ज्ञानेश्वरी / अध्याय तेरावा : संत ज्ञानेश्वर ॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥ । अथ त्रयोदशोऽध्यायः - अध्याय तेरावा,। । क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, सकळ विद्यांचें अधिकरण, तेचि वंदूं श्रीचरण, श्रीगुरूंचे ॥ १ ॥ जयांचेनि आठवें, शब्दसृष्टि आंगवे, सारस्वत आघवें, जिव्हेसि ये ॥ २ ॥ वक्तृत्वा गोडपणें, अमृतातें पारुखें म्हणे, रस होती वोळंगणें, अक्शरांसी ॥ ३ ॥ भावाचें अवतरण, अवतरविती खूण, हाता चढे संपूर्ण, तत्त्वभेद ॥ ४ ॥ श्रीगुरूंचे पाय, जैं हृदय गिंवसूनि ठाय, तैं येवढें भाग्य होय, उन्मेखासी ॥ ५ ॥ ते नमस्कारूनि आतां, जो पितामहाचा पिता, लक्ष्मीयेचा भर्ता, ऐसें म्हणे ॥ ६ ॥ श्रीभगवानुवाच। इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते। एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥ १॥ तरी पार्था परिसिजे, देह हें क्षेत्र म्हणिजे, जो हें जाणे तो बोलिजे, क्षेत्रज्ञु एथें ॥ ७ ॥ क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत। क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ञानं मतं मम ॥ २॥ तरि क्षेत्रज्ञु जो एथें, तो मीचि जाण निरुतें, जो सर्व क्षेत्रांतें, स...