ॥
निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन।
पापनेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ॥ ३६ ॥
जरी वधु करूनी गोत्रजांचा, तरी वसौटा होऊन दोषांचा।
मज जोडलासि तूं हातींचा, दूरी होसी ॥ २२८ ॥
कुळहरणीं पातकें, तिये आंगीं जडती अशेखें।
तयें वेळी तूं कवण कें, देखावासी ॥ २२९ ॥
जैसा उद्यानामाजीं अनळु, संचरला देखोनि प्रबळु।
मग क्षणभरी कोकिळु, स्थिर नोहे ॥ २३० ॥
सकर्दम सरोवरु, अवलोकूनि चकोरु।
न सेवितु अव्हेरु, करूनि निघे ॥ २३१ ॥
तयापरी तूं देवा, मज झकों न येसी मावा।
जरी पुण्याचा वोलावा, नाशिजेल ॥ २३२ ॥
तस्मान्नार्हा वयं हन्तुम् धार्तराष्ट्रान्स्वबांधवान्।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ ३७ ॥
म्हणोनि मी हें न करीं, इये संग्रामीं शस्त्र न धरीं।
हें किडाळ बहुतीं, परीं दिसतसे ॥ २३३ ॥
तुझा अंतराय होईल, मग सांगें आमचें काय उरेल।
तेणें दुःखे हियें फुटेल, तुजवीण कृष्णा ॥ २३४ ॥
म्हणावूनि कौरव हे वधिजती, मग आम्हीं भोग भोगिजती।
हे असो मात अघडती, अर्जुन म्हणे ॥ २३५ ॥
यद्यप्यते न पश्यंति लोभोपहृतचेतसः।
कुलक्षयकृतंदोषं मित्रद्रोहे च पातकम् ॥ ३८ ॥
कथं ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम्।
कुलक्षयकृतम् दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥ ३९ ॥
हे अभिमानपदे भुलले, जरी पां संग्रामा आले।
तर्हीि आम्हीं हित आपुलें, जाणावें लागे ॥ २३६ ॥
हें ऐसें कैसें करावें, जे आपुले आपण मारावे।
जाणत जाणतांचि सेवावें, कालकूट ॥ २३७ ॥
हां जी मार्गीं चालतां, पुढां सिंह जाहला अवचितां।
तो तंव चुकवितां, लाभु आथी ॥ २३८ ॥
असता प्रकाशु सांडावा, मग अंधकूप आश्रावा।
तरी तेथ कवणु देवा, लाभु सांगे ॥ २३९ ॥
का समोर अग्नि देखोनी, जरी न वचिजे वोसंडोनी।
तरी क्षणा एका कवळूनि, जांळू सके ॥ २४०॥
तैसे दोष हे मूर्त, अंगी वाजों असती पहात।
हें जाणतांही केवीं एथ, प्रवर्तावें ॥ २४१ ॥
ऐसें पार्थ तिये अवसरीं, म्हणे देवा अवधारीं।
या कल्मषाची थोरी, सांगेन तुज ॥ २४२ ॥
कुलक्षये प्रणश्यंति कुलधर्माः सनातनः।
धर्मे नष्टे कुलं कृत्सनमधर्मोऽभिभवत्युत ॥ ४० ॥
जैसें काष्ठें काष्ठ मथिजे, येथ वन्हि एक उपजे।
तेणें काष्ठजात जाळिजे, प्रज्वळलेनि ॥ २४३ ॥
तैसा गोत्रींची परस्परें, जरी वधु घडे मत्सरें।
तरी तेणें महादोषें घोरें, कुळचि नाशे ॥ २४४॥
म्हणवूनि येणें पापें, वंशजधर्मु लोपे।
मग अधर्मुचि आरोपे, कुळामाजि ॥ २४५ ॥
अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यंति कुलस्त्रियः।
स्त्रीसु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः ॥ ४१ ॥
एथ सारासार विचारावें, कवणे काय आचरावें।
आणि विधिनिषेध अघवे, पारुषति ॥ २४६ ॥
असता दीपु दवडीजे, मग अंधकारीं राहाटिजे।
जे उजूंचि का आडळिजे, जयापरी ॥ २४७ ॥
तैसा कुळीं कुळक्षयो होय, तये वेळी तो आद्य धर्मु जाय।
मग आन कांहीं आहे, पापांवाचुनि ॥ २४८ ॥
जैं यमनियम ठाकती, तेथ इंद्रियें सैरा विचरती।
म्हणवूनि व्यभिचार घडती, कुळस्त्रियांसी ॥ २४९ ॥
उत्तम अधमीं संचरती, ऐसे वर्णावर्ण मिसळती।
तेथ समूळ उपडती, जातिधर्म ॥ २५० ॥
जैसी चोहटाचिया बळी, पाविजे सैरा काऊळीं।
तैसीं महापापें कुळीं प्रवेशती ॥ २५१ ॥
संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च।
पतंति पितरि ह्येषां लुप्तपिंडिदकक्रियाः ॥ ४१॥
मग कुळा देखा अशेखा, आंणि कुळघातका।
येरयेरा नरक, जाणें आथी ॥ २५२ ॥
देखें वंशवृद्धि समस्त, यापरी होय पतित।
मग मग वोवांडिती स्वर्गस्थ, पूर्वपुरुष ॥ २५३ ॥
जेथ नित्यादि क्रिया ठाके, आणि नैमित्तिक पारुखे ।
तेथ कवणा तिळोदकें, कवण अर्पी ॥ २५४ ॥
तरी पितर काय करिती, कैसेनि स्वर्गीं बसती।
म्हणोनि तेही येती, कुळापासी ॥ २५५ ॥
जैसा नखाग्रीं व्याळु लागे, तो शिखांत व्यापी वेगें।
तेवी आब्रह्म कुळ अवघें, आप्लविजे ॥ २५६ ॥
दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः।
उत्साद्यंते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वतः ॥ ४३ ॥
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन।
नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥ ४४ ॥
अहो वत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयमं।
यद् राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥ ४५ ॥
देवा अवधारी आणिक एक, एथ घडे महापातक।
जै संगदोषें हा लौकिक, भ्रंशु पावे ॥ २५७ ॥
जैसा घरीं आपुला, वानिवसे वन्ही लागला।
तो आणिकांही प्रज्वळिला, जाळुनि घाली ॥ २५८ ॥
तैसिया तया कुळसंगती, जे जे लोक वर्तती।
तेही बाधु पावती, निमित्तें येणें ॥ २५९ ॥
तैसें नाना दोषें सकळ, अर्जुन म्हणे तें कुळ।
मग महाघोर केवळ, निरय भोगी ॥ २६० ॥
पडिलिया तिये ठायीं, मग कल्पांतीही उगंडु नाही।
येसणें पतन कुळक्षयीं, अर्जुन म्हणे ॥ २६१ ॥
देवा हें विविध कानीं ऐकिजे, परि अझुनिवरी त्रासु नुपजे।
हृदय वज्राचें हें काय कीजे, अवधारी पां ॥ २६२ ॥
अपेक्षिजे राज्यसुख, जयालागीं तें तंव क्षणिक।
ऐसे जाणतांही दोख, अव्हेरू ना ॥ २६३ ॥
हे वडिल सकळ आपुले, वधावया दिठी सूदले।
सांग पां काय थेकुलें, घडले आम्हा ॥ २६४ ॥
यदि मामप्रतीकारमशस्त्रतं शस्त्रपाणयः।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तनं मे क्षेमतरं भवेत् ॥ ४६ ॥
आतां यावरी जें जियावें, तयापासूनि हें बरवे।
जे शस्त्र सांडूनि साहावे, बाण त्यांचे ॥ २६५ ॥
तयावरी होय जितुकें, तें मरणही वरी निकें।
परी येणें कल्मषें, चाड नाहीं ॥ २६६ ॥
ऐसें देखोनि सकळ, अर्जुनें आपुलें कुळ ।
मग म्हणे राज्य तें केवळ, निरयभोगु ॥ २६७ ॥
संजय उवाचः
एवमुक्तवार्जुन: संख्ये रथोपस्य उपाविशत्।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥ ४७ ॥
ऐसें तिये अवसरीं, अर्जुन बोलिला समरीं।
संजयो म्हणे अवधारी, धृतराष्ट्रातें ॥ २६८ ॥
मग अत्यंत उद्वेगला, न धरत गहिंवरू आला।
तेथ उडी घातली खालां, रथौनियां ॥ २६९ ॥
जैसा राजकुमरु पदच्युतु, सर्वथा होय उपहृतु।
कां रवि राहुग्रस्तु, प्रभाहीनु ॥ २७० ॥
ना तरी महासिद्धीसंभ्रमें, जिंतला त्रासु भ्रमे।
मग आकळुनि कामें, दीनु कीजे ॥ २७१ ॥
तैसा तो धनुर्धरु, अत्यंत दुःखें जर्जरु।
दिसे जेथ रहंवरु, त्यजिला तेणें ॥ २७२ ॥
मग धनुष्यबाण सांडिले, न धरत अश्रुपात आले।
ऐसें ऐके राया तेथ वर्तलें, संजयो म्हणे ॥ २७३ ॥
आता यावरी तो वैकुंठ्नाथु, देखोनि सखेद पार्थु।
कवणेपरी परमार्थु, निरुपील ॥ २७४ ॥
ते सविस्तर पुढारी कथा, अति सकौतुक ऐकतां।
ज्ञानदेव म्हणे आतां निवृत्तिदासु ॥ २७५ ॥
ज्ञानेश्वरी / अध्याय दुसरा : संत ज्ञानेश्वर
संजय उवाच : तं तथा कृपयाविष्टमश्रूपूर्णाकुलेक्षणम्।विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ १॥
मग संजयो म्हणे रायातें, आइकें तो पार्थु तेथें।
शोकाकुल रुदनातें, करितुसे ॥ १॥
तें कुळ देखोनि समस्त, स्नेह उपनलें अद्भुत।
तेणें द्रवले असे चित्त, कवणेपरी ॥ २ ॥
जैसें लवण जळें झळंबलें, ना तरी अभ्र वातें हाले।
तैसे सधीर परी विरमलें, हृदय तयाचें ॥ ३॥
म्हणोनि कृपा आकळिला, दिसतसे अति कोमाइला।
जैसा कर्दमीं रुपला, राजहंस ॥ ४ ॥
तयापरी तो पांडुकुमरु, महामोहें अतिजर्जरु।
देखोनि, शार्गङधरु, काय बोले ॥ ५ ॥
श्रीभगवानुवाच : कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम्।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तीकरमर्जुन ॥ २ ॥
म्हणे अर्जुना आदि पाहीं, हें उचित काय इये ठायीं।
तूं कवण हें कायी, करीत आहासी ॥ ६ ॥
तुज सांगे काय जाहलें, कवण उणें आलें।
करितां काय ठेलें, खेदु कायिसा ॥ ७ ॥
तूं अनुचिता चित्त नेदिसी, धीरु कंहीच न संडिसी।
तुझेनि नामे अपयशीं, दिशा लंघिजे ॥ ८ ॥
तू शूरवृत्तीचा ठावो, क्षत्रियांमाजीं रावो।
तुझिया लाठेपणाचा आवो, तिहीं लोकीं ॥ ९ ॥
तुवा संग्रामीं हरु जिंतिला, निवात्कवचांचा ठावो फेडिला।
पवाडा तुवां केला, गंधर्वासी ॥ १० ॥
हें पाहता तुझेनि पाडें, दिसे त्रैलोक्यही थोकडें।
ऐसें पौरुष चोखडें, पार्था तुझे ॥ ११ ॥
तो तूं कीं आजि एथें, सांडुनिया वीरवृत्तीतें।
अधोमुख रुदनातें, करितु आहासी ॥ १२ ॥
विचारीं तूं अर्जुनु, कीं कारुण्यें कीजसी दीनु।
सांग पां अंधकारे, भानु ग्रासिला आथी ॥ १३ ॥
ना तरी पवनु मेघासी बिहे, कीं अमृतासी मरण आहे।
पाहे पा इंधनचि गिळोनि जाये, पावकातें ॥ १४ ॥
की लवणेंचि जळ विरे, संसर्गें काळकूट मरे।
सांग महाफणी दर्दुरें, गिळिजे कायी ॥ १५ ॥
सिंहासी झोंबे कोल्हा, ऐसा अपाडु आथी कां जाहला।
परी तो त्वां साच केला, आजि एथ ॥ १६ ॥
म्हणोनि अझुनि अर्जुना, झणें चित्त देसी या हीना।
वेगीं धीर करूनियां मना, सावधान होईं ॥ १७ ॥
सांडी हे मूर्खपण, उठीं घे धनुष्यबाण,
संग्रामीं हें कवण, कारुण्य तुझे ॥ १८ ॥
हां गा तू जाणता, तरी न विचारीसी कां आता।
सांगे झुंजावेळें सदयता, उचित कायी ॥ १९ ॥
हे असतिये कीर्तीसी नाशु, आणि पारत्रिकासी अपभ्रंशु।
म्हणे जगन्निवासु, अर्जुनातें ॥ २० ॥
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत् त्वय्युपपद्यते।
क्षुद्रं ह्रदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥ ३ ॥
म्हणोनि शोक न करीं, तूं पुरता धीरु धरीं।
हे शोच्यता अव्हेरीं, पंडुकुमरा ॥ २१ ॥
तुज नव्हे हें उचित, येणें नासेल जोडले बहुत।
तूं अझुनिवरी हित, विचारी पां ॥ २२ ॥
येणें संग्रामाचेनि अवसरें, एथ कृपाळुपण नुपकरे।
हे आतांचि काय सोयरे, जाहले तुज ॥ २३ ॥
तूं आधींचि काय नेणसी, कीं गोत्र नोळखसी।
वायांचि काय करिसी, अतिशो आतां ॥ २४ ॥
आजिंचे हें काय झुंज, काय जन्मा नवल तुज।
हें परस्परें तुम्हां व्याज, सदाचि आथि ॥ २५ ॥
तरी आतां काय जाहलें, कायि स्नेह उपनले।
हें नेणिजे परि कुडे केले, अर्जुना तुवा ॥ २६ ॥
मोह धरिलिया ऐसें होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल।
आणि परलोकही अंतरेल, ऐहिकेंसी ॥ २७ ॥
हृदयाचे ढिलेपण, एथ निकयासी नव्हे कारण।
हें संग्रामीं पतन जाण, क्षत्रीयांसी ॥ २८ ॥
ऐसेनि तो कृपावंतु, नानापरी असे शिकवितु।
हे ऐकोनि पंडुसुतु, काय बोले ॥ २९ ॥
अर्जुन उवाचः कथं च भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन।
इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥ ४॥
देवा हें येतुलेवरी, बोलावे नलगे अवधारीं।
आधीं तूंचि चित्ती विचारीं, संग्रामु हा ॥ ३० ॥
हें झुंज नव्हे प्रमादु, एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु।
हा उघडा लिंगभेदु, वोढवला आम्हा ॥ ३१ ॥
देखें मातापितरें अर्चिजती, सर्वस्वें तोष पावविजती,
तियें पाठीं केवीं वधिजती, आपुला हातीं ॥ ३२ ॥
देवा संतवृंदु नमस्कारिजे, कां घडे तरी पूजिजे।
हें वांचूनि केवीं निंदिजे, स्वयें वाचा ॥ ३३ ॥
तैसे गोत्रगुरु आमुचे, हे पूजनीय आम्हां नियमांचे।
मज बहुत भीष्मद्रोणांचे, वर्ततसे ॥ ३४ ॥
जयालागीं मनें विरु, आम्ही स्वप्नींही न शको धरूं।
तया प्रत्यक्ष केवीं, घातु देवा ॥ ३५ ॥
वर जळो हें जियालें, एथ आघवेयांसी हेंचि काय जाहले।
जे यांचां वधीं अभ्यासिलें, मिरविजे आम्हीं ॥ ३६ ॥
मी पार्थु द्रोणाचा केला, येणें धनुर्वेदु मज दिधला।
तेणें उपकारें काय आभारैला, वधीं तयातें ॥ ३७ ॥
जेथींचिया कृपा लाभिजे वरु, तेथेंचि मने व्यभिचारु।
तरी काय मी भस्मासुरु, अर्जुन म्हणे ॥ ३८ ॥
गुरूनहत्वा हि महानुभवान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥ ५ ॥
देवा समुद्र गंभीर आइकिजे, वर तोहि आहाच देखिजे।
परी क्षोभु मनीं नेणिजे, द्रोणाचिये ॥ ३९ ॥
हें अपार जें गगन, वर तयाही होईल मान।
परि अगाध भलें गहन, हृदय यांचे ॥ ४० ॥
वरी अमृतही विटे, कीं काळवशें वज्र फुटे।
परि मनोधर्मु न लोटे, विकरविला हा ॥ ४१ ॥
स्नेहालागीं माये, म्हणिपे तें कीरु होये।
परि कृपा ते मूर्त आहे, द्रोणीं इये ॥ ४२ ॥
हा कारुण्याची आदि, सकळ गुणांचा निधि।
विद्यासिंधु निरवधि, अर्जुन म्हणे ॥ ४३ ॥
हा येणें मानें महंतु, वरी आम्हांलागी कृपावंतु।
आतां सांग पां येथ घातु, चिंतूं येईल ॥ ४४ ॥
ऐसे हे रणीं वधावे, मग आपण राज्यसुख भोगावें।
तें मना न ये आघवें, जीवितेंसीं ॥ ४५ ॥
हें येणें मानें दुर्भर, जे याहीहुनि भोग सधर।
ते असतु येथवर, भिक्षा मागतां भली ॥ ४६ ॥
ना तरी देशत्यागें जाइजे, का गिरिकंदर सेविजे।
परी शस्त्र आतां न धरिजे, इयांवरी ॥ ४७ ॥
देवा नवनिशतीं शरीं, वावरोनि यांचां जिव्हारीं।
भोग गिंवसावे रुधिरीं, बुडाले जे ॥ ४८ ॥
ते काढूनि काय कीजती, लिप्त केवीं सेविजती।
मज न ये हे उपपत्ति, याचिलागीं ॥ ४९ ॥
ऐसे अर्जुन तिये अवससरीं, म्हणे श्रीकृष्णा अवधारीं।
परि ते मना न येचि मुरारी, आइकोनियां ॥ ५० ॥
हें जाणोनि पार्थु बिहाला, मग पुनरपि बोलों लागला,
म्हणे देवो कां चित्त या बोलां, देतीचिना ॥ ५१ ॥
न चैतद् विद्मः करतन् नो गरीयो यद् वा जयेम यदि वा नो जयेयुः।
यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥ ६ ॥
येर्ह वीं माझां चित्तीं जें होते, तें मी विचारूनि बोलिलों एथें।
परि निकें काय यापरौते, तें तुम्ही जाणा ॥ ५२ ॥
पै विरु जयांसी ऐकिजे, आणि या बोलाचि प्राणु सांडिजे।
ते एथ संग्रामव्याजें, उभे आहाती ॥ ५३ ॥
आतां ऐसेयांतें वधावे, कीं अव्हेरुनिया निघावें।
या दोहोंमाजी काइ करावे, तें नेणों आम्ही ॥ ५४ ॥
कार्पण्यदोषोपहत्स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः।
यत् श्रेयः स्यान् निश्चितं ब्रूहि तन् मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥ ७॥
आम्हां काय उचित, तें पाहतां न स्फुरे एथ।
जे मोहें येणें चित्त, व्याकुळ माझे ॥ ५५ ॥
तिमिरावरुद्ध जैसें, दृष्टीचे तेज भ्रंशे।
मग पांसीच असतां न दिसे, वस्तुजात ॥ ५६ ॥
देवा मज तैसे जाहले, जें मन भ्रांती ग्रासिलें।
आतां काय हित आपुलें, तेंही नेणे ॥ ५७ ॥
तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें, निकें तें आम्हां सांगावें।
जे सखा सर्वस्व आघवें, आम्हांसी तूं ॥ ५८ ॥
तूं गुरु बंधु पिता, तूं आमची इष्ट देवता।
तूंचि सदा रक्षिता, आपदीं आमुतें ॥ ५९ ॥
जैसा शिष्यांते गुरु, सर्वथा नेणे अव्हेरु।
कीं सरितांते सागरु, त्यजी केवीं ॥ ६०॥
नातरी अपत्यातें माये, सांडुनि जरी जाये।
तरी ते कैसेनिं जिये, ऐकें कृष्णा ॥ ६१ ॥
तैसा सर्वांपरी आम्हांसी, देवा तूंचि एक आहासी।
आणि बोलिलें जरी न मानिसी, मागील माझें ॥ ६२ ॥
तरी उचित काय आम्हां, जे व्यभिचरेना धर्मा।
तें झडकरी पुरुषोत्तमा, सांगें आतां ॥ ६३ ॥
न हि प्रपश्यामि ममापुनुद्याद् यच्छोकमुछोषणमिन्द्रियाणाम्।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥ ८ ॥
हें सकळ कुळ देखोनि, जो शोकु उपजलासे मनीं।
तो तुझिया वाक्यावांचुनि, न जाय आणिकें ॥ ६४ ॥
एथ पृथ्वीतळ आपु होईल, हें महेंद्रपदही पाविजेल।
परि मोह हा न फिटेल, मानसींचा ॥ ६५ ॥
जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं, तरी सुक्षेत्री जर्ही पेरिलीं।
तरी न विरुढती सिंचलीं, आवडे तैसीं ॥ ६६ ॥
ना तरी आयुष्य पुरलें आहे, तरी औषधें काही नोहे।
एथ एकचि उपेगा जाये, परमामृत ॥ ६७ ॥
तैसे राज्यभोगसमृद्धि, उज्जीवन नोहे जीवबुद्धि।
एथ जिव्हाळा कृपानिधि, कारुण्य तुझें ॥ ६८ ॥
ऐसें अर्जुन तेथ बोलिला, जंव क्षण एक भ्रांति सांडिला।
मग पुनरपि व्यापिला, उर्मीं तेणें ॥ ६९ ॥
कीं मज पाहता उर्मी नोहे, हें अनारिसें गमत आहे।
तो ग्रासिला महामोहें, काळसर्पें ॥ ७० ॥
सवर्म हृदयकल्हारीं, तेथ कारुण्यवेळेचां भरीं।
लागला म्हणोनि लहरी, भांजेचि ना ॥ ७१ ॥
हें जाणोनि ऐसी प्रौढी, जो दृष्टीसवें विष फेडी।
तो धावया श्रीहरी गारुडी, पातला कीं ॥ ७२ ॥
तैसिया पंडुकुमरा व्याकुळा, मिरवतसे श्रीकृष्ण जवळा।
तो कृपावशें अवलीळा, रक्षील आतां ॥ ७३ ॥
म्हणोनि तो पार्थु, मोहफणिग्रस्तु।
म्यां म्हणितला हा हेतु, जाणोनियां ॥ ७४ ॥
मग देखा तेथ फाल्गुनु, घेतला असे भ्रांती कवळूनु।
जैसा घनपडळीं भानु, आच्छादिजे ॥ ७५ ॥
तयापरी तो धर्नुधरू, जाहलासे दुःखे जर्जरु।
जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु, वणवला कां ॥ ७६ ॥
म्हणोनि सहजे सुनिळु, कृपामृते सजळु।
तो वोळलासे श्रीगोपाळु, महामेघु ॥ ७७ ॥
तेथ सुदर्शनाची द्युति, तेचि विद्युल्लता झळकती।
गंभीर वाचा ते आयती, गर्जनेची ॥ ७८ ॥
आतां तो उदार कैसा वर्षेल, तेणे अर्जुनाचळु निवेल।
मग नवी विरुढी फुटेल, उन्मेषाची ॥ ७९ ॥
ते कथा आइका, मनाचिया आराणुका।
ज्ञानदेवो म्हणे देखा, निवृत्तिदासु ॥ ८० ॥
संजय उवाच: एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परंतपः।
न योत्स्य इति गोविंदमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ ९ ॥
ऐसें संजयो सांगतु, म्हणे राया तो पार्थु।
पुनरपि शोकाकुलितु, काय बोले ॥ ८१ ॥
आइकें सखेदु बोले श्रीकृष्णातें, आतां नाळवावें तुम्हीं मातें।
मी सर्वथा न झुंजें येथें, भरंवसेनि ॥ ८२ ॥
ऐसें येकि हेळां बोलिला, मग मौन धरोनि ठेला।
तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला, देखोनि तयाते ॥ ८३ ॥
तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत।
सेनयोरुभयोर्मध्ये विषीदंतमिदं वचः ॥ १० ॥
मग आपुला चित्तीं म्हणे, एथ हें काय आदरिलें येणें।
अर्जुन सर्वथा कांही नेणे, काय कीजे ॥ ८४ ॥
हा उमजे आतां कवणेपरी, कैसेनि धीरु स्वीकारी।
जैसा ग्रहाते पंचाक्षरी, अनुमानी कां ॥ ८५ ॥
ना तरी असाध्य देखोनि व्याधी, अमृतासम दिव्य औषधी।
वैद्य सूचि निरवधि, निदानींची ॥ ८६ ॥
तैसा विवरितु असे श्रीअनंतु, तया दोन्हीं सैन्याआंतु।
जयापरी पार्थु, भ्रांति सांडी ॥ ८७ ॥
तें कारण मनीं धरिलें, मग सरोष बोलों आदरिले।
जैसें मातेच्या कोपीं थोकलें, स्नेह आथी ॥ ८८ ॥
कीं औषधाचिया कडुवटपणीं, जैसी अमृताची पुरवणी।
ते आहाच न दिसे परी गुणीं, प्रकट होय ॥ ८९ ॥
तैसे वरिवरि पाहतां उदासें, आंत तरी अतिसुरसें।
तियें वाक्यें हृषीकेशें, बोलों आदरिलीं ॥ ९० ॥
श्रीभगवानुवाच: अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे।
गतासूनगतासूंश्च नानुशोचंति पंडितः ॥ ११ ॥
मग अर्जुनाते म्हणितलें, आम्ही आजि हें नवल देखिलें।
जें तुवां येथ आदरिलें, माझारींचि ॥ ९१ ॥
तूं जाणता तरी म्हणविसी, परी नेणीवेतें न संडिसी।
आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी, बहुसाल नीति ॥ ९२ ॥
जात्यंधा लागे पिसें, मग तें सैरा धांवे जैसें।
तुझे शहाणपण तैसें, दिसतसे ॥ ९३ ॥
तूं आपणपें तरी नेणसी, परी या कौरवांते शोचूं पहासी,
हा बहु विस्मय आम्हांसी, पुढतपुढती ॥ ९४ ॥
तरी सांग पां मज अर्जुना, तुजपासोनि स्थिती या त्रिभुवना।
हे अनादि विश्वरचना, तें लटकें कायी ॥ ९५ ॥
एथ समर्थु एक आथीं, तयापासूनि भूतें होती।
तरी हें वायाचि काय बोलती, जगामाजीं ॥ ९६ ॥
हो कां सांप्रत ऐसें जहालें, जे हे जन्ममृत्यू तुवा सृजिले।
आणि नाशु पाविले, तुझेनि कायी ॥ ९७ ॥
तूं भ्रमलेपणें अहंकृती, यांसी घातु न करिसी चितीं।
तरी सांगे कायि हे होती, चिरंतन ॥ ९८ ॥
कीं तूं एक वधिता, आणि सकळ लोकु हा मरता।
ऐसी भ्रांति झणें चित्ता, येवो देसी ॥ ९९ ॥
अनादिसिद्ध हें आघवें, होत जात स्वभावें।
तरी तुवा का शोचावे, सांग मज ॥ १०० ॥
परी मूर्खपणे नेणसी, न चिंतावें तें चिंतसी।
आणि तूंचि नीति सांगसी, आम्हाप्रति ॥ १०१ ॥
देखें जे विवेकी जे होती, ते दोहींतेही न शोचती।
जे होय जाय हे भ्रांती, म्हणऊनियां ॥ १०२ ॥
न त्वेवाहं जातुं नासं न त्वं नेमे जनाधिपाः।
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ १२ ॥
अर्जुना सांगेन आइक, एथ आम्ही तुम्ही देख।
आणि हे भूपति अशेख, आदिकरुनी ॥ १०३ ॥
नित्यता ऐसेचि असोनि, ना तरी निश्चित क्षया जाऊनि।
हे भ्रांति वेगळी करूनी, दोन्हीं नाहीं ॥ १०४ ॥
हे उपजे आणि नाशे, ते मायावशें दिसे।
येर्ह वीं तत्वता वस्तु जे असे, ते अविनाशचि ॥ १०५ ॥
जैसें पवनें तोय हालविलें, आणि तरंगाकार जाहलें।
तरी कवण कें जन्मलें, म्हणों ये तेथ ॥ १०६ ॥
तेंचि वायूचे स्फुरण ठेलें, आणि उदक सहज सपाटलें।
तरी आता काय निमालें, विचारीं पां ॥ १०७ ॥
देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा।
तथा देहांतरप्राप्तिर्धीरस्त्तत्र न मुह्यति ॥ १३ ॥
आइकें शरीर तरी एक, परी वयसा भेद अनेक।
हें प्रत्यक्षचि देख, प्रमाण तूं ॥ १०८ ॥
एथ कौमारत्व दिसे, मग तारुण्यीं तें भ्रंशे।
परी देहचि न नाशे, एकेकासवें ॥ १०९ ॥
तैसीं चैतन्याचां ठायीं, इयें शरीरांतरे होति जाति पाहीं।
ऐसें जाणे जया नाहीं, व्यामोहदुःख ॥ ११० ॥
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ १४ ॥
एथ नेणावया हेंचि कारण, जें इंद्रियांआधीनपण।
तिहीं आकळिजे अंतःकरण, म्हणऊनि भ्रमे ॥ १११ ॥
इंद्रियें विषय सेविती, तेथ हर्ष शोकु उपजती।
ते अंतर आप्लविती, संगें येणें ॥ ११२ ॥
जयां विषायांचां ठायीं, एकनिष्ठता कहीं नाहीं।
तेथ दुःख आणि कांहीं, सुखहि दिसे ॥ ११३ ॥
देखें हे शब्दाची व्याप्ति, निंदा आणि स्तुति।
तेथ द्वेषाद्वेष उपजति, श्रवणद्वारें ॥ ११४ ॥
मृदु आणि कठीण, जे स्पर्शाचे दोन्ही गुण।
जे वपूचेनि संगे कारण संतोषखेदां ॥ ११५ ॥
भ्यासुर आणि सुरेख, हें रुपाचें स्वरूप देख।
जें उपजवी सुखदुःख, नेत्राद्वारें ॥ ११६ ॥
सुगंधु आणि दुर्गंधु, हा परिमळाचा भेदु।
जो घ्राणसंगे विषादु -, तोषु देता ॥ ११७ ॥
तैसाचि द्विविध रसु, उपजवी प्रीतित्रासु।
म्हणूनि हा अपभ्रंशु, विषयसंगु ॥ ११८ ॥
देखें इंद्रियां आधीन होईजे।तें शीतोष्णांते पाविजे।
आणि सुखदुःखी आकळिजे, आपणपें ॥ ११९ ॥
या विषयावांचूनि कांही, आणीक सर्वथा रम्य नाहीं।
ऐसा स्वभावोचि पाहीं, इंद्रियांचा ॥ १२० ॥
हे विषय तरी कैसे, रोहिणीचें जळ जैसें।
कां स्वप्नींचा आभासे, भद्रजाति ॥ १२१ ॥
देखें अनित्य तियापरी, म्हणऊनि तूं अव्हेरीं।
हा सर्वथा संगु न धरीं, धनुर्धरा ॥ १२२ ॥
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषषर्भ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ १५ ॥
हे विषय जयाते नाकळिती, तयाते सुखदुःखें दोन्ही न पवती।
आणि गर्भवासुसंगती, नाहीं तया ॥ १२३ ॥
तो नित्यरूपु पार्था, वोळखावा सर्वथा।
जो या इंद्रियार्था, नागवेचि ॥ १२४ ॥
नासंतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः ॥ १६ ॥
आतां अर्जुना आणिक कांही एक, सांगेन मी आइक।
जें विचारें परलोक, वोळखिती ॥ १२५ ॥
या उपाधिमाजि गुप्त, चैतन्य असे सर्वगत।
तें तत्वज्ञ संत, स्वीकारिती ॥ १२६ ॥
सलिलीं पय जैसें, एक होऊन मीनलें असे।
परीं निवडूनि राजहंसें, वेगळें कीजे ॥ १२७ ॥
कीं अग्निमुखें किडाळ, तोडोनियां चोखाळ।
निवडिती केवळ, बुद्धिमंत ॥ १२८ ॥
ना तरी जाणिवेच्या आयणी, करितां दधिकडसणी।
मग नवनीत निर्वाणीं, दिसे जैसें ॥ १२९ ॥
कीं भूस बीज एकवट, उपणितां राहे घनवट।
तेथ उडे तें फलकट, जाणों आले ॥ १३० ॥
तैसें विचारितां निरसलें, तें प्रपंचु सहजें सांडवलें।
मग तत्वता तत्व उरलें, ज्ञानियांसी ॥ १३१ ॥
म्हणोनि अनित्याचां ठायीं, तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं।
निष्कर्ष दोहींही, देखिला असे ॥ १३२ ॥
अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमैदं तत्।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति ॥ १७ ॥
देखें सारासार विचारितां, भ्रांति जे पाहीं असारता।
तरी सार तें स्वभावता, नित्य जाणें ॥ १३३ ॥
हा लोकत्रयाकारु, तो जयाचा विस्तारु।
तेथ नाम वर्ण आकारु, चिन्ह नाही ॥ १३४ ॥
जो सर्वदा सर्वगतु, जन्मक्षयातीतु।
तया केलियाहि घातु, कदाचि नोहे ॥ १३५ ॥
अन्तवंतः इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्याद् युध्यस्व भारत ॥ १८ ॥
आणि शरीरजात हे आघवें, हें नाशवंत स्वभावें।
म्हणोनि तुवा झुंजावें, पंडुकुमरा ॥ १३६ ॥
य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम्।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ १९ ॥
तूं धरूनि देहाभिमानातें, दिठी सूनि या शरीरातें।
मी मारिता हे मरते, म्हणत आहासी ॥ १३७ ॥
तरी अर्जुना तूं हें नेणसी, जरी तत्वता विचारिसी।
तरी वधिता तूं नव्हेसी, हे वध्य नव्हती ॥ १३८ ॥
न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता न भूयः।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २० ॥
वेदाविनाशिनं नित्यं य एनमजव्ययम्।
कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥ २१ ॥
जैसें स्वप्नामाजिं देखिजे, तें स्वप्नींचि साच आपजे।
मग चेऊनियां पाहिजे, तंव कांही नाहीं ॥ १३९ ॥
तैसी हे जाण माया, तूं भ्रमत आहासी वायां।
शस्त्रें हाणितलिया छाया, जैसी आंगी न रुपे ॥ १४० ॥
कां पूर्ण कुंभ उलंडला, तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला।
परी भानु नाहीं नासला, तयासवें ॥ १४१ ॥
ना तरी मठीं आकाश जैसें, मठाकृती अवतरले असे।
तो भंगलिया आपैसे, स्वरूपचि ॥ १४२ ॥
तैसें शरीराचां लोपीं, सर्वथा नाशु नाहीं स्वरूपीं।
म्हणऊनि तूं हें नारोपीं, भ्रांति बापा ॥ १४३॥
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नावानि देही ॥ २२॥
जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वेढिजे।
तैसे देहांतराते स्वीकारिजे, चैतन्यनाथें ॥ १४४ ॥
नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २३॥
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च।
नित्य सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २४ ॥
हा अनादि नित्यसिद्धु, निरुपाधि विशुद्धु।
म्हणऊनि शस्त्रादिकीं छेदु, न घडे यया ॥ १४५ ॥
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ २५ ॥
हा प्रळयोदके नाप्लवे, अग्निदाहो न संभवे।
एथ महाशोषु न प्रभवे, मारुताचा ॥ १४६ ॥
अर्जुना हा नित्यु, अचळु हा शाश्वतु।
सर्वत्र सदोदितु, परिपूर्णु हा ॥ १४७ ॥
हा तर्काचिये दिठी, गोचर नोहे किरिटी।
ध्यान याचिये भेटी, उत्कंठा वाहे ॥ १४८ ॥
हा सदा दुर्लभु मना, आपु नोहे साधना।
निःसीमु हा अर्जुना, पुरुषोत्तमु ॥ १४९ ॥
हा गुणत्रयरहितु, व्यक्तीसी अतीतु।
अनादि अविकृतु, सर्वरूप ॥ १५० ॥
अर्जुना ऐसा जाणावा, हा सकळात्मकु देखावा।
मग सहजे शोकु आघवा, हरेल तुझा ॥ १५१ ॥
अथ चैनं नित्यजात नित्यं वा मन्यसे मृतं।
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥ २६ ॥
अथवा ऐसा नेणसी, तूं अंतवंतचि हें मानिसी।
तर्हीऐ शोचूं न पवसी, पंडुकुमरा ॥ १५२ ॥
जे आदि-स्थिती- अंतु, हा निरंतर असे नित्यु।
जैसा प्रवाहो अनुस्यूतु, गंगाजळाचा ॥ १५३ ॥
तें आदि नाहीं खंडले, समुद्रीं तरी असे मिनलें।
आणि जातचि मध्यें उरले, दिसे जैसें ॥ १५४॥
इये तिन्हीं तयापरी, सरसींच सदा अवधारीं।
भूतांसी कवणीं अवसरीं, ठाकती ना ॥ १५५ ॥
म्हणोनि हे आघवें, एथ तुज न लगे शोचावें।
जे स्थितीची हे स्वभावें, अनादि ऐसी ॥ १५६ ॥
ना तरी हे अर्जुना, न येचि तुझिया मना।
जे देखोनि लोकु अधीना, जन्मक्षया ॥ १५७ ॥
तरी येथ कांही, तुज शोकासि कारण नाहीं।
जे जन्ममृत्यु हे पाहीं, अपरिहर ॥ १५८ ॥
जातस्य हि धृवो मृत्युर्धृवं जन्म मृतस्य च।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥ २७ ॥
उपजे तें नाशे, नाशलें पुनरपि दिसे।
हें घटिकायंत्र तैसें, परिभ्रमे गा ॥ १५९ ॥
ना तरी उदो अस्तु आपैसे, अखंडित होत जात जैसें।
हें जन्ममरण तैसें, अनिवार जगीं ॥ १६० ॥
महाप्रळय अवसरे, हें त्रैलोक्यही संहरे।
म्हणोनि हा परिहरे, आदि अंतु ॥ १६१ ॥
तूं जरी हे ऐसें मानसी, तरी खेदु कां करिसी।
काय जाणतचि नेणसी, धनुर्धरा ॥ १६२ ॥
एथ आणिकही एक पार्था, तुज बहुतीं परी पाहतां।
दुःख करावया सर्वथा, विषो नाहीं ॥ १६३ ॥
अव्यक्तादिनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥ २८ ॥
जें समस्तें इयें भूते, जन्मा आदि अमूर्ते।
मग पातलीं व्यक्तीतें, जन्मलेया ॥ १६४ ॥
तियें क्षयासि जेथ जाती, तेथ निभ्रांत आने नव्हती।
देखें पूर्व स्थितीच येती, आपुलिये ॥ १६५ ॥
येर मध्यें जें प्रतिभासे, तें निद्रिता स्वप्न जैसें।
तैसा आकारु हा मायावशें, सत्स्वरूपीं ॥ १६६ ॥
ना तरी पवनें स्पर्शिलें नीर, पढियासे तरंगाकार।
का परापेक्षा अळकांर-, व्यक्ति कनकीं ॥ १६७ ॥
तैसें सकळ हें मूर्त, जाण पां मायाकारित।
जैसें आकाशीं बिंबत, अभ्रपटल ॥ १६८ ॥
तैसें आदीचि जें नाही, तयालागीं तूं रुदसि कायी।
तूं अवीट तें पाहीं, चैतन्य एक ॥ १६९ ॥
जयाचि आर्तीचि भोगित, विषयी त्यजिले संत।
जयालागीं विरक्त, वनवासिये ॥ १७० ॥
दिठी सूनि जयातें, ब्रह्मचर्यादि व्रतें।
मुनीश्वर तयातें आचरताती ॥ १७१ ॥
आश्चर्यवत् पश्चति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः।
आश्चर्यवत् चैनमन्यः शृणोति, शृत्वाऽप्येनं वेद न चैव कश्चित् ॥ २९ ॥
एक अंतरी निश्चळ, जें निहाळितां केवळ।
विसरले सकळ, संसारजात ॥ १७२ ॥
एकां गुणानुवादु करितां, उपरती होऊनि चिता।
निरवधि तल्लीनता, निरंतर ॥ १७३ ॥
एक ऐकतांचि निवाले, ते देहभावीं सांडले।
एक अनुभवें पातले, तद्रुपता ॥ १७४ ॥
जैसा सरिता ओघ समस्त, समुद्रामाजिं मिळत।
परी माघौते न समात, परतले नाहीं ॥ १७५ ॥
तैसिया योगीश्वरांचिया मती, मिळणीसवें एकवटती।
परी जे विचारूनि पुनरावृत्ति, भजतीचिना ॥ १७६ ॥
देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत।
तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥ ३० ॥
जें सर्वत्र सर्वही देहीं, जया करितांही घातु नाहीं।
तें विश्वात्मक तूं पाहीं, चैतन्य एक ॥ १७७ ॥
याचेनिचि स्वभावें, हें होत जात आघवें।
तरी सांग काय शोचावें, एथ तुवां ॥ १७८ ॥
एर्हसवीं तरी पार्था, तुज कां नेणों न मनें चित्ता।
परी किडाळ हें शोचितां, बहुतीं परीं ॥ १७९ ॥
स्वधर्मपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि।
धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते ॥ ३१ ॥
तूं अझुनि कां न विचारिसी, काय हें चिंतितु आहासी।
स्वधर्मु तो विसरलासी, तरावें जेणें ॥ १८० ॥
या कौरवां भलतें जाहलें, अथवा तुजचि कांही पातलें।
कीं युगचि हें बुडालें, जर्हीं एथ ॥ १८१ ॥
तरी स्वधर्मु एक आहे, तो सर्वथा त्याज्य नोहे।
मग तरिजेल काय पाहे, कृपाळुपणें ॥ १८२ ॥
अर्जुना तुझें चित्त, जर्हीु जाहलें द्रवीभूत।
तर्हीन हें अनुचित, संग्रामसमयीं ॥ १८३ ॥
अगा गोक्षीर जरी जाहलें, तरी पथ्यासि नाही म्हणितलें।
ऐसेनिहि विष होय सुदलें, नवज्वरीं देतां ॥ १८४ ॥
तैसे आनीं आन करितां, नाशु होईल हिता।
म्हणऊनि तूं आतां, सावध होई ॥ १८५ ॥
वायांचि व्याकुळ कायी, आपुला निजधर्मु पाहीं।
जो आचरिता बाधु नाहीं, कवणे काळीं ॥ १८६ ॥
जैसें मार्गेंचि चालतां, अपावो न पवे सर्वथा।
कां दीपाधारें वर्ततां, नाडळिजे ॥ १८७ ॥
म्हणोनि यालागीं पाहीं, तुम्हां क्षत्रियां आणीक कांही।
संग्रामावांचूनि नाहीं, उचित जाणें ॥ १८९ ॥
निष्कपटा होआवें, उसिणा घाई जुंझावें।
हें असो काय सांगावे, प्रत्यक्षावरी ॥ १९० ॥
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृत्तम्।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभंते युद्धमीदृशम् ॥ ३२ ॥
अर्जुना झुंज देखें आतांचें, हें हो काय दैव तुमचे।
कीं निधान सकळ धर्माचें, प्रगटले असे ॥ १९१ ॥
हा संग्रामु काय म्हणिपे, कीं स्वर्गुचि येणें रूपें।
मूर्त कां प्रतापे, उदो केला ॥ १९२ ॥
ना तरी गुणाचेनि पतिकरें, आर्तिंचेनि पडिभरें।
हें कीर्तीचि स्वयंवरे, आली तुज ॥ १९३ ॥
क्षत्रियें बहुत पुण्य कीजे, तें झुंज ऐसें हें लाहिजे।
जैसें मार्गें जातां आडळिजे, चिंतामणीसी ॥ १९४ ॥
ना तरी जांभया पसरे मुख, तेथ अवचटें पडे पीयूख।
तैसा संग्रामु हा देख, पातला असे ॥ १९५ ॥
अथ चेत् त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्यसिं ॥ ३३ ॥
आतां हा ऐसा अव्हेरिजे, मग नाथिले शोचूं बैसिजे।
तरी आपण आहाणा होईजे, आपणपेयां ॥ १९६ ॥
पूर्वजांचे जोडलें, आपणचि होय धाडिलें।
जरी आजि शस्त्र सांडिले, रणीं इये ॥ १९७ ॥
असती कीर्ति जाईल, जग अभिशापु देईल।
आणि गिंवसित पावतील, महादोष ॥ १९८ ॥
जैसी भ्रतारेहीन वनिता, उपहृती पावे सर्वथा।
तैशी दशा जीविता, स्वधर्मेंवीण ॥ १९९ ॥
ना तरी रणीं शव सांडिजे, तें चौमेरीं गिधीं विदारिजे।
तैसे स्वधर्महीन अभिभविजे, महादोषी ॥ २०० ॥
अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यंति तेऽव्याम्।
संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥ ३४ ॥
म्हणोनि स्वधर्म हा सांडसील, तरी पापा वरपडा होसील।
आणि अपेश तें न वचेल, कल्पांतावरी ॥ २०१ ॥
जाणतेनि तंवचि जियावे, जंव अपकीर्ति आंगा न पवे।
आणि सांग पां केवी निगावें, एथोनियां ॥ २०२ ॥
तूं निर्मत्सरु सदयता, येथूनि निघसी कीर माघौता।
परी ते गति समस्तां, न मनेल ययां ॥ २०३ ॥
हें चहूंकडून वेढितील, बाणवरी घेतील।
तेथ पार्था न सुटिजेल, कृपाळुपणे ॥ २०४ ॥
ऐसेनिही प्राण्संकटे, जरी विपायें पां निघणें घटे।
तरी तें जियालेंही वोखटें, मरणाहुनी ॥ २०५ ॥
भयाद् रणादुपरं मंस्यते त्वां महारथाः।
येषां त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥ ३५ ॥
तूं आणिकही एक न विचारिसी, एथ संभ्रमे झुंजो आलासी।
आणि सकणवपणे निघालासी, मागुता जरी ॥ २०६ ॥
तरी तुझें तें अर्जुना, या वैरियां दुर्जनां
कां प्रत्यया येईल मना, सांगे मज ॥ २०६ ॥
अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यंति तवाहिताः।
निंदंतस्तव सामर्थ्य ततो दुःखतरं नु किम् ॥ ३६ ॥
हे म्हणतील गेला रे गेला, अर्जुन आम्हां बिहाला।
हा सांगें बोलु उरला, निका कायी ॥ २०८ ॥
लोक सायासें करूनि बहुतें, कां वेंचिती आपुली जीवितें।
परी वाढविती कीर्तीतें, धनुर्धरा ॥ २०९ ॥
ते तुज अनायसें, अनकळित जोडिली असे।
हें अद्वितीय जैसें, गगन आहे ॥ २१० ॥
तैसी कीर्ती निःसीम, तुझां ठायीं निरुपम।
तुझे गुण उत्तम, तिहीं लोकीं ॥ २११॥
दिगंतीचे भूपति, भाट होऊनि वाखाणिती।
जे ऐकिलिया दचकती, कृतांतादिक ॥ २१२ ॥
ऐसा महिमा घनवट, गंगा तैसी चोखट।
जयां देखी जगीं सुभट, वांठ जाहली ॥ २१३ ॥
ते पौरुष तुझें अद्भुत, आइकोनियां हे समस्त।
जाहले आथि विरक्त, जीवितेंसी ॥ २१४ ॥
जैसा सिंहाचिया हांका, युगांतु होय मदमुखा।
तैसा कौरवां अशेखां, धाकु तुझा॥ २१५ ॥
जैसे पर्वत वज्रांते, ना तरी सर्प गरुडातें।
तैसा अर्जुना हे तूंते, मानिती सदा ॥ २१६ ॥
ते अगाधपण जाईल, मग हिणावो अंगा येईल।
जरी मागुता निघसील, न झुंजतचि ॥ २१७ ॥
आणि हे पळतां पळों नेदिती, धरूनि अवकळा करिती।
न गणित कुटी बोलती, आइकतां तुज ॥ २१८ ॥
मग ते वेळी हियें फुटावें, आंता लाठेपणे कां न झुंजावे।
हें जिंतले तरी भोगावें, पृथ्वीतल ॥ २१९ ॥
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्षसे महीम्।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ ३७ ॥
ना तरी रणीं एथ, झुंजतां वेंचलें जीवित।
तरी स्वर्गसुख अनकळित, पावसील ॥ २२० ॥
म्हणोनि ये गोठी, विचारु न करीं किरिटी।
आतां धनुष्य घेऊनि उठी, झुंजें वेगीं ॥ २२१ ॥
देखें स्वधर्मु हा आचरतां, दोषु नासे असता।
तुज भ्रांति हे कवण चित्ता, एथ पातकाची ॥ २२२ ॥
सांगे प्लवेंचि काय बुडिजे, कां मार्गीं जातां आडळिजे।
परी विपायें चालो नेणिजे, तरी तेंही घडे ॥ २२३ ॥
अमृतें तरीचि मरीजे, जरी विखेंसी सेवीजे।
तैसा स्वधर्में दोषु पाविजे, हेतुकपणे ॥ २२४ ॥
म्हणोनि तुज पार्था, हेतु सांडोनि सर्वथा।
क्षात्रवृत्ती झुंजतां, पाप नाही ॥ २२५ ॥
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥ ३८ ॥
सुखीं संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावें।
आणि लाभालाभ न धरावे, मनामाजीं ॥ २२६ ॥
एथ विजयपण होईल, कां सर्वथा देह जाईल।
हें आधींचि कांही पुढील, चिंतावेना ॥ २२७ ॥
आपणयां उचिता, स्वधर्मातेंचि रहाटतां।
जे पावें तें निवांता, साहोनि जावें ॥ २२८ ॥
ऐसेया मनें होआवें, तरी दोषु न घडे स्वभावें।
म्हणोनि आतां झुंजावें, निभ्रांत तुवां ॥ २२९ ॥
एषाऽतेभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि ॥ ३९ ॥
हे सांख्यस्थिति मुकुलित, सांगितली तुज एथ।
आतां बुद्धियोगु निश्चित, अवधारीं पां ॥ २३० ॥
जया बुद्धियुक्ता, आहालिया पार्था।
कर्मबंधु सर्वथा, बांधू न पावे ॥ २३१ ॥
जैसे वज्रकवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे।
परी जैतेंसी उरिजे, अचुंबिता ॥ २३२ ॥
नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥ ४० ॥
तैसें ऐहिक तरी न नशे, आणि मोक्षु तो उरला असे।
जेथ पूर्वानुक्रम दिसे, चोखाळत ॥ २३३ ॥
कर्माधारे राहाटिजे, परी कर्मफळ न निरीक्षिजे।
जैसा मंत्रज्ञु न बधिजे, भूतबाधा ॥ २३४ ॥
तियापरी जे सुबुद्धि, आपुलाल्या निरवधि।
हां असतांचि उपाधि, आंकळू न सके ॥ २३५ ॥
जेथ न संचरे पुण्यपाप, जे सूक्ष्म अति निष्कंप।
गुणत्रयादि लेप, न लगती जेथ ॥ २३६ ॥
अर्जुना ते पुण्यवशें, जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे।
तरी अशेषही नाशे, संसारभय ॥ २३७ ॥
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवस्थिताम् ॥ ४१ ॥
जैसी दीपकळिका धाकुटी, परी बहु तेजातें प्रगटी।
तरी सद्बुद्धि हे थेकुटी, म्हणों नये ॥ २३८ ॥
पार्था बहुतीं परी, हे अपेक्षिजे विचारशूरी।
जे दुर्लभ चराचरीं, सद्वासना ॥ २३९ ॥
आणिकासारिखा बहुवसु, जैसा न जोडे परिसु।
कां अमृताचा लेशु, दैवगुणें ॥ २४० ॥
तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि, जिये परमात्माचि अवधि।
जैसा गंगेसी उदधि, निरंतर ॥ २४१ ॥
तैसी ईश्वरावांचूनि कांही, जिये आणिक लाणी नाहीं।
ते एकचि बुद्धि पाहीं, अर्जुना जगीं ॥ २४२ ॥
येरी ते दुर्मति, जे बहुधा असे विकरती।
तेथ निरंतर रमती, अविवेकिये ॥ २४३ ॥
म्हणोनि तया पार्था, स्वर्ग संसार नरकावस्था।
आत्मसुख सर्वथा, दृष्ट नाहीं ॥ २४४ ॥
यामिनां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः।
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ ४२ ॥
वेदाधारें बोलती, केवळ कर्म प्रतिष्ठिती।
परी कर्मफळीं आसक्ती, धरूनियां ॥ २४५ ॥
म्हणती संसारी जन्मिजे, यज्ञादि कर्म कीजें।
मग स्वर्गसुख भोगिजे, मनोहर ॥ २४६ ॥
एथ हें वांचूनि कांही, आणिक सर्वथा सुखचि नाही।
ऐसें अर्जुना बोलती पाहीं, दुर्बुद्धि ते ॥ २४७ ॥
कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम्।
क्रियाविषेश्बहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥ ४३ ॥
देखें कामना अभिभूत, होऊनि कर्में आचरत।
ते केवळ भोगीं चित्त, देऊनियां ॥ २४८ ॥
क्रियाविशेषें बहुतें, न लोपितीं विधीतें।
निपुण होऊनि धर्मातें, अनुष्ठिती ॥ २४९ ॥
भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम्।
व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥ ४४ ॥
परि एकचि कुडें करिती, जे स्वर्गकामु मनीं धरिती।
यज्ञपुरुषा चुकती, भोक्ता जो ॥ २५० ॥
जैसा कर्पुराचा राशि कीजे, मग अग्नि लाऊनि दीजे।
कां मिष्टानीं संचरविजे, काळकूट ॥ २५१ ॥
दैवें अमृतकुंभ जोडला, तो पायें हाणोनि उलंडिला।
तैसा नासिती धर्म निपजला, हेतुकपणें ॥ २५२ ॥
सायासें पुण्य अर्जिजे, मग संसारु का अपेक्षिजे।
परी नेणती ते काय कीजे, अप्राप्त देखें ॥ २५३ ॥
जैसे रांधवणी रससोय निकी, करुनियां मोले विकी।
तैसा भोगासाठी अविवेकी, धाडिती धर्मु ॥ २५४ ॥
म्हणोनि हे पार्था, दुर्बुद्धि देख सर्वथा।
तयां वेदवादरतां, मनीं वसे ॥ २५५ ॥
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन।
निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥ ४५ ॥
तिन्हीं गुणीं आवृत्त, हे वेद जाणे निभ्रांत।
म्हणोनि उपनिषदादि समस्त, सात्विक ते ॥ २५६ ॥
येर रजतमात्मक, जेथ निरुपिजे कर्मादिक।
जे केवळ स्वर्गसूचक, धनुर्धरा ॥ २५७ ॥
म्हणोनि तूं जाण, हे सुखदुःखासीच कारण।
एथ झणे अंतःकरण, रिगों देसी ॥ २५८ ॥
तूं गुणत्रयातें अव्हेरीं, मी माझें हें न करीं।
एक आत्मसुख अंतरी, विसंब झणीं ॥ २५९ ॥
यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ ४६ ॥
जरी वेदें बहुत बोललें, विविध भेद सूचिले।
तर्हीे आपण हित आपुलें, तेंचि घेपे ॥ २६० ॥
जैसा प्रगटलिया गभस्ती, अशेषही मार्ग दिसती।
तरी तेतुलेही काय चालिजती, सांगे मज ॥ २६१ ॥
का उदकमय सकळ, जर्ही जाहलें असे महीतळ।
तरी आपण घेपे केवळ, आर्तीचजोगें ॥ २६२ ॥
तैसे ज्ञानिये जे होती, ते वेदार्थाते विवरिती।
मग अपेक्षित तें स्वीकारिती, शाश्वत जें ॥ २६३ ॥
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥ ४७ ॥
म्हणौनि आइकें पार्था, याचिवरी पाहतां।
तुज उचित होय आतां, स्वकर्म हें ॥ २६४ ॥
आम्हीं समस्तही विचारिलें, तंव ऐसेंचि हें मना आलें।
जे न संडिजे तुवा आपुलें, विहित कर्म ॥ २६५ ॥
परी कर्मफळीं आस न करावी, आणि कुकर्मी संगति न व्हावी।
हे सत्क्रियाचि आचरावी, हेतूविण ॥ २६६ ॥
योगस्थ कुरू कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय।
सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ ४८ ॥
तूं योगयुक्त होऊनी, फळाचा संग सांडुनी।
मग अर्जुना चित्त देऊनी, करीं कर्में ॥ २६७ ॥
परी आदरिले कर्म दैवें, जरी समाप्तीतें पावे।
तरी विशेषें तेथ तोषावें, हेही नको ॥ २६८ ॥
कां निमित्तें कोणे एकें, तें सिद्धी न वचतां ठाकें।
तरी तेथिंचेनि अपरितोखें, क्षोभावें ना ॥ २६९ ॥
आचरता सिद्धी गेलें, तरी काजाचि कीर आलें।
परी ठेलियाही सगुण जहालें, ऐसेंचि मानीं ॥ २७० ॥
देखें जेतुलालें कर्म निपजे, तेतुलें आदिपुरुषीं जरी अर्पिजे।
तरी परीपूर्ण सहजें, जहालें जाणे ॥ २७१ ॥
देखें संतासंती कर्मीं, हें जे सरिसेपण मनोधर्मीं।
तेचि योगस्थिति उत्तमीं, प्रशंसिजे ॥ २७२ ॥
दूरेण ह्यत्वरं कर्म बुद्धियोगाद्धनंजय।
बुद्धौ शरणमन्विछ कृपणाः फलहेतवः ॥ ४९ ॥
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत्दुष्कृते।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलं ॥ ५० ॥
अर्जुना समत्व चित्ताचें, तेचिं सार जाण योगाचें।
जेथ मना आणि बुद्धीचें, ऐक्य आथी ॥ २७३ ॥
तो बुद्धियोग विवरितां, बहुतें पाडे पार्था।
दिसे हा अरुता, कर्मभागु ॥ २७४ ॥
परि तेंचि कर्म आचरिजे, तरीच हा योगु पाविजे।
जें कर्मशेष सहजे, योगस्थिति ॥ २७५ ॥
म्हणोनि बुद्धियोगु सधरु, तेथ अर्जुना होई स्थिरु।
मनिं करी अव्हेरु, फळहेतूचा ॥ २७६ ॥
जे बुद्धियोगा योजिले, तेचि पारंगत जाहले।
इहीं उभय संबंधी सांडिले, पापपुण्यीं ॥ २७७ ॥
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः।
जन्मबंधविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥ ५१ ॥
ते कर्मी तरी वर्तती, परी कर्मफळा नातळती।
आणि यातायाति लोपती, अर्जुना तयां ॥ २७८ ॥
मग निरामयभरित, पावती पद अच्युत।
ते बुद्धियोगयुक्त, धनुर्धरा ॥ २७९ ॥
यदा ते मोहकलिलं बुद्धुर्व्यतितरिष्यति।
तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥ ५२ ॥
तूं ऐसा तैं होसी, जैं मोहातें या सांडिसी।
आणि वैराग्य मानसीं, संचरेल ॥ २८० ॥
मग निष्कळंक गहन, उपजेल आत्मज्ञान।
तेणे निचाडें होईल मन, अपैसें तुझे ॥ २८१ ॥
तेथ आणिक कांही जाणावे, कां मागिलातें स्मरावें।
हें अर्जुनां आघवें, पारुषेल ॥ २८२ ॥
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥ ५३ ॥
इंद्रियांचिया संगती, जिये पसरु असे मती।
ते स्थिर होईल मागुती, आत्मस्वरूपीं ॥ २८३ ॥
समाधिसुखीं केवळ, जैं बुद्धि होईल निश्चळ।
तैं पावसी तूं सकळ, योगस्थिति ॥ २८४ ॥
अर्जुन उवाच: स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव।
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत ब्रजेत किम् ॥ ५४ ॥
तेथ अर्जुन म्हणे देवा, हाचि अभिप्रावो आघवा।
मी पुसेन आतां सांगावा, कृपानिधि ॥ २८५ ॥
मग अच्युत म्हणे सुखें, जें किरीटी तुज निकें।
तें पूस पां उन्मेखें, मनाचेनि ॥ २८६ ॥
या बोला पार्थें, म्हणितलें सांग पां श्रीकृष्णातें।
काय म्हणिपे स्थितप्रज्ञातें, वोळखों केवीं ॥ २८७ ॥
आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे, तो कैसां चिन्हीं जाणिजे।
जो समाधिसुख भुंजिजे, अखंडित ॥ २८८ ॥
तो कवणे स्थिती असे, कैसेनि रूपी विलसे।
देवा सांगावें हें ऐसें, लक्ष्मीपती ॥ २८९ ॥
तव परब्रह्मअवतरणु, जो षड्गुणाधिकरणु।
तो काय तेथ नारायणु, बोलतु असे ॥ २९० ॥
श्रीभगवानुवाच: प्रजहाति यदा कामान् सर्वान्पार्थ मनोगतान्।
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥ ५५ ॥
म्हणे अर्जुना परियेसीं, हा अभिलाषु प्रौढ मानसीं।
तो अंतराय स्वसुखेसीं, करीत असे ॥ २९१ ॥
जो सर्वदा नित्यतृप्तु, अंतःकरणभरितु।
परि विषयामाजि पतितु, जेणें संगे कीजे ॥ २९२ ॥
तो कामु सर्वथा जाये, जयाचे आत्मतोषीं मन राहें।
तोचि स्थितप्रज्ञु होये, पुरुष जाणे ॥ २९३ ॥
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनीरुच्यते ॥ ५६ ॥
नाना दुःखी प्राप्तीं, जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं।
आणि सुखाचिया आर्ती, अडपैजेना ॥ २९४ ॥
अर्जुना तयाचां ठायीं, कामक्रोधु सहजें नाहीं।
आणि भयातें नेणें कहीं, परिपूर्ण तो ॥ २९५ ॥
ऐसा जो निरवधि, तो जाण पां स्थिरबुद्धि।
जो निरसूनि उपाधि, भेदरहितु ॥ २९६ ॥
यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम्।
नाभिननंदंति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५७ ॥
जो सर्वत्रा सदा सरिसा, परिपूर्ण चंद्रु कां जैसा।
अधमोत्तम प्रकाशा -, माजीं न म्हणे ॥ २९७ ॥
ऐसी अनवच्छिन्न समता, भूतामत्रीं सदयता।
आणि पालटु नाहीं चित्ता, कवणे वेळे ॥ २९८ ॥
गोमटें कांही पावे, तेणे संतोषें तेणें नाभिभवे।
जो ओखटेनि नागवे, विषादासी ॥ २९९ ॥
ऐसा हरिखशोकरहितु, जो आत्मबोधभरितु।
तो पां जाण प्रज्ञायुक्तु, धनुर्धरा ॥ ३०० ॥
यदा संहरते चायं कूर्मोऽङगानीव सर्वशः।
इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५८ ॥
कां कूर्म जियापरी, उवाइला अवेव पसरी।
ना इच्छावशें आवरी, आपुले आपण ॥ ३०१ ॥
तैसीं इंद्रिये आपैतीं होतीं, जयाचें म्हणितलें करिती।
तयाची प्रज्ञा जाण स्थिती, पातलीं असे ॥ ३०२ ॥
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः।
रसवर्ज्यं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥ ५९ ॥
आतां अर्जुना आणिकही एक, सांगेन ऐकें कवतिक।
या विषयांते साधक, त्यजिती नियमें ॥ ३०३ ॥
श्रोत्रादि इंद्रिये आवरती, परि रसने नियमु न करिती।
ते सहस्रधा कवळिजती, विषयीं इहीं ॥ ३०४ ॥
जैसी वरिवरि पालवी खुडिजे, आणि मुळीं उदक घालिजे।
तरी कैसेनि नाशु निपजे, तया वृक्षा ॥ ३०५ ॥
तो उदकाचेनि बळें अधिकें, जैसा आडवोनि आंगे फांके।
तैसा मानसी विषो पोखे, रसनाद्वारें ॥ ३०६ ॥
येरां इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमूं न ये रस हटें।
जे जीवन हें न घटे, येणेंविण ॥ ३०७ ॥
मग अर्जुना स्वभावे, ऐसियाही नियमातें पावे।
जैं परब्रह्म अनुभवें, होऊनि जाईजे ॥ ३०८ ॥
तैं शरीरभाव नासती, इंद्रिये विषय विसरती।
सोहंभावप्रतीति, प्रकट होय ॥ ३०९ ॥
यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः।
इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ ६० ॥
येर्हरवीं तरी अर्जुना, हें आया नये साधना।
जे रहाटताती जतना, निरंतर ॥ ३१० ॥
जयातें अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी।
जे मनाते सदा मुठी, धरूनि आहाती ॥ ३११ ॥
तेही किजती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी।
जैसी मंत्रज्ञातें विवसी, भुलवी कां ॥ ३१२ ॥
देखे विषय हे तैसे, पावती ऋद्धिसिद्धीचेनि मिषें।
मग आकळती स्पर्शें , इंद्रियांचेनि ॥ ३१३ ॥
तिये संधी मन जाये, मग अभ्यासां ठोठावलें ठाये।
ऐसें बळकटपण आहे, इंद्रियांचे ॥ ३१४ ॥
तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः।
वशे हि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६१ ॥
म्हणोनि आइकें पार्था, यांते निर्दळी जो सर्वथा।
सर्व विषयीं आस्था, सांडूनिया ॥ ३१५ ॥
तोचि तूं जाण, योगनिष्ठेसी कारण।
जयाचे विषयसुखे, अंतःकरण झकवेना ॥ ३१६ ॥
जो आत्मबोधयुक्तु, होऊनि असे सततु।
जो मातें हृदयाआंतु, विसंबेना ॥ ३१७ ॥
एर्हावीं बाह्य विषय तरी नाहीं, परी मानसीं होईल जरी कांही।
तरी साद्यंतुचि हा पाहीं, संसारु असे ॥ ३१८ ॥
जैसा कां विषाचा लेशु, घेतलिया होय बहुवसु।
मग निभ्रांत करी नाशु, जीवितासी ॥ ३१९ ॥
तैसी या विषयांची शंका, मनीं वसती देखा।
घातु करी अशेखा, विवेकजाता ॥ ३२० ॥
ध्यायतो विषयान्पुंसः सङगस्तेषूपजायते।
सङगात्संजायते कामः कामात्क्रोधोभिजायते ॥ ६२ ॥
क्रोधाद् भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ ६३ ॥
जरी हृदयीं विषय स्मरती, तरी निसंगाही आपजे संगती।
संगी प्रगटे मूर्ति, अभिलाषाची ॥ ३२१ ॥
जेथ कामु उपजला, तेथ क्रोधु आधींचि आला।
क्रोधीं असे ठेविला, संमोह जाणे ॥ ३२२ ॥
संमोहा जालिया व्यक्ति, तरी नाशु पावे स्मृति।
चंडवातें ज्योति, आहत जैसी ॥ ३२३ ॥
कां अस्तमानीं निशी, जैसी सूर्यतेजातें ग्रासी।
तैसी दशा स्मृतिभ्रंशीं, प्राणियांसी ॥ ३२४ ॥
नग अज्ञानांध केवळ, तेणे आप्लविजे सकळ।
तेथ बुद्धि होय व्याकुळ, हृदयामाजीं ॥ ३२५ ॥
जैसें जात्यंधा पळणी पावे, मग ते काकुळती सैरा धांवे।
तैसे बुद्धीसि होती भवें, धनुर्धरा ॥ ३२६ ॥
ऐसा स्मृतिभ्रंशु घडे, मग सर्वथा बुद्धि अवघडे।
तेथ समूळ हें उपडे, ज्ञानजात ॥ ३२७ ॥
चैतन्याचां भ्रंशी, शरीरा दशा जैशी।
पुरुषा बुद्धिनाशीं, होय देखें ॥ ३२८ ॥
म्हणोनि आइकें अर्जुना, जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना।
मग प्रौढ जालिया त्रिभुवना, पुरों शके ॥ ३२९ ॥
तैसें विषयांचे ध्यान, जरी विपायें वाहे मन।
तरी येसणे हें पतन, गिंवसीत पावे ॥ ३३० ॥
रागद्वेषवियुकतैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन्।
आत्मवशैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ ६४ ॥
म्हणोनि विषय हे आघवे, सर्वथा मनौनि सांडावे।
मग रागद्वेष स्वभावें, नाशतील ॥ ३३१ ॥
पार्था आणिकही एक, जरी नाशिले रागद्वेष।
तरी इंद्रियां विषयीं बाधक, रमतां नाही ॥ ३३२ ॥
जैसा सूर्य आकाशगतु, रश्मिकरीं जगातें स्पर्शतु।
तरी संगदोषें काय लिंपतु, तेथिंचेनि ॥ ३३३ ॥
तैसा इंद्रियार्थी उदासीन, आत्मरसेंचि निर्भिन्न।
जो कामक्रोधविहीन, होऊनि असे ॥ ३३४ ॥
तरी विषयांतुही कांही, आपणपेवाचुनि नाहीं।
मग विषय कवण कायी, बाधीतील कवणा ॥ ३३५ ॥
जरी उदकें उदकीं बुडीजे, कां अग्नि आगी पोळिजे।
तरीं विषयसंगे आप्लविजे, परिपूर्ण तो ॥ ३३६ ॥
ऐसा आपणचि केवळ, होऊनि असे निखळ।
तयाचि प्रज्ञा अचळ, निभ्रांत मानीं ॥ ३३७ ॥
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥ ६५ ॥
देखें अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता।
तेथे रिगणें नाहीं समस्तां, संसारदुःखां ॥ ३३८ ॥
जैसा अमृताचा निर्झरु, प्रसवे जयाचा जठरु।
तया क्षुधेतृष्णेचा अडदरु, कहींचि नाहीं ॥ ३३९ ॥
तैसें हृदय प्रसन्न होये, तरी दुःख कैचें कें आहे।
तेथ बुद्धि आपैसी राहे, परमात्मरूपीं ॥ ३४० ॥
जैसा निर्वातीचा दीपु, सर्वथा नेणे कंपु।
तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु , योगयुक्तु ॥ ३४१ ॥
नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना।
न चाभावयतः शांतिरशांतस्य कुतः सुखम् ॥ ६६ ॥
ये युक्तीचि कडसणी, नाहीं जयाचां अंतःकरणीं।
तो आकळिलां जाण गुणीं, विषयादिकीं ॥ ३४२ ॥
तया स्थिरबुद्धि पार्था, कहीं नाहीं सर्वथा।
आणि स्थैर्याची आस्था, तेही नुपजे ॥ ३४३ ॥
निश्चळत्वाची भावना, जरी नव्हेचि देखें मना।
तरी शांति केवी अर्जुना, आपु होय ॥ ३४४ ॥
आणि जेथ शांतिचा जिव्हाळा नाहीं, तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं।
जैसा पापियाचां ठायीं, मोक्षु न वसे ॥ ३४५ ॥
देखें अग्निमाजी धापती, तियें बीजें जरी विरुढती।
तरी अशांत सुखप्राप्ती, घडों शके ॥ ३४६ ॥
म्हणोनि अयुक्तपण मनाचे, तेंचि सर्वस्व दुःखाचें।
या कारणें इंद्रियांचें, दमन निकें ॥ ३४७ ॥
इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥ ६७ ॥
ये इंद्रियें जें जें म्हणती, तें तेंचि जे पुरुष करिती।
ते तरलेचि न तरिती, विषयसिंधु ॥ ३४८ ॥
जैसी नाव थडिये ठाकितां, जरी वरपडी होय दुर्वाता।
तरी चुकलाही मागौता, अपावो पावे ॥ ३४९ ॥
तैसी प्राप्तेंही पुरुषें, इंद्रियें लाळिलीं जरी कौतुकें।
तरी आक्रमिला देख दुःखे, सांसारिकें ॥ ३५० ॥
तस्माद् यस्य महाबाहो निगृहितानि सर्वशः।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६८ ॥
म्हणोनि आपुलीं आपणपेया, जरी ये इंद्रिये येती आया।
तरी अधिक कांही धनंजया, सार्थक असे ॥ ३५१ ॥
देखे कूर्म जियापरी, उवाइला अवयव पसरी।
ना तरी इच्छावशें आवरी, आपणपेंचि ॥ ३५२ ॥
तैसीं इंद्रिये आपैती होती, जयाचें म्हणितलें करिती।
तयाची प्रज्ञा जाण स्थिती, पातली असे ॥ ३५३ ॥
आता आणिक एक गहन, पूर्णाचें चिन्ह।
अर्जुना तुज सांगेन, परिस पां ॥ ३५४ ॥
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी।
यस्यां जाग्रति भूतानां सा निशा पश्यतो मुनेः ॥ ६९ ॥
देखे भूतजात निदेलें, तेथेंचि जया पाहलें।
आणि जीव जेथ चेइले, तेथ निद्रित तो ॥ ३५५ ॥
तैसा तो निरुपाधि, अर्जुना तो स्थिरबुद्धि।
तोचि जाणे निरवधि, मुनीश्वर ॥ ३५६ ॥
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥ ७० ॥
पार्था आणिकही परी, तो जाणो येईल अवधारीं।
जैसी अक्षोभता सागरीं, अखंडित ॥ ३५७ ॥
जरी सरिताओघ समस्त, परिपूर्ण होऊनि मिळत।
तरी अधिक नोहे ईषत्, मर्यादा न संडी ॥३५८ ॥
ना तरी ग्रीष्मकाळीं सरिता, शोषूनि जाति समस्ता।
परी न्यून नव्हे पार्था, समुद्रु जैसा ॥ ३५९ ॥
तैसा प्राप्तीं ऋद्धिसिद्धी, तयासि क्षोभु नाहीं बुद्धी।
आणि न पवतां न बाधी, अधृति तयातें ॥ ३६० ॥
सांगे सूर्याचां घरी, प्रकाशु काय वातीवेरी।
की न लविजे तरी अंधारीं, कोंडेल तो ॥ ३६१ ॥
देखें ऋद्धिसिद्धि तयापरी, आली गेली से न करी।
तो विगुंतला असे अंतरीं, महासुखीं ॥ ३६२ ॥
जो आपुलेनि नागरपणें, इंद्रभुवनातें पाबळें म्हणे।
तो केवि रंजे पालविणें, भिल्लांचेनि ॥ ३६३ ॥
जो अमृतासि ठी ठेवी, तो जैसा कांजी न सेवी।
तैसा स्वसुखानुभवी, न भोगी ऋद्धि ॥ ३६४ ॥
पार्था नवल हें पाहीं, जेथ स्वर्गसुख लेखनीय नाही।
तेथ ऋद्धिसिद्धि कायी, प्राकृता होती ॥ ३६५ ॥
विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निस्पृहः।
निर्ममो निरहंकरः स शान्तिमधिगच्छति ॥ ७१ ॥
ऐसा आत्मबोधें तोषला, जो परमानंदें पोखला।
तोचि स्थिरप्रज्ञु भला, वोळख तूं ॥ ३६६ ॥
तो अहंकाराते दंडुनी, सकळ काम सांडोनि।
विचरे विश्व होऊनि, विश्वाचिमाजीं ॥ ३६७ ॥
एष ब्राह्मो स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥ ७२ ॥
हे ब्रह्मस्थिती निःसीम, जे अनुभवितां निष्काम।
पातलें परब्रह्म, अनायासें ॥ ३६८ ॥
जे चिद्रूपीं मिळतां, देहांतीची व्याकुळता।
आड ठाकों न शके चित्ता, प्राज्ञा जया ॥ ३६९ ॥
तेचि हे स्थिति, स्वमुखें श्रीपति।
सांगत अर्जुनाप्रति, संजयो म्हणे ॥ ३७० ॥
ऐसे कृष्णवाक्य ऐकिलें, तेथ अर्जुने मनीं म्हणितलें।
आतां आमुचियाचि काजा आलें, उपपत्ति इया ॥ ३७१ ॥
जे कर्मजात आघवें, एथ निराकारिलें देवें।
तरी पारुषलें म्यां झुंजावें, म्हणूनियां ॥ ३७२ ॥
ऐसा श्रीअच्युताचिया बोला, चित्तीं धनुर्धरु उवायिला।
आतां प्रश्नु करील भला, आशंकोनियां ॥ ३७३ ॥
तो प्रसंगु असे नागरु, जो सकळ धर्मासि आगरु।
कीं विवेकामृतसागरु, प्रांतहीनु ॥ ३७४ ॥
जो आपणपे सर्वज्ञनाथु, निरुपिता होईल श्रीअनंतु।
ते ज्ञानदेवो सांगेल मातु, निवृत्तीदासु ॥ ३७५ ॥
ज्ञानेश्वरी / अध्याय तिसरा : संत ज्ञानेश्वर
अर्जुन उवाच: ज्यायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन।तत् किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ १ ॥
मग आइका अर्जुनें म्हणितलें, देवा तुम्हीं जें वाक्य बोलिले।
तें निकें म्यां परिसलें, कमळापती ॥ १ ॥
तेथ कर्म आणि कर्ता, उरेचिना पाहतां।
ऐसें मत तुझें अनंता, निश्चित जरी ॥ २ ॥
तरी मातें केवी हरी, म्हणसी पार्था संग्रामु करीं।
इये लाजसीना महाघोरीं, कर्मीं सुता ॥ ३ ॥
हां गा कर्म तूंचि अशेष, निराकारासी निःशेष।
तरी मजकरवीं हें हिंसक, कां करविसी तूं ॥ ४ ॥
तरीं हेंचि विचारीं हृषीकेशा, तूं मानु देसी कर्मलेशा।
आणि येसणी हे हिंसा, करवित अहासी ॥ ५ ॥
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥ २ ॥
देवा तुवांचि ऐसें बोलावें, तरी आम्हीं नेणतीं काय करावें।
आता संपले म्हणे पां आघवें, विवेकाचे ॥ ६ ॥
हां गा उपदेशु जरी ऐसा, तरी अपभ्रंशु तो कैसा।
आतां पुरला आम्हां धिंवसा, आत्मबोधाचा ॥ ७ ॥
वैद्यु पथ्य वारूनि जाये, मग जरी आपणचि विष सुये।
तरी रोगिया कैसेनि जिये, सांगे मज ॥ ८ ॥
जैसे आंधळे सुईजे आव्हांटा, कां माजवण दीजे मर्कटा।
तैसा उपदेशु हा गोमटा, वोढवला आम्हां ॥ ९ ॥
मी आधींचि कांही नेणें, वरी कवळिलों मोहें येणें।
कृष्णा विवेकु या कारणें, पुसिला तुज ॥ १० ॥
तंव तुझी एकेकी नवाई, एथ उपदेशामाजीं गांवाई।
तरी अनुसरलिया काई, ऐसें कीजे ॥ ११ ॥
आम्हीं तनुमनुजीवें, तुझिया बोला वोटंगावें।
आणि तुवांचि ऐसें करावें, तरी सरलें म्हणे ॥ १२ ॥
आतां ऐसियापरी बोधिसी, तरी निकें आम्हां करिसी।
एथ ज्ञानाची आस कायसी, अर्जुन म्हणे ॥ १३ ॥
तरी ये जाणिवेचे कीर सरलें, परी आणिक एक असें जाहलें।
जें थितें हें डहुळलें, मानस माझें ॥ १४ ॥
तेवींचि कृष्णा हें तुझें, चरित्र कांहीं नेणिजे।
जरी चित्त पाहसी माझें, येणे मिषें ॥ १५ ॥
ना तरी झकवितु आहासी मातें, की तत्वचि कथिलें ध्वनितें।
हे अवगमतां निरुतें, जाणवेना ॥ १६ ॥
म्हणोनि आइकें देवा, हा भावार्थु आतां न बोलावा।
मज विवेकु सांगावा, मर्हााटा जी ॥ १७ ॥
मी अत्यंत जड असें, परी ऐसाही निकें परियसें।
कृष्णा बोलावें तुवां तैसें, एकनिष्ठ ॥ १८ ॥
देखें रोगातें जिणावें, औषध तरी द्यावें।
परी तें अतिरुच्य व्हावें, मधुर जैसें ॥ १९ ॥
तैसें सकळार्थभरित, तत्व सांगावे उचित।
परी बोधे माझें चित्त, जयापरी ॥ २० ॥
देवा तुज ऐसा निजगुरु, आणि आर्तीधणी कां न करूं।
एथ भीड कवणाची धरूं, तूं माय आमुची ॥ २१॥
हां गा कामधेनूचें दुभतें, देवें जाहलें जरी आपैतें।
तरी कामनेची कां तेथें, वानी कीजे ॥ २२ ॥
जरी चिंतामणि हातां चढे, तरी वांछेचे कवण सांकडे।
कां आपुलेनि सुरवाडें, इच्छावें ना ॥ २३ ॥
देखें अमृतसिंधूतें ठाकावें, मग तहाना जरी फुटावें।
मग सायासु कां करावे , मागील ते ॥ २४ ॥
तैसा जन्मांतरी बहुतीं, उपासिता लक्ष्मीपती।
तूं दैवें आजि हातीं, जाहलासी जरी ॥ २५ ॥
तरी आपुलेया सवेसा, कां न मगावासी परेशा।
देवा सुकाळु हा मानसा, पाहला असे ॥ २६ ॥
देखें सकळार्तीचें जियालें, आजि पुण्य यशासि आलें।
हे मनोरथ जहाले, विजयी माझे ॥ २७ ॥
जी जी परममंगळधामा, देवदेवोत्तमा।
तूं स्वाधीन आजि आम्हां, म्हणऊनियां ॥ २८ ॥
जैसां मातेचां ठायीं, अपत्या अनवसरु नाहीं।
स्तन्यालागूनि पाहीं, जियापरी ॥ २९ ॥
तैसें देवा तूंते, पुसिजतसें आवडे तें।
आपुलेनि आर्तें, कृपानिधि ॥ ३० ॥
तरी पारत्रिकीं हित, आणि आचरितां तरी उचित।
ते सांगें एक निश्चित, पार्थु म्हणे ॥ ३१ ॥
श्रीभगवानुवाच: लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयाऽनघ।
ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां ॥ ३ ॥
या बोला अच्युतु, म्हणतसे विस्मितु।
अर्जुना हा ध्वनितु, अभिप्रावो ॥ ३२ ॥
जे बुद्धियोगु सांगतां, सांख्यमतसंस्था।
प्रकटिली स्वभावता, प्रसंगे आम्हीं ॥ ३३ ॥
तो उद्देशु तूं नेणसी, म्हणोनि क्षोभलासि वायांचि।
तरी आता जाण म्यांचि, उक्त दोन्ही ॥ ३४ ॥
अवधारीं वीरश्रेष्ठा, यें लोकीं या दोन्ही निष्ठा।
मजचिपासूनि प्रगटा, अनादिसिद्धा ॥ ३५ ॥
एकु ज्ञानयोगु म्हणिजे, जो सांख्यीं अनुष्ठीजे।
जेथ ओळखीसवें पाविजे, तद्रूपता ॥ ३६ ॥
एक कर्मयोगु जाण, जेथ साधकजन निपुण।
होवूनिया निर्वाण, पावती वेळे ॥ ३७ ॥
हे मार्गु तरी दोनी, परि एकवटती निदानीं।
जैसे सिद्धसाध्यभोजनीं, तृप्ति एकी ॥ ३८ ॥
कां पूर्वापर सरिता, भिन्ना दिसती पाहतां।
मग सिंधूमिळणीं ऐक्यता, पावती शेखीं ॥ ३९ ॥
तैसीं दोनी ये मतें, सूचिती एका कारणातें।
परी उपास्ति ते योग्यते -, आधीन असे ॥ ४० ॥
देखें उत्प्लवनासरिसा, पक्षी फळासि झोंबे जैसा।
सांगें नरु केवीं तैसा, पावे वेगां ॥ ४१ ॥
तो हळूहळू ढाळेंढाळें, केतुकेनि एके वेळे।
मार्गाचेनि बळें, निश्चित ठाकी ॥ ४२ ॥
तैसें देख पां विहंगममतें, अधिष्ठूनि ज्ञानातें।
सांख्य सद्य मोक्षातें, आकळिती ॥ ४३ ॥
येर योगिये कर्माधारें, विहितेंचि निजाचारें।
पूर्णता अवसरें, पावतें होती ॥ ४४ ॥
न कर्मणामनारभान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते।
न च संन्यसनादेव सिद्धिं समाधिगच्छति ॥ ४ ॥
वांचोनि कर्मारंभ उचित, न करितांचि सिद्धवत।
कर्महीना निश्चित, होईजेना ॥ ४५ ॥
कां प्राप्तकर्म सांडिजे, येतुलेनि नैष्कर्म्या होईजे।
हें अर्जुना वायां बोलिजे, मूर्खपणें ॥ ४६ ॥
सांगें पैलतीरा जावें, ऐसें व्यसन कां जेथ पावे।
तेथ नावेतें त्यजावें, घडे केवीं ॥ ४७ ॥
ना तरी तृप्ति इच्छिजे, तरी कैसेनि पाकु न कीजे।
कीं सिद्धुही न सेविजे, केवीं सांगें ॥ ४८ ॥
जंव निरार्तता नाहीं, तंव व्यापारु असे पाहीं।
मग संतुष्टीचां ठायीं, कुंठे सहजें ॥ ४९ ॥
म्हणोनि आइकें पार्था, जया नैष्कर्म्यपदीं आस्था।
तया उचित कर्म सर्वथा, त्याज्य नोहे ॥ ५० ॥
आणि आपुलालिया चाडे, आपादिले हे मांडे।
कीं त्यजिलें हें कर्म सांडे, ऐसें आहे ॥ ५१ ॥
हें वायाचि सैरा बोलिजे, उकलु तरी देखों पाहिजे।
परी त्यजितां कर्म न त्यजे, निभ्रांत मानी ॥ ५२ ॥
न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैगुणैः ॥ ५ ॥
जंव प्रकृतीचें अधिष्ठान, तंव सांडी मांडी हें अज्ञान।
जि चेष्टा गुणाधीन, आपैसी असे ॥ ५३ ॥
देखें विहित कर्म जेतुलें, तें सळें जरी वोसंडिलें।
तरी स्वभाव काय निमाले, इंद्रियांचे ॥ ५४ ॥
सांगे श्रवणीं ऐकावें ठेलें, की नेत्रीचे तेज गेलें।
हें नासारंध्र बुझालें, परिमळु नेघे ॥ ५५ ॥
ना तरी प्राणापानगति, की निर्विकल्प जाहली मति।
की क्षुधातृषादि आर्ति, खुंटलिया ॥ ५६ ॥
हे स्वप्नावबोधु ठेले, कीं चरण चालो विसरले।
हे असो काय निमाले, जन्ममृत्यू ॥ ५७ ॥
हें न ठकेचि जरी कांही, तरी सांडिले तें कायी।
म्हणोनि कर्मत्यागु नाही, प्रकृतिमंतां ॥ ५८ ॥
कर्म पराधीनपणे, निपजतसे प्रकृतिगुणें।
येरीं धरीं मोकलीं अंतःकरणें, वाहिजे वायां ॥ ५९ ॥
देखें रथीं आरूढिजे, मग निश्चळा बैसिजे।
मग चळा होऊनि हिंडिजे, परतंत्रा ॥ ६० ॥
कां उचलिलें वायुवशें, चळें शुष्क पत्र जैसें।
निचेष्ट आकाशे, परिभ्रमे ॥ ६१ ॥
तैसें प्रकृतिआधारें, कर्मेंद्रियविकारें।
मिष्कर्म्युही व्यापारे, निरंतर ॥ ६२ ॥
म्हणऊनि संगु जंव प्रकृतिचा, तंव त्यागु न घडे कर्माचा।
ऐसियाहि करूं म्हणती तयांचा, आग्रहोचि उरें ॥ ६३ ॥
कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्।
इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उचयते ॥ ६ ॥
जे उचित कर्म सांडिती, मग नैष्कर्म्य होऊं पाहती।
परी कर्मेंद्रियप्रवृत्ती, निरोधूनि ॥ ६४ ॥
तयां कर्मत्यागु न घडे, जें कर्तव्य मनीं सापडे।
वरी नटती तें फुडे, दरिद्र जाण ॥ ६५ ॥
ऐसे ते पार्था, विषयासक्त सर्वथा।
वोळखावे तत्वता, येथ भ्रांति नाहीं ॥ ६६ ॥
आतां देई अवधान, प्रसंगे तुज सांगेन।
या नैराश्याचे चिन्ह, धनुर्धरा ॥ ६७ ॥
यस्तित्वंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन।
कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः न विशिष्यते ॥ ७ ॥
जो अंतरी दृढु, परमात्मरूपीं गूढु।
बाह्य तरी रूढु, लौकिक जैसा ॥ ६८ ॥
तो इंद्रियां आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी।
प्राप्त कर्म न अव्हेरी, उचित जें जें ॥ ६९ ॥
तो कर्मेंद्रियें कर्मी, राहाटतां तरी न नियमी।
परी तेथिचेनि उर्मी, झांकोळेना ॥ ७० ॥
तो कामनामात्रें न घेपे, मोहमळें न लिंपे।
जैसे जळीं जळें न शिंपें, पद्मपत्र ॥ ७१ ॥
तैसा संसर्गामाजि असे, सकळांसारिखा दिसे।
जैसें तोयसंगे आभासे, भानुबिंब ॥ ७२ ॥
तैसा सामन्यत्वें पाहिजे, तरी साधारणुचि देखिजे।
येरवीं निर्धारितां नेणिजे, सोय जयाची ॥ ७३ ॥
ऐसां चिन्हीं चिन्हितु, देखसी तोचि तरी मुक्तु।
आशापाशरहितु, वोळख पां ॥ ७४ ॥
अर्जुना तोचि योगी, विशेषिजे जो जगीं।
म्हणोनि ऐसा होय यालागीं, म्हणिपे तूंते ॥ ७५ ॥
तूं मानसा नियमु करीं, निश्चळु होय अंतरी।
मग कर्मेंद्रियें हीं व्यापारीं, वर्ततु सुखें ॥ ७६ ॥
नियतं कुरु कर्म त्वं ज्यायो ह्यकर्मणः।
शरीरयात्रापि च ते न प्रसिध्येदकर्मणः ॥ ८ ॥
म्हणशी नैष्कर्म्य होआवें, तरी एथ तें न संभवे।
आणि निषिद्ध केवीं राहाटावें, विचारी पां ॥ ७७ ॥
म्हणोनि जें जें उचित, आणि अवसरेंकरून प्राप्त।
तें कर्म हेतुरहित, आचर तूं ॥ ७८ ॥
पार्था आणिकही एक, नेणसी तूं हे कवतिक।
जें ऐसें कर्म मोचक, आपैसें असे ॥ ७९ ॥
देखें अनुक्रमाधारें, स्वधर्मु जो आचरे।
तो मोक्षु तेणें व्यापारें, निश्चित पावे ॥ ८० ॥
यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः।
तदर्थे कर्म कौंतेय मुक्तसङगः समाचरः ॥ ९ ॥
स्वधर्मु जो बापा, तोचि नित्ययज्ञु जाण पां।
म्हणोनि वर्ततां तेथ पापा, संचारु नाहीं ॥ ८१ ॥
हा निजधर्मु जैं सांडे, कुकर्मी रति घडे।
तैंचि बंधु पडे, संसारिकु ॥ ८२ ॥
म्हणोनि स्वधर्मानुष्ठान, ते अखंड यज्ञयाजन।
जो करी तया बंधन, कहींच नाहीं ॥ ८३ ॥
हा लोकु कर्में बांधिला, जो परतंत्रा भुतला।
तो नित्ययज्ञाते चुकला, म्हणोनियां ॥ ८४ ॥
आतां येचिविशीं पार्था, तुज सांगेन एकी मी कथा।
जैं सृष्ट्यादि संस्था, ब्रह्मेनि केली ॥ ८५ ॥
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥ १० ॥
तें नित्ययागसहितें, सृजिलीं भूतें समस्तें।
परी नेणतीचि तिये यज्ञातें, सूक्ष्म म्हणऊनी ॥ ८६ ॥
तें वेळीं प्रजीं विनविला ब्रह्मा, देवा आश्रयो काय एथ आम्हां।
तंव म्हणे तो कमळजन्मा, भूतांप्रति ॥ ८७ ॥
तुम्हां वर्णविशेषवशें, आम्हीं हा स्वधर्मुचि विहिला असे।
यातें उपासा मग आपैसे, काम पुरती ॥ ८८ ॥
तुम्हीं व्रतें नियमु न करावे, शरीरातें न पीडावें।
दुरी केंही न वचावे, तीर्थासी गा ॥ ८९ ॥
योगादिक साधनें, साकांक्ष आराधनें।
मंत्रयंत्रविधानें, झणीं करा ॥ ९० ॥
देवतांतरा न भजावें, हें सर्वथा कांहीं न करावे।
तुम्हीं स्वधर्मयज्ञीं यजावें, अनायासें ॥ ९१ ॥
अहेतुकें चित्तें, अनुष्ठां पां ययातें।
पतिव्रता पतीतें, जियापरी ॥ ९२ ॥
तैसा स्वधर्मरूप मखु, हाचि सेव्य तुम्हां एकु।
ऐसें सत्यलोकनायकु, म्हणता जहाला ॥ ९३ ॥
देखा स्वधर्मातें भजाल, तरी कामधेनु हा होईल।
मग प्रजाहो न संडील, तुमतें सदा ॥ ९४ ॥
देवान् भावयतानेन ते देवाः भावयंतु वः।
परस्परं भावयंतः श्रेयः परमवाप्स्यच ॥ ११ ॥
जें येणेचिकरूनि समस्तां, परितोषु होईल देवतां।
मग ते तुम्हां ईप्सीता, अर्थांते देती ॥ ९५ ॥
या स्वधर्मपूजा पूजितां, देवतागणां समस्तां।
योगक्षेमु निश्चिता, करिती तुमचा ॥ ९६ ॥
तुम्हीं देवतांते भजाल, देव तुम्हां तुष्टितील।
ऐसी परस्परें घडेल, प्रीति तेथ ॥ ९७ ॥
तेथ तुम्हीं जें करूं म्हणाल, ते आपैसे सिद्धी जाईल।
वांछितही पुरेल, मानसींचे ॥ ९८॥
वाचासिद्धी पावाल, आज्ञापक होआल।
म्हणिये तुमतें मागतील, महाऋद्धि ॥ ९९ ॥
जैसें ऋतुपतींचे द्वार, वनश्री निरंतर।
वोळगे फळभार, लावण्येंसी ॥ १००॥
इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यंते यज्ञभाविताः।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङक्ते स्तेन एव सः ॥ १२ ॥
तैसें सर्व सुखेंसहित, दैवचि मूर्तिमंत।
येईल देखा काढत, तुम्हापांठी ॥ १०१ ॥
ऐसे समस्त भोगभरित, होआल तुम्ही अनार्त।
जरी स्वधर्मैकनिरत, वर्ताल बापा ॥ १०२ ॥
कां जालिया सकल संपदा, जो अनुसरेल इंद्रियमदा।
लुब्ध होऊनियां स्वादां, विषयांचिया ॥ १०३ ॥
तिहीं यज्ञभाविकीं सुरीं, जे हे संपत्ति दिधली पुरी।
तयां स्वमार्गीं सर्वेश्वरीं, न भजेल तो ॥ १०४ ॥
अग्निमुखीं हवन, न करील देवतापूजन।
प्राप्त वेळे भोजन, ब्राह्मणांचे ॥ १०५ ॥
विमुखु होईल गुरुभक्ती, आदरु न करील अतिथी।
संतोषु नेदील ज्ञाती, आपुलिये ॥ १०६ ॥
ऐसा स्वधर्मक्रियारहितु, आथिलेपणे प्रमत्तु।
केवळ भोगासक्तु, होईल जो ॥ १०७ ॥
तया मग अपावो थोरु आहे, जेणें तें हातीचे सकळ जाये।
देखा प्राप्तही न लाहे, भोग भोगूं ॥ १०८ ॥
जैसें गतायुषीं शरीरीं, चैतन्य वासु न करी।
कां निदैवाचां घरीं, न राहे लक्ष्मी ॥ १०९ ॥
तैसा स्वधर्मु जरी लोपला, तरी सर्व सुखांचा थारा मोडला।
जैसा दीपासवे हरपला, प्रकाशु जाय ॥ ११० ॥
तैसी निजवृत्ति जेथ सांडे, तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे।
आइका प्रजाहो हे फुडें, विरंचि म्हणे ॥ १११ ॥
म्हणऊनि स्वधर्मु जो सांडील, तयातें काळु दंडील।
चोरु म्हणूनि हरील, सर्वस्व तयांचे ॥ ११२ ॥
मग सकळ दोष भंवते, गिंवसोनि घेती तयातें।
रात्रिसमयीं स्मशानातें, भूतें जैशी ॥ ११३ ॥
तैशी त्रिभुवनींची दुःखे, आणि नानाविध पातकें।
दैन्यजात तितुकें, तेथेंचि वसे ॥ ११४ ॥
ऐसें होय तया उन्मत्ता, मग न सुटे बापां रुदतां।
परी कल्पांतीहीं सर्वथा, प्राणिगण हो ॥ ११५ ॥
म्हणोनि निजवृत्ति हे न संडावी, इंद्रिये बरळों नेदावीं।
ऐसें प्रजांते शिकवी, चतुराननु ॥ ११६ ॥
जैसें जळचरां जळ सांडे, आणि तत्क्षणीं मरण मांडे।
हा स्वधर्मु तेणें पाडें, विसंबों नये ॥ ११७ ॥
म्हणोनि तुम्ही समस्तीं, आपुलालिया कर्मीं उचितीं।
निरत व्हावें पुढतपुढती, म्हणिपत असे ॥ ११८ ॥
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यते सर्वकिल्बिषैः।
भुङजते ते त्वघं पापा ये पचंत्यात्मकारणात् ॥ १३ ॥
देखा विहित क्रियविधी, निर्हेतुका बुद्धी।
जो असतिये समृद्धी, विनियोगु करी ॥ ११९ ॥
गुरु गोत्र अग्नि पूजी, अवसरीं भजे द्विजीं।
निमितादिकीं यजी, पितरोद्देश ॥ १२० ॥
या यज्ञक्रिया उचिता, यज्ञेशीं हवन करितां।
हुतशेष स्वभावतः, उरे जें जें ॥ १२१ ॥
तें सुखे आपुलां घरीं, कुटुंबेसीं भोजन करी।
कीं भोग्यचि तें निवारी, कल्मषातें ॥ १२२ ॥
तें यज्ञावशिष्ट भोगी, म्हणोनि सांडिजे तो अधीं।
जयापरी महारोगीं, अमृतसिद्धी ॥ १२३ ॥
कां तत्वनिष्ठु जैसा, नागवे भ्रांतिलेशा।
तो शेषभोगी तैसा, नाकळे दोषा ॥ १२४ ॥
म्हणोनि स्वधर्में जें अर्जें, तें स्वधर्मेचि विनियोगिजे।
मग उरे तें भोगिजे, संतोषेंसीं ॥ १२५ ॥
हें वांचूनि पार्था, राहाटों नये अन्यथा।
ऐसी आद्य ही कथा, मुरारी सांगे ॥ १२६ ॥
जें देहचि आपणपें मानिति, आणि विषयांते भोग्य म्हणती।
यापरतें न स्मरती, आणिक कांही ॥ १२७ ॥
हे यज्ञोपकरण सकळ, नेणसांते बरळ।
अहंबुद्धी केवळ, भोगूं पाहती ॥ १२८ ॥
इंद्रियरुचीसारखे, करविती पाक निके।
ते पापिये पातकें, सेविती जाण ॥ १२९ ॥
जे संपत्तिजात आघवें, हे हवनद्रव्य मानावें।
मग स्वधर्मयज्ञें अर्पावें, आदिपुरुषी ॥ १३० ॥
हें सांडोनिया मूर्ख, आपणपेयांलागीं देख।
निपजविती पाक, नानाविध ॥ १३१ ॥
जिहीं यज्ञु सिद्धी जाये, परेशा तोषु होये।
तें हें सामान्य अन्न न होये, म्हणोनियां ॥ १३२ ॥
हें न म्हणावें साधारण, अन्न ब्रह्मरूप जाण।
जे जीवनहेतु कारण, विश्वा यया ॥ १३३ ॥
अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नस्संभवः।
यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ १४ ॥
अन्नस्तव भूतें, प्ररोह पावति समस्तें।
मग वरिषु या अन्नाते, सर्वत्र प्रसवे ॥ १३४ ॥
त्या पर्जन्या यज्ञीं जन्म, यज्ञाते प्रगटी कर्म।
कर्मासि आदि ब्रह्म, वेदरूप ॥ १३५ ॥
कर्म ब्रह्मोद्बभवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं।
तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं ॥ १५ ॥
मग वेदांते परापर, प्रसवतसे अक्षर।
म्हणऊनि हे चराचर, ब्रह्मबद्ध ॥ १३६ ॥
परी कर्माचिये मूर्ति, यज्ञीं अधिवासु श्रुती।
ऐकें सुभद्रापती, अखंड गा ॥ १३७ ॥
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः।
अघायुरिंद्रियारामो मोघं पार्थ स जीवती ॥ १६ ॥
ऐशीं आदि हे परंपरा, संक्षेपे तुज धनुर्धरा।
सांगितली या अध्वरा, लागौनियां ॥ १३८ ॥
म्हणून समूळ हा उचितु, स्वधर्मरूप क्रतु।
नानुष्ठी जो मत्तु, लोकीं इये ॥ १३९ ॥
तो पातकांची राशी, जाण भार भूमीसी ॥
जो कुकर्में इंद्रियांसी, उपेगा गेला ॥ १४० ॥
तें जन्म कर्म सकळ, अर्जुना अति निष्फळ।
जैसे कां अभ्रपटळ, अकाळींचे ॥ १४१ ॥
कां गळा स्तन अजेचे, तैसें जियालें देखें तयाचें।
जया अनुष्ठान स्वधर्माचें, घडेचिना ॥ १४२ ॥
म्हणोनि ऐकें पांडवा, हा स्वधर्मु कवणे न संडावा।
सर्वभावें भजावा, हाचि एकु ॥ १४३ ॥
हां गा शरीर जरी जाहलें, तरी कर्तव्य वोघें आले।
मग उचित कां आपुले, वोसंडावे ॥ १४४ ॥
परिस पां सव्यसाची, मूर्ती लाहोनि देहाचि।
खंती करिती कर्माची, ते गावंढे गा ॥ १४५ ॥
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः।
आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते ॥ १७ ॥
देखें असतेनि देहकर्में, एथ तोचि एकु न लिंपे कर्में।
जो अखंडित रमे, आपणपांचि ॥ १४६ ॥
जे तो आत्मबोधें तोषला, तरी कृतकार्यु देखें जाहला।
म्हणोनि सहजे सांडवला, कर्मसंगु ॥ १४७ ॥
नैव तस्य कृतेनार्थो माकृतेनेह कश्चन।
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥ १८ ॥
तृप्ती झालिया जैसीं, साधने सरती आपैसीं।
देखें आत्मतुष्टीं तैसीं, कर्मे नाही ॥ १४८ ॥
तस्मादसक्तः सततं कार्य कर्म समाचर।
असक्तो ह्याचरन् कर्म पमाप्नोति पुरूषः ॥ १९ ॥
म्हणऊनि तूं नियतु, सकळ कामरहितु।
होऊनियां उचितु, स्वधर्में रहाटें ॥ १५० ॥
जे स्वकर्मे निष्कामता, अनुसरले पार्था।
कैवल्य पर तत्वतां, पातले जगी ॥ १५१ ॥
कर्मणैव हि संसिद्धीमास्थिता जनकादयः।
लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि ॥ २० ॥
देखें पां जनकादिक, कर्मजात अशेख।
न सांडिता मोक्षसुख, पावते जाहले ॥ १५२ ॥
याकारणे पार्था, होआवी कर्मीं आस्था।
हे आणिकाही एका अर्था, उपकारेल ॥ १५३ ॥
जे आचरता आपणपेयां, देखी लागेल लोका यया।
तरी चुकेल हा अपाया, प्रसंगेचि, १५४ ॥
देखें प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले।
तयाही कर्तव्य असे उरलें, लोकांलागीं ॥ १५५ ॥
मार्गीं अंधासरिसा, पुढे देखणाही चाले जैसा।
अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा, आचरोनि ॥ १५६ ॥
हां गा ऐसें जरी न कीजे, तरी अज्ञानां काय वोजे।
तिहीं कवणेपरी जाणिजे, मार्गांते या ॥ १५७ ॥
यद् यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।
स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ २१ ॥
एथ वडील जें जें करिती, तया नाम धर्मु ठेविती।
तेंचि येर अनुष्ठिती, सामान्य सकळ ॥ १५८ ॥
हें ऐसें असे स्वभावें, म्हणोनि कर्म न संडावे।
विशेषें आचरावें, लागे संती ॥ १५९ ॥
न मे पार्थस्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ २२ ॥
आता आणिकाचिया गोठी, तुज सांगो काय किरीटी।
देखें मीचि इये राहाटी, वर्तत असे ॥ १६० ॥
काय सांकडे कांही मातें, कीं कवणें एकें आर्तें।
आचरें मी धर्मातें, म्हणसी जरी ॥ १६१ ॥
तरी पुरतेपणालागी, आणिकु दुसरा नाहीं जगीं।
ऐसी सामुग्री माझां अंगी, जाणसी तूं ॥ १६२ ॥
मृत गुरूपुत्र आणिला, तो तुवां पवाडा देखिला।
तोही मी उगला, कर्मीं वर्ते ॥ १६३ ॥
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः।
मम वर्त्मानुवर्तंते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ २३ ॥
परी स्वधर्मीं वर्तें कैसा, साकांक्षु कां होय जैसा।
तयाचि एका उद्देशा -, लागोनियां ॥ १६४ ॥
जे भूतजात सकळ, असे आम्हांचि आधीन केवळ।
ते न व्हावें बरळ, म्हणोनियां ॥ १६५ ॥
उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्।
संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ २४ ॥
आम्ही पूर्णकाम होऊनी, जरी आत्मस्थिती राहुनी ॥
तरी हे प्रजा कैसेनि, निस्तरेल ॥ १६६ ॥
इहीं आमुची वास पाहावी, मग वर्तती परी जाणावी।
ते लौकिक स्थिती अवघी, नासिली होईल ॥ १६७ ॥
म्हणोनि समर्थु जो एथें, आथिला सर्वज्ञते।
तेणे सविशेषें कर्मातें, त्यजावे ना ॥ १६८ ॥
सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वंति भारत।
कुर्याद्विवांस्तथाऽसक्तश्चिकीर्षुर्लोकलोग्रहम् ॥ २५ ॥
देखे फळाचिया आशा, आचरे कामुकु जैसा।
कर्मी बहरु होआवा तैसा, निराशाही ॥ १६९ ॥
जे पुढतपुढती पार्था, हे सकळ लोकसंस्था।
रक्षणीय सर्वथा, म्हणऊनियां ॥ १७० ॥
मार्गाधारे वर्तावें, विश्व हें मोहरें लावावें।
अलौकिक नोहावें, लोकांप्रति ॥ १७१ ॥
न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम्।
जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् ॥ २६ ॥
जें सायासें स्तन्य सेवी, तें पक्वान्नें केवीं जेवी।
म्हणोनि बाळका जैशीं नेदावीं, धनुर्धरा ॥ १७२ ॥
तैशी कर्मीं जया अयोग्यता, तयाप्रति नैष्कर्म्यता।
न प्रगटावी खेळतां, आदिकरूनी ॥ १७३ ॥
तेथें सत्क्रियाचि लावावी, तेचि एकी प्रशंसावी।
नैष्कर्मींही दावावी, आचरोनि ॥ १७४ ॥
तया लोकसंग्रहालागीं, वर्ततां कर्मसंगी।
तो कर्मबंधु आंगी, वाजेलना ॥ १७५ ॥
जैसी बहुरूपियाची रावो राणी, स्त्रीपुरुषभावो नाही मनीं।
परी लोकसंपादणी, तैशीच करिती ॥ १७६ ॥
प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः।
अहंकारविमूढात्मा कर्ताहं इति मन्यते ॥ २७ ॥
देखें पुढिलाचें वोझें, जरी आपुला माथां घेईजे।
तरी सांगे कां न दाटिजे, धनुर्धरा ॥ १७७ ॥
तैसी शुभाशुभें कर्में, जिये निफजति प्रकृतिधर्में।
तियें मूर्ख मतिभ्रमें, मी कर्ता म्हणे ॥ १७८ ॥
ऐसा अहंकाराधिरूढ, एकदेशी मूढ।
तया हा परमार्थ गूढ, प्रगटावा ना ॥ १७९ ॥
हें असो प्रस्तुत, सांगिजेल तुज हित।
तें अर्जुना देऊनि चित्त, अवधारी पां ॥ १८० ॥
तत्ववित् तु महाबाहो गुणकर्मविभागयोः।
गुणाः गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ २८ ॥
जे तत्वज्ञियांचां ठायीं, तो प्रकृतिभावो नाहीं।
जेथ कर्मजात पाहीं, निपजत असे ॥ १८१ ॥
ते देहाभिमानु सांडुनी, गुणकर्में वोलांडुनी।
साक्षिभूत होऊनी, वर्तती देहीं ॥ १८२ ॥
म्हणूनि शरीरी जरी होती, तरी कर्मबंधा नाकळती।
जैसा कां भूतचेष्टा गभस्ती, घेपवेना ॥ १८३ ॥
प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्ते गुणकर्मसु।
तानकृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन् न विचालयेत् ॥ २९ ॥
एथ कर्मी तोच लिंपे, जो गुणसंभ्रमें घेपे।
प्रकृतिचेनि आटोपें, वर्ततु असे ॥ १८४ ॥
इंद्रियें गुणाधारें, राहाटती निजव्यापारें।
तें परकर्म बलात्कारें, आपादी जो ॥ १८५ ॥
मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याद्यात्मचेतसा।
निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगत्ज्वरः ॥ ३० ॥
परी उचिते कर्में आघवीं, तुवा आचरोनि मज अर्पावीं।
परी चित्तवृत्ती न्यासावी, आत्मरूपीं ॥ १८६ ॥
हें कर्म मी कर्ता, कां आचरेन या अर्था।
ऐसा अभिमानु झणें चित्ता, रिगो देसी ॥ १८७ ॥
तुवां शरीरपरा नोहावें, कामनाजात सांडावें।
मग अवसरोचित भोगावे, भोग सकळ ॥ १८८ ॥
आतां कोदंड घेऊनि हातीं, आरूढ पां इये रथीं।
देईं आलिंगन वीरवृत्ती, समाधानें ॥ १८९ ॥
जगीं कीर्ती रूढवीं स्वधर्माचा मानु वाढवीं।
मग भारापासोनि सोडवी, मेदिनी हे ॥ १९० ॥
आतां पार्था निःशंकु होई, या संग्रामा चित्त देईं।
एथ हें वांचूनि कांही, बोलों नये ॥ १९१ ॥
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवः।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ ३१ ॥
हें अनुपरोध मत माझें, जिहीं परमादरे स्वीकारिजे।
श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे, धनुर्धरा ॥ १९२ ॥
तेही सकळ कर्मी वर्ततु, जाण पां कर्मरहितु।
म्हणोनि हें निश्चितु, करणीय गा ॥ १९३ ॥
ये त्वेतत्दभ्यसूयंतो नानुतिष्ठन्ति मे मतम्।
सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टानचेतसः ॥ ३२ ॥
नातरी प्रकृतिमंतु होऊनी, इंद्रियां लळा देऊनी।
जे हें माझे मत अव्हेरुनी, ओसंडिती ॥ १९४ ॥
जे सामान्यत्वें लेखिती, अवज्ञा करूनि देखिती।
कां हा अर्थवादु म्हणती, वाचाळपणें ॥ १९५ ॥
ते मोहमदिरा भ्रमले, विषयविखें घारले।
अज्ञानपंकी बुडाले, निभ्रांत मानीं ॥ १९६ ॥
देखें शवाचां हातीं दिधलें, जैसे कां रत्न वायां गेलें।
नातरी जात्यंधा पाहलें, प्रमाण नोहे ॥ १९७ ॥
कां चंद्राचा उदयो जैसा, उपयोगा नवचे वायसा।
मूर्खा विवेकु हा तैसा, रुचेल ना ॥ १९८ ॥
तैसे ते पार्था, जे विमुख या परमार्था।
तयांसी संभाषण सर्वथा, करावे ना ॥ १९९ ॥
म्हणोनि ते न मानिती, आणि निंदाही करूं लागती।
सांगे पतंग काय साहती, प्रकाशातें ॥ २०० ॥
पतंगा दीपीं आलिंगन, तेथ त्यासी अचूक मरण।
तेवीं विषयाचरण, आत्मघाता ॥ २०१ ॥
सदृश्यं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥ ३३ ॥
म्हणोनि इंद्रिये एकें, जाणतेनि पुरुखें।
लाळावीं ना कौतुकें, आदिकरूनि ॥ २०२ ॥
हां गा सर्पेंसी खेळों येईल, कीं व्याघ्रसंसर्ग सिद्धी जाईल।
सांगे हाळाहाळ जिरेल, सेविलिया ॥ २०३ ॥
देखें खेळतां अग्नि लागला, मग तो न सांवरे जैसा उधवला।
तैसा इंद्रिया लळा दिधला, भला नोहे ॥ २०४ ॥
एर्ह वीं तरी अर्जुना, या शरीरा पराधीना।
कां नाना भोगरचना, मेळवावी ॥ २०५ ॥
आपण सायासेंकरूनि बहुतें, सकळहि समृद्धिजातें।
उदोअस्तु या देहातें, प्रतिपाळावे कां ॥ २०६ ॥
सर्वस्वें शिणोनि एथें, अर्जवावीं संपत्तिजातें।
तेणें स्वधर्मु सांडुनी देहातें, पोखावें काई ॥ २०७ ॥
मग हें तंव पांचमेळावा, शेखीं अनुसरेल पंचत्वा।
ते वेळीं केला कें गिंवसावा, शीणु आपुला ॥ २०८ ॥
म्हणूनि केवळ देहभरण, ते जाणें उघडी नागवण।
यालागी एथ अंतःकरण, देयावें ना ॥ २०९ ॥
इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ।
तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपंथिनौ ॥ ३४ ॥
एर्ह वीं इंद्रियाचियां अर्था -, सारिखा विषयो पोखितां।
संतोषु कीर चित्ता, आपजेल ॥ २१० ॥
परी तो संवचोराचा संगु, जैसा नावेक स्वस्थु।
जंव नगराचा प्रांतु, सांडिजेना ॥ २११ ॥
बापा विषाची मधुरता, झणे आवडी उपजे चित्ता।
परी तो परिणाम विचारितां, प्राणु हरी ॥ २१२ ॥
देखें इंद्रियीं कामु असे, तो लावी सुखदुराशे।
जैसा गळीं मीनु आमिषें, भुलविजे गा ॥ २१३ ॥
परी तयामाजि गळु आहे, जो प्राणातें घेऊनि जाये।
तो जैसा ठाउवा नोहे, झांकलेपणें ॥ २१४ ॥
तैसें अभिलाषें येणें कीजेल, जरी विषयाची आशा कीजेल।
तरी वरपडा होईजेल, क्रोधानळा ॥ २१५ ॥
जैसा कवळोनियां पारधी, घातेचिये संधी।
आणि मृगातें बुद्धीं, साधावया ॥ २१६ ॥
एथ तैसीची परी आहे, म्हणूनि संगु हा तुज नोहे।
पार्था दोन्ही कामक्रोध हे, घातुक जाणें ॥ २१७ ॥
म्हणऊनि हा आश्रयोचि न करावा, मनींही आठवो न धरावा।
एकु निजवृत्तीचा वोलावा, नासों नेदीं ॥ २१८ ॥
श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्।
स्वधर्मे निधनम् श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३५ ॥
अगा स्वधर्मु हा आपुला, जरि कां कठिणु जाहला।
तरी हाचि अनुष्ठिला, भला देखें ॥ २१९ ॥
येरू आचारु जो परावा, तो देखतां कीर बरवा।
परि आचरतेनि आचरावा, आपुलाचि ॥ २२० ॥
सांगे शूद्रघरीं आघवीं, पक्वाने आहाति बरवीं।
तीं द्विजें केवीं सेवावीं, दुर्बळु जरी जाहला ॥ २२१ ॥
हें अनुचित कैसेनि कीजे, अप्राप्य केवीं इच्छिजे।
अथवा इच्छिलेंही पाविजे, विचारीं पां ॥ २२२ ॥
तरी लोकांचीं धवळारें, देखोनियां मनोहरें।
असतीं आपुलीं तणारें, मोडावीं केवीं ॥ २२३ ॥
हें असो वनिता आपुली, कुरुप जरी जाहली।
तरी भोगितां तेचि भली, जियापरी ॥ २२४ ॥
तेवीं आवडे सांकडु, आचरता जरी दुवाडु।
तरी स्वधर्मचि सुरवाडु, पारत्रिकीचा ॥ २२५ ॥
हां गा साकर आणि दूध, हें गौल्य कीर प्रसिद्ध।
परी कृमीदोषीं विरुद्ध, घेपें केवीं ॥ २२६ ॥
ऐसेनिही जरी सेविजेल, तरी ते आळुकीची उरेल।
जे तें परिणामीं पथ्य नव्हेल, धनुर्धरा ॥ २२७ ॥
म्हणोनि आणिकांसी जे विहीत, आणि आपणपेयां अनुचित।
तें नाचरावे जरी हित, विचारिजे ॥ २२८ ॥
या स्वधर्मातें अनुष्ठितां, वेचु होईल जीविता।
तोहि निका वर उभयतां, दिसतसे ॥ २२९ ॥
ऐसें समस्तसुरशिरोमणी, बोलिले जेथ श्रीशार्ङगपाणी।
तेथ अर्जुन म्हणे विनवणी, असे देवा ॥ २३० ॥
हें जें तुम्हीं सांगितलें, तें सकळ कीर म्यां परिसलें।
परि पुसेन कांही आपुले, अपेक्षित ॥ २३१ ॥
अर्जुन उवाच: अथ केन प्रयुकोऽयं पापं चरति पूरुषः।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ ३६ ॥
तरी देवा हें ऐसें कैसें, जे ज्ञानियांचीही स्थितीही भ्रंशे।
मार्ग सांडुनि अनारिसे, चालत देखों ॥ २३२ ॥
सर्वज्ञुही जे होती, हे उपायही जाणती।
तेही परधर्में व्यभिचरति, कवणें गुणें ॥ २३३ ॥
बीजा आणि भुसा, अंधु निवाडु नेणे जैसा।
नावेक देखणाही तैसा, बरळे कां पां ॥ २३४ ॥
जे असता संगु सांडिती, तेचि संसर्गु करिता न धाती।
वनवासीही सेविती, जनपदातें ॥ २३५ ॥
आपण तरी लपती, सर्वस्वें पाप चुकविती।
परी बलात्कारे सुइजती, तयाचिमाजी ॥ २३६ ॥
जयांची जीवें घेती विवसी, तेचि जडोनि ठाके जीवेंसीं।
चुकविती ते गिंवसी, तयातेंचि ॥ २३७ ॥
ऐस बलात्कारु एकु दिसे, तो कवणाचा एथ आग्रहो असे।
हें बोलावे हृषिकेशें, पार्थु म्हणे ॥ २३८ ॥
श्रीभगवानुवाच: काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥ ३७ ॥
तंव हृदयकमळारामु, जो योगियांचा निष्कामकामु।
तो म्हणतसे पुरुषोत्तमु, सांगेन आइक ॥ २३९ ॥
तरी हे कम क्रोधु पाहीं, जयांते कृपेची साठवण नाहीं।
हें कृतांताचां ठायीं, मानिजती ॥ २४० ॥
हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरांचे वाघ।
भजनमार्गीचे मांग, मारक जे ॥ २४१ ॥
हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रियग्रामीचे कोंड।
यांचे व्यामोहादिक बंड, जगामाजि ॥ २४२ ॥
हे रजोगुण मानसाचे, समूळ आसुरियेचे।
धायपण ययांचे, अविद्या केले ॥ २४३ ॥
हे रजाचे कीर जाहले, परी तमासी पढियंते भले।
तेणें निजपद यां दिधले, प्रमादमोह ॥ २४४ ॥
हे मृत्यूचां नगरीं, मानिजति निकियापरी।
जे जीविताचे वैरी, म्हणऊनियां ॥ २४५ ॥
जयांसि भुकेलियां आमिषा, हें विश्व न पुरेचि घांसा।
कुळवाडी यांची आशा, चाळित असे ॥ २४६ ॥
कौतुकें कवळितां मुठीं, जिये चौदा भुवनें थेंकुटीं।
तें भ्रांति तिये धाकुटी, वाल्हीदुल्ही ॥ २४७ ॥
जे लोकत्रयाचें भातुके, खेळताचि खाय कवतिकें।
तिच्या दासीपणाचेनि बिकें, तृष्णा जिये ॥ २४८ ॥
हें असो मोहे मानिजे, यांते अहंकार घेपे दीजे।
जेणे जग आपुलेनि भोजें, नाचवित असे ॥ २४९ ॥
जेणें सत्याचा भोकसा काढिला, मग अकृत्य तृणकुटा भरिला।
तो दंभु रूढविला, जगीं इहीं ॥ २५० ॥
साध्वी शांती नागवली, मग माया मांगी शृंगारिली।
तियेकरवी विटाळविली, साधुवृंदे ॥ २५१ ॥
इहीं विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची खाली काढिली।
जितया मान मोडिली, उपशमाची ॥ २५२ ॥
इहीं संतोषवन खांडिले, धैर्यदुर्ग पाडिले।
आनंदरोप सांडिले, उपडूनियां ॥ २५३ ॥
इहीं बोधाची रोपे लुंचिली, सुखाची लिपी पुसली।
जिव्हारीं आगी सूदली, तापत्रयाची ॥ २५४ ॥
हे आंगा तव घडले, जीवींचि आथी जडले।
परी नातुडती गिंवसले, ब्रह्मादिकां ॥ २५५ ॥
हें चैतन्याचे शेजारी, वसती ज्ञानाचां एका हारीं।
म्हणोनि प्रवर्तले महामारी, सांवरती ना ॥ २५६ ॥
हें जळेंवीण बुडविती, आगीविण जाळिती।
न बोलता कवळिती, प्राणियांते ॥ २५७ ॥
हे शस्त्रेविण साधिती, दोरेविण बांधिती।
ज्ञानियासी तरी वधिती, पैज घेऊनि ॥ २५८ ॥
चिखलेंवीण रोविती, पाशिकेंवीण गोंविती।
हे कवणाजोगे न होती, आंतौटेपणें ॥ २५९ ॥
धूमेनाऽव्रियते वन्हिर्यथादर्शो मलेन च।
येथोल्बेनावृत्तो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥ ३८ ॥
जैसी चंदनाची मुळी, गिंवसोनी घेपे व्याळीं।
ना तरी उल्बाची खोळी, गर्भस्थासी ॥ २६० ॥
कां प्रभावीण भानु, धूमेंवीण हुताशनु।
जैसा दर्पण मळहीनु, कहींच नसे ॥ २६१ ॥
तैसें इहीविण एकलें, आम्हीं ज्ञान नाही देखिलें।
जैसें कोंडेनि पां गुंतलें, बीज निपजे ॥ २६२ ॥
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा।
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणतलेन च ॥ ३९ ॥
तैसें ज्ञान तरी शुद्ध, परी इहीं असे प्ररुद्ध।
म्हणोनि तें अगाध, होऊनि ठेलें ॥ २६३ ॥
आधी यांते जिणावें, मग तें ज्ञान पावावें।
तंव पराभवो न संभवे, रागद्वेषां ॥ २६४ ॥
यांते साधावयालागी, जें बळ जाणिजे अंगी।
तें इंधन जैसें आगी, सावावो होय ॥ २६५ ॥
इंद्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते।
एतैरविमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥ ४० ॥
तैसे उपाय कीजती जे जे, ते यांसीचि होती विरजे।
म्हणोनि हटियांते जिणिजे, इहींचि जगीं ॥ २६६ ॥
ऐसियांही सांकडां बोला, एक उपायो आहे आहे भला।
तो करितां जरी आंगवला, तरी सांगेन तुज ॥ २६७ ॥
तस्मात् त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ।
पाप्मानं प्रहि ह्येनं ज्ञान्विज्ञाननाशनम् ॥ ४१ ॥
यांचा पहिला कुरुठा इंद्रियें, एथूनि प्रवृत्ति कर्मातें वियें।
आधी निर्दळूनि घालीं तियें, सर्वथैव ॥ २६८ ॥
इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः।
मनसस्तु परा बुद्धियोर् बुद्धेः परतस्तु सः ॥ ४२ ॥
मग मनाची धांव पारुषेल, आणि बुद्धीची सोडवण होईल।
इतुकेनि थारा मोडेल, या पापियांचा ॥ २६९ ॥
एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना।
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॥ ४३ ॥
हें अंतरीहूनि जरी फिटले, तरी निभ्रांत जाण निवटले।
जैसें रश्मीवीण उरले, मृगजळ नाही ॥ २७० ॥
तैसे रागद्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मीचें स्वराज्य आलें।
मग तो भोगी सुख आपुलें, आपणचि ॥ २७१ ॥
जे गुरुशिष्यांची गोठी, पदपिंडाची गांठी।
तेथ स्थिर राहोनि नुठीं, कवणे काळीं ॥ २७२ ॥
ऐसें सकळ सिद्धांचा रावो, देवी लक्ष्मीयेचा नाहो।
राया ऐक देवदेवो, बोलता जाहला ॥ २७३ ॥
आतां पुनरपि तो अनंतु, आद्य एकी मातु।
सांगेल तेथ पंडुसुतु, प्रश्नु करील ॥ २७४ ॥
तया बोलाचा हन पाडु, का रसवृत्तीचा निवाडु।
येणें श्रोतयां होईल सुरवाडु, श्रवणसुखाचा ॥ २७५ ॥
ज्ञानदेवो म्हणे निवृत्तिचा, चांग उठावा करूनि उन्मेषाचा।
मग संवादु श्रीहरिपार्थाचा, भोग बापा ॥ २७६ ॥
ज्ञानेश्वरी / अध्याय चौथा : संत ज्ञानेश्वर
आजि श्रवणेंद्रिया पिकलें, जे येणें गीतानिधान देखिलें।आता स्वप्नचि हें तुकलें, साचासरिसें ॥ १ ॥
आधी विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी।
आणि भक्तराजु किरीटी, परिसत असे ॥ २ ॥
जैसा पंचमालापु सुगंधु, कीं परिमळ आणि सुस्वादु।
तं भला जाहला विनोदु, कथेचा इये ॥ ३ ॥
कैसी आगळिक दैवाची, जे गंगा वोळली अमृताची।
हो कां जपतपें श्रोतयांची, फळा आली ॥ ४ ॥
आतां इंद्रियजात आघवें, तिहीं श्रवणाचे घर रिघावें।
मग संवादसुख भोगावें, गीताख्य हें ॥ ५ ॥
हा अतिसो अतिप्रसंगे, सांडूनि कथाचि ते सांगे।
जे कृष्णार्जुन दोघे, बोलत होते ॥ ६ ॥
ते वेळी संजयों रायातें म्हणे, अर्जुन अधिष्ठिला दैवगुणें।
जे अतिप्रीती नारायणें, बोलिजतु असे ॥ ७ ॥
जें न संगेचि पितया वसुदेवासी, जें न संगे माते देवकीसी।
जें न संगेचि बळिभद्रासी, तें गुह्य अर्जुनेंसी बोलत ॥ ८ ॥
देवी लक्ष्मीयेवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख।
आणि कृष्णस्नेहाचें पिक, यांतेचि आथी ॥ ९ ॥
सनकादिकांच्या आशा, वाढिनल्या होत्या कीर बहुवसा।
परी त्याही येणें माने यशा, येतीचिना ॥ १० ॥
या जगदीश्वराचें प्रेम, एथ दिसतसे निरुपम।
कैसें पार्थें येणें सर्वोत्तम, पुण्य केलें ॥ ११ ॥
हो कां जयाचिया प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती।
मज एकवंकी याची स्थिती, आवडतु असे ॥ १२ ॥
एर्हकवीं हा योगिया नाडळे, वेदार्थासी नाकळे।
जेथ ध्यानाचेही डोळे, पावतीना ॥ १३ ॥
तें हा निजस्वरूप, अनादि निष्कंप।
परी येणे मानें सकृप, जाहला असे ॥ १४ ॥
हा त्रैलोक्यपटाचि घडी, आकाराची पैलथडी।
कैसा याचिये आवडी, आवरला असे ॥ १५ ॥
श्रीभगनानुवाच: इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्।
विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥ १ ॥
मग देव म्हणे अगा पंडुसुता, हाचि योगु आम्हीं विवस्वता।
कथिला परी ते वार्ता, बहुवां दिवसांची ॥ १६ ॥
मग तेणें विवस्वतें रवी, हे योगस्थिति आघवी।
निरूपिली बरवी, मनूप्रती ॥ १७ ॥
मनूनें आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशिली।
ऐसी परंपरा विस्तारिली, आद्य हे गा ॥ १८ ॥
एवं परंपराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः।
स कालेनेह महता योगो नष्टः परंतप ॥ २ ॥
मग आणिकही या योगाते, राजर्षि जाहले जाणते।
परी तेथोनि आतां सांप्रतें, नेणिजे कोणी ॥ १९ ॥
जे प्राणियां कामी भरू, देहाचिवरी आदरु।
म्हणोनि पडला विसरु, आत्मबोधाचा ॥ २० ॥
अव्हांटलिया आस्थाबुद्धि, विषयसुखचि परमावधि।
जीवु तैसा उपाधि, आवडे लोकां ॥ २१ ॥
एर्ह वीं तरी खवणेयांच्या गांवीं, पाटाऊवें काय करावीं।
सांगे जात्यंधा रवी, काय आथी ॥ २२ ॥
कां बहिरयांचां आस्थानीं, कवणे गीतातें मानी।
कीं कोल्हेया चांदणीं, आवडी उपजे ॥ २३ ॥
पैं चंद्रोदया आरौतें, जयांचे डोळे फुटती असते।
ते काऊळे केवीं चंद्रातें, ओळखती ॥ २४ ॥
तैसे वैराग्याची शिंव न देखती, जे विवेकाची भाषा नेणती।
ते मूर्ख केंवीं पावती, मज ईश्वराते ॥ २५ ॥
कैसा नेणों मोहो वाढीनला, तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला।
म्हणोनि योगु हा लोपला, लोकीं इये ॥ २६ ॥
स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥ ३ ॥
तोचि हा आजि आतां, तुजप्रती कुंतीसुता।
सांगितला आम्हीं तत्वता, भ्रांति न करीं ॥ २७ ॥
हें जीवींचे निज गुज, परी केवीं राखों तुज।
जे पढियेसी तूं मज, म्हणऊनियां ॥ २८ ॥
तूं प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा।
मैत्रियेची चित्कळा, धनुर्धरा ॥ २९ ॥
तूं अनुसंगाचा ठावो, आतां तुज काय वंचूं जावों।
जरी संग्रामारूढ आहों, जाहलों आम्ही ॥ ३० ॥
तरी नावेक हें सहावें, गाजाबज्यही न धरावें।
परी तुझें अज्ञानत्व हरावें, लागे आधीं ॥ ३१ ॥
अर्जुन उवाच: अपरं भवतो जन्मं परं जन्म विवस्वतः।
कथमेतद् विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥ ४ ॥
तंव अर्जुन म्हणे हरी, माय आपुलेयाचा स्नेहो करी।
एथ विस्मो काय अवधारीं, कृपानिधी ॥ ३२ ॥
तूं संसारश्रांतांची साऊली, अनाथ जीवांची माऊली।
आमुतें कीर प्रसवली, तुझीच कृपा ॥ ३३ ॥
देवा पांगुळ एकादें विईजे, तरी जन्मोनि जोजारू साहिजे।
हें बोलों काय तुझें, तुजचि पुढां ॥ ३४ ॥
आतां पुसेन जें मी कांही, तेथ निकें चित्त देईं।
तेवींचि देवें कोपावें ना कांही, बोला एका ॥ ३५ ॥
तरी मागील जे वार्ता, तुवां सांगितली होती अनंता।
ते नावेक मज चित्ता, मानेचिना ॥ ३६ ॥
जे तो विवस्वतु म्हणजे कायी, ऐसें हें वडिलां ठाऊवें नाहीं।
तरी तुवांचि केवीं पाहीं, उपदेशिला ॥ ३७ ॥
तो तरी आइकिजे बहुतां काळांचा, आणि तूं तंव कृष्ण सांपेचा।
म्हणोनि गा इये मातुचा, विसंवादु ॥ ३८ ॥
तेवींचि देवा चरित्र तुझें, आपण कांही काय जाणिजे।
हें लटिके केवीं म्हणिजे, एकिहेळां ॥ ३९ ॥
परी हेचि मातु आघवी, मी परियेसें तैशी सांगावी।
जे तुवांचि तया रवीं केवीं, उपदेशु केला ॥ ४० ॥
श्री भगवानुवाच: बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ॥ ५ ॥
तंव कृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्वतु जैं होता।
तैं आम्ही नसों ऐसी चित्ता, भ्रांति जरी तुज ॥ ४१ ॥
तरी तूं गा हें नेणसी, पैं जन्में आम्हां तुम्हांसी।
बहुतें गेलीं परी तियें न स्मरसी, आपली तूं ॥ ४२ ॥
मी जेणें जेणें अवसरें, जें जें होऊनि अवतरें।
ते समस्तही स्मरें, धनुर्धरा ॥ ४३ ॥
अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतामामिश्वरोऽपि सन्।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया ॥ ६ ॥
म्हणोनि आघवें, मज मागील आठवें।
मी अजुही परि संभवे, प्रकृतिसंगे ॥ ४४ ॥
माझें अव्ययत्व तरी न नसे, परी होणें जाणें एक दिसे।
ते प्रतिबिंबे मायावशें, माझांचि ठायीं ॥ ४५ ॥
माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीनु ऐसा आवडे।
तेंही भ्रांतिबुद्धि तरी घडे, एर्हकवीं नाहीं ॥ ४६ ॥
कीं एकचि दिसे दुसरें, तें दर्पणाचेनि आधारें।
एर्हएवीं काय वस्तुविचारें, दुजें आहे ॥ ४७ ॥
तैसा अमूर्तचि मी किरीटी, परी प्रकृति जैं अधिष्ठीं।
तैं साकारपणे नटें नटीं, कार्यालागीं ॥ ४८ ॥
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ७ ॥
ते वेळी आपुल्याचेनि कैवारें, मी साकारु होऊनि अवतरें।
मग अज्ञानाचें आंधारें, गिळूनि घालीं ॥ ४९ ॥
अधर्माचि अवधी तोडीं, दोषांचीं लिहिलीं फाडीं।
सज्जनांकरवी गुढी, सुखाची उभवीं ॥ ५० ॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ ८ ॥
ते वेळी आपुल्याचेनि कैवारें, मी साकारु होऊनि अवतरें।
मग अज्ञानाचें आंधारें, गिळूनि घालीं ॥ ५१ ॥
अधर्माचि अवधी तोडीं, दोषांचीं लिहिलीं फाडीं।
सज्जनांकरवी गुढी, सुखाची उभवीं ॥ ५२ ॥
दैत्यांचीं कुळें नाशीं, साधूंचा मानू गिंवशीं।
धर्मासी नीतीशी, शेंज भरी ॥ ५३ ॥
मी अविवेकाची काजळी, फेडूनी विवेकदीप उजळीं।
तैं योगियां पाहे दिवाळी, निरंतर ॥ ५४ ॥
स्वसुखे विश्व कोंदे, धर्मचि जगीं नांदे।
भक्तां निघती दोंदें, सात्विकाचीं ॥ ५५ ॥
तैं पापाचा अचळु फिटे, पुण्याची पहाट फुटे।
जैं मूर्ति माझी प्रगटे, पंडुकुमरा ॥ ५६ ॥
ऐसेया काजालागी, अवतरें मी युगीं युगीं।
परि हेंचि वोळखे जो जगीं, तो विवेकिया ॥ ५७ ॥
जन्म कर्म च ने दिव्यमेवं यो वेत्ति तत्वतः।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ९ ॥
माझे अजत्वें जन्मणें, अक्रियताचि कर्म करणें।
हें अविकार जो जाणे, तो परममुक्त ॥ ५८ ॥
तो चालिला संगे न चळे, देहींचा देहा नाकळे।
मग पंचत्वीं तंव मिळे, माझांचि रूपीं ॥ ५९ ॥
वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥ १० ॥
एर्ह वीं परापर न शोचिती, जे कामनाशून्य होती।
वाटा केवेळीं न वचती, क्रोधाचिया ॥ ६० ॥
जे सदा मियांचि आथिले, माझिया सेवा जियाले।
कां आत्मबोधे तोषले, वीतराग जे ॥ ६१ ॥
जे तपोतेजाचिया राशी, कां एकायतन ज्ञानासी।
जे पवित्रता तीर्थांसी, तीर्थरूप ॥ ६२ ॥
ते मद्भावा सहजें आले, मी तेचि ते होऊनि ठेले।
जे मज तयां उरले, पदर नाहीं ॥ ६३ ॥
सांगे पितळेची गंधिकाळिक, जे फिटली होय निःशेख।
तैं सुवर्ण काई आणिक, जोडूं जाईजे ॥ ६४ ॥
तैसे यमनियमीं कडसले, ते तपोज्ञानीं चोखळले।
मी तेचि ते जाहले, एथ संशयो कायसा ॥ ६५ ॥
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ११ ॥
एर्ह वीं तरी पाहीं, जे जैसे माझां ठाईं।
भजती तया मीही, तैसाचि भजे ॥ ६६ ॥
देखें मनुष्यजात सकळ, हें स्वभावता भजनसीळ।
जाहलें असे केवळ, माझां ठायीं ॥ ६७ ॥
परी ज्ञानेंवीण नाशिले, जे बुद्धिभेदासि आले।
तेणेंचि या कल्पिलें, अनेकत्व ॥ ६८ ॥
म्हणऊनि अभेदीं भेदु देखती, यया अनाम्या नामें ठेविती ॥
देवी देवो म्हणती, अचर्चातें ॥ ६९ ॥
जें सर्वत्र सदा सम, तेथे विभाग अधमोत्तम।
मतिवशें संभ्रम, विवंचिती ॥ ७० ॥
काङक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥ १२ ॥
मग नानाहेतुप्रकारें, यथोचितें उपचारें।
मानिलीं देवतांतरें, उपासिती ॥ ७१ ॥
तेथ जें जें अपेक्षित, तें तैसेंचि पावति समस्त।
परी ते कर्मफळ निश्चित, वोळख तूं ॥ ७२ ॥
वाचूंनि देतें घेतें आणिक, निभ्रांत नाही सम्यक।
एथ कर्मचि फळसूचक, मनुष्यलोकीं ॥ ७३ ॥
जैसें क्षेत्रीं जें पेरिजे, तेंवांचूनि आन न निपजे।
कां पाहिजे तेंचि देखिजे, दर्पणाधारें ॥ ७४ ॥
ना तरी कडेयातळवटीं, जैसा आपुलाचि बोलु किरीटी।
पडिसादु होऊनि उठी, निमित्तयोगें ॥ ७५ ॥
तैसा समस्तां यां भजनां, मी साक्षिभूतु पैं अर्जुना।
एथ प्रतिफळे भावना, आपुलाली ॥ ७६ ॥
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः।
तस्य कर्तारमपि मां विध्यकर्तारमव्यम् ॥ १३ ॥
आतां याचिपरी जाण, चार्ही् आहेती हे वर्ण।
सृजिले म्यां गुण -, कर्मभागें ॥ ७७ ॥
जे प्रकृतीचेनि आधारें, गुणाचेनि व्यभिचारें।
कर्में तदनुसारें, विवंचिली ॥ ७८ ॥
एथ एकचि हे धनुष्यपाणी, परीं जाहले गा चहूं वर्णीं।
ऐसी गुणकर्मीं कडसणी, केली सहजें ॥ ७९ ॥
म्हणोनि आईकें पार्था, हे वर्णभेदसंस्था।
मी कर्ता नव्हे सर्वथा, याचिलागीं ॥ ८० ॥
न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ १४ ॥
हें मजचिस्तव जाहलें, परी म्यां नाहीं केलें।
ऐसे जेणे जाणितलें, तो सुटला गा ॥ ८१ ॥
एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वेरपि मुमुक्षुभिः।
कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ॥ १५ ॥
मागील मुमुक्षु जे होते, तिहीं ऐशियाचि जाणोनि मातें।
कर्मे केलीं समस्तें, धर्नुधरा ॥ ८२ ॥
परी तें बीजें जैसीं दग्धलीं, नुगवतीचि पेरलीं।
तैशीं कर्मेंचि परि तयां जाहली, मोक्षहेतु ॥ ८३ ॥
एथ आणिकही एक अर्जुना, हे कर्माकर्मविवंचना।
आपुलिये चाडे सज्ञाना, योग्य नोहे ॥ ८४ ॥
किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः।
तत् ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १६ ॥
मर्म म्हणिजे तें कवण, अथवा अकर्मा काय लक्षण।
ऐसें विचारितां विचक्षण, गुंफोनि ठेले ॥ ८५ ॥
जैसें का कुडें नाणें, खर्याुचेनि सारखेपणें।
डोळ्यांचेहि देखणें, संशयी घाली ॥ ८६ ॥
तैसे नैष्कर्म्यतेचेनि भ्रमें, गिंवसिजत आहाति कर्में।
जे दुजी सृष्टि मनोधर्में, करूं शकती ॥ ८७ ॥
वाचूनि मूर्खाची गोठी कायसी, एथ मोहले गा क्रांतदर्शी।
म्हणोनि आतां तेचि परियेसीं, सांगेन तुज ॥ ८८ ॥
कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः।
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ १७ ॥
तरी कर्म म्हणजे स्वभावें, जेथ विश्वाकारु संभवे।
ते सम्यक आधीं जाणावें, लागे एथ ॥ ८९ ॥
मग वर्णाश्रमासि उचित, जे विशेष कर्म विहित।
तेंही वोळखावें निश्चित, उपयोगेंसीं ॥ ९० ॥
पाठीं जें निषिद्ध म्हणिपे, तेंही बुझावें स्वरूपें।
येतुलेनि येथ कांही न गुंफे, आपैसेंचि ॥ ९१ ॥
एर्हलवीं जग हें कर्माधीन, ऐसी याची व्याप्ती गहन।
परि तें असो आइकें चिन्ह, प्राप्ताचें गा ॥ ९२ ॥
कर्मण्य कर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः।
स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥ १८ ॥
जो सकळकर्मीं वर्ततां, देखे आपुली नैष्कर्म्यता।
कर्मसंगे निराशता, फळाचिया ॥ ९३ ॥
आणि कर्तव्यतेलागीं, जया दुसरें नाहीं जगीं।
ऐसिया नैष्कर्मता तरी चांगी, बोधला असे ॥ ९४ ॥
परि क्रियाकलापु आघवा, आचरतु दिसे बरवा।
तरी तो इहीं चिन्हीं जाणावा, ज्ञानिया गा ॥ ९५ ॥
जैसा कां जळापाशीं उभा ठाके, तो जरी आपणपें जळामाजिं देखे।
तरी तो निभ्रांत वोळखे, म्हणे मी वेगळा आहे ॥ ९६ ॥
अथवा नावे हन जो रिगे, तो थडियेचे रुख जातां देखे वेगें।
तेचि साचोकारें जों पाहों लागे, तंव रुख म्हणे अचळ ॥ ९७ ॥
तैसे सर्व कर्मीं असणें, तें फुडें मानूनि वायाणें।
मग आपणपें जो जाणे, नैष्कर्म्यु ऐसा ॥ ९८ ॥
आणि उदोअस्ताचेनि प्रमाणें, जैसे न चलतां सूर्याचें चालणें।
तैसें नैष्कर्म्यत्व जाणे, कर्मीचि असतां ॥ ९९ ॥
तो मनुष्यासारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे।
जैसें जळीं जळामाजीं न बुडे, भानुबिंब ॥ १०० ॥
तेणें न पाहतां विश्व देखिलें, न करितां सर्व केले।
न भोगितां भोगिलें, भोग्यजात ॥ १०१ ॥
एकेचि ठायीं बैसला, परि सर्वत्र तोचि गेला।
हें असो विश्व जाहला, आंगेंचि तो ॥ १०२ ॥
यस्य सर्वे समारम्भाः कामसंकल्पवर्जिताः।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः ॥ १९ ॥
जया पुरुषाचां ठायीं, कर्माचा तरी खेदु नाहीं।
परी फळापेक्षा कहीं, संचरेना ॥ १०३ ॥
आणि हें कर्म मी करीन, अथवा आदरिले सिद्धी नेईन।
येणें संकल्पेंही जयाचें मन, विटाळेना ॥ १०४ ॥
ज्ञानाग्निचेनि मुखें, जेणें जाळिली कर्में अशेखें।
तो ब्रह्मचि मनुष्यवेखें, वोळख तूं ॥ १०५ ॥
त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः ॥ २० ॥
जो शरीरीं उदासु, फळभोगीं निरासु।
नित्यता उल्हासु, होऊनि असे ॥ १०६ ॥
जो संतोषाचां गाभारां, आत्मबोधाचिया वोगरा।
पुरे न म्हणेचि धनुर्धरा, आरोगितां ॥ १०७ ॥
निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः।
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिशम् ॥ २१ ॥
यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः।
सम सिद्धावसिद्धौच कृत्वाऽपि न निबध्यते ॥ २२ ॥
कैसा अधिकाधिक आवडी, घेत महासुखाची गोडी।
सांडोनियां आशा कुरोंडी, अहंभावेसीं ॥ १०८ ॥
म्हणोनि अवसरें जें जें पावे, तेणेचि तो सुखावे।
जया आपुले आणि परावें, दोन्ही नाहीं ॥ १०९ ॥
तो दिठी जें पाहे, ते आपणचि होऊनि जाये।
आइकें तें आहे, तोचि जाहाला ॥ ११० ॥
चरणीं हन चाले, मुखें जें जें बोले।
ऐसें चेष्टाजात तेतुलें, आपणचि जो ॥ १११ ॥
हें असो विश्व पाहीं, जयासि आपणपेवांचूनि नाहीं।
आता कवण तें कर्म कायी, बाधी तयातें ॥ ११२ ॥
हा मत्सरु जेथ उपजे, तेतुले नुरेचि जया दुजें।
तो निर्मत्सरु काइ म्हणिजे, बोलवरी ॥ ११३ ॥
म्हणोनि सर्वांपरी मुक्तु, तो सकर्मुचि तो कर्मरहितु।
सगुण परि गुणातीतु, एथ भ्रांति नाहीं ॥ ११४ ॥
गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित्चेतसः।
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥ २३ ॥
तो देहसंगे तरी असे, परी चैतन्यासारिखा दिसे।
पाहतां परब्रह्माचेनि कसें, चोखाळु भला ॥ ११५ ॥
ऐसाही परी कौतुकें, जरी कर्मे करी यज्ञादिकें।
तरी तियें लया जाती अशेखें, तयाचांचि ठायीं ॥ ११६ ॥
अकाळींची अभ्रें जैसी , उर्मीविण आकाशीं।
हारपती आपैशीं, उदयलीं सांती ॥ ११७ ॥
तैशीं विधीविधान विहितें जरी आचरे तो समस्तें।
तरी तियें ऐक्यभावें ऐक्यातें, पावतीचि गा ॥ ११८ ॥
ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मस्माधिना ॥ २४ ॥
जें हें हवन मी होता, कां इये यज्ञीं हा भोक्ता।
ऐसीया बुद्धीसि नाही भंगता, म्हणऊनियां ॥ ११९ ॥
जे इष्टयज्ञ यजावे, तें हविर्मंत्रादि आघवें।
तो देखतसे अविनाशभावें, आत्मबुद्धि ॥ १२० ॥
म्हणऊनि ब्रह्म तेंचि कर्म, ऐसें बोधा आले जया सम।
तया कर्तव्य तें नैष्कर्म्य, धनुर्धरा ॥ १२१ ॥
आतां अविवेककुमारत्वा मुकले, जयां विरक्तीचे पाणिग्रहण जाहलें।
मग उपासन जिहीं आणिलें, योगाग्नीचें ॥ १२२ ॥
दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥ २५ ॥
जे यजनशील अहर्निशीं, जिहीं अविद्या हविली मनेंसी।
गुरुवाक्यहुताशीं, हवन केलें ॥ १२३ ॥
तिहीं योगाग्निकीं यजिजे, तो दैवयज्ञु म्हणिजे।
जेणे आत्मसुख कामिजे, पंडुकुमरा ॥ १२४ ॥
दैवास्तव देहाचे पाळण, ऐसा निश्चयो परिपूर्ण।
जो चिंतीना देहभरण, तो महायोगी जाण दैवयोगें ॥ १२५ ॥
आतां अवधारीं सांगेन आणिक, जे ब्रह्माग्नी साग्निक।
तयांते यज्ञेंचि यज्ञु देख, उपासिजे ॥ १२६ ॥
श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति।
शब्दादीन् विषयानन्य, इंद्रियाग्निषु जुह्वति ॥ २६ ॥
एथ संयमाग्निहोत्री, जे युक्तित्रयांच्यां मंत्रीं।
यजन करिती पवित्रीं, इंद्रियद्रव्यीं ॥ १२७ ॥
एकां वैराग्यरवि विवळे, तंव संयती विहार केले।
तेथ अपावृत्त जाहले, इंद्रियानळ ॥ १२८ ॥
तिहीं विरक्तीची ज्वाळा घेतली, तंव विकारांची इंधने पळिपलीं।
तेथ आशाधूमें सांडिलीं, पांचही कुंडें ॥ १२९ ॥
मग वाक्यविधीचिया निरवडी, विषयआहुति उदंडी।
हवन केलें कुंडी, इंद्रियाग्नीचां ॥ १३० ॥
सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥ २७ ॥
एकीं ययापरी पार्था, दोषु क्षाळिले सर्वथा।
आणिकीं हृदयारणीं मंथा, विवेकु केला ॥ १३१ ॥
तो उपशमें निहटिला, धैर्यें वरी दाटिला।
गुरुवाक्यें काढिला, बळकटपणें ॥ १३२ ॥
ऐसे समरसें मंथन केलें, तेथ झडकरी काजा आलें।
जे उज्जीवन जहालें, ज्ञानाग्नीचें ॥ १३३ ॥
पहिला ऋद्धिसिद्धीचा संभ्रमु, तो निवर्तोनि गेला धूमु।
मग प्रगटला सूक्ष्मु, विस्फुलिंगु ॥ १३४ ॥
मन तयाचे मोकळें, तेचि पेटवण घातलें।
जें यमदमीं हळुवारलें, आइतें होतें ॥ १३५ ॥
तेणें सादुकपणें ज्वाळा समृद्धा, मग वासनांतराचिया समिधा।
स्नेहेंसी नानाविधा, जाळिलिया ॥ १३६ ॥
तेथ सोहंमंत्रें दीक्षितीं, इंद्रियकर्मांचिया आहुती।
तिये ज्ञानानळीं प्रदीप्तीं, दिधलिया ॥ १३७ ॥
पाठीं प्राणक्रिचेनि स्रुवेनिशीं, पूर्णाहुती पडली हुताशीं।
तेथ अवभृत समरसीं, सहजें जाहलें ॥ १३८ ॥
मग आत्मबोधींचे सुख, जे संयमाग्नीचें हुतशेष।
तोचि पुरोडाशु देख, घेतला तिहीं ॥ १३९ ॥
एक ऐशिया इहीं यजनीं, मुक्त ते जाहले त्रिभुवनीं।
या यज्ञक्रिया तरी आनानी, परि प्राप्य तें एक ॥ १४० ॥
द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥ २८ ॥
एक द्रव्ययज्ञु म्हणिपती, एक तपसामग्रिया निपजती।
एक योगयागुही आहाती, जे सांगितले ॥ १४१ ॥
एकीं शब्दीं शब्दु यजिजे, तो वाग्यज्ञु म्हणिजे।
ज्ञाने ज्ञेय गमिजे, तो ज्ञानयज्ञु ॥ १४२ ॥
हें अर्जुना सकळ कुवाडें, जे अनुष्ठितां अतिसांकडे।
परी जितेंद्रियासीचि घडे, योग्यतावशें ॥ १४३ ॥
ते प्रवीण तेथ भले, आणि योगसमृद्धी आथिले।
म्हणोनि आपणपां तिहीं केले, आत्महवन ॥ १४४ ॥
अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपाऽनं तथापरे।
प्राणापानगति रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥ २९ ॥
मग अपाग्नीचां मुखी, प्राणद्रव्यें देखी।
हवन केलें एकीं, अभ्यासयोगें ॥ १४५ ॥
एकु अपानु प्राणीं अर्पिती, एक दोहींतेंही निरुंधिती।
ते प्राणायामी म्हणिपती, पंडुकुमरा ॥ १४६ ॥
अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति।
सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥ ३० ॥
एक वज्रयोगक्रमें, सर्वाहारसंयमें।
प्राणीं प्राणु संभ्रमें, हवन करिती ॥ १४७ ॥
ऐसे मोक्षकाम सकळ, समस्त हे यजनशीळ।
जिहीं यज्ञद्वारा मनोमळ, क्षाळण केले ॥ १४८ ॥
जया अविद्याजात जाळितां, जे उरलें निजस्वभावता।
जेथ अग्नि आणि होता, उरेचिना ॥ १४९ ॥
जेथ यजितयाचा कामु पुरे, यज्ञींचें विधान सरे।
मागुते जेथूनि वोसरे, क्रियाजात ॥ १५० ॥
विचार जेथ न रिगे, हेतु जेथ न निगे।
जें द्वैतदोषसंगें, सिंपेचिना ॥ १५१ ॥
यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम्।
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥ ३१ ॥
ऐसें अनादिसिद्ध चोखट, जें ज्ञान यज्ञावशिष्ट।
तें सेविती ब्रह्मनिष्ठ, ब्रह्माहंमंत्रे ॥ १५२ ॥
ऐसे शेषामृते धाले, कीं अमर्त्यभावा आले।
म्हणोनि ब्रह्म ते जहाले, अनायासे ॥ १५३ ॥
येरां विरक्ति माळ न घालीचि, जयां संयमाग्नीची सेवा न घडेचि।
जें योगयागु न करितीचि, जन्मले सांते ॥ १५४ ॥
जयां ऐहिक धड नाहीं, तयांचें परत्र पुससी काई।
म्हणोनि सांगों कां वांई, पंडुकुमरा ॥ १५५ ॥
एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे।
कर्मजान् विद्धि तान् सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्षसे ॥ ३२ ॥
ऐसे बहुतीं परीं अनेग, जे सांगितले तुज कां याग।
ते विस्तारुनि वेदेंचि चांग, म्हणितले आहाती ॥ १५६ ॥
परि तेणें विस्तारें काय करावें, हेंचि कर्मसिद्ध जाणावें।
येतुलेनि कर्मबंधु स्वभावें, पावेल ना ॥ १५७ ॥
श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञान् ज्ञानयज्ञः परंतप।
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥ ३३ ॥
अर्जुना वेदु जयांचे मूळ, जे क्रियाविशेषें स्थूळ।
जयां नव्हाळियेचे फळ, स्वर्गसुख ॥ १५८ ॥
ते द्रव्यादियागु कीर होती, परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती।
जैशी तारातेजसंपत्ती, दिनकरापाशीं ॥ १५९ ॥
देखें परमात्मसुखनिधान, साधावया योगीजन।
जें न विसंबिती अंजन, उन्मेषनेत्रीं ॥ १६० ॥
जें धांवतया कर्माची लाणी, नैष्कर्म्यबोधाची खाणी।
जें भुकेलिया धणी, साधनाची ॥ १६१ ॥
जेथ प्रवृत्ति पांगुळ जाहली, तर्काची दिठी गेली।
जेणें इंद्रिये विसरलीं, इंद्रियसंगु ॥ १६२ ॥
मनाचे मनपण गेलें, जेथ बोलाचे बोलपण ठेलें।
जयामाजि सांपडलें, ज्ञेय दिसें ॥ १६३ ॥
जेथ वैराग्याचा पांगु फिटे, विवेकाचाही सोसु तुटे।
जेथ न पाहता सहज भेटे, आपणपें ॥ १६४ ॥
तद् विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः ॥ ३४ ॥
तें ज्ञान पैं गा बरवें, जरी मनीं आथि आणावें।
तरी संतां यां भजावें, सर्वस्वेंशीं ॥ १६५ ॥
जे ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंटा।
तू स्वाधीन करी सुभटा, वोळगोनी ॥ १६६ ॥
तरी तनुमनुजीवें, चरणासी लागावें।
आणि अगर्वता करावें, दास्य सकळ ॥ १६७ ॥
मग अपेक्षित जें आपुलें, तेंही सांगती पुसिलें।
जेणे अंतःकरण बोधलें, संकल्पा न ये ॥ १६८ ॥
यज् ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पांडव।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥ ३५ ॥
जयाचेनि वाक्यउजिवडें, जाहलें चित्त निधडें।
ब्रह्माचेनि पाडे, निःशंकु होय ॥ १६९ ॥
ते वेळीं आपणपेया सहितें, इये अशेषेंही भूतें।
माझां स्वरूपीं अखंडितें, देखसी तूं ॥ १७० ॥
ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल, तैं मोहांधकारू जाईल।
जैं गुरुकृपा होईल, पार्था गा ॥ १७१ ॥
अपि चेदसी पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः।
सर्व ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि ॥ ३६ ॥
जरी कल्मषांचा आगरु, तूं भ्रांतीचा सागरु।
व्यामोहाचा डोंगरु, होऊनि अससी ॥ १७२ ॥
तर्ही ज्ञानशक्तीचेनि पाडें, हें आघवेंची गा थोकडें।
ऐसे सामर्थ्य असे चोखडें, ज्ञानी इये ॥ १७३ ॥
देखें विश्वभ्रमाऐसा, जो अमूर्ताचा कवडसा।
तो जयाचिया प्रकाशा, पुरेचिना ॥ १७४ ॥
तया कायसें हें मनोमळ, हें बोलतांचि अति किडाळ।
नाहीं येणें पाडें हे ढिसाळ, दुजें जगीं ॥ १७५ ॥
यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन।
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा ॥ ३७ ॥
सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगनामाजि उधवली।
तिये प्रळयींचे वाहुटळी, काय अभ्र पुरे ॥ १७६ ॥
कीं पवनाचेनि कोंपें, पाणियेंचि जो पळिपें।
तो प्रळयानळु दडपे, तृणें काष्ठे काइ ॥ १७७ ॥
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।
तत् स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥ ३८ ॥
म्हणोनि असे हें न घडे, तें विचारितांचि असंगडे।
पुढती ज्ञानाचेनि पाडें, पवित्र न दिसे ॥ १७८ ॥
एथ ज्ञान हें उत्तम होये, आणिकही एक तैसें के आहे।
जैसें चैतन्य कां नोहे, दुसरे गा ॥ १७९ ॥
या महातेजाचेनि कसें, जरी चोखाळु प्रतिबिंब दिसे।
कां गिंवसिलें गिंवसे, आकाश हें ॥ १८० ॥
ना तरी पृथ्वीचेनि पाडें, कांटाळें जरी जोडे।
तरी उपमा ज्ञानी घडे, पंडुकुमरा ॥ १८१ ॥
म्हणूनी बहुतीं परीं पाहतां, पुढतपुढती निर्धारिता।
हे ज्ञानाची पवित्रता, ज्ञानींचि आथि ॥ १८२ ॥
जरी अमृताचि चवी निवडिजे, तरी अमृतासारखी म्हणिजे।
तैसें ज्ञान हें उपमिजे, ज्ञानेसींचि ॥ १८३ ॥
आतां यावरि जे बोलणे, ते वायां वेळु फेडणें।
तंव सांचचि जी हे पार्थु म्हणे, जें बोलत असां ॥ १८४ ॥
परि तेंचि ज्ञान केवीं जाणावें, ऐसें अर्जुनें जंव पुसावें
तंव तें मनोगत देवें, जाणितलें ॥ १८५ ॥
मग म्हणतसे किरीटी, आतां चित्त देयीं गोठी।
सांगेन ज्ञानाचिये भेटी, उपाय तुज ॥ १८६ ॥
श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ३९ ॥
तरी आत्मसुखाचिया गोडिया, विटे जो कां सकळ विषयां।
जयां ठायीं इंद्रियां, मानु नाही ॥ १८७ ॥
जो मनाचि चाड न सांगे, जो प्रकृतीचे केलें नेघे।
जो श्रद्धेचेनि संभोगें, सुखिया जाहला ॥ १८८ ॥
तयातेंचि गिंवसित, हेंहें ज्ञान पांवे निश्चित।
जयामाजि अचुंबित, शांति असे ॥ १८९ ॥
तें हृदयीं प्रतिष्ठे, आणि शांतीचा अंकुर फुटे।
मग विस्तार बहु प्रकटे, आत्मबोधाचा ॥ १९० ॥
मग जेऊति वास पाहिजे, तेऊति शांतीचि देखिजे।
तेथ अपारा पारु नेणिजे, निर्धारितां ॥ १९१ ॥
ऐसा हा उत्तरोत्तरु, ज्ञानबीजाचा विस्तारु।
सांगता असे अपारु, परि असो आतां ॥ १९२ ॥
अज्ञाश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति।
मायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥
ऐकें जया प्राणियाचां ठायीं, इया ज्ञानाची आवडी नाहीं।
तयाचें जियालें म्हणों काई, वरी मरण चांग ॥ १९३ ॥
शून्य जैसें गृह, कां चैतन्येंवीण देह।
तैसें जीवित तें संमोह, ज्ञानहीना ॥ १९४ ॥
अथवा ज्ञान कीर आपु नोहे, परी ते चाड एकी जरी वाहे।
तरी तेथ जिव्हाळा कांही आहे, प्राप्तीचा पैं ॥ १९५ ॥
वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी, परी ते आस्थाही न धरी मानसीं।
तरी तो संशयरूप हुताशीं, पडिला जाण ॥ १९६ ॥
जे अमृतही परि नावडे, ऐसें सावियाचि आरोचकु जैं पडे।
तैं मरण आले आलें असे फुडें, जाणों ये कीं ॥ १९७ ॥
तैसा विषयसुखें रंजे, जो ज्ञानेंसींचि माजे।
तो संशये अंगीकारिजे, एथ भ्रांति नाहीं ॥ १९८ ॥
मग संशयी जरी पडला, तरी निभ्रांत जरी नासला।
ति ऐहिकपरत्रा मुकला, सुखासी गा ॥ १९९ ॥
जया काळज्वरु आंगी बाणे, तो शीतोष्णें जैशीं नेणे।
आगी आणि चांदिणें, सरिसेंचि मानी ॥ २०० ॥
तैसे साच आणि लटिकें, विरुद्ध आणि निकें।
संशयी तो नोळखे, हिताहित ॥ २०१ ॥
हा रात्रिदिवसु पाहीं जैसा, जात्यंधा ठाउवा नाहीं।
तैसे संशयीं असतां काहीं, मना न ये ॥ २०२ ॥
म्हणऊनि संशयाहुनि थोर, आणिक नाही पाप घोर।
हा विनाशाची वागुर, प्राणियासी ॥ २०३ ॥
येणें कारणे तुवा त्यजावा, आधी हाचि एकु जिणावा।
जो ज्ञानाचिया अभावा-, माजी असे ॥ २०४ ॥
जैं अज्ञानाचे गडद पडे, तैं हा बहुवस मनीं वाढे।
म्हणोनि सर्वथा मागु मोडे, विश्वासाचा ॥ २०५ ॥
हृदयी हाचि न समाये, बुद्धींते गिंवसूनि ठाये।
तेथ संशयात्मक होये, लोकत्रय ॥ २०६ ॥
योगसंन्यस्तकर्माणि ज्ञानसंछिन्नसंशयम्।
आत्मवंतं न कर्माणि निबध्नन्ति धनंजयः ॥ ४१ ॥
ऐसे जरी थोरावे, तरी उपायें एकें आंगवे।
जरी हाती होय बरवें, ज्ञानखड्ग ॥ २०७ ॥
तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें, निखळु हा निवटे।
मग निःशेष खता फिटे, मानसींचा ॥ २०८ ॥
तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः।
छित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥ ४२ ॥
याकारणे पार्था, उठीं वेगीं वरौता।
नाशु करोनि हृदयस्था, संशयासी ॥ २०९ ॥
ऐसे सर्वज्ञानाचा बापु, जो कृष्ण ज्ञानदीपु।
तो म्हणतसे सकृपु, ऐकें राया ॥ २१० ॥
तंव या पूर्वापर बोलाचा, विचारुनि कुमरु पंडूचा।
कैसा प्रश्नु हन अवसरींचा, करिता होईल ॥ २११ ॥
ते कथेची संगति, भावाची संपत्ति।
रसाचि उन्नति, म्हणिपेल पुढां ॥ २१२ ॥
जयाचिया बरवेपणीं, कीजे आठां रसांची ओवाळणी।
सज्जनाचिये आयणी, विसांवा जगी ॥ २१३ ॥
तो शांतुचि अभिनवेल, ते परियेसा मऱ्हाठे बोल।
जे समुद्राहूनि खोल, अर्थभरित ॥ २१४ ॥
जैसें बिंब तरी बचकें एवढें, परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें।
शब्दाची व्याप्ती तेणें पाडें, अनुभवावी ॥ २१५ ॥
ना तरी कामितयाचिया इच्छा, फळे कल्पवृक्षु जैसा।
बोल व्यापकु होय तैसा, तरी अवधान द्यावे ॥२१६ ॥
हें असो काय म्हणावें, सर्वज्ञु जाणतीं स्वभावें।
तरी निकें चित्त द्यावें, हें विनंती माझी ॥ २१७ ॥
जेथ साहित्य आणि शांति, हे रेखा दिसे बोलती।
जैसी लावण्यगुणकुळवती, आणि पतिव्रता ॥२१८ ॥
आधींचि साखर आवडे, आणि तेचि जरी ओखदीं जोडे।
तरी सेवावी ना कां कोडें, नावानावा ॥ २१९ ॥
सहजे मलयानिळु मंद सुगंधु, तया अमृताचा होय स्वादु।
आणि तेथेंचि जोडे नादु, जरी दैवगत्या ॥ २२० ॥
तरी स्पर्शें सर्वांग निववी, स्वादें जिव्हेतें नाचवी।
तेवीचि कानाकरवीं, म्हणवी बापु माझा ॥ २२१ ॥
तैसे कथेचें इये ऐकणें, एक श्रवणासि होय पारणें।
मग संसारदुःख मूळवणें, विकृतीविणें ॥ २२२ ॥
जरी मंत्रेचि वैरी मरे, तरी वायांचि कां बांधावीं कटारें।
रोग जाये दुधें साखरे, तरी निंब कां पियावा ॥ २२३ ॥
तैसा मनाचा मारु न करितां, आणि इंद्रियां दुःख न देतां।
एथ मोक्षु असे आयता, श्रवणाचिमाजी ॥ २२४ ॥
म्हणोनि आथिलिया आराणुका, गीतार्थु हा निका।
ज्ञानदेवो म्हणे आइका, निवृत्तीदासु ॥ २२५ ॥
ज्ञानेश्वरी / अध्याय पांचवा : संत ज्ञानेश्वर
अर्जुन उवाचः संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि।यत् श्रेयं एतयोरेकें तत् मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥ १ ॥
मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे, हां हो हें कैसें तुमचे बोलणें।
एक होय तरी अंतःकरणे, विचारूं ये ॥ १ ॥
मागां सकळ कर्माचा संन्यासु, तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु।
तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु, पोखीतसां पुढती ॥ २ ॥
ऐसें द्व्यर्थ हें बोलतां, आम्हां नेणतयांचिया चित्ता।
आपुलिये चाडे अनंता, उमजू नोहे ॥ ३ ॥
एकें एकसारातें बोधिजे, तरी एकनिष्ठचि बोलिजे।
हें आणिकीं काय सांगिजे, तुम्हांप्रति ॥ ४ ॥
तरी याचिलागीं तुमतें, म्यां राऊळासी विनविले होते।
जे हा परमार्थु ध्वनितें, न बोलावा ॥ ५ ॥
परी मागील असो देवा, आतां प्रस्तुतीं उकलु देखावा।
सांगे दोहींमाजि बरवा, मार्गु कवण ॥ ६ ॥
जो परिणामींचा निर्वाळा, अचुंबितु ये फळा।
आणि अनुष्ठिता प्रांजळा, सावियाचि ॥ ७ ॥
जैसें निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्गु तरी बहुसाल सांडे।
तैसें सोकासनां सांगडे, सोहपें होय ॥ ८ ॥
येणें अर्जुनाचेनि बोले, देवो मनीं रिझले।
मग होईल ऐकें म्हणितले, संतोषोनियां ॥ ९ ॥
देखा कामधेनु ऐसी माये, सदैवा जया होये।
तो चंद्रुहि परी लाहे खेळावया ॥ १० ॥
पाहें पां शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूचिया आर्ता।
काय क्षीराब्धि दूधभाता, देईजेचिना ॥ ११ ॥
तैसा औदार्याचा कुरुठा, कृष्ण आपु जाहलिया सुभटा।
कां सर्व सुखांचा वसौटा, तोचि नोहावा ॥ १२ ॥
एथ चमत्कारु कायसा, गोसावी लक्ष्मीकांताऐसा।
आतां आपुलिया सवेसा, मागावा कीं ॥ १३ ॥
म्हणोनि अर्जुने म्हणितले, तें हांसोनि येरें दिधले।
तेंचि सांगेन बोलिले, काय कृष्णें ॥ १४ ॥
श्रीभगवानुवाचः संन्यासं कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ।
तयोस्तु कर्मसंन्यासात् कर्मयोगो विशिष्यते ॥ २ ॥
तो म्हणे गा कुंतीसुता, हे संन्यासयोगु विचारितां।
मोक्षकर तत्वता, दोनीहि होती ॥ १५ ॥
तरी जाणां नेणां सकळां, हा कर्मयोगु कीर प्रांजळा।
जैसी नाव स्त्रियां बाळां, तोयतरणीं ॥ १६ ॥
तैसें सारासार पाहिजे, तरी सोहपा हाचि देखिजे।
येणें संन्यासफळ लाहिजे, अनायासें ॥ १७ ॥
आतां याचिलागीं सांगेन, तुज संन्यासियाचे चिन्ह।
मग सहजें हे अभिन्न, जाणसी तूं ॥ १८ ॥
ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङक्षति।
निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखं बंधात् प्रमुच्यते ॥ ३ ॥
तरी गेलियाचि से न करी, न पवतां चाड न धरी।
जो सुनिश्चळु अंतरीं, मेरु जैसा ॥ १९ ॥
आणि मी माझें ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण।
पार्था तो संन्यासी जाण, निरंतर ॥ २० ॥
जो मनें ऐसा जाहला, संगी तोचि सांडिला।
म्हणोनि सुखें सुख पावला, अखंडित ॥ २१ ॥
आतां गृहादिक आघवें, तें कांहीं नलगे त्यजावें।
जें घेतें जाहलें स्वभावें, निःसंगु म्हणऊनि ॥ २२ ॥
देखें अग्नि विझोनि जाये, मग जे रांखोंडी केवळु होये।
तैं ते कापुसें गिंवसूं ये, जियापरी ॥ २३ ॥
तैसा असतेनि उपाधी, नाकळिजे जो कर्मबंधीं।
जयाचीचे बुद्धी, संकल्पु नाहीं ॥ २४ ॥
म्हणोनि कल्पना जैं सांडे, तैंचि गा संन्यासु घडे।
या कारणे दोनी सांगडे, संन्यासयोगु ॥ २५ ॥
सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः।
एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥ ४ ॥
एऱ्हवीं तरी पार्था, जे मूर्ख होती सर्वथा।
ते सांख्यकर्मसंस्था, जाणती केवीं ॥ २६ ॥
सहजें ते अज्ञान, म्हणोनि म्हणती हे भिन्न।
एऱ्हवी दीपाप्रती काई अनान, प्रकाशु आहाती ॥ २७ ॥
पैं सम्यक् एकें अनुभवें, जिहीं देखिलें तत्व आघवें।
ते दोन्हीतेंही ऐक्यभावें, मानिती गा ॥ २८ ॥
यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तत योगैरपि गम्यते।
एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥ ५ ॥
आणि सांख्यीं जें पाविजे, तेंचि योगीं गमिजे।
म्हणोनि ऐक्यता दोहींते सहजें, इयापरी ॥ २९ ॥
देखें आकाशा आणि अवकाशा, भेदु नाहीं जैसा।
तैसे ऐक्य योगसंन्यासा, वोळखे जो ॥ ३० ॥
तयासीचि जगीं पाहलें, आपणपें तेणेंचि देखिलें।
जया सांख्ययोग जाणवले, भेदेंविण ॥ ३१ ॥
संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः।
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिच्छति ॥ ६ ॥
जो युक्तिपंथें पार्था, चढे मोक्षपर्वता।
तो महासुखाचा निमथा, वहिला पावे ॥ ३२ ॥
येरा योगस्थिति जया सांडे, तो वायांचि गा हव्यासीं पडे।
परि प्राप्ति कहीं न घडे, संन्यासाची ॥ ३३ ॥
योगयुक्तो विशुध्दात्मा विजितात्मा जितेद्रियः,
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ७ ॥
जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें, गुरुवाक्यें मन धुतलें।
मग आत्मस्वरुपीं घातलें, हारौनियां ॥ ३४ ॥
जैसें समुद्रीं लवण न पडे, तवं वेगळे अल्प आवडे।
मग होय सिंधूचि एवढें, मिळे तेव्हां ॥ ३५ ॥
तैसें संकल्पोनि काढिलें, जयाचें मनचि चैतन्य जाहलें।
तेणें एकदेशियें परि व्यापिलें , लोकत्रय ॥ ३६ ॥
आतां कर्ता कर्म करावें , हें खुंटलें तया स्वभावें।
आणि करी जऱ्ही आघवें, तऱ्ही अकर्ता तो ॥ ३७ ॥
नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्वचित्।
पश्चन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन्नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् ॥ ८ ॥
प्रलपन् विसृजन् गृण्हन्नुन्मिषन् निमिषन्नपि।
इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥ ९ ॥
जे पार्था तया देहीं, मी ऐसा आठऊ नाहीं।
तरी कर्तृत्व कैचें काई, उरे सांगे ॥ ३८ ॥
ऐसें तनुत्यागेंवीण, अमूर्ताचे गुण,
दिसती संपूर्ण , योगयुक्तां ॥ ३९ ॥
एऱ्हवीं आणिकांचिये परी, तोही एक शरीरी।
अशेषाही व्यापारीं, वर्ततु दिसे ॥ ४० ॥
तोही नेत्रीं पाहे, श्रवणीं ऐकतु आहे।
परि तेथींचा सर्वथा नोहे, नवल देखें ॥ ४१ ॥
स्पर्शासि तरी जाणे, परिमळु सेवी घ्राणें।
अवसरोचित बोलणें, तयाहि आथी ॥ ४२ ॥
आहारातें स्वीकारी, त्यजावें तें परिहरि।
निद्रेचिया अवसरीं, निदिजे सुखें ॥ ४३ ॥
आपुलेनि इच्छावशें, तोही गा चालतु दिसे।
पैं सकळ कर्म ऐसें, रहाटे कीर ॥ ४४ ॥
हें सांगों काई एकैक, देखें श्वासोच्छासादिक।
आणि निमिषोन्निमिष, आदिकरुनि ॥ ४५ ॥
पार्था तयाचे ठायीं , हें आघवेंचि आथि पाहीं।
परि तो कर्ता नव्हे कांही, प्रतीतिबळें ॥ ४६ ॥
जैं भ्रांती सेजे सुतला, तैं स्वप्नसुखें भुतला।
मग तो ज्ञानोदयी चेइला, म्हणोनियां ॥ ४७ ॥
ब्रह्मण्याधाय कर्माणि संग त्यक्त्वा करोति यः।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भ्सा ॥ १० ॥
आतां अधिष्ठानसंगती, अशेषाही इंद्रियवृत्ती।
आपुलालिया अर्थीं, वर्तत आहाती ॥ ४८ ॥
दीपाचेनि प्रकाशें, गृहींचे व्यापार जैसे।
देहीं कर्मजात तैसे, योगयुक्ता ॥ ४९ ॥
तो कर्में करी सकळें, परी कर्मबंधा नाकळे।
जैसें न सिपें जळीं जळें, पद्मपत्र ॥ ५० ॥
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि।
योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्त्वात्मशुद्धये ॥ ११॥
देखे बुध्दीची भाष नेणिजे, मनाचा अंकुर नुदैजे।
ऐसा व्यापारु तो बोलिजे, शारीरु गा ॥ ५१ ॥
हेंच मराठे परियेशीं, तरी बाळकाची चेष्टा जैशी।
योगिये कर्मे करिती तैशीं , केवळा तनू ॥ ५२ ॥
मग पांचभौतिक संचलें, जेव्हां शरीर असे निदेलें।
तेथ मनचि राहाटें एकलें, स्वप्नीं जेवीं ॥ ५३ ॥
नवल ऐकें धनुर्धरा, कैसा वासनेचा संसारा।
देहा होऊं नेदी उजगरा, परि सुखदुःखें भोगी ॥ ५४ ॥
इंद्रियांचां गांवीं नेणिजे, ऐसा व्यापारु जो निपजे।
तो केवळु गा म्हणिजे, मानसाचा ॥ ५५ ॥
योगिये तोही करिती, परि कर्में तेणें न बंधिजती।
जे सांडिली आहे संगती, अंहभावाची ॥ ५६ ॥
आतां जाहालिया भ्रमहत, जैसें पिशाचाचें चित्त।
मग इंद्रियांचे चेष्टित, विकळु दिसे ॥ ५७ ॥
स्वरूप तरी देखे, आळविलें आइके।
शब्दु बोले मुखें, परि ज्ञान नाही ॥५८ ॥
हें असो काजेंविण, जें जें काही कारण।
तें केवळ कर्म जाण, इंद्रियांचे ॥ ५९ ॥
मग सर्वत्र जें जाणतें , ते बुद्धीचें कर्म निरूतें ।
वोळख अर्जुनातें, म्हणे हरि ॥ ६० ॥
ते बुद्धी धुरे करुनी, कर्म करिती चित्त देऊनी।
परि ते नैष्कम्यापासुनी , मुक्त दिसती ॥ ६१ ॥
जें बुद्धीचिये ठावूनि देही, तयां अंहकाराची सेचि नाहीं ।
म्हणोनि कर्म करितां पाही, चोखाळले ॥ ६२ ॥
अगा करितेनवीण कर्म, तेंचि तें नैष्कर्म्य।
हें जाणती सुवर्म, गुरुगम्य जें ॥ ६३ ॥
आतां शांतरसाचें भरितें, सांडीत आहे पात्रातें।
जें बोलणें बोलापरौतें, बोलवलें ॥ ६४ ॥
एथ इंद्रियांचा पांगु, जया फिटला आहे चांगु।
तयासीचि आथी लागु, परिसावया ॥ ६५ ॥
हा असो अतिप्रसंगु, न संडी पां कथालागु।
होईल श्लोकसंगति भंगु, म्हणोनियां ॥ ६६ ॥
जें मना आकळितां कुवाडें, घाघुसितां बुद्धी नातुडे।
तें दैवाचेनि सुरवाडें, सांगवलें तुज ॥ ६७ ॥
जें शब्दातीत स्वभावें, तें बोलींचि जरी फावे।
तरी आणिकें काय करावें, सांगे कथा ॥ ६८ ॥
हा आर्तिविशेषु श्रोतयांचा, जाणोनि दास निवृतीचा।
म्हणे संवादु दोघांचा, परिसोनि परिसा ॥ ६९ ॥
मग कृष्ण म्हणे पार्थातें, आतां प्राप्ताचें चिन्ह पुरतें।
सांगेन तुज निरुतें, चित्त देई ॥ ७० ॥
युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोप्ति नैष्ठीकीम्।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निवध्यते ॥ १२ ॥
तरी आत्मयोगें आथिला, जो कर्मफळाशीं विटला।
तो घर रिघोनि वरिला, शांति जगीं ॥ ७१ ॥
येरु कर्मबधें किरीटी, अभिलाषाचिया गांठीं।
कळासला खुंटी, फळभोगाचां ॥ ७२ ॥
सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी।
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन् न कारयन् ॥ १३ ॥
जैसा फळाचिया हांवे, तैसें कर्म करि आघवें।
मग न कीजेचि येणें भावें, उपेक्षी जो ॥ ७३ ॥
तो जयाकडे वास पाहे, तेउती सुखाची सृष्टी होये।
तो म्हणे तेथ राहे, महाबोधु ॥ ७४ ॥
नवद्वारें देहीं, तो असतुचि परि नाहीं।
करितुचि न करी कांही, फलत्यागी ॥ ७५ ॥
न कर्तृत्वत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः।
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥ १४ ॥
जैसा कां सर्वेश्वरु, पाहिजे तंव निर्व्यापारु।
परि तोचि रची विस्तारु, त्रिभुवनाचा ॥ ७६ ॥
आणि कर्ता ऐसें म्हणिपे, तरी कवणें कर्मीं न शिंपें।
जे हातोपावो न लिंपे , उदासवृतीचा ॥ ७७ ॥
योगनिद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळु न पडे।
परि महाभूतांचे दळवाडें, उभारी भले ॥ ७८ ॥
जगाचा जीवीं आहे, परि कवणाचा कहीं नोहे।
जगचि हें होय जाये, तो शुद्धीहि नेंणे ॥ ७९ ॥
नादत्ते कस्यचित् पापं न चैव सकृतं विभुः।
अज्ञानेनावृतं ज्ञान तेन मुह्यन्ति जन्तवः ॥ १५ ॥
पापपुण्यें अशेषें, पासींचि असतु न देखें।
आणि साक्षीही होऊं न ठके, येरी गोठी कायसी ॥ ८० ॥
पै मूर्तीचेनि मेळें, तो मूर्तचि होऊनि खेळे,
परि अमूर्तपण न मैळे, दादुलयाचें ॥ ८१ ॥
तो सृजी पाळी संहारी, ऐसे बोलती जे चराचरीं,
ते अज्ञान गा अवधारीं, पंडुकुमरा ॥ ८२ ॥
ज्ञानेन न तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः,
तेषामादित्यवत् ज्ञान प्रकाशयति तत्परम् ॥ १६ ॥
तें अज्ञान जैं समूळ तुटे, तैं भ्रांतीचें मसैरें फिटे,
मग अकर्तृत्व प्रगटे , ईश्वराचें ॥ ८३ ॥
एथ ईश्वरु एकु अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता,
तरी तोचि मी हें स्वभावता, आदीचि आहे ॥ ८४ ॥
ऐसेनि विवेकें उदो चित्तीं, तयासी भेदु कैंचा त्रिजगतीं,
देखें आपुलिया प्रतीति, जगचि मुक्त ॥ ८५ ॥
जैशी पूर्वदिशेच्या राउळीं, उदयाचि सूर्ये दिवाळी,
की येरीही दिशां तियेचि काळी, काळिमा नाही ॥ ८६ ॥
तद् बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः,
गच्छन्त्यपुनरावृत्ति ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥ १७ ॥
बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान, ब्रह्मरुप भावी आपणा आपण,
ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण , तत्परायण अहर्निशीं ॥ ८७ ॥
ऐसें व्यापक ज्ञान भलें, जयांचिया हृदयाते गिंवसित आलें,
तयांची समता दृष्टि बोलें , विशेषूं काई ॥ ८८ ॥
एक आपणपेंचि पां जैसें, ते देखतीं विश्व तैसे,
हें बोलणें कायसें, नवलु एथ ॥ ८९ ॥
परी दैव जैसें कवतिकें, कहींचि दैन्य न देखे,
कां विवेकु हा नोळखे, भ्रांतीतें जेवीं ॥ ९० ॥
नातरी अंधकाराची वानी, जैसा सूर्यो न देखे स्वप्नीं,
अमृत नायके कानी, मृत्युकथा ॥ ९१ ॥
हें असो संतापु कैसा, चंद्रु न स्मरे जैसा,
भूतीं भेदु नेणती तैसा , ज्ञानिये ते ॥ ९२ ॥
विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि,
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥ १८ ॥
मग हा मशकु हा गजु, कीं हा श्वपचु हा द्विपु,
पैल इतरु हा आत्मजु, हें उरेल कें ॥ ९३ ॥
ना तरी हे धेनु हें श्वान, एक गुरु एक हीन।
हें असो कैचें स्वप्न, जागतया ॥ ९४ ॥
एथ भेदु तरी कीं देखा, जरि अंहभावा उरला होआवा,
तो आधींचि नाहीं आघवा, आतां विषमु काई ॥ ९५ ॥
इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः,
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः ॥ १९ ॥
म्हणोनि सर्वत्र सदा सम, तें आपणचि अद्वय ब्रह्म,
हें संपूर्ण जाणें वर्म, समदृष्टीचें ॥ ९६ ॥
जिहीं विषयसंगु न सांडिता, इंद्रियांतें न दंडितां,
परि भोगिली निसंगता, कामेंविण ॥ ९७ ॥
जिहीं लोकांचेनि आधारें, लौकिकेंचि व्यापारें ।
परि सांडिले निदसुरें, लौकिकु हें ॥ ९८ ॥
जैसा जनामाजी खेचरु, असतुचि जना नोहे गोचरु,
तैसा शरीरीं परि संसारु, नोळखें तयांतें ॥ ९९ ॥
हें असो पवनाचेनि मेळें, जैसें जळींचि जळ लोळे,
तें आणिकें म्हणती वेगळें , कल्लोळ हे ॥ १०० ॥
तैसें नाम रुप तयाचें, एऱ्हवीं ब्रह्मचि तो साचें।
मन साम्या आलें जयाचें, सर्वत्र गा ॥ १०१ ॥
ऐसेनि समदृष्टी जो होये, तया पुरुषा लक्षणही आहे।
अर्जुना संक्षेपे सांगेन पाहें, अच्युत म्हणे ॥ १०२ ॥
न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य् चाप्रियम्।
स्थिरबुध्दिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥ २० ॥
तरी मृगजळाचेनि पूरें, जैसें न लोटिजे कां गिरिवरें।
तैसा शुभाशुभीं न विकरे, पातलां जो ॥ १०३ ॥
तोचि तो निरुता, समदृष्टी तत्वता।
हरि म्हणे पंडुसुता, तोचि ब्रह्म ॥ १०४ ॥
ब्राह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम्।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ॥ २१ ॥
जो आपणपे सांडुनि कहीं, इंद्रियग्रामावरी येणेंचि नाहीं।
तो विषय न सेवी हें काई, विचित्र येथ ॥ १०५ ॥
सहजें स्वसुखाचेनि अपारें, सुरवाडे अंतरें।
रचिला म्हणऊनि बाहिरें, पाउल न घली ॥ १०६ ॥
सांगे कुमुददळाचेनि ताटें, जो जेविला चंद्रकिरणें चोखटे।
तो चकोरु काई वाळुवंटे, चुंबितु आहे ॥ १०७ ॥
तैसें आत्मसुख उपाइलें, जयासि आपणपेचिं फावलें।
तया विषयो सहजे सांडवले, म्हणो काई ॥ १०८॥
एऱ्हवीं तरी कौतुकें, विचारुनि पाहें पां निकें।
या विषयांचेनि सुखे, झकविती कवण ॥ १०९ ॥
ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते।
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ २२ ॥
जिहीं आपणपें नाहीं देखिलें, तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले।
जैसें रंकु का आळुकैलें, तुषातें सेवी ॥ ११० ॥
नातरी मृगें तृषापीडितें, संभ्रमें विसरोनि जळांते।
मग तोयबुद्धी बरडीतें, ठाकूनि येती ॥ १११ ॥
तैसें आपणपें नाहीं दिठे, जयातें स्वसुखाचे सदा खरांटे।
तयासीचि विषय हे गोमटे, आवडती ॥ ११२ ॥
एऱ्हवीं विषयीं काइ सुख आहे, हे बोलणेंचि सारिखें नोहे।
तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे, जगामाजीं ॥ ११३ ॥
सांगें वातवर्षआतपु धरे, ऐसे अभ्रछायाचि जरी सरे।
तरी त्रिमाळिकें धवळारें , करावीं कां ॥ ११४ ॥
म्हणोनि विषयसुख जें बोलिजे, तें नेणतां गा वायां जल्पिजे।
जैसें महूर कां म्हणिजे, विषकंदातें ॥ ११५ ॥
नातरी भौमा नाम मंगळु, रोहिणीतें म्हणती जळु।
तैसा सुखप्रवादु बरळु, विषयिकु हा ॥ ११६ ॥
हे असो आघवी बोली, सांग पा सर्पफणीची साउली।
ते शीतल होईल केतुली, मूषकासी ॥ ११७ ॥
जैसा आमिषकवळु पांडवा, मीनु न सेवी तंवचि बरवा।
तैसा विषयसंगु आघवा, निभ्रांत जाणें ॥ ११८ ॥
हे विरक्तांचिये दिठी, जैं न्याहाळिजे किरीटी।
तैं पांडुरोगाचिये पुष्टि-।सारिखें दिसे ॥ ११९ ॥
म्हणोनि विषयभोगी जें सुख, तें साद्यंतचि जाण दुःख।
परि काय कीजे मूर्ख, न सेवितां न सरे ॥ १२० ॥
तें अंतर नेणती बापुडे, म्हणोनि अगत्य सेवणें घडे।
सांगे पूयपंकीचे किडे, काय चिळसी घेती ॥ १२१ ॥
तयां दुःखियां दुःखचि जिव्हार, ते विषयकर्दमींचे दर्दुर।
ते भोगजळींचे जलचर, सांडिती केवी ॥ १२२।।
आणि दुःखयोनि जिया आहाती, तिया निरर्थका तरी नव्हती।
जरी विषयांवरी विरक्ती, धरिती जीव ॥ १२३ ॥
नातरी गर्भवासादि संकट, कां जन्ममरणींचे कष्ट।
हे विसांवेवीण वाट, वाहावी कवणें ॥ १२४ ॥
जरी विषयीं विषयो सांडिजेल, तरी महादोषी कें वसिजेल।
आणि संसारु हा शब्दु नव्हेल, लटिका जगीं ॥ १२५ ॥
म्हणोनि अविद्याजात नाथिलें, तें तिहींचि साच दाविलें।
जिहीं सुखबुद्धी घेतलें, विषयदुःख ॥ १२६ ॥
या कारणें गा सुभटा, हा विचारितां विषय वोखटा।
तूं झणें कहीं या वाटा, विसरोनि जाशी ॥ १२७ ॥
पै यातें विरक्त पुरुष, त्यजिती कां जैसें विष।
निराशा तयां दुःख, दाविलें नावडे ॥ १२८ ॥
शक्नोतीहैव यः सोढुं प्राक् शरीरविमोक्षणात्।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः सुखी नरः ॥ २३ ॥
ज्ञानियांच्या हन ठायीं, याची मातुही कीर नाहीं।
देहीं देहभावो जिहीं, स्ववश केले ॥ १२९ ॥
जयांतें बाह्याची भाष, नेणिजेचि निःशेष।
अंतरीं सुख, एक आथी ॥ १३० ॥
परि तें वेगळेपणें भोगिजे, जैसे पक्षिये फळ चुंबिजे।
तैसें नव्हे तेथ विसरिजे, भोगितेपणही ॥ १३१ ॥
भोगीं अवस्था एक उठी, ते अंहकाराचा अचळु लोटी।
मग सुखेंसि आंठी, गाढेपणें ॥ १३२ ॥
तिये आलिंगनमेळीं, होय आपेंआप कवळी।
तेथ जळ जैसें जळी, वेगळें न दिसे ॥ १३३ ॥
कां आकाशीं वायु हारपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे।
तैसे सुखचि उरे स्वरुपें, सुरतीं तिये ॥ १३४ ॥
ऐसी द्वैताची भाष जाय, मग म्हणों जरी एकचि होय।
तरी तेथ साक्षी कवणु आहे, जाणतें जे ॥ १३५ ॥
योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः।
स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥ २४ ॥
लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः।
छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥ २५ ॥
म्हणोनि असो हें आघवें, एथ न बोलणें काय बोलावें।
ते खुणाचि पावेल स्वभावें, आत्माराम ॥ १३६ ॥
जे ऐसेनि सुखें मातले, आपणपांचि आपण गुंतले।
ते मी जाणे निखळ वोतले, साम्यरसाचे ॥ १३७ ॥
ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर।
कीं महाबोधें विहार, केले जैसे ॥ १३८ ॥
ते विवेकाचें गांव, की परब्रह्मीचे स्वभाव।
नातरी अळंकारले अवयव, ब्रह्मविद्येचे ॥ १३९ ॥
ते सत्त्वाचे सात्त्विक, की चैतन्याचे आंगिक।
हें बहु असो एकैक, वानिसी काई ॥ १४० ॥
तूं संतस्तवनी रतसी, तरी कथेची से न करिसी।
कीं निराळी बोल देखसी, सनागर ॥ १४१ ॥
परि तो रसातिशयो मुकुळीं, मग ग्रंथार्थदीपु उजळीं।
करी साधुहृदयराउळीं, मंगळ उखा ॥ १४२ ॥
ऐसा श्रीगुरुचा उवायिला, निवृत्तिदासासी पातला।
मग तो म्हणे कृष्ण बोलिला, तेंचि आइका ॥ १४३ ॥
अर्जुना अंनत सुखाच्या डोहीं, एकसरा तळुचि घेतला जिहीं।
मग स्थिराऊनी तेही, तेंचि जाहले ॥ १४४ ॥
अथवा आत्मप्रकाशें चोखें, जो आपणपेंचि विश्व देखे।
तो देहेंचि परब्रह्म सुखें, मानूं येईल ॥ १४५ ॥
जें साचोकारें परम, ना तें अक्षर निःसीम।
जिये गांवींचे निष्काम, अधिकारिये ॥ १४६ ॥
जे महर्षीं वाढले, विरक्तां भागा फिटलें।
जे निःसंशया पिकलें, निरंतर ॥ १४७ ॥
कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम्।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥ २६ ॥
जिहीं विषयांपासोनि हिरतलें, चित्त आपुलें आपण जिंतिले।
ते निश्चित जेथ सुतले, चेतीचिना ॥ १४८ ॥
तें परब्रह्म निर्वाण, जें आत्मविदांचें कारण।
तेचि ते पुरुष जाण, पंडुकुमरा ॥ १४९ ॥
ते ऐसे कैसेनि जाहले, जे देहींचि ब्रह्मत्वा आले।
हें ही पुससी तरी भलें, संक्षेपे सांगो ॥ १५० ॥
स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रवोः।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥ २७ ॥
तरी वैराग्यचेनि आधारें, जिहीं विषय दवडुनि बाहिरें।
शरीरीं एकंदरें, केलें मन ॥ १५१ ॥
सहजें तिहीं संधी भेटी, जेथ भ्रुपल्लवां पडे गांठी।
तेथ पाठमोरी दिठी, पारुखोनियां ॥ १५२ ॥
सांडूनि दक्षिण वाम, प्राणापानसम।
चित्तेंसीं व्योम-, गामिये करिती ॥ १५३ ॥
यतेद्नियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः।
विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥ २८ ॥
तेथ जैसीं रथ्योदकें सकळें, घेऊनि गंगा समुद्री मिळे।
मग एकैक वेगळें, निवडु नये ॥ १५४ ॥
तैसी वासनांतराची विवंचना, मग आपैसी पारुखे अर्जुना।
जे वेळी गगनीं लयो मना, पवनें कीजे ॥ १५५ ॥
जेथ हें संसारचित्र उमटे, तो मनोरुपु पटु फाटे।
जैसें सरोवर आटे, मग प्रतिमा नाहीं ॥ १५६ ॥
तैसें मनपण मुदल जाये, मग अंहभावादिक कें आहे।
म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होये, अनुभवी तो ॥ १५७ ॥
भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम्।
सुहृद सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥ २९ ॥
आम्ही मागां हन सांगितलें, जे देहींचि ब्रह्मत्व पावले।
ते येणें मार्गे आले, म्हणऊनिया ॥ १५८ ॥
आणि यमनियमांचे डोंगर, अभ्यासाचे सागर।
क्रमोनि हे पार, पातले ते ॥ १५९ ॥
तिहीं आपणपें करुनि निर्लेप, प्रंपचाचें घेतलें माप।
मग साचाचेंचि रुप, होऊनि ठेले ॥ १६० ॥
ऐसा योगयुक्तीचा उद्देशु, जेथ बोलिला हृषीकेशु।
तेथ अर्जुनु सुदंशु, म्हणोनि चमत्कारला ॥ १६१ ॥
तें देखिलिया कृष्णें जाणितलें, मग हांसोनि पार्थातें म्हणितलें।
तें काई पां चित्त उवाइलें, इये बोलीं तुझे ॥ १६२ ॥
तंव अर्जुन म्हणे देवो, परचित्तलक्षणांचा रावो।
भला जाणितला जी भावो, मानसु माझा ॥ १६३ ॥
म्यां जें काहीं विवरुनि पुसावें, ते आधींचि कळले देवें।
तरी बोलिलें तेंचि सांगावें, विवळ करुनि ॥ १६४ ॥
एऱ्हवीं तरी अवधारा, जो दाविला तुम्हीं अनुसारा।
तो पव्हण्याहूनि पायउतारा, सोहपा जैसा ॥ १६५ ॥
तैसा सांख्याहूनि प्रांजळा, तरी आम्हांसारिखियां अभोळां।
एथ आहाति कांही परि काळा, तो साहों ये वर ॥ १६६ ॥
म्हणोनि एक वेळ देवा, तोचि पडताळा घेयावा।
विस्तरेल तरी सांगावा, साद्यंतुचि ॥ १६७ ॥
तंव कृष्ण म्हणती हो कां, तुज हा मार्ग गमला निका,
तरी काय जाहलें ऐंकिजो कां, सुखें बोलों ॥ १६८ ॥
अर्जुना तु परिससी, परिसोनि अनुष्ठिसी।
तरी आम्हांसीचि वानी कायसी, सांगावयाची ॥ १६९ ॥
आधींच चित्त मायेचें, वरी मिष जाहलें पढियंताचे,
आतां तें अद्भुतपण स्नेहाचें, कवण जाणे ॥ १७० ॥
ते म्हणों कारुण्यरसाची वृष्टि , कीं नवया स्नेहाची सृष्टि।
हें असे नेणिजे दृष्टी, हरीची वानूं ॥ १७१ ॥
जे अमृताची वोतली, कीं प्रेमचि पिऊन मातली।
म्हणोनि अर्जुनमोहें गुंतली, निघों नेणे ॥ १७२ ॥
हें बहु जें जें जल्पिजेल, तेथें कथेसि फांकु होईल।
परि स्नेह रुपा नयेल, बोलवरी ॥ १७३ ॥
म्हणोनि विसुरा काय येणें, तो ईश्वरु आकळावा कवणें।
जो आपुलें मान नेणे, आपणचि ॥ १७४ ॥
तरी मागीला ध्वनीआंतु, मज गमला सावियाचि मोहितु।
जे बलात्कारें असे म्हणतु, परिस बापा ॥ १७५ ॥
अर्जुना जेणें भेदें, तुझें कां चित्त बोधे।
तैसें तैसें विनोदें, निरुपिजेल ॥ १७६ ॥
तो काइसया नाम योगु, तयाचा कवण उपेगु।
अथवा अधिकारप्रसंगु, कवणा येथ ॥ १७७ ॥
ऐसें जें जें कांही, उक्त असे इये ठाई।
तें आघवेंचि पाहीं, सांगेन आतां ॥ १७८ ॥
तूं चित्त देऊनि अवधारीं, ऐसें म्हणोनि श्रीहरी।
बोलिजेल ते पुढारी, कथा आहे ॥ १७९ ॥
श्रीकृष्ण अर्जुनासी संगु, न सांडोनि सांगेल योगु।
तो व्यक्त करु प्रसंगु, म्हणे निवृत्तिदासु ॥ १८० ॥
ज्ञानेश्वरी / अध्याय सहावा : संत ज्ञानेश्वर
मग रायातें म्हणे संजयो, तोचि अभिप्रावो अवधारिजो।कृष्ण सागंती जो, योगरुप ॥ १॥
सहजें ब्रह्मरसाचें पारणें, केलें अर्जुनालागीं नारायणें।
की तेचि अवसरी पाहुणे, पातलों आम्ही ॥ २॥
कैसी दैवाची थोरी नेणिजे, जैसें तान्हेलिया तोय सेविजे।
कीं तेंचि चवी करुनि पाहिजे, तंव अमृत आहे ॥ ३॥
तैसे आम्हां तुम्हां जाहले, जें आडमुठी तत्व फावलें।
तंव धृतराष्ट्रे म्हणितलें, हें न पुसों तूंते ॥ ४॥
तया संजया येणें बोलें, रायाचें हृदय चोजवलें ।
जें अवसरीं आहे घेतलें, कुमारांचिया ॥ ५ ॥
हें जाणोनि मनीं हांसिला, म्हणे म्हातारा मोहें नाशिला।
एऱ्हवीं बोलु तरी भला जाहला, अवसरीं ये ॥ ६ ॥
परि तैं तैसें कैसेनि होईल, जात्यंधा कैसें पाहेल।
तेवींचि येरु से घेईल, म्हणौनि बिहे ॥ ७ ॥
परि आपण चित्तीं आपुलां, निकियापरि संतोषला।
जे तो संवादु फावला, कृष्णार्जुनांचा ॥ ८ ॥
तेणें आनंदाचेनि धालेपणें, साभिप्राय अंतःकरणें।
आतां आदरेंसी बोलणें, घडेल तया ॥ ९॥
तो गीतेमाजी षष्ठींचा, प्रसंगु असे आयणीचा।
जैसा क्षीरार्णवीं अमृताचा, निवाडु जाहला ॥ १० ॥
तैसें गीतार्थाचें सार, जे विवेकसिंधूचे पार।
नाना योगविभवभांडार, उघडलें कां ॥ ११ ॥
जें आदिप्रकृतीचें विसवणें, जे शब्दब्रह्मासि न बोलणें।
जेथूनि गीतावल्लीचें ठाणें, प्ररोहो पावे ॥ १२ ॥
तो अध्याय हा सहावा, वरि साहित्याचिया बरवा।
सांगिजैल म्हणौनि परिसावा, चित्त देउनी ॥ १३ ॥
माझा मराठाचि बोलु कौतुकें, परि अमृतातेहीं पैजासीं जिंके।
ऐसीं अक्षरें रसिकें, मेळवीन ॥ १४ ॥
जिये कोंवळिकेचेनि पाडें, दिसती नादींचे रंग थोडे।
वेधें परिमळाचें बीक मोडे, जयाचेनि ॥ १५ ॥
ऐका रसाळपणाचिया लोभा, कीं श्रवणींचि होति जिभा।
बोले इंद्रियां लागे कळंभा , एकमेकां ॥ १६ ॥
सहजें शब्दु तरि विषो श्रवणाचा, परि रसना म्हणे हा रसु आमुचा,
घ्राणासि भावो जाय परिमळाचा, हा तोचि होईल ॥ १७ ॥
नवल बोलतीये रेखेची वाहणी, देखतां डोळ्यांही पुरों लागे धणी।
ते म्हणती उघडली खाणी, रुपाची हे ॥ १८ ॥
जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनचि धांवे बाहिरें ।
बोलु भुजाहि आविष्करें, आलिंगावया ॥ १९ ॥
ऐशी इंद्रिये आपुललिया भावीं, झोंबती परि तो सरिसेपणेंचि बुझावी,
जैसा एकला जग चेववी, सहस्त्रकरु ॥ २० ॥
तैसें शब्दाचें व्यापकपण, देखिजे असाधारण।
पाहातयां भावज्ञां फावती गुण, चिंतामणीचे ॥ २१ ॥
हें असोतु या बोलाचीं ताटें भलीं, वरी कैवल्यरसें वोगरिलीं।
ही प्रतिपत्ति मियां केली, निष्कामासी ॥ २२ ॥
आता आत्मप्रभा नीच नवी, तेचि करुनी ठाणदिवी।
जो इंद्रियांतें चोरुनि जेवी, तयासीचि फावे ॥ २३ ॥
येथ श्रवणाचेनि पांगे-, वीण श्रोतयां होआवें लागे।
हे मनाचेनि निजांगें, भोगिजे गा ॥ २४ ॥
आहाच बोलाचि वालीफ फेडिजे, आणि ब्रह्माचियाचि।
आंगा घडिजे, मग सुखेंसी सुरवाडिजे, सुखाचिमाजीं ॥ २५ ॥
ऐसें हळुवारपण जरी येईल, तरीच हें उपेगा जाइल।
एरव्हीं आघवी गोठी होईल, मुकिया बहिरयाची ॥ २६ ॥
परी तें असो आतां आघवें, नलगे श्रोतयांते कडसावें।
जे एथ अधिकारिये स्वभावें, निष्कामकामु ॥ २७ ॥
जिहीं आत्मबोधाचिया आवडी, केली स्वर्गसंसाराचि कुरोंडी।
ते वांचुनी एथींची गोडी, नेणती आणिक ॥ २८ ॥
जैसा वायसीं चंद्र नोळखिजे, तैसा ग्रंथु हा प्राकृतीं नेणिजे।
आणि तो हिमांशुचि जेवि खाजें, चकोराचें ॥ २९ ॥
तैसा सज्ञानासी तरी हा ठावो, अज्ञानासी आन गांवो।
म्हणौनि बोलावया विषय पहाहो, विशेषें नाहीं ॥ ३० ॥
परी अनुवादलो मी प्रसंगे, तें सज्जनी उपसाहावें लागे।
आतां सांगेन काय श्रीरंगे, निरोपिलें जें ॥ ३१ ॥
ते बुध्दीही आकळितां सांकडें, म्हणऊनि बोलीं विपायें सांपडे।
परि निवृत्तिकृपादीपउजियेडें, देखेन मी ॥ ३२ ॥
जें दिठीही न पविजे, तें दिठीविण देखिजे।
जरी अतींद्रिय लाहिजे, ज्ञानबळ ॥ ३३ ॥
ना तरी जें धातुवादाही न जोडे, तें लोहींचि पंधरें सापडे।
जरी दैवयोगें चढे, परिसु हातां ॥ ३४ ॥
तैसी सद्गुरुकृपा होये, तरी करितां काय आपु नोहे।
म्हणौनि तें अपार मातें आहे, ज्ञानदेवो म्हणे ॥ ३५ ॥
तेणें कारणें मी बोलेन, बोली अरुपाचे रुप दावीन।
अतींद्रिय परि भोगवीन, इंद्रियांकरवीं ॥ ३६ ॥
आइका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य।
हे साही गुणवर्य, वसती जेथ ॥ ३७ ॥
म्हणोनि तो भगवंतु, जो निःसंगाचा सांगातु।
तो म्हणे पार्था दत्तचित्तु, होई आतां ॥ ३८ ॥
श्रीभगवानुवाचः अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः।
स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥ १ ॥
आइकें योगी आणि संन्यासी जनीं, हे एकचि सिनानें।
झणीं मानी, एऱ्हवी विचारिजती जंव दोन्ही, तंव एकचि ते ॥ ३९ ॥
सांडिजे दुजया नामाचा आभासु, तरी योगी तोचि संन्यासु।
पहातां ब्रह्मीं नाही अवकाशु, दोहींमाजीं ॥ ४० ॥
जैसें नामाचेनि अनारिसपणें, एका पुरुषाते बोलावणें।
कां दोहीं मार्गीं जाणें, एकचि ठाया ॥ ४१ ॥
नातरी एकचि उदक सहजें, परी सिनानां घटीं भरिजें।
तैसें भिन्नत्व जाणिजे, योगसंन्यासांचें ॥ ४२ ॥
आइकें सकळ संमते जगीं, अर्जुना गा तोचि योगी।
जो कर्में करुनि रागी, नोहेचि फळीं ॥ ४३ ॥
जैसी मही हे उद्भिजें, जनी अहंबुध्दीवीण सहजें।
आणि तेथींची तियें बीजें, अपेक्षीना ॥ ४४ ॥
तैसा अन्वयाचेनि आधारें, जातीचेनि अनुकारें।
जें जेणें अवसरें, करणें पावे ॥ ४५ ॥
तें तैसेंचि उचित करी, परी साटोपु नोहे शरीरीं।
आणि बुध्दीही करोनि फळवेरीं, जायेचिना ॥ ४६ ॥
ऐसा तोचि संन्यासी, पार्था गा परियेसीं।
तोचि भरंवसेनिसीं, योगीश्वरु ॥ ४७ ॥
वांचूनि उचित कर्म प्रासंगिक, तयातें म्हणे हे सांडीन बध्दक।
तरी टांकोटांकी आणिक, मांडिचि तो ॥ ४८ ॥
जैसा क्षाळुनियां लेपु एकु, सवेंचि लाविजे आणिकु।
तैसेनि आग्रहाचा पाइकु, विचंबे वायां ॥ ४९ ॥
गृहस्थाश्रमाचें वोझें, कपाळी आधींच आहे सहजें।
की तेंचि संन्याससवा ठेविजे, सरिसें पुढती ॥ ५० ॥
म्हणौनि अग्निसेवा न सांडितां, कर्माची रेखा नोलांडितां।
आहे योगसुख स्वभावता, आपणापांचि ॥ ५१ ॥
यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विध्दि पाण्डव।
न ह्यसंन्यस्त्यसंकल्पो योगी भवनि कश्चन ॥ २ ॥
ऐकें संन्यासी आणि योगी, ऐसी एक्यवाक्यतेची जगीं।
गुढी उभविली अनेगीं, शास्त्रांतरी ॥ ५२ ॥
जेथ संन्यासिला संकल्पु तुटे, तेथचि योगाचें सार भेटे।
ऐसें हें अनुभवाचेनि धटें, साचें जया ॥ ५३ ॥
आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते।
योगारुढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥ ३ ॥
आतां योगाचळाचा निमथा, जरी ठाकावा आथि पार्था।
तरी सोपाना या कर्मपथा, चुका झणीं ॥ ५४ ॥
येणें यमनियमाचेनि तळवटें, रिगे असनाचिये पाउलवाटें।
येई प्राणायामाचेनि आडकंठें, वरौता गा ॥ ५५ ॥
मग प्रत्याहाराचा आधाडा, बुध्दीचियाहि पाया निसरडा।
जेथ हटिये सांडिती होडा, कडेलग ॥ ५६ ॥
तरी अभ्यासाचेनि बळें, प्रत्याहारीं निराळें ।
नखी लागेल ढाळें ढाळें, वैराग्याची ॥ ५७ ॥
ऐसा पवनाचेनि पाठारें, येतां धारणेचेनि पैसारें।
क्रमी ध्यानाचें चवरें, सांडे तंव ॥ ५८ ॥
मग तया मार्गाची धांव, पुरेल प्रवृत्तीचि हांव।
जेथ साध्यसाधना खेंव, समरसें होय ॥ ५९ ॥
जेथ पुढील पैस पारुखे, मागील स्मरावें तें ठाके।
ऐसिया सरिसीये भूमिके, समाधी राहे ॥ ६० ॥
येणें उपायें योगारूढु, जो निरवधि जाहला प्रौढु।
तयाचिया चिन्हांचा निवाडु, सांगेन आइकें ॥ ६१ ॥
यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते।
सर्वसंकल्पसंन्यासी योगारुढस्तदोच्यते ॥ ४ ॥
तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा, नाहीं विषयांचिया येरझारा।
जो आत्मबोधाचिया वोवरां, पहुडला असे ॥ ६२ ॥
जयाचें सुखदुःखाचेनि आंगे, झगटलें मानस चेवो नेघे।
विषय पासींही आलियां से न रिगे, हे काय म्हणउनि ॥ ६३ ॥
इंद्रियें कर्माच्या ठायी, वाढीनलीं परी कहीं।
फळहेतूची चाड नाहीं, अंतःकरणीं ॥ ६४ ॥
असतेनि देहें एतुला, जो चेतुचि दिसे निदेला।
तोचि योगारूढु भला, वोळखें तूं ॥ ६५ ॥
तेथ अर्जुन म्हणे अनंता, हें मज विस्मो बहु आइकतां।
सांगे तया ऐसी योग्यता, कवणें दीजे ॥ ६६ ॥
उध्दरेदात्मनाऽऽत्मानं नात्मानमवसादयेत।
आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ॥ ५ ॥
तंव हांसोनि श्रीकृष्ण म्हणे, तुझें नवल ना हें बोलणें।
कवणासि काय दिजेल कवणें, अद्वैतीं इये ॥ ६७ ॥
पै व्यामोहाचिये शेजे, बळिया अविद्या निद्रित होइजे।
ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे, जन्ममृत्यूंचा ॥ ६८ ॥
पाठीं अवसांत ये चेवो, तैं तें अवघेंचि होय वावो।
ऐसा उपजे नित्य सद्भावो, तोहि आपणपांचि ॥ ६९ ॥
म्हणऊनि आपणचि आपणपेया, घातु कीजतु असे धनंजया।
चित्त देऊनि नाथिलिया, देहाभिमाना ॥ ७० ॥
बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः।
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत ॥ ६ ॥
हा विचारुनि अहंकारु सांडिजे, मग असतीच वस्तु होइजे ।
तरी आपली स्वस्ति सहजें, आपण केली ॥ ७१ ॥
एऱ्हवीं कोशकीटकाचिया परी, तो आपणया आपण वैरी।
जो आत्मबुध्दी शरीरीं, चारुस्थळी ॥ ७२ ॥
कैसे प्राप्तीचिये वेळे, निदैवा अंधळेपणाचे डोहळे।
कीं असते आपुले डोळे, आपण झांकी ॥ ७३ ॥
कां कवणु एकु भ्रमलेपणे, मी तो नव्हे गा चोरलों म्हणे।
ऐसा नाथिला छंद अंतःकरणें, घेऊनि ठाके ॥ ७४ ॥
एऱ्हवीं होय तें तोचि आहे, परि काई कीजे बुध्दी तैशी नोहे।
देखा स्वप्नींचेनि घायें, की मरे साचें ॥ ७५ ॥
जैसी ते शुकाचेनि आंगभारें, नळिका भोविन्नली एरी मोहरें ।
तेणें उडावें परी न पुरे, मनशंका ॥ ७६ ॥
वायांचि मान पिळी, अटुवें हियें आंवळी।
टिटांतु नळी, धरुनि ठाके ॥ ७७ ॥
म्हणे बांधला मी फुडा, ऐसिया भावनेचिया पडे खोडां।
कीं मोकळिया पायांचा चवडा, गोंवी अधिकें ॥ ७८ ॥
ऐसा काजेंवीण आतुंडला, तो सांग पां काय आणिकें बांधला।
मग नोसंडी जऱ्ही नेला, तोडुनि अर्धा ॥ ७९ ॥
म्हणऊनि आपणयां आपणचि रिपु, जेणें वाढविला हा संकल्पु।
येर स्वंयबुध्दी म्हणे बापु, जो नाथिलें नेघे ॥ ८० ॥
जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः।
शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥ ७ ॥
तया स्वांतःकरणजिता, सकळकामोपशांता।
परमात्मा परौता, दुरी नाहीं ॥ ८१ ॥
जैसा किडाळाचा दोषु जाये, तरी पंधरे तेंचि होये।
तैसें जीवा ब्रम्हत्व आहे, संकल्पलोपीं ॥ ८२ ॥
हा घटाकारु जैसा, निमालिया तया अवकाशा।
नलगे मिळो जाणें आकाशा, आना ठाया ॥ ८३ ॥
तैसा देहाहंकारु नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला।
तोचि परमात्मा संचला, आधींचि आहे ॥ ८४ ॥
आतां शीतोष्णाचिया वाहणी, तेथ सुखदुःखाची कडसणीं।
इयें न समाती कांही बोलणीं, मानापमानांची।। ८५ ॥
जे जिये वाटा सुर्यु जाये, तेउतें तेजाचें विश्व होये।
तैसे तया पावे तें आहे, तोचि म्हणऊनि ॥ ८६ ॥
देखैं मेघौनि सुटती धारा, तिया न रुपती जैसिया सागरा।
तैशी शुभाशभें योगीश्वरा, नव्हती आनें ॥ ८७ ॥
ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेद्रियः।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाज्चनः ॥ ८ ॥
जो हा विज्ञानात्मकु भावो, तया विचारितां जाहला वावो।
मग लागला जंव पाहों, तंव ज्ञान तें तोचि ॥ ८८ ॥
आतां व्यापकु कीं एकदेशी, हे ऊहापोही जे ऐसी।
ते करावी ठेली आपैशी, दुजेनवीण ॥ ८९ ॥
ऐसा शरीरीचि परी कौतुकें, परब्रह्माचेनि पाडें तुके।
जेणें जिंतलीं एके, इंद्रिये गा ॥ ९० ॥
तो जितेंद्रियु सहजें, तोचि योगयुक्तु म्हणिजे।
जेणें सानें थोर नेणिजे, कवणें काळीं।। ९१ ॥
देखे सोनियाचें निखळ, मेरुयेसणें ढिसाळ।
आणि मातियेचें डिखळ, सरिसेंचि मानी ॥ ९२ ॥
पाहता पृथ्वीचें मोल थोडें, ऐसें अनर्घ्य रत्न चोखडें।
देखें दगडाचेनि पाडें, निचाडु ऐसा ॥ ९३ ॥
सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु।
साधुष्वपि च पापेषु समबुध्दिर्विशिष्यते ॥ ९ ॥
तेथ सुहृद आणि शत्रु, कां उदासु आणि मित्रु।
हा भावभेद विचित्रु, कल्पुं कैंचा ॥ ९४ ॥
तया बंधु कोण काह्याचा, द्वेषिया कवणु तयाचा।
मीचि विश्व ऐसा जयाचा, बोधु जाहला ॥ ९५ ॥
मग तयाचिये दिठी, अधमोत्तम असे किरीटी।
काय परिसाचिये कसवटी, वानिया कीजे ॥ ९६ ॥
ते जैशी निर्वाण वर्णुचि करी, तैशी जयाचि बुध्दी चराचरीं।
होय साम्याची उजरी, निरंतर ॥ ९७॥
जे ते विश्वाळंकाराचें विसुरे, जरी आहाती आनानें आकारें,
तरी घडले एकचि भांगारें, परब्रह्में ॥ ९८ ॥
ऐसें जाणणें जें बरवें, ते फावलें तया आघवें।
म्हणौनि आहाचवाहाचें न झकवे, येणे आकारचित्रें ॥ ९९ ॥
घापे पटामाजी दृष्टी, दिसे तंतूंचि सैंघ सृष्टी।
परी तो एकवांचुनि गोठी, दुजी नाहीं ॥ १०० ॥
ऐसेनि प्रतीती हे गवसे, ऐसा अनुभव जयातें असे।
तोचि समबुध्दी हें अनारिसें, नव्हे जाणें ॥ १०१ ॥
जयाचें नांव तीर्थरावो , दर्शनें प्रशस्तीसि ठावो।
जयाचेनि संगें ब्रह्मभावो, भ्रांतासी ॥ १०२ ॥
जयाचेनि बोलें धर्मु जिये, दिठी महासिध्दितें विये।
देखें स्वर्गसुखादि इयें, खेळु जयाचा ॥ १०३ ॥
विपायें जरी आठवला चित्ता, तरी दे आपुली योग्यता।
हें असो तयातें प्रशंसितां, लाभु आथि ॥ १०४ ॥
योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः।
एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥ १० ॥
पुढती अस्तवेना ऐसें, जया पाहलें अद्वैतदिवसें।
मग आपणपांचि आपण असे, अखंडित ॥ १०५ ॥
ऐसिया दृष्टी जो विवेकी, पार्था तो एकाकी।
सहजें अपरिग्रही जो तिहीं लोकी, तोचि म्हणऊनि ॥ १०६ ॥
ऐसियें असाधारणें, निष्पन्नाचीं लक्षणें।
आपुलेनि बहुवसपणें, श्रीकृष्ण बोले ॥ १०७ ॥
जो ज्ञानियांचा बापु, देखणेयांचे दिठीचा दीपु।
जया दादुलयाचा संकल्पु, विश्व रची ॥ १०८ ॥
प्रणवाचिये पेठे, जाहलें शब्दब्रह्म माजिठें।
तें जयाचिया यशा धाकुटें, वेढूं न पुरे ॥ १०९ ॥
जयाचेनि आंगीकें तेजें, आवो रविशशीचिये वणिजे।
म्हणौनि जग हें वेसजे-, वीण असे तया ॥ ११० ॥
हां गा नांवचि एक जयाचें, पाहतां गगनही दिसे टांचे।
गुण एकेक काय तयाचे, आकळशील तूं ॥ १११ ॥
म्हणोनि असो हें वानणें, सांगों नेणों कवणांची लक्षणें।
दावावीं मिषें येणें, कां बोलिलों तें ॥ ११२ ॥
ऐकें द्वैताचा ठावोचि फेडी, ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी।
तरी अर्जुना पढिये हे गोडी, नासेल हन ॥ ११३ ॥
म्हणोनि तें तैसे बोलणें, नव्हे सपातळ आड लावणें।
केलें मनचि वेगळवाणें, भोगावया ॥ ११४ ॥
जया सोहंभाव अटकु, मोक्षसुखालागोनि रंकु।
तयाचिये दिठीचा झणें कळंकु, लागेल तुझिया प्रेमा ॥ ११५ ॥
विपायें अंहभाव ययाचा जाईल, मी तेंचि हो जरी होईल।
तरी मग काय कीजेल, एकलेया ॥ ११६ ॥
दिठीचि पाहतां निविजे , कां तोंड भरोनि बोलिजे।
नातरी दाटुनि खेंव दीजे, ऐसें कोण आहे ॥ ११७ ॥
आपुलिया मना बरवी, असमाई गोठी जीवीं।
ते कवणेंसि चावळावी, जरी ऐक्य जाहलें ॥ ११८ ॥
इया काकुळती जनार्दनें, अन्योपदेशाचेनि हातासनें।
बोलामाजि मन मनें , आलिंगुं सरले ॥ ११९ ॥
हें परिसतां जरी कानडें, तरी जाण पां पार्थ उघडें।
कृष्णसुखाचेंचि रुपडें, वोतलें गा ॥ १२० ॥
हें असो वयसेचिये शेवटीं, जैसें एकचि विये वांझोटी।
मग ते मोहाची त्रिपुटी, नाचों लागे ॥ १२१ ॥
तैसें जाहले अनंता, ऐंसे तरी मी न म्हणतां।
जरी तयाचा न देखतां, अतिशयो एथ ॥ १२२ ॥
पाहा पां नवल कैसें चोज, कें उपदेशु केउतें झुंज।
परी पुढें वालभाचे भोज, नाचत असे ॥ १२३ ॥
आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी।
पिसें आणि न भुलवी, तरी तेंचि काइ ॥ १२४ ॥
म्हणउनि भावार्थु तो ऐसा, अर्जुन मैत्रियेचा कुवासा।
कीं सुखे श्रृंगारलिया मानसा, दर्पणु तो ॥ १२५ ॥
यावरी बाप पुण्यपवित्र, जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र।
तो कृष्णकृपे पात्र, याचिलागीं ॥ १२६ ॥
हो का आत्मनिवेदनातळींची, जे पीठिका होय सख्याची।
पार्थु अधिष्ठात्री तेथिंची, मातृका गा ॥ १२७ ॥
पासींचि गोसावी न वर्णिजे, मग पाइकाचा गुण घेईजे ।
ऐसा अर्जुने तो सहजें, पढिये हरी ॥ १२८ ॥
पाहां पां अनुरागें भजे , जे प्रियोत्तमें मानिजे।
ते पतीहून काय न वर्णिजे, पतिव्रता ॥ १२९ ॥
तैसा अर्जुनचि विशेषें स्तवावा, ऐसें आवडलें मज जीवा।
जे तो त्रिभुवनाचिया दैवां, एकायतनु जाहला।। १३० ॥
जयाचिया आवडीचेनि पांगें, अमूर्तुही मूर्ति आवगे।
पूर्णाहि परी लागे, अवस्था जयाची ॥ १३१॥
तंव श्रोते म्हणती दैव, कैसी बोलाची हवाव।
काय नादातें हन बरव, जिणोनी आली ॥१३२॥
हां हो नवल नोहे देशी, मऱ्हाटी बोलिजे तरी ऐसी।
वाणें उमटताहे आकाशीं, साहित्यरंगाचें ॥१३३॥
कैसें उन्मेखचांदिणें तार, आणि भावार्था पडे गार।
हेचि श्लोकार्थकुमुदी तरी फार, साविया होती ॥१३४॥
चाडचि निचाडां करी, ऐसी मनोरथीं ये थोरी।
तेणें विवळले अंतरी, तेथ डोलु आला ॥१३५॥
तें निवृत्तिदासें जाणितलें, मग अवधान द्या म्हणितलें ॥
नवल पांडवकुळीं पाहलें, कृष्णदिवसें ॥१३६॥
देवकीया उदरीं वाहिला। यशोदा सायासें पाळिला ॥
कीं शेखीं उपेगा गेला, पांडवासी ॥१३७॥
म्हणऊनि बहु दिवस वोगळावा, कां अवसरु पाहोनि विनवावा।
हाही सोसु तया सदैवा, पडेचिना ॥१३८॥
हें असो कथा सांगें वेगीं, मग अर्जुन म्हणे सलगी।
देवा इयें संतचिन्हें हन आंगीं, न ठकती माझां ॥१३९॥
एऱ्हवीं या लक्षणांचिया निजसारा, मी अपाडें कीर अपुरा।
परि तुमचेनि बोलें अवधारा, थोरावें जरी ॥१४०॥
जी तुम्ही चित्त देयाल, तरी ब्रह्म मियां होईजेल।
काय जाहलें अभ्यासिजेल, सांगाल जे ॥ १४१ ॥
हां हो नेणों कवणाची काहाणी, आइकोनि श्लाघत असों अंतःकरणीं,
ऐसी जाहलेपणाची शिरयाणी, कायसी देवा ॥ १४२ ॥
हें आंगे म्या होइजो का, येतुलें गोसावी आपुलेपणें कीजो कां।
तंव हांसोनि श्रीकृष्ण हो कां, करुं म्हणती ॥ १४३ ॥
देखा संतोषु एक न जोडे, तंवचि सुखाचें सैंघ सांकडें।
मग जोडलिया कवणीकडे, अपुरें असे।। १४४ ॥
तैसा सर्वेश्वरु बळिया सेवकें, म्हणोनि ब्रह्मही होय तो कौतुकें।
परि कैंसा भारें आतला पिके, दैवाचेनि ॥ १४५ ॥
जो जन्मसहस्रांचियासाठीं, इंद्रादिकांही महागु भेटी।
तो आधीनु केतुला किरीटी, जे बोलुहि न साहे ॥ १४६ ॥
मग ऐका जें पांडवें, म्हणितले ब्रह्म म्यां होआवें।
तें अशेषही देवें, अवधारिलें ॥ १४७ ॥
तेथ ऐसेंचि एक विचारिलें, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले।
परि उदरा वैराग्य आहे आलें, बुध्दीचिया ॥ १४८ ॥
एऱ्हवीं दिवस तरी अपुरे, परि वैराग्यवसंताचेनि भरें।
जे सोंहभाव महुरें, मोडोनि आला ॥ १४९ ॥
म्हणोनि प्राप्तिफळीं फळतां, यासि वेळु न लागेल आतां।
हो विरक्तु ऐसा अंनता, भरंवसा जाहला ॥ १५० ॥
म्हणे जें जें हा अधिष्ठील। तें आरंभींच यया फळेल।
म्हणौनि सांगितला न वचेल, अभ्यासु वायां ॥ १५१ ॥
ऐसें विवरोनियां श्रीहरी, म्हणितलें तिये अवसरीं।
अर्जुना हा अवधारीं, पंथराजु ॥ १५२ ॥
तेथ प्रवृत्तितरुच्या बुडीं, दिसती निवृत्तिफळाचिया कोडी।
जिये मार्गीचा कापडी, महेशु आझुनि ॥ १५३ ॥
पैं योगवृंदे वहिलीं, आडवीं आकाशीं निघालीं।
कीं तेथ अनुभवाच्या पाउलीं, धोरणु पडिला ॥ १५४ ॥
तिहीं आत्मबोधाचेनि उजुकारें, धांव घेतली एकसरें।
कीं येर सकळ मार्ग निदसुरे, सांडुनियां ॥ १५५ ॥
पाठीं महर्षी येणें आले, साधकांचे सिध्द जाहाले।
आत्मविद थोरावले, येणेंचि पंथें ॥ १५६ ॥
हा मार्गु जैं देखिजे, तैं तहान भूक विसरिजे।
रात्रिदिवसु नेणिजे, वाटे इये ॥ १५७ ॥
चालतां पाऊल जेथ पडे, तेथ अपवर्गाची खाणी उघडे।
आव्हांटलिया तरी जोडे, स्वर्गसुख ॥ १५८ ॥
निगिजे पूर्वींलिया मोहरा, कीं येइजे पश्चिमेचिया घरा।
निश्चळपणें धनुर्धरा, चालणें येथिंचें ॥ १५९ ॥
येणें मार्गें जया ठाया जाइजे, तो गांवो आपणचि होइजे।
हें सांगो काय सहजें, जाणसी तूं ॥ १६० ॥
तेथ म्हणितलें देवा, तरी तेंचि मग केव्हां।
कां आर्तीसमुद्रौनि न काढावा, बुडतु जी मी ॥ १६१ ॥
तवं श्रीकृष्ण म्हणती ऐसें, हें उत्संखळ बोलणें कायसें।
आम्हीं सांगतसों आपैसें, वरि पुशिले तुवां ॥ १६२ ॥
शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः।
नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥ ११ ॥
तरी विशेषे आतांचि बोलिजेल, परि तें अनुभवें उपेगा जाईल।
म्हणौनि तैसें एक लागेल, स्थान पहावें ॥ १६३ ॥
जेथ आराणुकेचेनि कोडें, बैसलिया उठों नावडे।
वैराग्यासी दुणीव चढे, देखलिया जें ॥ १६४ ॥
जो संती वसविला ठावो, संतोषासि सावावो।
मना होय उत्सावो, धैर्याचा ॥ १६५ ॥
अभ्यासुचि आपणयातें करी , हृदयातें अनुभव वरि।
ऐसी रम्यपणाची थोरी, अखंड जेथ ॥ १६६ ॥
जया आड जातां पार्था, तपश्चर्या मनोरथा।
पाखांडियाही आस्था, समूळ होय ॥ १६७ ॥
स्वभावें वाटे येतां, जरी वरपडा जाहला अवचितां।
तरी सकामुही परि माघौता, निघों विसरे ॥ १६८ ॥
ऐसेनि न राहतयातें राहावी, भ्रमतयातें बैसवी।
थापटुनि चेववी, विरक्तीतें ॥ १६९ ॥
हें राज्य वर सांडिजे, मग निवांता एथेंचि असिजे।
ऐसे शृंगारियांहि उपजे, देखतखेंवो ॥ १७० ॥
जें येणें मानें बरवंट, आणि तैसेच अतिचोखट।
जेथ अधिष्ठान प्रगट, डोळां दिसे ॥ १७१ ॥
आणिकही एक पहावें, साधकीं वसतें होआवें।
आणि जनाचेनि पायरवें, रुळेचिना ॥ १७२ ॥
जेथ अमृताचेनि पाडें, मुळेहीसकट गोडें।
जोडती दाटें झाडें, सदा फळतीं ॥ १७३ ॥
पाउला पाउला उदकें, वर्षाकाळेंही अतिचोखें।
निर्झरें का विशेखें, सुलभें जेथ ॥ १७४ ॥
हा आतपुही अळुमाळु, जाणिजे तरी शीतळु।
पवन अति निश्चळु, मंद झुळके ॥ १७५ ॥
बहुत करुनि निःशद्ब, दाट न रिगे श्वापद।
शुक हन षट्पद, तेउतें नाहीं ॥ १७६ ॥
पाणिलगें हंसें, दोनी चारी सारसें।
कवणें एके वेळे बैसे, तरी कोकिळही हो ॥ १७७ ॥
निरंतर नाही, तरी आलीं गेलीं कांहीं।
होतु कां मयुरेंही, आम्ही ना न म्हणों ॥ १७८ ॥
परि आवश्यक पांडवा, ऐसा ठावो जोडावा।
तेथ निगूढ मठ होआवा, कां शिवालय ॥ १७९ ॥
दोहींमाजी आवडे तें, जें मानलें होय चित्तें।
बहुतकरुनि एकांते, बैसिजे गा ॥ १८० ॥
म्हणोनि तैसें ते जाणावें, मन राहातें पाहावें।
राहेल तेथ रचावें, आसन ऐसें।। १८१ ॥
वरि चोखट मृगसेवडी, माजी धूतवस्त्राची घडी।
तळवटीं अमोडी, कुशांकुर ॥ १८२ ॥
सकोमळ सरिसे, सुबध्द राहती आपैसे।
एकें पाडें तैसें, वोजा घाली ॥ १८३ ॥
परि सावियाचि उंच होईल, तरी आंग हन डोलेल।
नीच तरी पावेल, भूमिदोषु ॥ १८४ ॥
म्हणौनि तैसें न करावें, समभावें धरावें।
हें बहु असो होआवें, आसन ऐसें ॥ १८५ ॥
तत्रैकाग्नं मनः कृत्वा यतचित्तेद्रियक्रियः।
उपविश्यासने युञ्ज्याद योगमात्मविशुध्दये ॥ १२ ॥
मग तेथ आपण, एकाग्र अंतःकरण।
करुनि सद्गुरुस्मरण, अनुभविजे ॥ १८६ ॥
तैसें स्मरतेनि आदरें, सबाह्य सात्विकें भरे।
जंव काठिणपण विरे, अहंभावाचे ॥ १८७ ॥
विषयांचा विसरु पडे, इंद्रियांची कसमस मोडे।
मनाची घडी घडे, हृदयामाजीं ॥ १८८ ॥
ऐसें ऐक्य हें सहजें, फावें तंव राहिजे।
मग तेणेंचि बोधें बैसिजे, आसनावरी ॥ १८९ ॥
आतां आंगाते आंग करी, पवनातें पवनु धरी।
ऐसी अनुभवाची उजरी, होंचि लागे ॥ १९० ॥
प्रवृत्ती माघौति मोहरे, समाधि ऐलाडि उतरे।
आघवें अभ्यासु सरे, बैसतखेंवो ॥ १९१ ॥
मुद्रेची प्रौढी ऐशी, तेचि सांगिजेल आतां परियेसीं ।
तरी उरु या जघनासी, जडोनि घालीं ॥ १९२ ॥
चरणतळें देव्हडी, आधारद्रुमाचा बुडीं।
सुघटितें गाढीं, संचरीं पां ॥ १९३ ॥
सव्य तो तळीं ठेविजे, तेणें सिवणीमध्यु पीडिजे।
वरी बैसे तो सहजें, वामचरणु ॥ १९४ ॥
गुद मेंढ्राआंतौति, चारी अंगुळें निगुतीं ।
तेथ सार्ध सार्ध प्रांती, सांडुनियां ॥ १९५ ॥
माजि अंगुळ एक निगे, तेथ टांचेचेनि उत्तराभागें।
नेहेटिजे वरि आंगें, पेललेनि ॥ १९६ ॥
उचलिले कां नेणिजे, तैसें पृष्ठांत उचलिजे।
गुल्फद्वय धरिजे, तेणेंचि मानें ॥ १९७ ॥
मग शरीर संचु पार्था, अशेषुही सर्वथा।
पार्ष्णीचा माथा, स्वयंभु होय ॥ १९८ ॥
अर्जुना हें जाण, मूळबंधाचें लक्षण।
वज्रासन गौण, नाम यासी ॥ १९९ ॥
ऐसी आधारीं मुद्रा पडे, आणि आधींचा मार्गु मोडे।
तेथ अपानु आंतलीकडे , वोहोंटो लागे ॥ २००॥
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः।
संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ॥ १३ ॥
तंव करसंपुट आपैसें, वाम चरणीं बैसे।
तंव बाहुमुळीं दिसे, थोरवी आली ॥ २०१ ॥
माजी उभारलेनि दंडें, शिरकमळ होय गाढें।
नेत्रद्वारीची कवाडें, लागूं पहाती ॥ २०२ ॥
वरचिलें पाती ढळती, तळींची तळीं पुंजाळती।
तेथ अर्धोन्मीलित स्थिती, उपजे तया ॥ २०३ ॥
दिठी राहोनि आंतुलीकडे, बाहेर पाऊल घाली कोडें।
ते ठायीं ठावो पडे, नासाग्रपीठीं ॥ २०४ ॥
ऐसें आंतुच्या आंतुचि रचे, बाहेरी मागुतें न वचे।
म्हणौनि राहणें आधिये दिठीचें, तेथेंचि होय ॥ २०५ ॥
आतां दिशांचि भेटी घ्यावी, कां रुपाची वाट पहावी।
हे चाड सरे आघवी, आपैसया ॥ २०६ ॥
मग कंठनाळ आटे, हनुवटी हे हडौति दाटे।
ते गाढी होऊनि नेहटे, वक्षःस्थळीं ॥ २०७ ॥
माजीं घंटिका लोपे, वरी बंधु जो आरोपे।
तो जालंधरु म्हणिपे, पंडुकुमरा ॥ २०८ ॥
नाभीवरी पोखे, उदर हें थोके।
अंतरीं फांके, हृदयकोशु ॥ २०९ ॥
स्वाधिष्ठानावरिचिले कांठीं, नाभीस्थानातळवटीं।
बंधु पडे किरीटी, वोढियाणा तो ॥ २१० ॥
प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः।
मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥ १४ ॥
ऐसी शरीराबाहेरलीकडे, अभ्यासाची पांखर पडे।
तंव आंतु त्राय मोडे, मनोधर्माची ॥ २११ ॥
कल्पना निमे, प्रवृत्ती शमे।
आंग मन विरमे, सावियाचि ॥ २१२॥
क्षुधा काय जाहाली, निद्रा केउती गेली।
हे आठवणही हारपली, न दिसे वेगां, २१३ ॥
जो मुळबंधे कोंडला, अपानु माघौता मुरडला।
तो सवेंचि वरी सांकडला, फुगु धरी ॥ २१४ ॥
क्षोभलेपणें माजे, उवाइला ठायी गाजे।
मणिपुरेंसी झुंजे, राहोनियां ॥ २१५ ॥
मग थांवली ते वाहटुळी, सैंघ घेऊनि घर डहुळी।
बाळपणींची कुहीटुळी, बाहेर घाली ॥ २१६ ॥
भीतरीं वळी न धरे, कोठ्यामाजीं संचरे।
कफपित्ताचे थारे, उरों नेदी॥ २१७।।
धांतुचे समुद्र उलंडी, मेदाचे पर्वत फोडी।
आंतली मज्जा काढी, अस्थिगत ॥ २१८ ॥
नाडीतें सोडवी, गात्रांतें विघडवी।
साधकांते भेडसावी, परि बिहावें ना ॥ २१९ ॥
व्याधीतें दावी, सवेंचि हरवी।
आप पृथ्वी कालवी, एकवाट ॥ २२० ॥
तंव येरीकडे धनुर्धरा, आसनाचा उबारा।
शक्ती करी उजगरा, कुंडलिनीते ॥ २२१ ॥
नागाचें पिलें, कुंकुमें नाहलें।
वळण घेऊनि आलें, सेजे जैसें ॥ २२२।।
तैशी ते कुंडलिनी, मोटकी औट वळणी।
अधोमुख सर्पिणी, निजैली असे ॥ २२३ ॥
विद्युलतेची विडी, वन्हिज्वाळांची घडी।
पंधरेयाची चोखडी, घोंटीव जैशी ॥ २२४ ॥
तैसी सुबध्द आटली, पुटीं होती दाटली।
तें वज्रासनें चिमुटली, सावधु होय ॥ २२५ ॥
तेथ नक्षत्र जैसें उलंडलें, कीं सुर्याचें आसन मोडलें।
तेजाचे बीज विरुढलें, अंकुरेशीं ॥ २२६ ॥
तैशी वेढियातें सोडती, कवतिकें आंग मोडिती।
कंदावरी शक्ती, उठली दिसे ॥ २२७ ॥
सहजें बहुतां दिवसांची भूक, वरी चेवविलीं तें होय मिष।
मग आवेशें पसरी मुख, ऊर्ध्वा उजू ॥ २२८ ॥
तेथ हृदयकोशातळवटीं, जो पवनु भरे किरीटी।
तया सगळेयाचि मिठी, देऊनि घाली ॥ २२९ ॥
मुखींच्या ज्वाळीं, तळीं वरी कवळी।
मांसाची वडवाळी।आरोगुं लागे ॥ २३० ॥
जे जे ठाय समांस, तेथ आहाच जोडे घाउस।
पाठी एकदोनी घांस, हियाही भरी ॥ २३१ ॥
मग तळवे तळहात शोधी, उर्ध्वीचे खंड भेदी।
झाडा घे संधी, प्रत्यंगाचा ॥ २३२ ॥
आधार तरी न संडी, परि नखींचेंही सत्त्व काढी।
त्वचा धुवूनि जडी, पांजरेशीं ॥ २३३ ॥
अस्थींचे नळे निरपे, शिरांचे हीर वोरपे।
तंव बाहेरी विरुढी करपे, रोमबीजांची ॥ २३४ ॥
मग सप्तधांतूच्या सागरीं, ताहानेली घोंट भरी।
आणि सवेंचि उन्हाळा करी, खडखडीत ॥ २३५ ॥
नासापुटौनि वारा, जो जातसे अंगुळे बारा।
तो गचिये धरुनि माघारा, आंतु घाली ॥ २३६ ॥
तेथ अध वरौतें आकुंचे, ऊर्ध्व तळौतें खांचे।
तया खेंवामाजि चक्राचे, पदर उरती ॥ २३७ ॥
एऱ्हवीं तरी दोन्ही तेव्हांचि मिळती, परि कुंडलिनी नावेकु दुश्चित्त होती।
ते तयांतें म्हणे परौती, तुम्हीचि कायसीं एथें ॥ २३८ ॥
आइकें पार्थिव धातु आघवी, आरोगितां काहीं नुरवी।
आणि आपातें तंव ठेवी, पुसोनियां ॥ २३९ ॥
ऐसी दोनी भुतें खाये, ते वेळी संपूर्ण धाये,
मग सौम्य होऊनि राहे, सुषुम्नेपाशीं ॥ २४० ॥
तेथ तृप्तीचेनि संतोषें, गरळ जें वमी मुखें।
तेणें तियेचेनि पीयूषे, प्राणु जिये ॥ २४१ ॥
तो अग्नि आंतूनि निघे, परि सबाह्य निववूंचि लागे।
ते वेळी कसु बांधिती आंगे, सांडिला पुढती ॥ २४२ ॥
मार्ग मोडिती नाडीचे, नवविधपण वायुचें।
जाय म्हणऊनि शरीराचे, धर्मु नाहीं ॥ २४३ ॥
इडा पिंगळा एकवटती, गांठी तिन्ही सुटती।
साही पदर फुटती, चक्रांचे हे ॥ २४४॥
मग शशी आणि भानु, ऐसा कल्पिजे जो अनुमानु।
तो वातीवरी पवनु, गिवसितां न दिसे ॥ २४५ ॥
बुध्दीची पुळिका विरे, परिमळु घ्राणी उरे।
तोही शक्तिसवें संचरे, मध्यमेमाजी ॥ २४६ ॥
तंव वरिलेकडोनि ढाळें, चंद्रामृताचें तळें।
कानवडोनि मिळे, शक्तिमुखीं ॥ २४७ ॥
तेणें नातकें रस भरे, तो सर्वांगामाजीं संचरे।
जेथिंचा तेथ मुरे, प्राणपवनु ॥ २४८ ॥
तातलिये मुसें, मेण निघोनि जाय जैसें।
कोंदली राहे रसें, वोतलेनि ॥ २४९ ॥
तैसे पिंडाचेनि आकारें, ते कळाचि कां अवतरे।
वरी त्वचेचेनि पदरें, पांगुरली असे ॥ २५० ॥
जैसी आभाळाची बुंथी, करुनि राहे गभस्ती।
मग फिटलिया दीप्ति, धरूं नये ॥ २५१ ॥
तैसा आहाचवरि कोरडा, त्वचेचा असे पातवडा।
तो झडोनि जाय कोंडा, जैसा होय ॥ २५२ ॥
मग काश्मीराचे स्वयंभ, कां रत्नबीजा निघाले कोंभ।
अवयवकांतीचि भांब, तैसी दिसे ॥ २५३ ॥
नातरि संध्यारागींचे रंग, काढूनि वळिलें तें आंग।
की अंतर्जोतीचें लिंग, निर्वाळिलें ॥ २५४ ॥
कुंकुमाचे भरींव, सिध्दरसांचे वोतींव।
मज पाहतां सावेव, शांतिचि ते ॥ २५५ ॥
तें आनंदचित्रींचें लेप, नातरी महासुखाचें रूप।
कीं संतोषतरूचें रोप, थांवलें जैसें ॥ २५६ ॥
तो कनकचंपकाचा कळा, कीं अमृताचा पुतळा।
नाना सासिंनला मळा, कोंवळिकेचा ॥ २५७ ॥
हो कां जे शारदियेचे वोलें, चंद्रबिंब पाल्हेलें।
कां तेजचि मूर्त बैसलें, आसनावरी ॥ २५८ ॥
तैसें शरीर होये, जे वेळीं कुंडलिनी चंद्र पिये।
मग देहाकृति बिहे, कृतांतु गा ॥ २५९ ॥
वृध्दाप्य तरी बहुडे, तारुण्याची गांठी विघडे।
लोपली उघडे, बाळदशा ॥ २६० ॥
वयसा तरी येतुलेवरी, एऱ्हवी बळाचा बळार्थु करी।
धैर्याची थोरी, निरुपम ॥ २६१ ॥
कनकद्रुमाचां पालवीं, रत्नकळिका नित्य नवी।
नखें तैसीं बरवीं, नवीं निघती ॥ २६२ ॥
दांतही आन होती, परि अपाडें सानेजती।
जैसी दुबाहीं बैसे पांती, हिरेयांची ॥ २६३ ॥
माणिकुलियांचिया कणिया, सावियाची अणुमानिया।
तैसिया सर्वांगीं उधवती अणिया, रोमांचियां ॥ २६४ ॥
करचरणतळें, जैसीं कां रातोत्पळें।
पाखाळीं होती डोळे, काय सांगो ॥ २६५ ॥
निडाराचेनि कोंदाटें, मोतियें नावरती संपुटें।
मग शिवणी जैशी उतटे, शुक्तिपल्लवांची ॥ २६६ ॥
तैशीं पातिचिये कवळिये न समाये, दिठी जाकळोनि निघों पाहे,
आधिलीची परि होये, गगना कळिती ॥ २६७ ॥
आइके देह होय सोनियाचें, परि लाघव ये वायूचें।
जे आपा आणि पृथ्वीचे, अंशु नाहीं ॥ २६८ ॥
मग समुद्रपैलाडी देखे, स्वर्गींचा आलोचु आइके।
मनोगत ओळखे, मुंगियेचे।। २६९ ॥
पवनाचा वारिका वळघे, चाले तरी उदकीं पाऊल न लागे।
येणें येणें प्रसंगे, येती बहुता सिध्दी ॥ २७० ॥
आइकें प्राणाचा हातु धरुनि, गगनाची पाउटी करुनी।
मध्यमेचेनि दादराहुनी, हृदया आली ॥ २७१ ॥
ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा।
जया विश्वबीजाचिया कोंभा, साउली केली ॥ २७२ ॥
जे शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची कंरडी।
जे प्राणाची उघडी, जन्मभूमी ॥ २७३ ॥
हें असो ते कुंडलिनी बाळी, हृदयाआंतु आली।
तंव अनाहताचां बोलीं, चावळे ते ॥ २७४ ॥
शक्तीचिया आंगा लागलें, बुद्धीचें चैतन्य होतें जाहलें।
तें तेणें आइकिलें, अळुमाळु ॥ २७५ ॥
घोषाच्या कुंडी, नादचित्रांची रुपडीं।
प्रणवाचिया मोडी, रेखिलीं ऐसीं ॥ २७६ ॥
हेंचि कल्पावें तरी जाणिजे , परि कल्पितें कैचें आणिजे।
तरी नेणों काय गाजे, तिये ठायीं ॥ २७७ ॥
विसरोनि गेलों अर्जुना, जंव नाशु नाही पवना।
तंव वाचा आथी गगना, म्हणोनि घुमे ॥ २७८ ॥
तया अनाहताचेनि मेघें, आकाश दुमदुमों लागे।
तंव ब्रह्मस्थानींचें बेगें, फिटलें सहजें ॥ २७९ ॥
आइकें कमळगर्भाकारें, जें महदाकाश दुसरें।
जेथ चैतन्य आधातुरें, करुनि असिजे ॥ २८० ॥
तया हृदयाच्या परिवरीं, कुंडलिनियां परमेश्वरी।
तेजाची शिदोरी, विनियोगिली।। २८१ ॥
बुध्दीचेनि शाकें, हातबोनें निकें।
द्वैत जेथ न देखे, तैसें केलें ॥ २८२ ॥
ऐसी निजकांती हारविली, मग प्राणुचि केवळ जाहली।
ते वेळी कैसी गमली, म्हणावी पां ॥ २८३ ॥
हो कां जे पवनाची पुतळी, पांघुरली होती सोनेसळी।
ते फेडुनियां वेगळी, ठेवली तिया ॥ २८४ ॥
नातरी वारयाचेनि आंगें झगटली, दीपाची दिठी निमटली।
कां लखलखोनि हारपली, वीजु गगनीं ॥ २८५ ॥
तैशी हृदयकमळवेऱ्हीं, दिसे सोनियाची जैशी सरी।
नातरी प्रकाशजळाची झरी, वाहत आली ॥ २८६ ॥
मग ते हृदयभूमी पोकळे, जिराली कां एके वेळे।
तैसें शक्तीचे रुप मावळे, शक्तीचिमाजीं।। २८७ ॥
तेव्हां तरी शक्तीचि म्हणिजे, एऱ्हवी तो प्राणु केवळ जाणिजे।
आतां नाद बिंदु नेणिजे, कला ज्योती ॥ २८८ ॥
मनाचा हन मारु, कां पवनाचा धरु।
ध्यानाचा आदरु, नाहीं परी ॥ २८९ ॥
हे कल्पना घे सांडी, तें नाहीं इये परवडी।
हे महाभूतांची फुडी, आटणी देखां ॥ २९० ॥
पिंडे पिंडाचा ग्रासु, तो हा नाथसंकेतीचा दंशु।
परि दाऊनि गेला उद्देशु, महाविष्णु ॥ २९१ ॥
तया ध्वनिताचें केणें सोडुनी, यथार्थाची घडी झाडुनी।
उपलविली म्यां जाणुनि, ग्राहीक श्रोते ॥ २९२ ॥
युञ्जन्नेनं सदाऽत्मानं योगी नियतमानसः।
शान्ति निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥ १५ ॥
ऐकें शक्तीचें तेज लोपे, तेथ देहींचे रुप हारपे।
मग तो डोळ्यांमाजी लपे, जगाचिया ॥ २९३ ॥
एऱ्हवीं आधिलाची ऐसें, सावयव तरी दिसे।
परी वायूचें कां जैसें, वळिलें होय ॥ २९४ ॥
नातरी कर्दळीचा गाभा, बुंथी सांडोनि उभा।
कां अवयवचि नभा, निवडला तो ॥ २९५ ॥
तैसें होय शरीर, तैं तें म्हणिजे खेचर।
हें पद होतां चमत्कार, पिंडजनी ॥ २९६ ॥
देखें साधकु निघोनि जाय, मागां पाउलांची वोळ राहे।
तेथ ठायी ठायी होये, हे अणिमादिक ॥ २९७ ॥
परि तेणें काय काज आपणयां, अवधारी ऐसा धनंजया।
लोप आथी भूतत्रया, देहींचा देहीं ॥ २९८ ॥
पृथ्वीतें आप विरवी, आपातें तेज जिरवी।
तेजातें पवनु हरवी, हृदयामाजीं।। २९९ ॥
पाठीं आपण एकला उरे, परि शरीराचेनि अनुकारें,
मग तोही निगे अंतरें, गगना मिळे ॥ ३०० ॥
ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये, मारुत ऐसें नाम होये।
परि शक्तीपण तें आहे, जंव न मिळे शिवीं ॥ ३०१ ॥
मग जालंधर सांडी, ककारांत फोडी।
गगनाचिये पाहाडीं, पैठी होय ॥ ३०२ ॥
ते ॐकाराचिये पाठी, पाय देत उठाउठी।
पश्यंतीचिये पाउटी, मागां घाली ॥ ३०३ ॥
पुढां तन्मात्रा अर्धवेरी, आकाशाचां अंतरी।
भरती गमे सागरीं, सरिता जेवीं ॥ ३०४ ॥
मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी, सोहंभावाच्या बाह्या पसरुनी।
परमात्मलिंगा धांवोनि, आंगा घडे ॥ ३०५ ॥
तंव महाभूतांची जवनिका फिटे, मग दोहींसि होय झटें,
तेथ गगनासकट आटे, समरसीं तिये ॥ ३०६ ॥
पैं मेघाचेनि मुखीं निवडिला, समुद्र कां वोघीं पडिला।
तो मागुता जैसा आला, आपणपेयां ॥ ३०७ ॥
तेवीं पिंडाचेनि मिषें, पदीं पद प्रवेशे।
तें एकत्व होय तैसें, पंडुकुमरा ॥ ३०८ ॥
आतां दुजें हन होतें, कीं एकचि हें आइतें।
ऐशिये विवंचनपुरतें, उरेचिना।। ३०९ ॥
गगनीं गगन लया जाये, ऐसें जे कांहीं आहे।
तें अनुभवें जो होये, तो होऊनि ठाके ॥ ३१० ॥
म्हणोनि तेथिंची मातु, न चढेचि बोलाचा हातु।
जेणें संवादाचिया गांवाआंतु, पैठी कीजे ॥ ३११ ॥
अर्जुना एऱ्हवीं तरी, इया अभिप्रायाचा गर्वु धरी।
ते पाहें पां वैखरी, दुरी ठेली ॥ ३१२ ॥
भ्रूलता मागिलीकडे, तेथ मकाराचेंचि आंग न मांडे।
सडेया प्राणा सांकडें, गगना येतां ॥ ३१३ ॥
पाठीं तेथेंचि तो भासळला, तंव शब्दाचा दिवो मावळला,
मग तयाहि वरी आटु भविन्नला, आकाशाचा ॥ ३१४ ॥
आतां महाशून्याचिया डोहीं, जेथ गगनसीचि ठावो नाहीं।
तेथ तागा लागेल काई, बोलाचा इया ॥ ३१५ ॥
म्हणोनि आखरामाजीं सांपडे, कीं कानावरी जोडे।
हे तैसें नव्हे फुडें, त्रिशुध्दी गा ॥ ३१६ ॥
जैं कही दैवें, अनुभविलें फावे।
तैं आपणचि हें ठाकावें, होऊनिया ॥ ३१७ ॥
पुढती जाणणें तें नाहींचि, म्हणोनि असो किती हेंचि।
बोलावें आतां वायांचि, धनुर्धरा ॥ ३१८ ॥
ऐसें शब्दजात माघौतें सरे, तेथ संकल्पाचें आयुष्य पुरे।
वाराही जेथ न शिरे, विचाराचा ॥ ३१९ ॥
जें उन्मनियेचें लावण्य, जें तुर्येचें तारुण्य।
अनादि जें अगण्य, परमतत्व ॥ ३२० ॥
जें आकाराचा प्रांतु, जें मोक्षाचा एकांतु।
जेथ आदि आणि अंतु, विरोनि गेले ॥ ३२१ ॥
जें विश्वाचें मूळ, जें योगद्रुमाचें फळ।
जें आनंदाचें केवळ, चैतन्य गा ॥ ३२२ ॥
जें महाभूतांचें बीज, जें महातेजाचें तेज।
एवं पार्था जें निज, स्वरुप माझें ॥ ३२३ ॥
ते हे चर्तुभुज कोंभेली, जयाची शोभा रुपा आली।
देखोनि नास्तिकीं नोकिली, भक्तवृंदें ॥ ३२४ ॥
तें अनिर्वाच्य महासुख, पैं आपणचि जाहले जे पुरुष।
जयांचे कां निष्कर्ष, प्राप्तीवेरीं ॥ ३२५ ॥
आम्ही साधन हें जें सांगितलें , तेंचि शरीरीं जिहीं केलें।
ते आमुचेनि पाडें आले, निर्वाळलेया ॥ ३२६ ॥
परब्रह्माचेनि रसें, देहाकृतीचिये मुसें।
वोतींव जाहले तैसे, दिसती आंगें ॥ ३२७ ॥
कां जें आपण आतां देवो , हा बोलिलो जो उपावो।
तो प्राप्तीचा ठावो, म्हणोनि घडे ॥ ३२९ ॥
इये अभ्यासीं जे दृढ होती, ते भरंवसेनि ब्रह्मत्वा येती।
हें सांगतियाची रीती, कळलें मज ॥ ३३० ॥
देवा गोठीचि हे ऐकतां, बोधु उपजतसे चित्ता।
मा अनुभवें तल्लीनता, नव्हेल केंवी ॥ ३३१ ॥
म्हणऊनि एथ कांही, अनारिसें नाहीं।
परि नावभरी चित्त देई, बोला एका ॥ ३३२ ॥
आतां कृष्णा तुवां सांगितला योगु, तो मना तरी आला चांगु।
परि न शकें करुं पांगु, योग्यतेचा ॥ ३३३ ॥
सहजें आंगिक जेतुली आहे, तेतुलियाची जरी सिध्दि जाये।
तरी हाचि मार्ग सुखोपायें, अभ्यासीन ॥ ३३४ ॥
नातरी देवो जैसें सांगतील, तैसें आपणपां जरी न ठकेल।
तरी योग्यतेवीण होईल, तेचिं पुसों ॥ ३३५ ॥
जीवींचिये ऐसी धारण, म्हणोनि पुसावया जाहलें कारण।
मग म्हणे तरी आपण, चित्त देइजो ॥ ३३६ ॥
हां हो जी अवधारिलें, जें हें साधन तुम्हीं निरुपिलें।
तें आवडतयाहि अभ्यासिलें, फावों शके ॥ ३३७ ॥
कीं योग्यतेवीण नाहीं, ऐसें हन आहे कांही।
तेथ कृष्णा म्हणती तरी काई , धनुर्धरा।। ३३८ ॥
हें काज कीर निर्वाण, परि आणिकही जें कांही साधारण।
तेंही अधिकाराचे वोडवेविण, काय सिध्दि जाय ॥ ३३९ ॥
पैं योग्यता जे म्हणिजे, ते प्राप्तीची आधीन जाणिजे।
कां जे योग्य होऊनि कीजे, तें आरंभी फळें ॥ ३४० ॥
तरी तैसी एथ कांही, सावियाचि केणी नाहीं।
आणि योग्यांची काई, खाणी असे ॥ ३४१ ॥
नावेक विरक्तु, जाहला देहधर्मी नियतु।
तरि तोचि नव्हे व्यवस्थितु, अधिकारिया ॥ ३४२ ॥
येतुलालिये आयणीमाजि येवढें, योग्यपण तूतेंही जोडे।
ऐसें प्रसंगे सांकडें, फेडिलें तयाचें ॥ ३४३ ॥
मग म्हणे पार्था, ते हे ऐसी व्यवस्था।
अनियतासि सर्वथा, योग्यता नाहीं ॥ ३४४ ॥
नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः।
न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥ १६ ॥
जो रसनेद्रियाचा अंकिला, कां निद्रेसी जीवें विकला।
तो नाहीं एथ म्हणितला, अधिकारिया ॥ ३४५ ॥
अथवा आग्रहाचिये बांदोडी, क्षुधा तृषा कोंडी।
आहारातें तोडी, मारुनियां ॥ ३४६ ॥
निद्रेचिया वाटा न वचे, ऐसा दृढिवेचेनि अवतरणें नाचे।
तें शरीरचि नव्हे तयाचें, मा योगु कवणाचा ॥ ३४७ ॥
म्हणोनि अतिशयें विषयो सेवावा, तैसा विरोधु नव्हावा।
कां सर्वथा निरोधु करावा, हेंही नको ॥ ३४८ ॥
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥ १७ ॥
आहार तरी सेविजे, परि युक्तीचेनि मापें मविजे ,
क्रियाजात आचरिजे, तयाचि स्थिती ॥ ३४९ ॥
मपितलां बोलिजे, मितलिया पाउलीं चालिजे।
निद्रेही मानु दीजे, अवसरें एकें ॥ ३५० ॥
जागणें जरी जाहलें, तरी व्हावे तें मितलें।
येतुलेनि धातुसाम्य संचले, असेल सुखें ॥ ३५१ ॥
ऐसें युक्तीचेनि हातें, जें इंद्रियां वोपिजे भातें।
तै संतोषासी वाढतें, मनचि करी ॥ ३५२ ॥
यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते।
निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥ १८ ॥
बाहेर युक्तीची मुद्रा पडे, तंव आंत सुख वाढे।
तेथें सहजचि योगु घडे, नाभ्यासितां ॥ ३५३ ॥
जैसें भाग्याचिये भडसें, उद्यमाचेनि मिसें।
मग समृध्दीजात आपैसें, घर रिघे ॥ ३५४ ॥
तैसा युक्तीमंतु कौतुकें, अभ्यासाचिया मोहरा ठाके।
आणि आत्मसिद्धीची पिके, अनुभवु तयाचा ॥ ३५५ ॥
म्हणोनि युक्ती हे पांडवा, घडे जया सदैवा।
तो अपवर्गाचिये राणिवा, अळंकरिजे ॥ ३५६ ॥
यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता।
योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥ १९ ॥
युक्ती योगाचे आंग पावे, ऐसें प्रयाग जें होय बरवें।
तेथ क्षेत्रसंन्यासें स्थिरावें, मानस जयाचें ॥ ३५७ ॥
तयातें योगायुक्त म्हण, हेंही प्रसंगे जाण।
तें दीपांचे उपलक्षण, निर्वातींचिया ॥ ३५८ ॥
आतां तुझें मनोगत जाणोनि, कांही एक आम्ही म्हणोनि।
तें निकें चित्त देउनी, परिसावें गा ॥ ३५९ ॥
तूं प्राप्तीची चाड वाहसी, परि अभ्यासीं दक्ष नव्हसी।
तें सांग पा काय बिहसी, दुवाडपणा ॥ ३६० ॥
तरी पार्था हें झणें, सायास घेशीं हो मनें।
वायां बागूल इये दुर्जनें, इंद्रिये करिती ॥ ३६१ ॥
पाहें पां आयुष्याचा अढळ करी, जें सरतें जीवित वारी।
तया औषधातें वैरी, काय जिव्हा न म्हणे ॥ ३६२ ॥
ऐसें हितासि जें जें निकें, तें सदाचि या इद्रिंयां दुःखे।
एऱ्हवी सोपें योगासारिखें, कांही आहे ॥ ३६३ ॥
यत्रोपरमते चित्तं निरुध्दं योगसेवया।
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥ २० ॥
सुखमात्यन्तिकं यत् तद् बुध्दीग्राह्यमतीद्रिंय।
वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥ २१ ॥
म्हणोनि आसनाचिया गाढीका, जो आम्ही अभ्यासु सांगितला निका,
तेणे होईल तरी हो कां, निरोधु यया ॥ ३६४ ॥
एऱ्हवी तरी येणें योगें, जै इद्रिंया विंदाण लागे।
तै चित्त भेटों रिगे, आपणपेयां ॥ ३६५ ॥
परतोनि पाठिमोरें ठाके, आणि आपणियांते आपण देखे।
देखतखेवों वोळखे, म्हणे तत्त्व हें मी ॥ ३६६ ॥
तिये ओळखीचिसरिसें, सुखाचिया साम्राज्यीं बैसे।
मग चित्तपण समरसें, विरोनि जाय ॥ ३६७ ॥
जयापरतें आणिक नाहीं, जयातें इद्रिंयें नेणती कहीं।
तें आपणचि आपुलिया ठायीं, होऊनि ठाके ॥ ३६८ ॥
यं लब्धा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः।
यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥ २२ ॥
मग मेरुपासूनि थोरें, देह दुःखाचेनि डोंगरे।
दाटिजो पां परि भरें, चित्त न दटे ॥ ३६९ ॥
कां शस्त्रें वरी तोडिलिया, देह अग्निमाजीं पडलिया।
चित्त महासुखीं पहुडलिया, चेवोचि नये ॥ ३७० ॥
ऐसें आपणपां रिगोनि ठाये, मग देहाची वास न पाहे।
आणिकचि सुख होऊनि जाये, म्हणूनि विसरे ॥ ३७१ ॥
तं विद्यात् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम्।
स् निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥ २३ ॥
जया सुखाचिया गोडी, मग आर्तीची सेचि सोडी।
संसाराचिया तोंडीं, गुंतलें जें ॥ ३७२ ॥
जे योगाची बरव, संतोषाची राणीव।
ज्ञानाची जाणीव, जयालागीं ॥ ३७३ ॥
तें अभ्यासिलेनि योगें, सावयव देखावें लागें।
देखिलें तरी आंगें, होईजेल गा ॥ ३७४ ॥
संकल्पप्रभवान् कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः।
मनसैवेद्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥ २४ ॥
तरि तोचि योगु बापा, एके परि आहे सोपा।
जरी पुत्रशोकु संकल्पा, दाखविजे ॥ ३७५ ॥
हा विषयातें निमालिया आइके, इंद्रियें नेमाचिया धारणीं देखे।
तरी हियें घालूनि मुके, जीवितांसी ॥ ३७६ ॥
ऐसें वैराग्य हें करी, तरी संकल्पाची सरे वारी।
सुखें धृतीचिया धवळारीं, बुद्धी नांदे ॥ ३७७ ॥
शनैः शनैरुपरमेत् बुध्या धृतिगृहीतया।
आत्मसंस्थं मनः कृत्वा न किचिंदपि चिन्तयेत् ॥ २५ ॥
यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम्।
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥ २६ ॥
बुद्धी धैया होय वसौटा, तरी मनातें अनुभवाचिया वाटा।
हळु हळु करी प्रतिष्ठा, आत्मभुवनीं ॥ ३७८ ॥
याही एके परी, प्राप्ती आहे विचारीं।
हें न ठके तरी सोपारी, आणिक ऐकें ॥ ३७९ ॥
आतां नियमुचि हा एकला, जीवें करावा आपुला।
जैसा कृतनिश्चयाचिया बोला, बाहेरा नोहे ॥ ३८० ॥
जरी येतुलेनि चित्त स्थिरावें, तरी काजा आलें स्वभावें।
नाही तरी घालावें, मोकलुनी ॥ ३८१ ॥
मग मोकलिलें जेथ जाईल, तेथूनि नियमूचि घेऊनि येईल।
ऐसेनि स्थैर्याची होईल, सवे ययां ॥ ३८२ ॥
प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम्।
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतकल्मषम् ॥ २७ ॥
पाठीं केतुलेनि एके वेळी, तया स्थैर्याचेनि मेळें।
आत्मस्वरुपाजवळें, येईल सहजें ॥ ३८३ ॥
तयातें देखोनि आंगा घडेल, तेथ अद्वैतीं द्वैत बुडेल।
आणि ऐक्यतेजें उघडेल, त्रैलोक्य हें ॥ ३८४ ॥
आकाशीं दिसे दुसरें, ते अभ्र जैं विरे।
तै गगनचि कां भरे, विश्व जैसें ॥ ३८५ ॥
तैसे चित्त लया जाये, आणि चैतन्यचि आघवें होये।
ऐसी प्राप्ति सुखोपायें, आहे येणें ॥ ३८६ ॥
युञ्जन्नेवं सदात्मनं योगी विगतकल्मषः।
सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥ २८ ॥
या सोपिया योगस्थिती, उकलु देखिला गा बहुतीं।
संकल्पाचिया संपत्ती, रुसोनियां ॥ ३८७ ॥
तें सुखाचेनि सांगातें, आलें परब्रह्मा आंतौतें।
तेथ लवण जैसें जळातें, सांडु नेणे ॥ ३८८ ॥
तैसें होय तिये मेळीं, मग साम्यरसाचिया राऊळीं।
महासुखाची दिवाळी, जगेंसि दिसे ॥ ३८९ ॥
ऐसें आपुले पायवरी, चालिजे आपुले पाठीवरी।
हें पार्था नागवे तरी, आन ऐकें ॥ ३९० ॥
सर्वभूस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि।
इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥ २९ ॥
यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥ ३० ॥
तरी मी तंव सकळ देहीं, असे एथ विचारु नाहीं।
आणि तैसेंति माझ्या ठायीं, सकळ असे ॥ ३९१ ॥
हें ऐसेंचि संचलें, परस्परें मिसळलें।
बुद्धी घेपे एतुलें, होआवें गा ॥ ३९२ ॥
एऱ्हवीं तरी अर्जुना, जो एकवटलिया भावना।
सर्वभूतीं अभिन्ना, मातें भजे ॥ ३९३ ॥
भूतांचेनि अनेकपणें, अनेक नोहे अंतःकरणें।
केवळ एकत्वचि माझें जाणें, सर्वत्र जो ॥ ३९४ ॥
मग तो एक हा मियां, बोलता दिसतसे वायां।
एऱ्हवीं न बोलिजे तरी धनंजया, तो मीचि आहें ॥ ३९५ ॥
दीपा आणि प्रकाशा, एकवंकीचा पाडु जैसा।
तो माझ्या ठायी तैसा, मी तयामाजीं ॥ ३९६ ॥
जैसा उदकाचेनि आयुष्यें रसु, कां गगनाचेनि माने अवकाशु।
तैसा माझेनि रुपें रुपसु, पुरुष तो गा ॥ ३९७ ॥
सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः।
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥ ३१ ॥
जेणें ऐक्याचिये दिठी, सर्वत्र मातेचि किरीटी।
देखिला जैसा पटीं, तंतु एकु ॥ ३९८ ॥
कां स्वरुपें तरी बहुतें आहाती, परि तैसी सोनीं बहुवें न होती।
ऐसी ऐक्याचळाची स्थिती, केली जेणें ॥ ३९९ ॥
ना तरी वृक्षांचीं पानें जेतुलीं, तेतुलीं रोपे नाहीं लाविलीं।
ऐसी अद्वैतदिवसें पाहली, रात्री जया ॥ ४०० ॥
तो पंचात्मकीं सांपडे, तरी मग सांग पा कैसेनि अडे।
जो प्रतीतीचेनि पाडें , मजसी तुके ॥ ४०१ ॥
माझें व्यापकपण आघवें, गवसलें तयाचेनि अनुभवें।
तरी न म्हणतां स्वभावें, व्यापकु जाहला ॥ ४०२ ॥
आतां शरीरीं तरी आहे, परि शरीराचा तो नोहे।
ऐसें बोलवरी होये, तें करु ये काइ ॥ ४०३ ॥
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन।
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥ ३२ ॥
म्हणोनि असो तें विशेषें, आपणपेयांसारिखें।
जो चराचर देखे, अखंडित ॥ ४०४ ॥
सुखदुःखादि वर्मे, कां शुभाशुभे कर्में।
दोनी ऐसी मनोधर्में, नेणेचि जो ॥ ४०५ ॥
जें समविषम भाव, आणिकही विचित्र जें सर्व।
तें मानी जैसे अवयव, आपुले होती ॥ ४०६ ॥
हें एकैक काय सांगावें, जया त्रैलोक्यचि आघवें।
मी ऐसें स्वभावें, बोधा आलें ॥ ४०७ ॥
तयाही देह एकु कीर आथी, लौकिकीं सुखदुःखी तयातें म्हणती,
परि आम्हांतें ऐसीचि प्रतीती, परब्रह्मचि हा ॥ ४०८ ॥
म्हणोनि आपणपां विश्व देखिजे, आणि आपण विश्व होईजे।
ऐसे साम्यचि एक उपासिजे, पांडवा गा ॥ ४०९ ॥
हें तूतें बहुतीं प्रसंगीं, आम्ही म्हणों याचिलागीं।
जे साम्यापरौति जगीं प्राप्ति नाहीं।। ४१०।।
अर्जुन उवाच - योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन।
एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थित्तिं स्थिराम् ॥ ३३ ॥
चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद् दृढम्।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥ ३४ ॥
अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा।
परी न पुरों जी स्वभावा, मनाचिया ॥ ४११ ॥
हें मन कैसें केवढें, ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडें।
एऱ्हवी राहाटावया थोडें, त्रैलोक्य यया ॥ ४१२ ॥
म्हणोनि ऐसें कैसें घडेल , जे मर्कट समाधी येईल।
कां राहा म्हणितलिया राहेल, महावातु ॥ ४१३ ॥
जें बुध्दीतें सळी, निश्चयाते टाळी।
धैर्येसी हातफळी, मिळऊनि जाय ॥ ४१४ ॥
जें विवेकातें भुलवी, संतोषासी चाड लावी।
बैसिजे तरी हिंडवी, दाही दिशा ॥ ४१५ ॥
जें निरोधलें घे उवावो, जया संयमुचि होय सावावो।
तें मन आपुला स्वभावो, सांडील काई ॥ ४१६ ॥
म्हणोनि मन एक निश्चळ राहेल, मग आम्हांसी साम्य होईल।
हें विशेषेंही न घडेल, तयालागीं ॥ ४१७ ॥
श्रीभगवानुवाच - असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥ ३५ ॥
तंव कृष्ण म्हणती साचचि, बोलत आहासि तें तैसेंचि।
यया मनाचा कीर चपळचि, स्वभावो गा ॥ ४१८ ॥
परि वैराग्यचेनि आधारें, जरि लाविलें अभ्यासाचिये मोहरें।
तरि केतुलेनि एके अवसरें, स्थिरावेल ॥ ४१९ ॥
कां जें यया मनाचें एक निकें, जें देखिले गोडीचिया ठाया सोके,
म्हणोनि अनुभवसुखचि कवतिकें, दावीत जाइजे ॥ ४२० ॥
असंयतात्मना योगो दुष्पाप इति मे मतिः।
वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥ ३६ ॥
एऱ्हवीं विरक्ती जयांसि नाही, जे अभ्यासीं न रिघती कहीं।
तयां नाकळे हें आम्हीही, न मनू कायी ॥ ४२१ ॥
परी यमनियमांचिया वाटा न वचिजे, कहीं वैराग्याची से न करिजे,
केवळ विषयजळीं ठाकिजे, बुडी देऊनी ॥ ४२२ ॥
या जालिया मानसा कहीं, युक्तीची कांबी लागली नाहीं।
तरी निश्चळ होईल काई, कैसेनि सांगे ॥ ४२३ ॥
म्हणोनि मनाचा निग्रह होये, ऐसा उपाय जो आहे।
तो आरंभीं मग नोहे, कैसा पाहों ॥ ४२४ ॥
तरी योगसाधन जितुकें, कें अवघेचि काय लटिकें।
परि आपणयां अभ्यास न ठाके, हेंचि म्हण ॥ ४२५ ॥
आंगी योगाचें होय बळ, तरी मन केतुलें चपळ।
काय महदादि हें सकळ, आपु नोहे ॥ ४२६ ॥
तेथ अर्जुन म्हणे निकें, देवो बोलती तें न चुके।
साचचि योगबळेंसीं न तुके, मनोबळ ॥ ४२७ ॥
तरी तोचि योगु कैसा केवीं जाणों, आम्ही येतुले दिया याची मातुही नेणों।
म्हणोनि मनातें जी म्हणों, अनावर ॥ ४२८ ॥
हा आतां आघवेया जन्मा, तुझेनि प्रसादें पुरुषोत्तमा।
योगपरिचयो आम्हां, जाहला आजी ॥ ४२९ ॥
अर्जन उवाच -अयतिः श्रध्दयोपेतो योगात् चलितमानसः।
अप्राप्य योगसंसिध्दि कां गतिं कृष्ण गच्छति ॥ ३७ ॥
कच्चित् नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्राह्मणः पथि ॥ ३८ ॥
एतत् मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः।
त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्दते ॥ ३९ ॥
परि आणिक एक गोसांविया, मज संशयो असे साविया।
तो तूंवांचूनि फेडावया, समर्थु नाहीं ॥ ४३० ॥
म्हणोनि सांगे गोविंदा, कवण एकु मोक्षपदा।
झोंबत होता श्रध्दा, उपायेंविण ॥ ४३१ ॥
इद्रिंयग्रामोनि निघाला, आस्थेचिया वाटा लागला।
आत्मसिद्धीचिया पुढिला, नगरा यावया ॥ ४३२ ॥
तंव आत्मसिद्धी न ठकेचि, आणि मागुतें न येववेचि।
ऐसा अस्तु गेला माझारींचि, आयुष्यभानु ॥ ४३३ ॥
जैसें अकाळीं आभाळ, अळुमाळु सपातळ।
विपायें आलें केवळ, वसे ना वर्से ॥ ४३४ ॥
तैसी दोन्ही दुरावलीं, जे प्राप्ती तंव अलग ठेली।
आणि अप्राप्तीही सांडवली, श्रध्दा तया ॥ ४३५ ॥
ऐसा वोलांतरला काजीं, जो श्रध्देचांचि समाजीं।
बुडाला तया हो जी, कवण गति ॥ ४३६ ॥
श्रीभगवानुवाच-पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते।
न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति ॥ ४० ॥
तंव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्षसुखीं आस्था।
तया मोक्षावांचुनि अन्यथा, गती आहे गा ॥ ४३७ ॥
परि एतुलेंचि एक घडे, जें माझारी विसवावें पडे।
तेंही परि ऐसेनि सुरवाडें, जो देवां नाहीं ॥ ४३८ ॥
एऱ्हवी अभ्यासाचा उचलतां, पाउलीं जरी चालतां।
तरी दिवसाआधीं ठाकिता, सोऽहंसिध्दीतें ॥ ४३९ ॥
परि तेतुला वेगु नव्हेचि, म्हणऊनि विसांवा तरी निकाचि।
पाठीं मोक्षु तंव तैसाचि, ठेविला असे ॥ ४४० ॥
प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥ ४१ ॥
ऐसें कवतिक हें कैसें, जें शतमखा लोक सायासें।
ते तो पावे अनायासें, कैवल्यकामु ॥ ४४१ ॥
मग तेथिंचे जे अमोघ, अलौकिक भोग।
भोगितांही सांग, कांटाळे मन ॥ ४४२ ॥
हा अंतरायो अवचितां, कां वोढवला भगवंता।
ऐसा दिविभोग भोगितां, अनुतापी नित्य ॥ ४४३ ॥
पाठीं जन्मे संसारी, परि सकळ धर्माचिया माहेरीं।
लांबा उगवे आगरीं, विभवश्रियेचा ॥ ४४४ ॥
जयातें नीतिपंथे चालिजे, सत्यधूत बोलिजे।
देखावें तें देखिजे, शास्त्रदृष्टी ॥ ४४५ ॥
वेद तो जागेश्वरु, जया व्यवसाय निजाचारु।
सारासारविचारु, मंत्री जयाते ॥ ४४६ ॥
जयाचा कुळीं चिंता, जाली ईश्वराची पतिव्रता।
जयातें गृहदेवता, आदि ऋध्दि ॥ ४४७ ॥
ऐसी निजपुण्याची जोडी, वाढिन्नली सर्वसुखाची कुळवाडी।
तिये जन्मे तो सुरवाडी, योगच्युतु ॥ ४४८ ॥
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम्।
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदिदृश्यम्।। ४२ ॥
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम्।
यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥ ४३ ॥
अथवा ज्ञानाग्निहोत्री, जे परब्रह्मण्य श्रोत्री।
महासुखक्षेत्रीं, आदिवंत ॥ ४४९ ॥
जे सिद्धांताचिया सिंहासनीं, राज्य करिती त्रिभुवनीं।
जे कूंजते कोकिल वनीं, संतोषाचां ॥ ४५० ॥
जे विवेकग्रामींचां मुळीं, बैसले आहाति नित्य फळीं।
तया योगियांचिया कुळीं, जन्म पावे ॥ ४५१ ॥
मोटकी देहाकृती उमटे, आणि निजज्ञानाची पाहांट फुटे।
सूर्यापुढें प्रगटे, प्रकाशु जैसा ॥ ४५२ ॥
तैसी दशेची वाट न पहातां, वयसेचिया गांवा न येतां।
बाळपणींच सर्वज्ञता, वरी तयातें ॥ ४५३ ॥
तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभें, मनचि सारस्वतें दुभे।
मग सकळ शास्त्रे स्वयंभें, निघती मुखें ॥ ४५४ ॥
ऐसें जे जन्म, जयालागीं देव सकाम।
स्वर्गीं ठेले जप होम, करिती सदा ॥ ४५५ ॥
अमरीं भाट होईजे, मग मृत्युलोकातें वानिजे।
ऐसें जन्म पार्था गा जे, तें तो पावे ॥ ४५६ ॥
पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः।
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥ ४४ ॥
आणि मागील जे सद्बुद्धि, जेथ जीवित्वा जाहाली होती अवधि।
मग तेचि पुढती निरवधि, नवी लाहे ॥ ४५७ ॥
तेथ सदैवा आणि पायाळा, वरि दिव्यांजन होय डोळां।
मग देखे जैसीं अवलीळा, पाताळधनें ॥ ४५८ ॥
तैसें दुर्भेद जे अभिप्राय, कां गुरुगम्य हन ठाय।
तेथ सौरसेंवीण जाय, बुद्धी तयाची ॥ ४५९ ॥
बळियें इंद्रियें येती मना, मन एकवटे पवना।
पवन सहजें गगना, मिळोंचि लागे ॥ ४६० ॥
ऐसें नेणों काय आपैसें, तयातेंचि कीजे अभ्यासें।
समाधी घर पुसे, मानसाचें।। ४६१ ॥
जाणिजे योगपीठीचा भैरवु, काय आरंभरंभेचा गौरवु।
की वैराग्यसिद्धीचा अनुभवु, रुपा आला ॥ ४६२ ॥
हा संसारु उमाणितें माप, का अष्टांगसामग्रीचें द्वीप।
जैसे परिमळेंचि धरिजे रुप, चंदनाचें ॥ ४६३ ॥
तैसा संतोषाचा काय घडिला, कीं सिद्धिभांडारीहूनि काढिला।
दिसे तेणें मानें रुढला, साधकदशे ॥ ४६४ ॥
प्रयत्नाद् यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥ ४५ ॥
जे वर्षशतांचिया कोडी, जन्मसहस्त्रांचिया आडी।
लंघितां पातला थडी, आत्मसिद्धीची ॥ ४६५ ॥
म्हणोनि साधनजात आघवें, अनुसरे तया स्वभावें।
मग आयतिये बैसे राणिवे, विवेकाचिये ॥ ४६६ ॥
पाठीं विचारितया वेगां, तो विवेकुही ठाके मागां।
मग अविचारणीय तें आंगा, घडोनि जाय ॥ ४६७ ॥
तेथ मनाचें मेहुडें विरे, पवनाचे पवनपण सरे।
आपणपां आपण मुरे, आकाशही ॥ ४६८ ॥
प्रणवाचा माथा बुडे, येतुलेनि अनिर्वाच्य सुख जोडे।
म्हणोनि आधींचि बोलु बहुडे, तयालागीं ॥ ४६९ ॥
ऐसी ब्रह्माची स्थिती, जे सकळां गतींसी गती।
तया अमूर्ताची मूर्ती, होऊनि ठाके ॥ ४७० ॥
तेणें बहुतीं जन्मीं मागिलीं, विक्षेपांची पाणिवळें झाडिलीं।
म्हणोनि उपजतखेंवो बुडाली, लग्नघटिका ॥ ४७१ ॥
आणि तद्रूपतेसीं लग्न, लागोनि ठेलें अभिन्न।
जैसे लोपलें अभ्र गगन, होऊनि ठाके ॥ ४७२ ॥
तैसें विश्व जेथ होये, मागौतें जेथ लया जाये।
तें विद्यमानेंचि देहें, जाहला तो गा ॥ ४७३ ॥
तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः।
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन ॥ ४६ ॥
जया लाभाचिया आशा, करुनि धैर्यबाहूंचा भंरवसा।
घालीत षट्कर्माचा धारसा, कर्मनिष्ठ ॥ ४७४ ॥
कां जिये एकी वस्तुलांगी, बाणोनि ज्ञानाची व्रजांगी।
झुंजत प्रपंचेंशीं समरंगीं, ज्ञानिये गा ॥ ४७५ ॥
अथवा निलागें निसरडा, तपोदुर्गाचा आडकडा।
झोंबती तपिये चाडा, जयाचिया ॥ ४७६ ॥
जें भजतियांसी भज्य, याज्ञिकांचे याज्य।
एवं जें पूज्य, सकळां सदा ॥ ४७७ ॥
तेंचि तो आपण, स्वयं जाहला निर्वाण।
जें साधकांचें कारण, सिद्ध तत्व ॥ ४७८ ॥
म्हणोनि कर्मनिष्ठां वंद्यु, तो ज्ञानियांसि वेद्यु।
तापसांचा आद्यु, तपोनाथु ॥ ४७९ ॥
पैं जीवपरमात्मसंगमा, जयाचें येणें जाहले मनोधर्मा।
तो शरीरीचि परि महिमा, ऐसी पावे ॥ ४८० ॥
म्हणोनि याकारणें , तूंतें मी सदा म्हणें।
योगी होई अंतःकरणें, पंडुकुमरा ॥ ४८१ ॥
योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना।
श्रद्धावान् भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥ ४७ ॥
अगा योगी जो म्हणिजे, तो देवांचा देव जाणिजे।
आणि सुखसर्वस्व माझें, चैतन्य तो ॥ ४८२ ॥
जया भजता भजन भजावें, हे भक्तिसाधन जें आघवें।
ते मीचि जाहलों अनुभवें, अखंडीत ॥ ४८३ ॥
मग तया आम्हां प्रीतीचें, स्वरुप बोली निर्वचे।
ऐसें नव्हे गा तो साचें, सुभद्रापती ॥ ४८४ ॥
तया एकवटलिया प्रेमा, जरी पाडें पाहिजे उपमा।
तरी मी देह तो आत्मा, हेचि होय ॥ ४८५ ॥
ऐसे भक्तचकोरचंद्रें, त्रिभुवनैकनरेंद्रे ।
बोलिलें गुणसमुद्रें, संजयो म्हणे ॥ ४८६ ॥
तेथ आदिलापासोनि पार्था, ऐकिजे ऐसीचि आस्था।
दुणावली हें यदुनाथा, पावों सरले ॥ ४८७ ॥
कीं सावियाचि मनीं तोषला, जे बोला आरिसा जोडला।
तेणें हरिखें आतां उपलवला, निरुपील ॥ ४८८ ॥
तो प्रसंगु आहे पुढां, जेथ शांतु दिसे उघडा।
तो पालविजेल मुडा, प्रमेयबीजांचा ॥ ४८९ ॥
जें सात्विकाचेनि वडपें, गेलें आध्यात्मिक खरपें।
सहजें निरोळले वाफे, चतुरचित्ताचे ॥ ४९० ॥
वरी अवधानाचा वाफसा, लाधला सोनयाऐसा।
म्हणोनि पेरावया धिंवसा, निवृतीसी ॥ ४९१ ॥
ज्ञानदेव म्हणे मी चाडें, सद्गुरुंनी केलें कोडें।
माथां हात ठेविला तें फुडें, बीजचि वाइलें ॥ ४९२ ॥
म्हणऊनि येणे मुखें जें जें निगे, तें संतांच्या हृदयीं साचचि लागे।
हें असो सांगों श्रीरंगे, बोलिले जें ॥ ४९३ ॥
परी ते मनाचा कानी ऐकावें, बोल बुद्धीचां डोळां देखावें।
हे सांटोवाटीं घ्यावें, चित्ताचिया ॥ ४९४ ॥
अवधानाचेनि हातें, नेयावें हृदयाआंतौते।
हे रिझवितील आयणीतें, सज्जनांचिये ॥ ४९५ ॥
हे स्वहितातें निवविती, परिणामातें जीवविती।
सुखाची वाहविती, लाखोली जीवां ॥ ४९६ ॥
आतां अर्जुनेंसीं श्रीमुकुंदे, नागर बोलिजेल विनोदें।
तें वोंवियेचेनि प्रबंधें, सांगेन मी ॥ ४९७ ॥
ज्ञानेश्वरी / अध्याय सातवा : संत ज्ञानेश्वर
श्रीभगवानुवाच।मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥ १ ॥
ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः।
यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते ॥ २ ॥
आइका मग तो श्रीअनंतु। पार्थातें असे म्हणतु। पैं गा तूं योगयुक्तु। जालासि आतां ॥ १ ॥
मज समग्रातें जाणसी ऐसें। आपुलिया तळहातींचें रत्न जैसें। तुज ज्ञान सांगेन तैसें। विज्ञानेंसीं ॥ २ ॥
एथ विज्ञानें काय करावें। ऐसें घेसी जरी मनोभावें। तरी पैं आधीं जाणावें। तेंचि लागे ॥ ३ ॥
मग ज्ञानाचिये वेळे। झांकती जाणिवेचे डोळे। जैसी तीरीं नाव न ढळे। टेकलीसांती ॥ ४ ॥
तैसी जाणीव जेथ न रिघे। विचार मागुता पाउलीं निघे। तर्कु आयणी नेघे। आंगीं जयांच्या ॥ ५ ॥
अर्जुना तया नांव ज्ञान। येर प्रपंचु हें विज्ञान। तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान। हेंही जाण ॥ ६ ॥
आतां अज्ञान अवघें हरपे। विज्ञान निःशेष करपे। आणि ज्ञान तें स्वरूपें। होऊनि जाइजे ॥ ७ ॥
जेणें सांगतयाचें बोलणें खुंटे। ऐकतयाचें व्यसन तुटे। हें जाणणें सानें मोठें। उरों नेदी ॥ ८ ॥
ऐसें वर्म जें गूढ। तें किजेल वाक्यारूढ। जेणें थोडेन पुरे कोड। बहुत मनींचें ॥ ९ ॥
मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यतति सिद्धये।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः ॥ ३ ॥
पैं गा मनुष्यांचिया सहस्तशां-, माजीं विपाइले याचि धिंवसा। तैसें या धिंवसेकरां बहुवसां। माजीं विरळा जाणे ॥ १० ॥
जैसा भरलेया त्रिभुवना-, आंतु एकएकु चांगु अर्जुना। निवडूनि कीजे सेना। लक्षवरी ॥ ११ ॥
कीं तयाही पाठीं। जे वेळीं लोह मांसातें घांटी। ते वेळीं विजयश्रियेच्या पाटीं। एकुची बैसे ॥ १२ ॥
तैसें आस्थेच्या महापुरीं। रिघताती कोटिवरी। परी प्राप्तीच्या पैलतीरीं। विपाइला निगे ॥ १३ ॥
म्हणौनि सामान्य गा नोहे। हें सांगतां वडिल गोठी आहे। परी तें बोलों येईल पाहें। आता प्रस्तुत ऐकें ॥ १४ ॥
भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च।
अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥ ४ ॥
तरी अवधारीं गा धनंजया। हे महदादिक माझी माया। जैसी प्रतिबिंबे छाया। निजांगाची ॥ १५ ॥
आणि इयेतें प्रकृति म्हणिजे। जे अष्टधा भिन्न जाणिजे। लोकत्रय निपजे। इयेस्तव ॥ १६ ॥
हे अष्टधा भिन्न कैसी। ऐसा ध्वनि धरिसी जरी मानसीं। तरी तेचि गा आतां परियेसीं। विवंचना ॥ १७ ॥
आप तेज गगन। मही मारुत मन। बुद्धि अहंकारु हे भिन्न। आठै भाग ॥ १८ ॥
अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम्।
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ॥ ५ ॥
या आठांची जे साम्यावस्था। ते माझी परम प्रकृति पार्था। तिये नाम व्यवस्था। जीवु ऐसी ॥ १९ ॥
जे जडातें जीववी। चेतनेतें चेतवी। मना करवीं मानवी। शोक मोहो ॥ २० ॥
पैं बुद्धीच्या अंगीं जाणणें। तें जिये जवळिकेचें करणें। जिया अहंकाराचेनि विंदाणें। जगचि धरिजे ॥ २१ ॥
एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय।
अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥ ६ ॥
ते सूक्ष्म प्रकृति कोडें। जैं स्थूळाचिया आंगा घडे। तैं भूतसृष्टीची पडे। टांकसाळ ॥ २२ ॥
चतुर्विध ठसा। उमटों लागे आपैसा। मोला तरी सरसा। परी थरचि आनान ॥ २३ ॥
होती चौऱ्यांशीं लक्ष थरा। येरा मिती नेणिजे भांडारा। भरे आदिशून्याचा गाभारा। नाणेयांसी ॥ २४ ॥
ऐसें एकतुके पांचभौतिक। पडती बहुवस टांक। मग तिये समृद्धीचे लेख। प्रकृतीचि धरी ॥ २५ ॥
जे आखूनि नाणें विस्तारी। पाठी तयाची आटणी करी। माजीं कर्माकर्माचिया व्यवहारीं। प्रवर्तु दावी ॥ २६ ॥
हें रूपक परी असो। सांगों उघड जैसें परियेसों। तरी नामरूपाचा अतिसो। प्रकृतीच कीजे ॥ २७ ॥
आणि प्रकृति तंव माझ्या ठायीं। बिंबे येथें आन नाहीं। म्हणौनि आदि मध्य अवसान पाहीं। जगासि मी ॥ २८ ॥
मत्तः परतरं नान्यत्किंचिदस्ति धनंजय।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥ ७ ॥
हें रोहिणीचें जळ। तयाचें पाहतां येइजे मूळ। तैं रश्मि नव्हती केवळ। होय तें भानु ॥ २९ ॥
तयाचिपरी किरीटी। इया प्रकृती जालिये सृष्टी। जैं उपसंहरूनि कीजेल ठी। तैं मीचि आहें ॥ ३० ॥
ऐसें होय दिसे न दिसे। हें मजचि माजीं असे। मियां विश्व धरिजे जैसें। सूत्रें मणि ॥ ३१ ॥
सुवर्णाचे मणी केले। ते सोनियाचे सुतीं वोविले। तैसें म्यां जग धरिलें। सबाह्याभ्यंतरीं ॥ ३२ ॥
रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः।
प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु ॥ ८ ॥
पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ।
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ॥ ९ ॥
म्हणौनि उदकीं रसु। कां पवनीं जो स्पर्शु। शशिसूर्यीं जो प्रकाशु। तो मीचि जाण ॥ ३३ ॥
तैसाचि नैसर्गिकु शुद्धु। मी पृथ्वीच्या ठायीं गंधु। गगनीं मी शब्दु। वेदीं प्रणवु ॥ ३४ ॥
नराच्या ठायीं नरत्व। जें अहंभाविये सत्त्व। तें पौरुष मी हें तत्त्व। बोलिजत असे ॥ ३५ ॥
अग्नि ऐसें आहाच। तेज नामाचें आहे कवच। तें परतें केलिया साच। निजतेज तें मी ॥ ३६ ॥
आणि नानाविध योनी। जन्मोनि भूतें त्रिभुवनीं। वर्तत आहाति जीवनीं। आपुलाल्या ॥ ३७ ॥
एकें पवनेंचि पिती। एकें तृणास्तव जिती। एकें अन्नाधारें राहती। जळें एकें ॥ ३८ ॥
ऐसें भूतांप्रति आनान। जें प्रकृतिवशें दिसे जीवन। तें आघवाठायीं अभिन्न। मीचि एक ॥ ३९ ॥
बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम्।
बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ॥ १० ॥
बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम्।
धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥ ११ ॥
पैं आदिचेनि अवसरें। विरूढे गगनाचेनि अंकुरें। जे अंतीं गिळी अक्षरें। प्रणवपीठींचीं ॥ ४० ॥
जंव हा विश्वाकारु असे। तंव जें विश्वाचिसारिखें दिसे। मग महाप्रळयदशे। कैसेंही नव्हे ॥ ४१ ॥
ऐसें अनादि जें सहज। तें मी गा विश्वबीज। हें हातातळीं तुज। देइजत असे ॥ ४२ ॥
मग उघड करूनि पांडवा। जैं हे आणिसील सांख्याचिया गांवा। तैं ययाचा उपेगु बरवा। देखशील ॥ ४३ ॥
परी हे अप्रासंगिक आलाप। आतां असतु न बोलों संक्षेप। जाण तपियांच्या ठायीं तप। तें रूप माझें ॥ ४४ ॥
बळियांमाजीं बळ। तें मी जाणें अढळ। बुद्धिमंतीं केवळ। बुद्धि तें मी ॥ ४५ ॥
भूतांच्या ठायीं कामु। तो मी म्हणे आत्मारामु। जेणें अर्थास्तव धर्मु। थोरु होय ॥ ४६ ॥
एऱ्हवीं विकाराचेनि पैसे। करी कीर इंद्रियांचि ऐसें। परी धर्मासि वेखासें। जावों नेदी ॥ ४७ ॥
जो अप्रवृत्तीचा अव्हांटा। सांडूनि विधीचिया निघे वाटा। तेवींचि नियमाचा दिवटा। सवें चाले ॥ ४८ ॥
कामु ऐसिया वोजा प्रवर्ते। म्हणौनि धर्मासि होय पुरतें। मोक्षतीर्थींचे मुक्तें। संसार भोगी ॥ ४९ ॥
जो श्रुतिगौरवाच्या मांडवीं। काम सृष्टीचा वेलु वाढवी। जंव कर्मफळेंसि पालवी। अपवर्गीं टेंके ॥ ५० ॥
ऐसा नियुत कां कंदर्पु। जो भूतां या बीजरूपु। तो मी म्हणे बापु। योगियांचा ॥ ५१ ॥
हें एकेक किती सांगावें। आतां वस्तुजातचि आघवें। मजपासूनि जाणावें। विकारलें असे ॥ ५२ ॥
ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये।
मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ॥ १२ ॥
जे सात्त्विक हन भाव। कां रजतमादि सर्व। तें ममरूपसंभव। वोळखें तूं ॥ ५३ ॥
हे जाले तरी माझ्या ठायीं। परी तयामाजीं मी नाहीं। जैसी स्वप्नींच्या डोहीं। जागृति न बुडे ॥ ५४ ॥
जैसी रसाचीच सुघट। बीजकणिका घनवट। परी तियेस्तव होय काष्ठ। अंकुरद्वारें ॥ ५५ ॥
मग तया काष्ठाच्या ठायीं। सांग पां बीजपण असे काई ?, तैसा मी विकारीं नाहीं। जरी विकारला दिसे ॥ ५६ ॥
पैं गगनीं उपजे आभाळ। परी तेथ गगन नाहीं केवळ। अथवा आभाळीं होय सलिल। तेथ अभ्र नाहीं ॥ ५७ ॥
मग त्या उदकाचेनि आवेशें। प्रगटलें तेज जें लखलखीत दिसे। तिये विजूमाजीं असे। सलिल कायी ? ॥ ५८ ॥
सांगें अग्नीस्तव धूम होये। तिये धूमीं काय अग्नि आहे ?, तैसा विकारु हा मी नोहें। जरी विकारला असे ॥ ५९ ॥
त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत्।
मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् ॥ १३ ॥
परी उदकीं जाली बाबुळी। ते उदकातें जैसी झांकोळी। कां वायांचि आभाळीं। आकाश लोपे ॥ ६० ॥
हां गा स्वप्न लटिकें म्हणों ये। परि निद्रावशें बाणलें होये। तंव आठवु काय देत आहे। आपणपेयां ? ॥ ६१ ॥
हें असो डोळ्यांचें। डोळांचि पडळ रचे। तेणें देखणेंपण डोळ्यांचे। न गिळजे कायी ? ॥ ६२ ॥
तैसी हे माझीच बिंबली। त्रिगुणात्मक साउली। कीं मजचि आड वोडवली। जवनिका जैसी ॥ ६३ ॥
म्हणौनि भूतें मातें नेणती। माझींच परी मी नव्हती। जैसी जळींचि जळीं न विरती। मुक्ताफळें ॥ ६४ ॥
पैं पृथ्वीयेचा घटु कीजे। सवेंचि पृथ्वीसि मिळे तरी मेळविजे। एऱ्हवीं तोचि अग्निसंगें सिजे। तरी वेगळा होय ॥ ६५ ॥
तैसें भूतजात सर्व। हे माझेचि कीर अवयव। परि मायायोगें जीव-, दशे आले ॥ ६६ ॥
म्हणौनि माझेचि मी नव्हती। माझेचि मज नोळखती। अहंममताभ्रांती। विषयांध जाले ॥ ६७ ॥
दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया।
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥ १४ ॥
आतां महदादि हे माझी माया। उतरोनियां धनंजया। मी होईजे हें आया। कैसेनि ये ? ॥ ६८ ॥
जिये ब्रह्माचळाचा आधाडा। पहिलिया संकल्पजळाचा उभडा। सवेंचि महाभूतांचा बुडबुडा। साना आला ॥ ६९ ॥
जे सृष्टिविस्ताराचेनि वोघें। चढत काळकळनेचेनि वेगें। प्रवृत्तिनिवृत्तीचीं तुंगें। तटें सांडी ॥ ७० ॥
जे गुणघनाचेनि वृष्टिभरें। भरली मोहाचेनि महापूरें। घेऊनि जात नगरें। यमनियमांचीं ॥ ७१ ॥
जे द्वेषाच्या आवर्तीं दाटत। मत्सराचे वळसे पडत। माजीं प्रमादादि तळपत। महामीन ॥ ७२ ॥
जेथ प्रपंचाचीं वळणें। कर्माकर्मांचीं वोभाणें। वरी तरताती वोसाणें। सुखदुःखांचीं ॥ ७३ ॥
रतीचिया बेटा। आदळती कामाचिया लाटा। जेथ जीवफेन संघटा। सैंघ दिसे ॥ ७४ ॥
अहंकाराचिया चळिया। वरि मदत्रयाचिया उकळिया। जेथ विषयोर्मीच्या आकळिया। उल्लाळ घेती ॥ ७५ ॥
उदयास्ताचे लोंढे। पाडीत जन्ममरणाचे चोंढे। जेथ पांचभौतिक बुडबुडे। होती जाती ॥ ७६ ॥
सम्मोह विभ्रम मासे। गिळिताती धैर्याचीं आविसें। तेथ देव्हडे भोंवत वळसे। अज्ञानाचे ॥ ७७ ॥
भ्रांतीचेनि खडुळें। रेवले आस्थेचे अवगाळें। रजोगुणाचेनि खळाळें। स्वर्गु गाजे ॥ ७८ ॥
तमाचे धारसे वाड। सत्त्वाचें स्थिरपण जाड। किंबहुना हे दुवाड। मायानदी ॥ ७९ ॥
पैं पुनरावृत्तीचेनि उभडें। झळंबती सत्यलोकींचे हुडे। घायें गडबडती धोंडे। ब्रह्मगोळकाचे ॥ ८० ॥
तया पाणियाचेनि वहिलेपणें। अझुनी न धरिती वोभाणें। ऐसा मायापूर हा कवणें। तरिजेल गा ? ॥ ८१ ॥
येथ एक नवलावो। जो जो कीजे तरणोपावो। तो तो अपावो। होय तें एक ॥ ८२ ॥
एक स्वयंबुद्धीच्या बाहीं। रिगाले तयांची शुद्धीचि नाहीं। एक जाणिवेचे डोहीं। गर्वेंचि गिळिले ॥ ८३ ॥
एकीं वेदत्रयाचिया सांगडी। घेतल्या अहंभावाचिया धोंडी। ते मदमीनाच्या तोंडीं। सगळेचि गेले ॥ ८४ ॥
एकीं वयसेचें जाड बांधले। मग मन्मथाचिये कांसे लागले। ते विषयमगरीं सांडिले। चघळूनियां ॥ ८५ ॥
आतां वार्धक्याच्या तरंगा-, माजीं मतिभ्रंशाचा जरंगा। तेणें कवळिजताती पैं गा। चहूंकडे ॥ ८६ ॥
आणि शोकाचा कडा उपडत। क्रोधाच्या आवर्तीं दाटत। आपदागिधीं चुंबिजत। उधवला ठायीं ॥ ८७ ॥
मग दुःखाचेनि बरबटें बोंबले। पाठीं मरणाचिये रेवे रेवले। ऐसे कामाचे कांसे लागले। ते गेले वायां ॥ ८८ ॥
एकीं यजनक्रियेची पेटी। बांधोनि घातली पोटीं। ते स्वर्गसुखाच्या कपाटीं। शिरकोनि ठेले ॥ ८९ ॥
एकीं मोक्षीं लागावयाचिया आशा। केला कर्मबाह्यांचा भरंवसा। परी ते पडिले वळसां। विधिनिषेधांच्या ॥ ९० ॥
जेथ वैराग्याची नाव न रिगे। विवेकाचा तागा न लगे। वरि कांहीं तरों ये योगें। तरी विपाय तो ॥ ९१ ॥
ऐसें तरी जीवाचिये आंगवणें। इये मायानदीचें तरणें। हें कासयासारिखें बोलणें। म्हणावें पां ॥ ९२ ॥
जरी अपथ्यशीळा व्याधी। कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी। कीं रागी सांडी रिद्धी। आली सांती ॥ ९३ ॥
जरी चोरां सभा दाटे। अथवा मीनां गळु घोटे। ना तरी भेडा उलटे। विवसी जरी ॥ ९४ ॥
पाडस वागुर करांडी। कां मुंगी मेरु वोलांडी। तरी मायेची पैलथडी। देखती जीव ॥ ९५ ॥
म्हणौनि गा पंडुसुता। जैसी सकामा न जिणवेचि वनिता। तेवीं मायामय हे सरिता। न तरवें जीवां ॥ ९६ ॥
येथ एकचि लीला तरले। जे सर्वभावें मज भजले। तयां ऐलीच थडी सरलें। मायाजळ ॥ ९७ ॥
जयां सद्गुरुतारूं फुडें। जे अनुभवाचे कांसे गाढे। जयां आत्मनिवेदन तरांडे। आकळलें ॥ ९८ ॥
जे अहंभावाचें वोझें सांडुनी। विकल्पाचिया झुळका चुकाउनी। अनुरागाचा निरुता होउनि। पाणिढाळु ॥ ९९ ॥
जया ऐक्याचिया उतारा। बोधाचा जोडला तारा। मग निवृत्तीचिया पैल तीरा। झेंपावले जे ॥ १०० ॥
ते उपरतीच्या वांवीं सेलत। सोऽहंभावाचेनि थावें पेलत। मग निघाले अनकळित। निवृत्तितटीं ॥ १०१ ॥
येणें उपायें मज भजले। ते हे माझी माया तरले। परि ऐसे भक्त विपाइले। बहुवस नाहीं ॥ १०२ ॥
न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः।
माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥ १५ ॥
चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥ १६ ॥
जे बहुतां एकां अव्हांतरु। अहंकाराचा भूतसंचारु। जाहला म्हणौनि विसरु। आत्मबोधाचा ॥ १०३ ॥
ते वेळीं नियमाचें वस्त्र नाठवे। पुढील अधोगतीची लाज नेणवे। आणि करिताति जें न करावें। वेदु म्हणे ॥ १०४ ॥
पाहें पां शरीराचिया गांवा। जयालागीं आले पांडवा। तो कार्यार्थु आघवा। सांडूनियां ॥ १०५ ॥
इंद्रियग्रामींचे राजबिदीं। अहंममतेचिया जल्पवादीं। विकारांतरांचि मांदीं। मेळवूनियां ॥ १०६ ॥
दुःखशोकांच्या घाईं। मारिलियाची सेचि नाहीं। हे सांगावया कारण काई। जे ग्रासिले माया ॥ १०७ ॥
म्हणौनि ते मातें चुकले। ऐका चतुर्विध मज भजले। जिहीं आत्महित केलें। वाढतें गा ॥ १०८ ॥
तो पहिला आर्तु म्हणिजे। दुसरा जिज्ञासु बोलिजे। तिजा अर्थार्थी जाणिजे। ज्ञानिया चौथा ॥ १०९ ॥
तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥ १७ ॥
तेथ आर्तु तो आर्तीचेनि व्याजें। जिज्ञासु तो जाणावयालागीं भजे। तिजेनि तेणें इच्छिजे। अर्थसिद्धि ॥ ११० ॥
मग चौथियाच्या ठायीं। कांहींचि करणें नाहीं। म्हणौनि भक्तु एकु पाहीं। ज्ञानिया जो ॥ १११ ॥
जे तया ज्ञानाचेनि प्रकाशें। फिटलें भेदाभेदांचें कडवसें। मग मीचि जाहला समरसें। आणि भक्तुही तेवींचि ॥ ११२ ॥
परि आणिकांचिये दिठी नावेक। जैसा स्फटिकुचि आभासे उदक। तैसा ज्ञानी नव्हे कौतुक। सांगतां तो ॥ ११३ ॥
जैसा वारा कां गगनीं विरे। मग वारेपण वेगळें नुरे। तेवीं भक्त हे पैज न सरे। जरी ऐक्या आला ॥ ११४ ॥
जरी पवनु हालवूनि पाहिजे। तरी गगनावेगळा देखिजे। एऱ्हवीं गगन तो सहजें। असे जैसें ॥ ११५ ॥
तैसें शरीरीं हन कर्में। तो भक्तु ऐसा गमे। परी अंतरप्रतीतिधर्मे। मीचि जाहला ॥ ११६ ॥
आणि ज्ञानाचेनि उजिडलेपणें। मी आत्मा ऐसें तो जाणें। म्हणौनि मीही तैसेंचि म्हणें। उचंबळला सांता ॥ ११७ ॥
हां गा जीवापैलीकडिलीये खुणे। जो पावोनि वावरों जाणें। तो देहाचेनि वेगळेपणें। काय वेगळा होय ? ॥ ११८ ॥
उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम्।
आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥ १८ ॥
म्हणौनि आपुलाल्या हिताचेनि लोभें। मज आवडे तोहि भक्त झोंबे। परी मीचि करी वालभें। ऐसा ज्ञानिया एकु ॥ ११९ ॥
पाहें पां दुभतयाचिया आशा। जगचि धेनूसि करीतसे फांसा। परि दोरेंवीण कैसा। वत्साचा बळी ॥ १२० ॥
कां जे तनुमनुप्राणें। तें आणिक कांहींचि नेणें। देखे तयातें म्हणे। हे माय माझी ॥ २१ ॥
तें येणें मानें अनन्यगती। म्हणौनि धेनुही तैसीचि प्रीति। यालागीं लक्ष्मीपती। बोलिले साचें ॥ १२२ ॥
हें असो मग म्हणितलें। जे कां तुज सांगितलें। तेही भक्त भले। पढियंते आम्हां ॥ १२३ ॥
परि जाणोनियां मातें। जे पाहों विसरले मागौतें। जैसें सागरा येऊनि सरितें। मुरडावें ठेलें ॥ १२४ ॥
तैसी अंतःकरणकुहरीं जन्मली। जयाची प्रतीतिगंगा मज मीनली। तो मी हे काय बोली। फार करूं ? ॥ १२५ ॥
एऱ्हवीं ज्ञानिया जो म्हणिजे। तो चैतन्यचि केवळ माझें। हें न म्हणावें परि काय कीजे। न बोलणें बोलों ॥ १२६ ॥
बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते।
वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥ १९ ॥
जे तो विषयांची दाट झाडी-, माजीं कामक्रोधांचीं सांकडीं। चुकावूनि आला पाडीं। सद्वासनेचिया ॥ १२७ ॥
मग साधुसंगें सुभटा। उजू सत्कर्माचिया वाटा। अप्रवृत्तीचा अव्हांटा। डावलूनि ॥ १२८ ॥
आणि जन्मशतांचा वाहतवणा। तेविंची आशेचिया न लेचि वाहणा। तेथ फलहेतूचा उगाणा। कवणु चाळी ॥ १२९ ॥
ऐसा शरीरसंयोगाचिये राती-, माजीं धांवतां सडिया आयती। तंव कर्मक्षयाची पाहाती। पाहांट जाली ॥ १३० ॥
तैसीच गुरुकृपा उखा उजळली। ज्ञानाची वोतपली पडली। तेथ साम्याची ऋद्धि उघडली। तयाचिये दिठी ॥ १३१ ॥
ते वेळीं जयाकडे वास पाहे, तेउता मीचि तया एकु आहे। अथवा निवांत जरी राहे। तऱ्ही मीचि तया ॥ १३२ ॥
हें असो आणिक कांहीं। तया सर्वत्र मीवांचूनि नाहीं। जैसें सबाह्य जळ डोहीं। बुडालिया घटा ॥ १३३ ॥
तैसा तो मजभीतरीं। मी तया आंतुबाहेरी। हें सांगिजेल बोलवरी। तैसें नव्हे ॥ १३४ ॥
म्हणौनि असो हें इयापरी। तो देखे ज्ञानाची वाखारी। तेणें संसरलेनि करी। आपु विश्व ॥ १३५ ॥
हें समस्तही श्रीवासुदेवो। ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो। म्हणौनि भक्तांमाजीं रावो। आणि ज्ञानिया तोचि ॥ १३६ ॥
जयाचिये प्रतीतीचा वाखारां। पवाडु होय चराचरा। तो महात्मा धनुर्धरा। दुर्लभु आथी ॥ १३७ ॥
येर बहुत जोडती किरीटी। जयांचीं भजनें भोगासाठीं। जे आशातिमिरें दृष्टी। विषयांध जाले ॥ १३८ ॥
कामैस्तैस्तैर्हृज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः।
तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ॥ २० ॥
आणि फळाचिया हांवा। हृदयीं कामा जाला रिगावा। कीं तयाचिये घसणी दिवा। ज्ञानाचा गेला ॥ १३९ ॥
ऐसे उभयतां आंधारीं पडले। म्हणौनि पासींचि मातें चुकले। मग सर्वभावें अनुसरले। देवतांतरां ॥ १४० ॥
आधींच प्रकृतीचे पाइक। वरी भोगालागीं तंव रंक। मग तेणें लोलुपत्वें कौतुक। कैसेनि भजती ॥ १४१ ॥
कवणीं तिया नियमबुद्धि। कैसिया हन उपचारसमृद्धि। कां अर्पण यथाविधि। विहित करणें ॥ १४२ ॥
यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति।
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥ २१ ॥
पैं जो जिये देवतांतरीं। भजावयाची चाड करी। तयाची ते चाड पुरी। पुरविता मी ॥ १४३ ॥
देवोदेवीं मीचि पाहीं। हाही निश्चयो त्यासि नाहीं। भावो ते ते ठायीं। वेगळा धरिती ॥ १४४ ॥
स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते।
लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान् ॥ २२ ॥
मग तिया श्रद्धायुक्त। तेथिंचें आराधन जें उचित। तें सिद्धिवरी समस्त। वर्तो लागे ॥ १४५ ॥
ऐसें जेणें जें भाविजे। तें फळ तेणें पाविजे। परी तेंही सकळ निपजे। मजचिस्तव ॥ १४६ ॥
अन्तवत्तु फलं तेषां तद्भ्वत्यल्पमेधसाम्।
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ॥ २३ ॥
परी ते भक्त मातें नेणती। जे कल्पनेबाहेरी न निघती। म्हणौनि कल्पित फळ पावती। अंतवंत ॥ १४७ ॥
किंबहुना ऐसें जें भजन। तें संसाराचेंचि साधन। येर फळभोग तो स्वप्न। नावभरी दिसे ॥ १४८ ॥
हें असो परौंते। मग हो कां आवडे तें। परी यजी जो देवतांतें। तो देवत्वासीचि ये ॥ १४९ ॥
येर तनुमनुप्राणी। जे अनुसरले माझेयाचि वाहणीं। ते देहाच्या निर्वाणीं। मीचि होती ॥ १५० ॥
अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥ २४ ॥
परी तैसें न करिती प्राणिये। वायां आपुलिया हितीं वाणिये। जें पोहताती पाणियें। तळहातींचेनि ॥ १५१ ॥
नाना अमृताच्या सागरीं बुडिजे। मग तोंडा कां वज्रमिठी पाडिजे ?, आणि मनीं तरी आठविजे। थिल्लरोदकातें ? ॥ १५२ ॥
हें ऐसें कासया करावें। जे अमृतींही रिगोनि मरावें। तें सुखें अमृत होऊनि कां नसावें। अमृतामाजीं ? ॥ १५३ ॥
तैसा फळहेतूचा पांजरा। सांडूनियां धनुर्धरा। कां प्रतीतिपाखीं चिदंबरा। गोसाविया नोहावें ? ॥ १५४ ॥
जेथ उंचावलेनि पवाडें। सुखाचा पैसारु जोडे। आपुलेनि सुरवाडें। उडों ये ऐसा ॥ १५५ ॥
तया उमपा माप कां सुवावें। मज अव्यक्ता व्यक्त कां मानावें। सिद्ध असतां कां निमावें। साधनवरी ? ॥ १५६ ॥
परी हा बोल आघवा। जरी विचारीजतसे पांडवा। तरी विशेषें या जीवां। न चोजवे गा ॥ १५७ ॥
नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः।
मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥ २५ ॥
कां जे योगमायापडळें। हे जाले आहाति आंधळे। म्हणौनि प्रकाशाचेनि देहबळें। न देखती मातें ॥ १५८ ॥
एऱ्हवीं मी नसें ऐसें। काय वस्तुजात असे ?, पाहें पां कणव जळ रसें-, रहित आहे ? ॥ १५९ ॥
पवनु कवणातें न शिवेचि। आकाश कें न समायेचि। हें असो एकु मीचि। विश्वीं आहें ॥ १६० ॥
वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन।
भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥ २६ ॥
येथें भूतें जियें अतीतलीं। तियें मीचि होऊनि ठेलीं। आणि वर्तत आहाति जेतुलीं। तींही मीचि ॥ १६१ ॥
कां भविष्यमाणें जियें हीं। तींहीं मजवेगळीं नाहीं। हा बोलचि एऱ्हवीं कांहीं। होय ना जाय ॥ १६२ ॥
दोराचिया सापासी। डोंबा बडिया ना गव्हाळा ऐसी। संख्या न करवे कोण्हासी। तेवीं भूतांसि मिथ्यत्वें ॥ १६३ ॥
मी ऐसा पंडुसुता। अनुस्यूतु सदा असतां। या संसार जो भूतां। तो आनें बोलें ॥ १६४ ॥
तरी तेचि आतां थोडीसी। गोठी सांगिजेल परियेसीं। जै अहंकारा तनूंसीं। वालभ पडिलें ॥ १६५ ॥
इच्छाद्वेषसत्मुत्थेन द्वंद्वमोहेन भारत।
सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ॥ २७ ॥
तेथ इच्छा हे कुमारी जाली। मग ते कामाचिया तारुण्या आली। तेथ द्वेषेंसीं मांडिली। वऱ्हाडिक ॥ १६६ ॥
तया दोघांस्तव जन्मला। ऐसा द्वंद्वमोहो जाला। मग तो आजेयानें वाढविला। अहंकारें ॥ १६७ ॥
जो धृतीसी सदां प्रतिकूळु। नियमाही नागवे सळु। आशारसें दोंदिलु। जाला सांता ॥ १६८ ॥
असंतुष्टीचिया मदिरा। मत्त होऊनि धनुर्धरा। विषयांचे वोवरां। विकृतीशीं ॥ १६९ ॥
तेणें भावशुद्धीचिये वाटे। विखुरले विकल्पाचे कांटे। मग चिरिलें आव्हांटे। अप्रवृत्तीचे ॥ १७० ॥
तेणें भूतें भांबावलीं। म्हणौनि संसाराचिया आडवामाजीं पडिलीं। मग महादुःखाच्या घेतलीं। दांडे वरी ॥ १७१ ॥
येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम्।
ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढवरताः ॥ २८ ॥
ऐसे विकल्पाचे वांयाणे। कांटे देखोनि सणाणे। जे मतिभ्रमाचे पासवणें। घेतीचिना ॥ १७२ ॥
उजू एकनिष्ठेच्या पाउलीं। रगडूनि विकल्पाचिया भालीं। महापातकाची सांडिली। अटवीं जिहीं ॥ १७३ ॥
मग पुण्याचे धांवा घेतले। आणि माझी जवळीक पातले। किंबहुना चुकले। वाटवधेयां ॥ १७४ ॥
जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये।
ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ॥ २९ ॥
एऱ्हवीं तरी पार्था। जन्ममरणाची निमे कथा। ऐसिया प्रयत्नातें आस्था। विये जयांची ॥ १७५ ॥
तयां तो प्रयत्नुचि एके वेळे। मग समग्र परब्रह्में फळे। जया पिकलेया रसु गळे। पूर्णतेचा ॥ १७६ ॥
ते वेळीं कृतकृत्यता जग भरे। तेथ अध्यात्माचें नवलपण पुरे। कर्माचें काम सरे। विरमे मन ॥ १७७ ॥
ऐसा अध्यात्मलाभु तया। होय गा धनंजया। भांडवल जया। उद्यमीं मी ॥ १७८ ॥
तयातें साम्याचिये वाढी। ऐक्याची सांदे कुळवाडी। तेथ भेदाचिया दुबळवाडी। नेणिजे तया ॥ १७९ ॥
साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः।
प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः ॥ ३० ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७अ ॥
जिहीं साधिभूता मातें। प्रतीतीचेनि हातें। धरूनि अधिदैवातें। शिवतले गा ॥ १८० ॥
जया जाणिवेचेनि वेगें। मी अधियज्ञुही दृष्टी रिगें। ते तनूचेनि वियोगें। विऱ्हये नव्हती ॥ १८१ ॥
एऱ्हवीं आयुष्याचें सूत्र विघडतां। भूतांची उमटे खडाडता। काय न मरतयाचियाहि चित्ता। युगांतु नोहे ? ॥ १८२ ॥
परी नेणों कैसे पैं गा। जे जडोनि गेले माझिया आंगा। ते प्रयाणींचिया लगबगा। न सांडितीच मातें ॥ १८३ ॥
एऱ्हवी तरीं जाण। ऐसे जे निपुण। तेचि अंतःकरण-, युक्त योगी ॥ १८४ ॥
तंव इये शब्दकुपिकेतळीं। नोडवेचि अवधानाची अंजुळी। जे नावेक अर्जुन तये वेळीं। मागांचि होता ॥ १८५ ॥
जेथ तद्ब्रह्मवाक्यफळें। जिये नानार्थरसें रसाळें। बहकताती परिमळें। भावाचेनि ॥ १८६ ॥
सहज कृपामंदानिळें। कृष्णद्रुमाची वचनफळें। अर्जुन श्रवणाचिये खोळे। अवचित पडिलीं ॥ १८७ ॥
तियें प्रमेयाची हो कां वळलीं। कीं ब्रह्मरसाच्या सागरीं चुबुकळिलीं। मग तैसीचि कां घोळिलीं। परमानंदें ॥ १८८ ॥
तेणें बरवेपणें निर्मळें। अर्जुना उन्मेषाचे डोहळे। घेताति गळाळे। विस्मयामृताचे ॥ १८९ ॥
तिया सुखसंपत्ती जोडलिया। मग स्वर्गा वाती वांकुलिया। हृदयाच्या जीवीं गुतकुलिया। होत आहाती ॥ १९० ॥
ऐसें वरचिलीचि बरवा। सुख जावों लागलें फावा। तंव रसस्वादाचिया हांवा। लाहो केला ॥ १९१ ॥
झडकरी अनुमानाचेनि करतळें। घेऊनि तियें वाक्यफळें। प्रतीतिमुखीं एके वेळे। घालूं पाहे ॥ १९२ ॥
तंव विचाराचिया रसना न दाटती। परी हेतूच्या दशनीं न फुटती। ऐसें जाणौनि सुभद्रापती। चुंबिचिना ॥ १९३ ॥
मग चमत्कारला म्हणे। इयें जळींचीं मा तारांगणें। कैसा झकविलों असलगपणें। अक्षरांचेनि ॥ १९४ ॥
इयें पदें नव्हती फुडिया। गगनाचिया घडिया। येथ आमुची मति बुडालिया। थावो न निघे ॥ १९५ ॥
वांचूनि जाणावयाची कें गोठी। ऐसें जीवीं कल्पूनि किरीटी। तिया पुनरपि केली दृष्टी। यादवेंद्रा ॥ १९६ ॥
मग विनविलें सुभटें। हां हो जी ये एकवाटे। सातही पदें अनुच्छिष्टें। नवलें आहाती ॥ १९७ ॥
एऱ्हवीं अवधानाचेनि वहिलेपणें। नाना प्रमेयांचें उगाणें। काय श्रवणाचेनि आंगवणें। बोंलों लाहाती ? ॥ १९८ ॥
परी तैसें हें नोहेचि देवा। देखिला अक्षरांचा मेळावा। आणि विस्मयाचिया जीवा। विस्मयो जाला ॥ १९९ ॥
कानाचेनि गवाक्षद्वारें। बोलाचे रश्मी अभ्यंतरें। पाहेना तंव चमत्कारें। अवधान ठकलें ॥ २०० ॥
तेवींचि अर्थाची चाड मज आहे। तें सांगतांही वेळु न साहे। म्हणौनि निरूपण लवलाहें। कीजो देवा ॥ २०१ ॥
ऐसा मागील पडताळा घेउनी। पुढां अभिप्राय दृष्टी सूनी। तेवींचि माजीं शिरौनी। आर्ती आपुली ॥ २०२ ॥
कैसी पुसती पाहें पां जाणिव। भिडेचि तरी लंघों नेदीं शिंव। एऱ्हवीं श्रीकृष्ण हृदयासि खेंव। देवों सरला ॥ २०३ ॥
अहो श्रीगुरूतें जैं पुसावें। तैं येणें मानें सावध होआवें। हें एकचि जाणें आघवें। सव्यसाची ॥ २०४ ॥
आतां तयाचें तें प्रश्न करणें। वरी सर्वज्ञ श्रीहरीचें बोलणें। संजयो आवडलेपणें। सांगैल कैसें ॥ २०५ ॥
तिये अवधान द्यावें गोठी। बोलिजेल नीट मऱ्हाटी। जैसी कानाचे आधीं दिठी। उपेगा जाये ॥ २०६ ॥
बुद्धीचिया जिभा। बोलाचा न चाखतां गाभा। अक्षरांचिया भांबा। इंद्रियें जिती ॥ २०७ ॥
पहा पां मालतीचे कळे। घ्राणासि कीर वाटले परिमळें। परि वरचिला बरवा काइ डोळे। सुखिये नव्हती ? ॥ २०८ ॥
तैसें देशियेचिया हवावा। इंद्रियें करिती राणिवा। मग प्रमेयाचिया गांवा। लेसां जाइजे ॥ २०९ ॥
ऐसेनि नागरपणें। बोलु निमे तें बोलणें। ऐका ज्ञानदेवो म्हणे। निवृत्तीचा ॥ २१० ॥
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें