ज्ञानेश्वरी / अध्याय आठवा : संत ज्ञानेश्वर
अर्जुन उवाचः किं तद् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम।अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥ १ ॥
मग अर्जुनें म्हणितलें, हां हो जी अवधारिले।
जे म्यां पुसिले, ते निरूपिजो ॥ १॥
सांगा कवण तें ब्रह्म, काइसया नाम कर्म।
अथवा अध्यात्म, काय म्हणिपे ॥ २॥
अधिभूत तें कैसे, एथ अधिदैव तें कवण असे।
हें उघड मी परियेसें, तैसें बोला ॥ ३॥
अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन् मधुसूदन।
प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥ २ ॥
देवा अधियज्ञ तो काई, कवण पां इये देही।
हें अनुमानासि कांही, दिठी न भरे ॥ ४॥
आणि नियता अंतःकरणी, तूं जाणिजसी देहप्रयाणी।
तें कैसेनि हें शारंगपाणी, परिसवा मातें ॥ ५॥
देखा धवळारी चिंतामणीचा, जरी पहुडला होय दैवाचा।
तरी वोसणताही बोल तयाचा, परी सोपु न वचे ॥ ६॥
तैसें अर्जुनाचिया बोलासवें, आलें तेंचि म्हणितलें देवे।
परियेसें गा बरवे, जें पुसिले तुवां ॥ ७॥
किरीटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदोडा।
म्हणोनि मनोरथसिद्धीचिया चाडा, तो नवल नोहे ॥ ८॥
कृष्ण कोपोनि ज्यासि मारी, तो पावे परब्रह्मसाक्षात्कारी।
मा कृपेने उपदेशु करी, तो कैशापरी न पवेल ॥ ९॥
जैं कृष्णाचेया होइजे आपण, तैं कृष्ण होय आपुले अंतःकरण।
मग संकल्पाचे आंगण, वोळगती सिद्धी ॥ १०॥
परि ऐंसे जें प्रेम, अर्जुनींचि आथि निस्सीम।
म्हणऊनि तयाचे काम, सदा सफळ ॥ ११॥
या कारणे श्रीअनंते, तें मनोगत तयाचें पुसतें।
होईल जाणूनि आइतें, वोगरूनि ठेविलें ॥ १२॥
जें अपत्य थानी निगे, त्याची भूक ते मातेसीचि लागे।
एऱ्हवीं तें शब्दें काय सांगे, मग स्तन्य दे येरी ॥ १३॥
म्हणोनि कृपाळुवा गुरूचिया ठायी, हे नवल नोहे कांही।
परि तें असो आइका काई, जें देव बोलते जाहले ॥ १४॥
अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते।
भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञित ॥ ३॥
मग म्हणितले सर्वेश्वरें, जें आकारी इये खोंकरें।
कोंदलें असत न खिरे, कवणे काळी ॥ १५॥
एऱ्हवीं सपूरपण तयाचें पहावें, तरि शून्यचि नव्हे स्वभांवें।
वरि गगनाचेनि पालवे, गाळूनि घेतलें ॥ १६॥
जें ऐसेंही परि विरूळें, इये विज्ञानाचिये खोळे।
हालवलेंही न गळे, ते परब्रह्म ॥ १७॥
आणि आकाराचेनि जालेपणें, जन्मधर्मातें नेणे।
आकारलोपीं निमणें, नाहीं कहीं ॥ १८॥
ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती।
तया नाम सुभद्रापति, अध्यात्म गा ॥ १९॥
मग गगनी जेविं निर्मळें, नेणों कैंची एक वेळे।
उठती घनपटळे, नानावर्णे ॥२०॥
तैसे अमूर्तीं तिये विशुध्दे, महदादि भूतभेदें।
ब्रह्मांडाचे बांधे, होंचि लागती ॥ २१॥
पैं निर्विकल्पाचिये बरडी, कीं आदिसंकल्पाची फुटे विरूढी।
आणि ते सवेंचि मोडोनि ये ढोंढी, ब्रह्मगोळकांची ॥ २२॥
तया एकैकाचे भीतरीं पाहिजे, तंव बीजाचाचि भरिला देखिजे।
माजीं होतियां जातियां नेणिजे, लेख जीवां ॥ २३॥
मग तयागोळकांचे अंशांश, प्रसवती आदिसंकल्प असमसहास।
हें असो ऐसी बहुवस, सृष्टी वाढे ॥ २४॥
परि दुजेनविण एकला, परब्रह्मचि संचला।
अनेकत्वाचा आला, पूर जैसा ॥ २५॥
तैसें समविषमत्व नेणों कैचें, वांयांचि चराचर रचे।
पाहतां प्रसवतिया योनीचे, लक्ष दिसती ॥ २६॥
येरी जीवभावाचिय पालविये, कांही मर्यादा करूं नये।
पाहिजे कवण हें आघवें विये, तंव मूळ तें शून्य ॥ २७॥
म्हणूनि कर्ता मुदल न दिसे, आणि शेखीं कारणही कांही नसे।
माजीं कार्यचि आपैसें, वाढोंचि लागे ॥ २८॥
ऐसा करितेनवीण गोचरू, अव्यक्तीं हा आकारू।
निपजे जो व्यापारू, तया नाम कर्म ॥ २९॥
अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम।
अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ॥ ४॥
आतां अधिभूत जें म्हणिपे, तेंहि सांगों संक्षेपें।
तरी होय आणि हारपे, अभ्र जैसें ॥ ३०॥
तैसें असतेपण आहाच, नाहीं होइजे हें साच।
जयांतें रूपा आणिती पांचपांच, मिळोनियां ॥ ३१ ॥
भूतांतें अधिकरूनि असे, आणि भूतसंयोगें तरि दिसे।
जे वियोगवेळे भ्रंशे, नामरूपादिक ॥ ३२ ॥
तयातें अधिभूत म्हणिजे, मग अधिदैवत पुरूष जाणिजे।
जेणें प्रकृतीचें भोगीजे, उपार्जिलें ॥ ३३ ॥
जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रियदेशीचा अध्यक्षु।
जो देहास्तमनीं वृक्षु, संकल्पविहंगमाचा ॥ ३४ ॥
जो परमात्माचि परि दुसरा, जो अहंकारनिद्रा निदसुरा।
म्हणोनि स्वप्नींचिया बोरबारा, संतोषें शिणे ॥ ३५॥
जीव येणें नांवें, जयातें आळविजे स्वभावे।
तें अधिदैवत जाणावें, पंचायतनींचें ॥ ३६॥
आतां इयेचि शरीरग्रामीं, जो शरीरभावातें उपशमी।
तो अधियज्ञु एथ गा मी, पांडुकुमरा ॥ ३७॥
येर अधिदैवाधिभूत, तेहि मीचि कीर समस्त।
परि पंधरें किडाळा मिळत, तें काय सांके नोहे ॥ ३८॥
तरि ते पंधरेपण न मैळे, आणि किडाळाचियाही अंशा न मिळे।
परि जंव असे तयाचेनि मेळें, तव सांकेंचि म्हणिजे ॥ ३९॥
तैसें अधिभूतादि आघवे, हें अविद्येचेनि पालवें।
झांकलें तंव मानावें, वेगळें ऐसें ॥ ४०॥
तेचि अविद्येची जवनिका फिटे, आणि भेदभावाची अवघि तुटे।
मग म्हणों एक होऊनि जरी आटे, तरी काय दोनी होती ॥ ४१॥
पैं केशांचा गुंडाळा, वरि ठेविली स्फटिकशिळा।
ते वरि पाहिजे डोळां, तवं भेदिली गमती ॥ ४२॥
पाठीं केश परौते नेले, आणि भेदलेपण काय नेणों जाहालें।
तरि डांक देऊनि सांदिले, शिळेतें काई ॥ ४३॥
ना ते अखंडचि आयती, परि संगें भिन्न गमली होती।
ते सारिलिया मागौती, जैसी कां तैसी।। ४४॥
तेवींचि अहंभावो जाये, तरी ऐक्य तें आधींचि आहे।
हेंचि साचें जेथ होये, तो अधियज्ञु मी ॥ ४५॥
पैं गा आम्हीं तुज, सकळ यज्ञ कर्मज।
सांगीतलें कां जें काज, मनी धरूनि ॥ ४६॥
तो हा सकळ जीवांचा विसांवा, नैष्कर्म्यसुखाचा ठेवा।
परि उघड करूनि पांडव, दाविजत असे ॥ ४७॥
पहिलें वैराग्याइंधनपरिपूर्ती, इंद्रियानळी प्रदीप्तीं।
विषयद्रव्याचिया आहुती, देऊनिया ॥ ४८॥
मग वज्रासन तेचि उर्वी, शोधूनि आधारमुद्रा बरवी।
वेदिका रचे मांडवी, शरीराच्या ॥ ४९॥
तेथ संयमाग्नीचीं कुंडे, इंद्रियद्रव्याचेनि पवाडें।
यजिजती उदंडे, युक्तिघोषे ॥ ५० ॥
मग मनप्राण आणि संयमु, हाचि हवनसंपदेचा संभ्रमु।
येणें संतोषविजे निर्धूमु, ज्ञानानळु ॥ ५१॥
ऐसेनि हें सकळ ज्ञानी समर्पे, मग ज्ञान तें ज्ञेयीं हारपे।
पाठीं ज्ञेयचि स्वरूपें, निखिल उरे ॥ ५२ ॥
तया नांव गा अधियज्ञु, ऐसें बोलिला जंव सर्वज्ञु।
तंव अर्जुन अतिप्राज्ञु, तया पातलें तें ॥ ५३॥
हें जाणोनि म्हणितलें देवें, पार्था परिसतु आहासि बरवें।
याकृष्णाचिया बोलासवें, येरू सुखाचा जाहला ॥ ५४॥
देखा बालकाचिया धणी धाइजे, कां शिष्याचेनि जाहलेपणें होइजे।
हें सद्गुरूचि एकलेनि जाणिजे, कां प्रसवतिया ॥ ५५॥
म्हणोनि सात्विकां भावांची मांदी, कृष्णाआंगीं अर्जुनाआधीं।
न समातसे परी बुद्धी, सांवरूनि देवें ॥ ५६॥
मग पिकलिया सुखाचा परिमळु, कीं निवालिया अमृताचा कल्लोळु।
तैसा कोंवळा आणि रसाळु, बोलु बोलिला ॥ ५७॥
म्हणे परिसणेयांच्या राया, आइके बापा धनंजया।
ऐसी जळों सरलिया माया, तेथ जाळितें तेंही जळे ॥ ५८॥
अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम्,
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥ ५॥
जें आतांचि सांगितलें होतें, अगा अधियज्ञ म्हणितला जयातें।
जे आदीचि तया मातें, जाणोनि अंतीं ॥ ५९॥
ते देह झोळ ऐसें मानुनी, ठेले आपणपें आपण होऊनी।
जैसा मठ गगना भरूनी, गगनींचि असे ॥ ६०॥
यें प्रतीतीचिया माजघरीं, तया निश्चयाची वोवरी।
आली म्हणोनि बाहेरी, नव्हेचि से ॥ ६१॥
ऐसें सबाह्य ऐक्य संचलें, मीचि होऊनि असतां रचिलें।
बाहेरि भूतांचीं पांचही खवलें, नेणतांचि पडिलीं ॥ ६२॥
आतां उभयां उभेपण नाहीं जयाचें, मा पडिलिया गहन कवण तयाचें।
म्हणोनि प्रतीतीचिये पोटींचें, पाणी न हाले ॥ ६३॥
ते ऐक्याची आहे वोतिली, कीं नित्यतेचिया हृदयीं घातली।
जैसी समरससमुद्रीं धुतली, रूळेचिना ॥ ६४॥
पैं अथावीं घट बुडाला, तो आंतबाहेरी उदकें भरला।
पाठीं दैवगत्या जरी फुटला, तरी उदक काय फुटे ॥ ६५॥
ना तरी सर्पे कवच सांडिलें, कां उबारेनें वस्त्र फेडिलें।
तरी सांग पां काय मोडलें, अवेवामाजीं ॥ ६६॥
तैसा आकार हा आहाच भ्रंशे, वांचूनि वस्तु ते सांचलीचि असे।
तेचि बुद्धि जालिया विसुकुसे, कैसेनि आतां ॥ ६७॥
म्हणोनि यापरी मातें, अंतकाळीं जाणत सांते।
जे मोकलिती देहातें, तें मीचि होती ॥ ६८॥
एऱ्हवीं तरी साधारण, उरीं आदळलिया मरण।
जो आठव धरी अंतःकरण, तेंचि होइजे ॥ ६९॥
जैसा कवण एक काकुळती, पळतां पवनगती।
दुपाउलीं अवचितीं, कुहामाजी पडियेला ॥ ७०॥
आतां तया पडणयाआरौतें, पडण चुकवावया परौतें।
नाहीं म्हणोनि तेथें, पडावेंचि पडे ॥ ७१॥
तेंवि मृत्यूचेनि अवसरें एकें, जें येऊनि जीवासमोर ठाके।
तें होणें मग न चुके, भलतयापरी ॥ ७२॥
आणि जागता जंव असिजे, तंव जेणें ध्यानें भावना भाविजे।
डोळा लागतखेवों देखिजे, तेंचि स्वप्नीं ॥ ७३॥
यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम्।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥ ६ ॥
तेविं जितेनि अवसरें, जें आवडोनि जीवीं उरे।
तेंचि मरणाचिये मेरे, फार हों लागे ॥ ७४॥
आणि मरणीं जया जें आठवे, तो तेचि गतीतें पावे।
म्हणोनि सदां स्मरावें, मातेंचि तुवां ॥ ७५॥
तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ॥ ७ ॥
डोळां जें देखावें, कां कानी हन ऐकावें,
मनीं जें भावावें, बोलावें वाचे ॥ ७६॥
तें आतं बाहेरि आघवें, मीचि करूनि घालावें।
मग सर्वीं काळीं स्वभावें, मीचि आहें ॥ ७७॥
अर्जुना ऐसें जाहलिया, मग न मरिजे देह गेलिया।
मा संग्रामु केलिया, भय काय तुज ॥ ७८॥
तूं मनबुद्धि साचेंसीं, जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी।
तरी मातेंचि गा पावसी, हे माझी भाक ॥ ७९॥
हेंच कायिसया वरी होये, ऐसा जरी संदेहो वर्ततु आहे।
तरी अभ्यासूनि आदीं पाहें, मग नव्हे तरी कोपें ॥ ८०॥
अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना।
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुन्तयन् ॥ ८॥
येणेंचि अभ्यासेंसिं योगु, चित्तासि करीं पां चांगु।
अगा उपायबळें पंगु, पहाड ठाकी ॥ ८१॥
तेविं सदभ्यासें निरंतर, चित्तासि परमपुरूषाची मोहर।
लावें मग शरीर, राहो अथवा जावो ॥ ८२ ॥
जें नानागतीतें पाववितें, तें चित्त वरील आत्मयातें।
मग कवण आठवी देहातें, गेलें की आहे ॥ ८३॥
पैं सरितेचिनि ओघें, सिंधुजळा मीनलें ओघें।
तें काय वर्तत आहे मागें, म्हणोनि पाहों येते ॥ ८४॥
ना तें समुद्रचि होऊन ठेलें, तेविं चित्ताचें चैतन्य जाहालें।
जेथ यातायात निमालें, घनानंद जें ॥ ८५॥
कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद्।
सर्वस्य धातरमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमसः परस्तात् ॥ ९ ॥
जयाचें आकारावीण असणें, जया जन्म ना निमणें।
जें आघवेंचि आघवेपणें, देखत असे ॥ ८६॥
जें गगनाहून जुनें, जं परमाणूहूनि सानें।
जयाचेनि सान्निधानें, विश्व चळे ॥ ८७॥
जें सर्वांतें यया विये, विश्व सर्व जेणें जिये,
हेतु जया बिहे, अचिंत्य जें ॥ ८८॥
देखे वोळंबा इंगळु न चरे, तेजीं तिमिर न शिरे।
जें दिहाचें आंधारें, चर्मचक्षूसीं ॥ ८९॥
सुसडा सूर्यकणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानियांसी।
अस्तमानाचें जयासी, आडनांव नाहीं ॥ ९०॥
प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव।
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ॥ १० ॥
तया अव्यंगवाणेया ब्रह्मातें, प्रयाणकाले प्राप्ते।
जो स्थिरावलेनि चित्तें, जाणोनि स्मरे ॥ ९१॥
बाहेरी पद्मासन रचुनी, उत्तराभिमुख बैसोनि।
जीवीं सुख सूनि, कर्मयोगाचें ॥ ९२॥
आंतु मिनलेनि मनोधर्मे, स्वरूपप्राप्तीचेनि प्रेमें।
आपेंआप संभ्रमें, मिळावया ॥ ९३॥
आकळलेनि योगें, मध्यमा मध्यमार्गे।
अग्निस्थानैनि निगे, ब्रह्मरंघ्रा ॥ ९४॥
तेथ अचेत चित्ताचा सांगातु, आहाचवाणा दिसे मांडतु।
जेथ प्राण गगनाआंतु, संचरे कां ॥ ९५ ॥
परी मनाचेनि स्थैयैं धरिला, भक्तीचिया भावना भरला।
योगबळें आवरला, सज्ज होउनी ॥ ९६॥
तो जडाजडातें विरवितु, भ्रूलतांमाजी संचरतु।
जैसा घंटानाद लयस्थु, घंटेसींच होय ॥ ९७॥
कां झांकलिय घटींचा दिवा, नेणिजे काय जाहला केव्हां।
या रीती जो पांडवा, देह ठेवी ॥ ९८॥
तो केवळ परब्रह्म, जया परमपुरूष ऐसें नाम।
तें माझें निजधाम, होऊनि ठाके ॥ ९९॥
यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति यत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ॥ ११॥
सकळां जाणणेयां जे लाणी, तिये जाणिवेची जे खाणी।
तयां ज्ञानियांचिये आयणी, जयातें अक्षर म्हणिपे ॥ १००॥
चंडवातेंही न मोडे, तें गगनचि कीं फुडें।
वांचूनि जरे होईल मेहुडें, तरी उरेल कैंचे ॥ १०१॥
तेविं जाणणेया जें आकळिलें, तें जाणवलेपणेंचि उमाणलें।
मग नेणवेचि तया म्हणितलें, अक्षर सहजें ॥ १०२॥
म्हणोनि वेदविद नर, म्हणती जयातें अक्षर।
जें प्रकृतीसी पर, परमात्मरूप।। १०३॥
आणि विषयांचें विष उलंडूनि, जे सर्वेंद्रियां प्रायश्चित देऊनि।
आहाति देहाचिया बैसोनि, झाडातळी ॥ १०४॥
ते यापरी विरक्त, जयाची निरंतर वाट पाहात।
निष्कामासि अभिप्रेत, सर्वदा जें ॥ १०५॥
जयाचिया आवडी, न गणिती ब्रह्मचर्यादि सांकडी।
निष्ठुर होऊनि बापुडी, इंद्रिये करिती ॥ १०६॥
ऐसें जें पद, दुर्लभ आणि अगाध।
जयाचिये थडिये वेद, चुबुकळिले ठेले ॥ १०७॥
तें तें पुरूष होती, जे यापरी लया जाती।
तरी पार्था हेचि स्थिती, एक वेळ सांगो ॥ १०८॥
तेथ अर्जुनें म्हणितलें स्वामी, हेंचि म्हणावया होतों पां मी।
तंव सहजें कृपा केली तुम्ही, तरी बोलिजो कां ॥ १०९॥
परि बोलावें तें अति सोहोपें, तेथें म्हणितलें त्रिभुवनदीपें।
तुज काय नेणों संक्षेपें, सांगेन ऐक ॥ ११०॥
तरी मना या बाहेरिलीकडे, यावयाची साविया सवे मोडे।
हें हृदयाचिया डोहीं बुडे, तैसें कीजे ॥ १११॥
सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरूध्य च।
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ॥ १२॥
परी हें तरीच घडे, जरी संयमाची अखंडें।
सर्वद्वारी कवाडें, कळासती ॥ ११२॥
तरी सहजें मन कोंडलें, हृदयींचि असेल उगलें।
जैसें करचरणीं मोडलें, परिवरू न संडी ॥ ११३॥
तैसें चित्त राहिल्या पांडवा, प्राणाचा प्रणवुचि करावा।
मग अनुवृत्तिपंथें आणावा, मूर्ध्निवरी ॥११४॥
तेथ आकाशीं मिळे न मिळे , तैसा धरावा धारणाबळें।
जंव मात्रात्रय मावळे, अर्धबिंबीं ॥ ११५॥
तंववरी तो समीरु, निराळी कीजे स्थिरू।
मग लग्नीं जेविं ॐकारू, बिंबींचे विलसे ॥ ११६॥
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन्।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ॥ १३॥
तैसें ॐ हें स्मरों सरे, आणि तेथेंचि प्राणु पुरे।
मग प्रणवांतीं उरे, पूर्णघन जें ॥ ११७॥
म्हणोनि प्रणवैकनाम, हें एकाक्षर ब्रह्म।
जो माझें स्वरूप परम, स्मरतसांता ॥१ १८॥
यापरी त्यजी देहातें, तो त्रिशुद्धी पावे मातें।
जया पावनया परौतें, आणिक पावणें नाहीं ॥ ११९॥
तेथे अर्जुना जरी विपायें, तुझ्या जीवीं हन ऐसें जाये।
ना हें स्मरण मग होये, कायसयावरी अंती ॥ १२०॥
इंद्रियां अनुघडु पडलिया, जीवितचें सुख बुडालिया।
आंतुबाहेरी उघडलिया, मृत्युचिन्हें ॥ १२१॥
ते वेळीं बैसवेंचि कवणें, मग कवण निरोधी करणें।
तेथे काह्याचेनि अंतकःरणें, प्रणव स्मरावा ॥ १२२॥
तरि गा ऐशिया ध्वनी, झणें थारा देशी हो मनीं।
पैं नित्य सेविला मी निदानीं, सेवकु होयें ॥ १२३॥
अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः।
तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥ १४॥
मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम्।
नाप्नुवंति महात्मानः संसिद्धिं परमां गताः ॥ १५ ॥
जे विषयांसि तीळांजळी देऊनी, प्रवृत्तीवरी निगड वाउनी।
मातें हृदयीं सूनी, भोगताती ॥ १२४॥
परि भोगितया आराणुका, भेटणें नाहीं क्षुधादिकां।
तेथ चक्षुरादि रंकां, कवण पाडु ॥ १२५॥
ऐसे निरंतर एकवटले, जे अंतःकरणी मजशीं लिगटले।
मीचि होऊनि आटले, उपासैती ॥ १२६॥
तयां देहावसान जैं पावे, तैं तिहीं मातें स्मरावें।
मग म्यां जरी पावावें, तरि उपास्ति ते कायसी ॥ १२७॥
पैं रंकु एक आडलेपणें, काकुळती अंती धांवा गा धांवा म्हणे।
तरि तयाचिये ग्लानी धांवणे, काय न घडे मज ॥ १२८॥
आणि भक्तांही तेचि दशा, तरी भक्तीचा सोसु कायसा।
म्हणऊनि हा ध्वनी ऐसा, न वाखाणावा ॥ १२९॥
तिहीं जे वेळीं मी स्मरावा, ते वेळीं स्मरला कीं पावावा।
तो आभारूही जीवा, साहवेचि ना ॥ १३०॥
तें ऋणवैपण देखोनि आंगी, मी आपुलियाचि उत्तीर्णत्वालागीं।
भक्तांचिया तनुत्यागीं, परिचर्या करीं ॥ १३१॥
देहवैकल्याचा वारा, झणें लागेल या सकुमारां।
म्हणोनि आत्मबोधाचे पांजिरां, सूयें तयांतें ॥ १३२॥
वरि आपुलिया स्मरणाची उवाइली, हींवाऐसी करीं साउली।
ऐसेनि नित्य बुद्धि संचली, मी आणीं तयांतें ॥ १३३॥
म्हणोनि देहांतींचें सांकडें, माझियां कहींचि न पडे।
मी आपुलियांतें आपुलीकडे, सुखेंचि आणीं ॥ १३४॥
वरचील देहाची गंवसणी फेडुनी, आहाच अहंकाराचे रज झाडुनी।
शुद्ध वासना निवडुनी, आपणापां मेळवी ॥ १३५॥
आणि भक्तां तरी देहीं, विशेष एकवंकीचा ठाव नाहीं।
म्हणऊनि अव्हेरू करितां कांही, वियोग ऐसा न वाटे ॥ १३६॥
ना तरी देहांतींचि मियां यावें, मग आपणपें यांतें न्यावें।
हेंही नाहीं जे स्वभावें, ते आधींचि मज मीनले ॥ १३७॥
येरी शरीराचिया सलिलीं, असतेपण हे साउले।
वांचूनि चंद्रिका ते ठेली, चंद्रींचि आहे।। १३८॥
ऐसे जे नित्ययुक्त, तयांसि सुलभ मी सतत।
म्हणाऊनि देहांतीं निश्चित, मीचि होती ॥ १३९॥
मग क्लेशतरूची वाडी, जे तापत्रयाग्नीची सगडी।
जे मृत्युकाकासि कुरोंडी, सांडिली आहे ॥ १४०॥
जें दैन्याचें दुभतें, जें महाभयातें वाढवितें।
जें सकळ दुःखाचें पुरतें, भांडवल ॥ १४१॥
जें दुर्मतीचें मूळ, जें कुमार्गाचें फळ।
जें व्यामोहाचें केवळ, स्वरूपचि ॥ १४२॥
जें संसाराचें बैसणें, जें विकाराचें उद्यानें।
जें सकळ रोगांचें भाणें, वाढिलें आहे ॥ १४३॥
जें काळाचा खिचउशिटा, जें आशेचा आंगवठा।
जन्ममरणाचा वोलिंवटा, स्वभावें जें ॥ १४४॥
जें भुलीचें भरींव, जें विकल्पाचें वोतींव।
किंबहुना पेंव, विंचुवांचें ॥ १४५॥
जें व्याघ्राचें क्षेत्र, जें पण्यांगनेचें मैत्र।
जें विषयविज्ञानयंत्र, सुपूजित ॥ १४६॥
जें लांवेचा कळवळा, निवालिया विषोदकाचा गळाळा।
जें विश्वासु आंगवळा, संवचोराचा ॥ १४७॥
जें कोढियाचें खेंव, जें काळसर्पाचें मार्दव।
गोरियाचें स्वभाव, गायन जें ॥ १४८॥
जें वैरियाचा पाहुणेर, जें दुर्जनाचा आदर।
हें असो जें सागर, अनर्थाचा ॥ १४९॥
जें स्वप्नीं देखिलें स्वप्न, जें मृगजळें सासिन्नलें वन।
जें धूम्ररजांचें गगन, ओतलें आहे ॥ १५०॥
ऐसें जें हें शरीर, तें ते न पवतीचि पुढती नर।
जे होऊनि ठेले अपार, स्वरूप माझें ॥ १५१॥
आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥ १६॥
एऱ्हवीं ब्रह्मपणाचिय भडसे, न चुकतीचि पुनरावृत्तीचे वळसे।
परि निवटलियाचें जैसें, पोट न दुखे ॥ १५२॥
ना तरी चेइलियानंतरें, न बुडिजे स्वप्नींचेनि महापूरें।
तेवीं मातें पावलें ते संसारें, लिंपतीचि ना ॥ १५३॥
एऱ्हवीं जगदाकाराचें सिरें, जें चिरस्थायीयांचे धुरे।
ब्रह्मभुवन गा चवरें, लोकाचळाचें ॥ १५४॥
जिये गांवींचा पहारू दिवोवरी, एका अमरेंद्राचें आयुष्य न धरी।
विळोनि पांतीं उठी एकसरी, चवदाजणांची ॥ १५५॥
सहस्त्रयुगपर्यंतमहर्यद् ब्रह्मणो विदुः।
रात्रिं युगसहस्त्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ॥ १७॥
जैं चौकडिया सहस्त्र जाये, तैं ठायेठावो विळुचि होये।
आणि तैसेंचि सहस्त्र भरिये पाहें, रात्री जेथ ॥ १५६॥
येवढें अहोरात्र जेथिंचें, तेणें न लोटती जे भाग्याचे।
देखती ते स्वर्गींचे, चिरंजीव ॥ १५७॥
येरां सुरगणांची नवाई, विशेष सांगावी तेथ काई।
मुद्दल इंद्राचीचि दशा पाहीं, जे दिहाचे चौदा ॥ १५८॥
परि ब्रह्मयाचियाहि आठां पहारांतें, आपुलिया डोळां देखते।
जे आहाति गा तयांतें, अहोरात्रविद म्हणिपे ॥ १५९॥
अव्यक्ताद् व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे।
रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ॥ १८॥
भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते।
रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ॥ १९ ॥
तये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे, ते वेळीं गणना केंही न समाये।
ऐसें अव्यक्ताचें होये, व्यक्त विश्व ॥ १६०॥
पुढती दिहाची चौपाहारी फिटे, आणि हा आकारसमुद्र आटे।
पाठीं तैसाचि मग पाहांटे, भरों लागे ॥ १६१॥
शारदीयेचिये प्रवेशीं, अभ्रें जिरती आकाशीं।
मग ग्रीष्मांतीं जैशीं, निगती पुढती ॥ १६२॥
तैसी ब्रह्मदिनाचिये आदी, हे भूतसृष्टीची मांदी।
मिळे जंव सहस्त्रावधी, निमित्त पुरे ॥ १६३॥
पाठीं रात्रीचा अवसरू होये, आणि विश्व अव्यक्तीं लया जाये।
तोही युगसहस्त्र मोटका पाहे, आणि तैसेंचि रचे ॥ १६४॥
हें सांगावया काय उपपत्ति, जें जगाचा प्रळयो आणि संभूति।
इथे ब्रह्मभुवनींचिया होती, अहोरात्रमाजीं ॥ १६५॥
कैसें थोरिवेचें मान पाहें पां, हो सृष्टिबीजाचा साटोपा।
परि पुनरावृत्तीचिया मापा, शीग जाहला ॥ १६६॥
एऱ्हवीं त्रैलोक्य हें धनुर्धरा, तिये गांवींचा गा पसारा।
तो हा दिनोदयीं एकसरां, मांडतु असे ॥ १६७॥
पाठीं रात्रीचा समो पावे, आणि अपैसाचि सांटवे।
म्हणिये जेथींचें तेथ स्वभावें, साम्यासि ये ॥ १६८॥
जैसें वृक्षपण बीजासि आलें, कीं मेघ हें गगन जाहालें।
तैसें अनेकत्व जेथ सामावलें, तें साम्य म्हणिपे ॥ १६९॥
परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः।
यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥ २०॥
तेथ समविषम न दिसे कांही, म्हणोनि भूतें हे भाष नाही।
जेविं दूधचि जाहालिया दहीं, नामरूप जाय ॥ १७० ॥
तेंविं आकारलोपासरिसें, जगाचें जगपण भ्रंशे।
परि जेथ जाहालें तें जैसें, तैसेंचि असे ॥ १७१॥
तैं तया नांव सहज अव्यक्त, आणि आकारा वेळीं तेंचि व्यक्त।
हें एकास्तव एक सूचित, एऱ्हवीं दोनी नाही ॥ १७२॥
जैसें आटलिया स्वरूपें, आटलेपण ते खोटी म्हणिपे।
पुढती तो घनाकारू हारपे, जे वेळीं अळंकार होती ॥ १७३॥
हीं दोन्ही जैशीं होणीं, एकीं साक्षीभूत सुवर्णी।
तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी, वस्तूच्या ठायी ॥ १७४॥
तें तरी व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत।
या दोहीं भावाअतीत, अनादिसिध्द ॥ १७५॥
जें हें विश्वचि होऊनि असे, परि विश्वपण नासिलेनि न नासे।
अक्षरें पुसिल्या न पुसे, अर्थु जैसा ॥ १७६।।
पाहें पां तरंग तरी होत जात, परि तेथ उदक तें अखंड असत।
तेवीं भूताभावीं नाशिवंत, अविनाश जें ॥ १७७॥
ना तरी आटतिये अळंकारी, नाटतें कनक असे जयापरी।
तेवीं मरतिये जीवाकारीं, अमर जें आहे ॥ १७८॥
अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम्।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ २१॥
पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभस्त्वनन्या।
यस्यातःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ॥ २२ ॥
जयातें अव्यक्त म्हणों ये कोडें, म्हणतां स्तुति हें ऐसें नावडे ॥
जें मनबुद्धी न सांपडे, म्हणऊनियां ॥ १७९॥
आणि आकारा आलिया जयाचें, निराकारपण न वचे।
आकारलोपें न विसंचे, नित्यता गा ॥ १८०॥
म्हणोनि अक्षर जें म्हणिजे, तेवीचि म्हणतां बोधुही उपजे।
जयापरौता पैसु न देखिजे, या नाम परमगति ॥ १८१॥
परि आघवा इहीं देहपुरीं, आहे निजेलियाचे परी।
जे व्यापारू करवी ना करी, म्हणऊनियां ॥ १८२॥
एऱ्हवीं जे शारीरचेष्टा, त्यांमाजीं एकही न ठके गा सुभटा।
दाही इंद्रियांचिया वाटा, वाहतचि आहाति ॥ १८३॥
उकलूं विषयांचा पेटा, होता मनाचां चोहटा।
तो सुखदुःखाचा राजवांटा, भीतराहि पावे ॥ १८४॥
परि रावो पहुडलिया सुखें, जैसा देशींचा व्यापारू न ठके।
प्रजा आपुलालेनि अभिलाखें, करितचि असती ॥ १८५॥
तैसें बुद्धीचें हन जाणणें, कां मनाचें घेणेंदेणें।
इंद्रियांचें करणें, स्फुरण वायूचें ॥ १८६॥
हे देहक्रिया आघवी, न करितां होय बरवी।
जैसा न चलवितेनि रवी, लोकु चाले ॥ १८७॥
अर्जुना तयापरी, सुतला ऐसा आहे शरीरीं।
म्हणोनि पुरूषु गा अवधारीं, म्हणिपे जयातें ॥ १८८॥
आणि प्रकृति पतिव्रते, पडिला एकपत्नीव्रतें।
येणेंही कारणें जयातें, पुरूषु म्हणों ये ॥ १८९॥
पैं वेदाचें बहुवसपण, देखेचिना जयाचें आंगण।
हें गगनाचें पांघरूण, होय देखा ॥ १९०॥
ऐसें जाणूनि योगीश्वर, जयातें म्हणती परात्पर।
जें अनन्यगतीचें घर, गिंवसीत ये ॥ १९१॥
जे तनू वाचा चित्ते, नाइकती दुजिये गोष्टीतें।
तयां एकनिष्ठेचें पिकतें, सुक्षेत्र जें ॥ १९२।।
हें त्रैलोक्यचि पुरूषोत्तम, ऐसा साच जयाचा मनोधर्मु।
तया आस्तिकाचा आश्रमु, पांडवा गा ॥ १९३॥
जें निगर्वाचें गौरव, जें निर्गुणाची जाणीव।
जें सुखाची राणीव, निराशांसी ॥ १९४॥
जें संतोषियां वाढिलें ताट, जें अचिंता अनाथाचें मायपोट।
भक्ती उजू वाट, जया गांवा ॥ १९५॥
हें एकैक सांगोनि वायां, काय फार करूं धनंजया।
पैं गेलिया जया ठाया, तो ठावोचि होइजे ॥ १९६॥
हिंवाचिया झुळुका, जैसें हिंवचि पडे उष्णोदका।
कां समोर हालिया अर्का, तमचि प्रकाशु ॥ १९७॥
तैसा संसारू जया गांवा, गेला सांता पांडवा।
होऊनि ठाके आघवा, मोक्षाचाचि ॥ १९८॥
तरी अग्नीमाजीं आलें, जैसें इंधनचि अग्नि जहालें
पाठीं न निवडेचि कांही केलें, काष्ठपण ॥ १९९॥
ना तरी साखरेचा माघौता, बुध्दिमंतपणेंही करितां।
परि ऊंस नव्हे पांडुसुता, जियापरी ॥ २००॥
लोहाचें कनक जहालें, हें एकें परिसेंचि केलें।
आतां आणिक कैंचें तें गेलें, लोहत्व आणी ॥ २०१॥
म्हणोनि तूप होऊनि माघौतें, जेवीं दूधपण न येचि निरूतें।
तेविं पावोनियां जयातें, पुनरावृत्ति नाहीं ॥ २०२॥
तें माझें परम, साचोकारें निजधाम।
हें आंतुवट तुज वर्म, दाविजत असें।। २०३॥
यत्र काले त्वानावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥ २३॥
तेवींचि आणिकेंही एके प्रकारें, जाणतां आहे सोपारें।
तरि देह सांडितेनि अवसरें, जेथ मिळती योगी ॥ २०४॥
अथवा अवचटें ऐसें घडे, जे अनवसरें देह सांडे।
तरि माघौतें येणें घडे, देहासीचि ॥ २०५॥
म्हणोनि काळशुद्धी जरी देह ठेवीती, तरी ठेवितखेवीं ब्रह्मचि होती।
एऱ्हवीं अकाळीं तरी येती, संसारा पुढती ॥ २०६॥
तैसें सायुज्य आणि पुनरावृत्ति, या दोन्ही अवसराअधीन आहाती।
तो अवसरू तुजप्रती, प्रसंगें सांगों ॥ २०७॥
तरि ऐकें गा सुभटा, पातलिया मरणाचा माजिवटा।
पांचै आपुलालिया वाटा, निघती अंती ॥ २०८॥
ऐसा वरिपडिला प्रयाणकाळी, बुद्धीतें भ्रमु न गिळी।
स्मृति नव्हे आंधळी, न मरे मन ॥ २०९॥
हा चेतनावर्गु आघवा, मरणी दिसे टवटवा।
परि अनुभविलिया ब्रह्मभावा, गवसणी होऊनि ॥ २१०॥
ऐसा सावध हा समवावो, आणि निर्वाणवेऱ्ही निर्वाहो।
हे तरीच घडे जरी सावावो, अग्नीचा आथी ॥ २११॥
पाहें पां वारेन कां उदकें, जैं दिवियांचें दिवेपण झांके।
तैं असतीच काय देखे, दिठी आपुली ॥ २१२॥
तैसें देहांतींचेनि विषमवातें, देह आंतबाहेरि श्लेष्माआतें।
तैं विझोनि जाय उजितें, अग्नीचें तें ॥ २१३॥
ते वेळीं प्राणासि पाणु नाहीं, तेथ बुद्धि असोनि करील काई।
म्हणोनि अग्नीवीण देहीं, चेतना न थरे ॥ २१४॥
अगा देहींचा अग्नि जरी गेला, तरी देह नव्हे चिखलु वोला।
वायां आयुष्यवेळु आपुला, अंधारे गिंवसी ॥ २१५॥
आणि मागील स्मरण आघवें, तें तेणें अवसरें सांभाळावें।
मग देह त्यजूनि मिळावें, स्वरूपीं कीं ॥ २१६॥
तंव तया देहश्लेष्माचे चिखलीं, चेतनाचि बुडोनि गेली।
तेथ मागिली पुढिली हे ठेली, आठवण ॥ २१७॥
म्हणोनि आधीं अभ्यासु जो केला, तो मरण न येतां निमोनि गेला।
जैसें ठेवणें न दिसतां मालवला, दीपु हातींचा ॥ २१८॥
आतां असो हें सकळ, जाण पां ज्ञानासि अग्नि मूळ।
तया अग्नीचें प्रयाणीं बळ, संपूर्ण आथी ॥ २१९॥
अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥ २४॥
आंतु अग्निज्योतीचा प्रकाशु, बाहेरी शुक्लपक्षु आणि दिवसु।
आणि सा मासांमाजीं मासु, उत्तरायण ॥ २२०॥
ऐशिया समयोगाची निरूती, लाहोनि जे देह ठेविती।
ते परब्रह्मचि होती, ब्रह्मविद ॥ २२१॥
अवधारीं गा धनुर्धरा, येथवरी सामर्थ्य यया अवसरा।
तेवींचि हा उजू मार्ग स्वपुरा, यावया पैं ॥ २२२॥
एथ अग्नि हें पहिलें पायतरें, ज्योतिर्मय हें दुसरें।
दिवस जाणें तिसरें, चौथें शुक्लपक्ष ॥ २२३॥
आणि सामास उत्तरायण, तें वरचील गा सोपान।
येणें सायुज्यसिद्धिसदन, पावती योगी ॥ २२४॥
हा उत्तम काळु जाणिजे, यातें अर्चिरादि मार्गु म्हणिजे।
आतां अकाळु तोही सहजें, सांगेन आईक ॥ २२५॥
धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम्।
तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योती प्राप्य निवर्तते ॥ २५॥
तरि प्रयाणाचिया अवसरें, वात श्लेष्मां श्लेष्मां।
तेणें अंतःकरणीं आंधारें, कोंदले ठाके ॥ २२६ ॥
सर्वेंद्रियां लांकुड पडे, स्मृती भ्रमामाजीं बुडे।
मन होय वेडें, कोंडे प्राण ॥ २२७॥
अग्नीचें अग्निपण जाये, मग तो धूमचि अवघा होये।
तेणें चेतना गिंवसिली ठाये, शरीरींची ॥ २२८॥
जैसें चंद्राआड आभाळ, सदट दाटे सजळ।
मग गडद ना उजाळ, ऐसें झांवळें होये ॥ २२९॥
कां मरे ना सावध, ऐसें जीवितासि पडे स्तब्ध।
आयुष्य मरणाची मर्याद-, वेळु ठाकी ॥ २३०॥
ऐसी मनबुद्धिकरणीं, सभोंवतीं धूमाकुळाची कोंडणी।
तेथ जन्में जोडलिये वाहणी, युगचि बुडे ॥ २३१।।
हां गा हातींचें जे वेळीं जाये, ते वेळीं आणिका लाभाची गोठी कें आहे।
म्हणऊनि प्रयाणीं तंव होये, येतुली दशा ॥ २३२॥
ऐसी देहाआंतु स्थिति, बाहेरि कृष्णपक्षु वरि राती।
आणि सा मासही वोडवती, दक्षिणायन ॥ २३३॥
इये पुनरावृतीचीं घराणीं, आघवीं एकवटती जयाचिया प्रयाणीं।
तो स्वरूपसिद्धीची काहाणी, कैसेनि आइके ॥ २३४॥
ऐसा जयाचा देह पडे, तया योगी म्हणोनि चंद्रवरी जाणें घडे।
मग तेथूनि मागुता बहुडे, संसारा ये ॥ २३५ ॥
आम्हीं अकाळ जो पांडवा, म्हणितला तो हा जाणावा।
आणि हाचि धूम्रमार्ग गांवा, पुनरावृत्तीचिया ॥ २३६॥
येर तो अर्चिरादि मार्गु, तो वसता आणि असलगु।
साविया स्वस्थु चांगु, निवृतीवरी ॥ २३७॥
शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते।
एकया यात्यनावृत्तिमन्यया वर्तते पुनः ॥ २६॥
ऐशिया अनादि या दोन्ही वाटा, एकी उजू एकी अव्हांटा।
म्हणवूनि बुद्धिपूर्वक सुभटा, दाविलिया तुज ॥ २३८॥
कां जे मार्गामार्ग देखावे, साच लटिकें वोळखावें।
हिताहित जाणावें, हिताचिलागीं ॥ २३९।।
पाहे पां नाव देखतां बरवी, कोणी आड घाली काय अथावीं।
कां सुपंथ जाणोनियां अडवीं, रिगवत असे।। २४०॥
जो विष अमृत वोळखे, तो अमृत काय सांडू शके।
तेविं जो उजू वाट देखे, तो अव्हांटा न वचे ॥ २४१॥
म्हणोनि फुडें, पारखावें खरें कुडें।
पारखिलें तरे न पडे, अवसरें कहीं ॥ २४२॥
एऱ्हवीं देहांतीं थोर विषम, या मार्गाचें आहे संभ्रम।
जन्में अभ्यासिलियाचें हन काम, जाईल वायां ॥ २४३॥
जरी अर्चिरादि मार्गु चुकलियां, अवचटें धूम्रपंथें पडिलियां।
तरी संसारपांतीं जुंतलियां, भंवतचि असावें ॥ २४४॥
हे सायास देखोनि मोठे, आतां कैसेनि पां एकवेळ फिटे।
म्हणोनि योगमार्गु गोमटे, शोधिले दोन्ही ॥ २४५॥
तंव एकें बह्मत्वा जाइजे, आणि एकें पुनरावृत्ते येइजे।
परि दैवगत्या जो लाहिजे, देहांतीं जेणें ॥ २४६॥
नैते सृती पार्थ जानन् योगी मुह्याति कश्चने।
तस्मात्सर्वेषु कालेषु योगसुक्तो भवार्जुन ॥ २७॥
ते वेळी म्हणितलें हें नव्हे, वायां अवचटें काय पावे।
देह त्यजुनि वस्तु होआवें, मार्गेचि कीं ॥ २४७॥
तरी आतां देह असो अथवा जावो, आम्ही तों केवळ वस्तूचि आहों।
कां जे दोरीं सर्पत्व वावो, दोराचिकडुनी ॥ २४८॥
मज तरंगपण असे कीं नसे, ऐसें हें उदकासी कहीं प्रतिभासे।
तें भलतेव्हां जैसें तैसें, उदकचि कीं ॥ २४९॥
तरंगाकारें न जन्मेचि, ना तरंगलोपें न निमेचि।
ते विदेही जे देहेंचि, वस्तु जाहले ॥ २५०॥
आतां शरीराचें तयाचिया ठाईं, आडनांवही उरलें नाहीं।
तरि कोणें काळें काई, निमे तें पाहें पां ॥ २५१॥
मग मार्गातें कासया शोधावें, कोणें कोठूनि कें जावें।
जरी देशकालादि आघवें, आपणचि असे ॥ २५२॥
आणि हां गा घटु जे वेळीं फुटे, ते वेळीं तेथींचें आकाश लागे नीटे वाटे।
वाटा लागे तरि गगना भेटे, एऱ्हवीं काय चुके ॥ २५३॥
पाहें पां ऐसें हन आहे, कीं तो आकारूचि जाये।
येर गगन तें गगनींचि आहे, घटत्वाहि आधीं ॥ २५४॥
ऐसिया बोधाचेनि सुरवाडें, मार्गामार्गाचें सांकडें।
तया सोऽहंसिद्धा न पडे, योगियांसी ॥ २५५॥
याकारणें पांडुसुता, तुवां होआवे योगयुक्ता।
येतुलेनि सर्वकाळीं साम्यता, आपणपां होईल ॥ २५६॥
मग भलतेथ भलतेंव्हा, देहबंध असो अथवा जावा।
परि अबंधा नित्य ब्रह्मभावा, विघड नाहीं ॥ २५७॥
तो कल्पादि जन्मा नागवे, कल्पांतीं मरणें नाप्लवे।
माजीं स्वर्गसंसाराचेनि लाघवें, झकवेना ॥ २५८॥
येणें बोधें जो योगी होये, तयासीचि या बोधाचें नीटपण आहे।
कां जे भोगातें पेलूनि पाहें, निजरूपा ये ॥ २५९॥
पैं गा इंद्रादिकां देवां, जयां सर्वस्वें गाजती राणिवा।
तें सांडणें मानूनि पांडवा, डावली जो ॥ २६०॥
वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम्।
अत्येति तत्सर्वमिदं विदेत्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥ २८॥
जरी वेदाध्ययनाचे जालें, अथवा यज्ञाचें शेतचि पिकलें।
कीं तपोदनांचें जोडलें, सर्वस्व हन जें ॥ २६१॥
तया आघवां पुण्याचा मळा, भार आंतौनि जया ये फळा।
तें परब्रह्मा निर्मळा, सांटी न सरे ॥ २६२॥
जें नित्यानंदाचेनि मानें, उपमेचा कांटाळां न दिसे सानें।
पाहा पां वेदयज्ञादि साधनें, जया सुखा ॥ २६३॥
जें विटे ना सरे, भोगितयाचेनि पवाडें पुरे।
पुढती महासुखाचें सोयरें, भावंडचि ॥ २६४॥
ऐसें दृष्टीचेनि सुखपणें, जयासी अदृष्टाचें बैसणें।
जें शतमखाही आंगवणें, नोहेचि एका ॥ २६५॥
तयातें योगीश्वर अलौकिकें, दिठीचेनि हाततुकें।
अनुमानती कौतुकें, तंव हळुवार आवडे ॥ २६६॥
मग तया सुखाची किरीटी, करुनियां गा पाउटी।
परब्रह्मचिये पाटीं, आरूढती ॥ २६७॥
ऐसें चराचरैकभाग्य, जें ब्रह्मेशां आराधनेयोग्य।
योगियांचे भोग्य-, भोगधन जें ॥ २६८॥
जो सकळ कळांची कळा, जो परमानंदाचा पुतळा।
तो जिवाचा जिव्हाळा, विश्वाचिया ॥ २६९॥
जो सवर्ज्ञतेचा वोलावा, जो यादवकुळींचा कुळदिवा।
तो श्रीकृष्णजी पांडवा-, प्रति बोलिला ॥ २७०॥
ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतु, संजयो रायासी असे सांगतु।
तेचि परियेसा पुढां मातु, ज्ञानदेव म्हणे ॥ २७१॥
ज्ञानेश्वरी / अध्याय नववा : संत ज्ञानेश्वर
तरि अवधान एकवेळें दीजे, मग सर्व सुखासि पात्र होईजे।हें प्रतिज्ञोत्तर माझें, उघड ऐका ॥ १ ॥
परि प्रौढी न बोलें हो जी, तुम्हां सर्वज्ञांचां समाजीं।
देयावें अवधान हे माझी, विनवणी सलगीची ॥ २ ॥
कां जे लळेयांचे लळें सरती, मनोरथाचे मनौरे पुरती।
जरी माहेरें श्रीमंतें होती, तुम्हा ऐसी ॥ ३ ॥
तुमचेया दिठिवेचिया वोले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे।
ते साऊली देखोनि लोळें, श्रांतु जी मी ॥ ४ ॥
प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो, म्हणोनि आम्ही आपुलिया स्वेच्छा वोलावों लाहों।
येथ जरी सलगी करू बिहों, तरी निवो कें पां ॥ ५ ॥
नातरी बालक बोबडां बोलीं, कां वाकुडां विचुकां पाऊलीं।
तें चोज करूनि माऊली, रिझे जेवीं ॥ ६ ॥
तेवी तुम्हा संतांचा पढियावो, कैसेनि तरि आम्हांवरी हो।
या बहुवा आळुकिया जी आहों, सलगी करीत ॥ ७ ॥
वांचूनि माझिये बोलतीये योग्यते, सर्वज्ञ भवादृश श्रोते।
काय धड्यावरी सारस्वतें, पढों सिकिजे ॥ ८ ॥
अवधारां आवडे तेसणां धुंधुरु, परि महातेजीं न मिरवे काय करूं।
अमृताच्या ताटी वोगरूं, ऐसी रससोय कैंची ॥ ९ ॥
अहो हिमकरासी विंजणे, की नादापुढे आइकवणे।
लेणियासी लेणें, हें कहीं आथी ॥ १० ॥
सांगा परिमळें काय तुरंबावें, सागरें कवणे ठायीं नाहावें।
हें गगनचि आडें आघवें, ऐसा पवाडु कैंचा ॥ ११ ॥
तैसें तुमचें अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हें होये।
ऐसें वक्तृत्व कवणा आहे, जेणे रिझा तुम्ही ॥ १२ ॥
तरि विश्वप्रगटतिया गभस्ती, हातिवेनि न कीजे आरती।
कां चुळोदकें अपांपती, अर्घ्यु नेदिजे ॥ १३ ॥
प्रभु तुम्ही महेशाचिया मूर्ती, आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती।
म्हणोनि बेल जऱ्ही गंगावती, तऱ्ही स्वीकाराल की ॥ १४ ॥
बाळक बापाचिये ताटीं रिगे, रिगौनि बापातेंच जेवऊं लागे।
की तो संतोषलेनि वेगें, मुखचि वोडवी ॥ १५ ॥
तैसा मी तुम्हांप्रती, चावटी करितसे बाळमती।
तरी तुम्हीं संतोषिजे ऐसी जाती, प्रेमाची या ॥ १६ ॥
आणि तेणे आपुलेपणाचेनि मोहें, तुम्ही संत घेतले असा बहुवे।
म्हणोनि केलिये सलगीचा नोहे, आभारु तुम्हां ॥ १७ ॥
अहो तान्हेयाची लागता झटे, तरी अधिकचि पान्हा फुटे।
रोषें प्रेम दुणवटे, पढियंतयाचेनि ॥ १८ ॥
म्हणऊनि मज लेंकुरवाचेनि बोलें, तुमचें कृपाळूपण निदैले।
ते चेइलें हें जी जाणवलें, यालागीं बोलिलों मी ॥ १९ ॥
एऱ्हवीं चांदणे पिकविजत आहे चेपणी, कीं वारया धापत आहे वाहणी।
हां हो गगनासी गंवसणी, घालिजे केवी ॥ २० ॥
आइकां पाणी वोथिजावे न लगे, नवनीतीं माथुला न रिगे।
तेविं लाजिलें व्याख्यान न निगे, देखोनि जयांते ॥ २१ ॥
हें असो शब्दब्रह्म जिये बाजे, शब्द मावळलेया निवांतु निजे।
तो गीतार्थु मऱ्हाटिया बोलिजे, हा पाडु काई ॥ २२ ॥
परि ऐसियाही मज धिंवसा, तो पुढतियाचि येकी आशा।
जे धिटींवा करूनि भवादृश्यां, पढियंता होआवें ॥ २३ ॥
परि आतां चंद्रापासोनि निवविते, जें अमृताहूनि जीववितें।
तेणें अवधान कीजो वाढतें, मनोरथा माझिया ॥ २४ ॥
कां जैं दिठिवा तुमचा वरुषे, तैं सकळार्थसिद्धि मती पिके।
एऱ्हवी कोंभेला उन्मेषु सुके, जरी उदास तुम्ही ॥ २५ ॥
सहजें तरी अवधारा, वक्तृत्वा अवधानाचा होय चारा।
तरी दोंदें पेलती अक्षरां, प्रमेयाचीं ॥ २६ ॥
अर्थ बोलाची वाट पाहे, तेथ अभिप्रावो अभिप्रायातें विये।
भावाचा फुलौरा होत जाये, मतिवरी ॥ २७ ॥
म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे, तरी हृदयाकाश सारस्वतें वोळे।
आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे, मांडला रसु ॥ २८ ॥
अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये, परि ते हातवटी चंद्री कीं आहे।
म्हणऊनि वक्ता तो वक्ताचि नव्हे, श्रोतेनि वीण ॥ २९ ॥
परी आतां आमुतें गोड करावें, ऐसे तांदुळी कायसा विनवावे।
साइखडियाने काइ प्रार्थावें, सूत्रधारातें ॥ ३० ॥
काय तो बाहुलियांचिया काजा नाचवी, कीं आपुलियें जाणिवेची कळा वाढवी।
म्हणऊनि आम्हां या ठेवाठेवी, काय काज ॥ ३१ ॥
तंव गुरु म्हणती काइ जाहलें, हें समस्तही आम्हां पावलें।
आतां सांगे जें निरोपिलें, नारायणें ॥ ३२ ॥
येथ संतोषोनि निवृत्तिदासें, जी जी म्हणऊनि उल्हासें।
अवधारां श्रीकृष्ण ऐसे, बोलते जाहले ॥ ३३ ॥
श्री भगवानुवाचः इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्षसेऽशुभात् ॥ १ ॥
नातरि अर्जुना हें बीज, पुढती सांगिजेल तुज।
जें हें अंतःकरणींचे गुज, जीवचिये ॥ ३४ ॥
येणें मानें जीवाचें हियें फोडावें, मग तुज कां पां मज सांगावे।
ऐसें काहीं स्वभावें, कल्पिशी जरी ॥ ३५ ॥
तरी परियेसीं प्राज्ञा, तूं आस्थेचीच संज्ञा।
बोलिलिये गोष्टींची अवज्ञा, नेणसी करुं ॥ ३६ ॥
म्हणोनि गूढपण आपुलें मोडो, वरि न बोलावेंही बोलावें घडो।
परि आमुचिचे जीवींचें पडो, तुझां जीवीं ॥ ३७ ॥
अगा थानीं कीर दूध गूढ, परि थानासीचि नव्हे कीं गोड।
म्हणोनि सरो कां सेवितयाची चाड, जरी अनन्य मिळे ॥ ३८ ॥
मुडाहूनि बीज काढिलें, मग निर्वाळलिये भूमी पेरिलें।
तरी तें सांडीविखुरीं गेलें, म्हणों ये कायी ॥ ३९ ॥
यालागीं सुमनु आणि शुद्धमती, जो अनिंदकु अनन्यगती।
पैं गा गौप्यही परि तयाप्रती, चावळिजें सुखें ॥ ४० ॥
तरि प्रस्तुत आतां गुणीं इहीं, तूं वांचूनि आणिक नाहीं।
म्हणोनि गुज तरी तुझां ठायीं, लपवूं नये ॥ ४१ ॥
आतां किती नावानावा गुज, म्हणतां कानडें वाटेल तुज।
तरि ज्ञान सांगेन सहज, विज्ञानेंसीं ॥ ४२ ॥
परि तेंचि ऐसेनि निवाडें, जैसें भेसळलें खरें कुडें।
मग काढिजे फाडोवाडें, पारखूनियां ॥ ४३ ॥
कां चांचूचेनि सांडसें, खांडिजे पय पाणी राजहंसें।
तुज ज्ञान विज्ञान तैसें, वांटूनि देऊं ॥ ४४ ॥
मग वारयाचियां धारसां, पडिला कोंडा कां नुरेचि जैसा।
आणि अन्नकणाचा आपैसा, राशि जोडे ॥ ४५ ॥
तैसें जें जाणितलेयासाठीं, संसार संसाराचिये गांठी।
लाऊनि बैसवी पाटीं, मोक्षश्रियेचां ॥ ४६ ॥
राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम्।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥ २ ॥
जें जाणणेयां आघवेयांचां गांवीं , गुरुत्वाची आचार्यपदवी।
जें सकळ गुह्यांचा गोसावी, पवित्रां रावो ॥ ४७ ॥
आणि धर्माचें निजधाम, तेंविंचि उत्तमाचे उत्तम।
पैं जया येतां नाहीं काम, जन्मांतराचें ॥ ४८ ॥
मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे, आणि हृदयीं स्वयंभचि असे।
प्रत्यक्ष फावो लागे तैसें, आपैसया ॥ ४९ ॥
तेविंचि पैं गा सुखाचां पाउटीं, चढतां येइजे जयाचिया भेटी।
मग भेटल्या कीर मिठी, भोगणेयाहि पडे ॥ ५० ॥
परि भोगाचिया ऐलीकडिलिये मेरे, चित्त उभें ठेलेंचि सुखा भरे।
ऐसें सुलभ आणि सोपारें, वरि परब्रह्म ॥ ५१ ॥
पैं गा आणिकही एक याचें, जें हाता आले तरी न वचे।
आणि अनुभवितां कांहीं न वेचे, वरि विटेहि ना ॥ ५२ ॥
येथ जरी तूं तार्किका, ऐसी हन घेसी शंका।
ना येवढी वस्तु हे लोकां, उरली केविं पां ॥ ५३ ॥
एकोत्तरेयाचिया वाढी, जे जळतिये आगीं घालिती उडी।
ते अनायासें स्वगोडी, सांडिती केविं ॥ ५४ ॥
तरि पवित्र आणि रम्य, तेविंचि सुखोपायेंचि गम्य।
आणि स्वसुख परि धर्म्य, वरि आपणपां जोडे ॥ ५५ ॥
ऐसा अवघाचि सुरवाडु आहे, तरी जनाहातीं केविं उरो लाहे।
हा शंकेचा ठाव कीर होये, परि न धरावी तुवां ॥ ५६ ॥
अश्रद्दधाना: पुरुषा धर्मस्यास्य परंतप।
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥ ३ ॥
पाहें पां दूध पवित्र आणि गोड, पासीं त्वचेचिया पदराआड।
परि तें अव्हेरुनि गोचिड, अशुद्ध काय नेघती ॥ ५७ ॥
कां कमलकंदा आणि दर्दुरीं, नांदणुक एकेचि घरीं।
परि परागु सेविजे भ्रमरीं, जवळिलां चिखलुचि उरे ॥ ५८ ॥
नातरी निदैवाचां परिवरीं, लोह्या रुतलिया आहाति सहस्त्रवरीं।
परि तेथ बैसोनि उपवासु करी, कां दरिद्रें जिये ॥ ५९ ॥
तैसा हृदयामध्यें मी रामु, असतां सर्वसुखाचा आरामु।
कीं भ्रांतासी कामु, विषयावरी ॥ ६० ॥
बहु मृगजळ देखोनि डोळां, थुंकिजे अमृताचा गिळितां गळाळा।
तोडिला परिसु बांधिला गळा, शुक्तिकालाभें ॥ ६१ ॥
तैसीं अहंममतेचिये लवडसवडी, मातें न पवतीचि बापुडीं।
म्हणोनि जन्ममरणाची दुथडी, डहुळितें ठेलीं ॥ ६२ ॥
एऱ्हवीं मी तरी कैसा, मुखाप्रती भानु कां जैसा।
कहीं नसे न दिसे ऐसा, वाणीचा नव्हें ॥ ६३ ॥
मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थित: ॥ ४ ॥
माझेया विस्तारलेपणाचेनि नांवें, हे जगचि नोहे आघवें।
जैसें दूध मुरालें स्वभावें , तरि तेंचि दहीं ॥ ६४ ॥
कां बीजचि जाहलें तरु, अथवा भांगारचि अळंकारु।
तैसा मज एकाचा विस्तारु, तें हें जग ॥ ६५ ॥
हें अव्यक्तपणें थिजलें, तेंचि मग विश्वाकारें वोथिजलें।
तैसें अमूर्तमूर्ति मियां विस्तारलें, त्रैलोक्य जाणें ॥ ६६ ॥
महदादि देहांतें, इयें अशेषेंही भूतें।
परि माझां ठायीं बिंबते, जैसे जळीं फेण ॥ ६७ ॥
परि तया फेणांआंतु पाहतां, जेवीं जळ न दिसे पंडुसुता।
नातरी स्वप्नींची अनेकता, चेइलिया नोहिजे ॥ ६८ ॥
तैसीं भूतें इयें माझां ठायीं, बिंबती तयांमाजी मी नाहीं।
इया उपपत्ती तुज पाहीं, सांगितलिया मागां ॥ ६९ ॥
म्हणऊनि बोलिलिया बोलाचा आतिसो, न कीजे यालागीं हें असो, तरी मजाआंत पैसो, दिठि तुझी ॥ ७० ॥
आमचा प्रकृतीपैलीकडील भावो, जरी कल्पनेवीण लागसी पाहों।
तरी मजमाजि भूतें हेंही वावो, जे मी सर्व म्हणऊनि ॥ ७१ ॥
एऱ्हवीं संकल्पाचिये सांजवेळे, नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे, म्हणोनि अखंडित परि झांवळें, भूतभिन्न ऐसें देखें ॥ ७२ ॥
तेचि संकल्पाची सांज जैं लोपे, तैं अखंडितचि आहे स्वरुपें।
जैसें शंका जातखेंवो लोपे, सापपण माळेचें ॥ ७३ ॥
एऱ्हवीं तरी भूमीआंतूनि स्वयंभ, काय घडेगाडगेयांचे निघती कोंभ, परि ते कुलालमतीचे गर्भ, उमटले कीं ॥ ७४ ॥
नातरी सागरींचां पाणीं, काय तंरगाचिया आहाती खाणी।
ते अवांतर करणी, वारयाची नव्हे ॥ ७५ ॥
पाहें पां कापसाचां पोटीं, काय कापडाची होती पेटी।
तो वेढितयाचिया दिठी, कापड जाहला ॥ ७६ ॥
जरी सोनें लेणें होऊनि घडे, तरी तयाचें सोनेपण न मोडे।
येर अळंकार हे वरचिलीकडे, लेतयाचेनि भावें ॥ ७७ ॥
सांगें पडिसादाची प्रत्युत्तरें, कां आरिसां जें आविष्करे।
तें आपलें कीं साचोकारें, तेथेंचि होतें ॥ ७८ ॥
तैसी इये निर्मळे माझां स्वरुपीं, जो भूतभावना आरोपी।
तयासी तयाचां संकल्पीं, भूताभासु असे ॥ ७९ ॥
तेचि कल्पिती प्रकृती पुरे, आणि भूताभासु आधींच सरे।
मग स्वरुप उरे एकसरें, निखळ माझें ॥ ८० ॥
हें असो आंगीं भरलिया भवंडी, जैशा भोंवत दिसती अरडीदरडी, तैशी आपुलिया कल्पना अखंडीं, गमती भूतें ॥ ८१ ॥
तेचि कल्पना सांडूनि पाहीं, तरि मी भूतीं भूतें माझिया ठायीं।
हें स्वप्नींही परि नाहीं, कल्पावयाजोगें ॥ ८२ ॥
आतां मी एक भूतातें धर्ता, अथवा भूतामाजि मी असता।
या संकल्पसन्निपाता, आंतुलिया बोलिया ॥ ८३ ॥
म्हणोनि परियेसीं गा प्रियोत्तमा, यापरी मी विश्वेंसीं विश्वात्मा।
जो इया लटकिया भूतग्रामा, भाव्यु सदा ॥ ८४ ॥
रश्मीचेनि आधारें जैसें, नव्हतेंचि मृगजळ आभासे।
माझां ठायीं भूतजात तैसें, आणि मातेंही भावीं ॥ ८५ ॥
मी ये परीचा भूतभावनु , परि सर्व भूतांसि अभिन्नु।
जैसी प्रभा आणि भानु, एकचि ते ॥ ८६ ॥
हा आमचा ऐश्वर्ययोगु, तुंवा देखिला कीं चांगु।
आतां सांगें कांहीं एथ लागु, भूतभेदाचा असे ॥ ८७ ॥
यालागीं मजपासूनि भूतें , आनें नव्हती हें निरुतें।
आणि भूतावेगळिया मातें, कहींच न मनीं हो, ८८ ॥
यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान्।
तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥ ६ ॥
पैं गगन जेवढें जैसें, पवनु गगनीं तेवढाचि असे।
सहजें हालविलिया वेगळा दिसे, एऱ्हवीं गगन तेंचि ते ॥ ८९ ॥
तैसें भूतजात माझां ठायीं, कल्पिजे तरी आभासें कांहीं।
निर्विकल्पीं तरि नाहीं, तेथ मीच मी आघवे ॥ ९० ॥
म्हणऊनि नाहीं आणि असे, हें कल्पनेचेनि सौरसें।
जे कल्पनालोपें भ्रंशें, आणि कल्पनेसवें होय।। ९१ ॥
तेंचि कल्पितें मुदल जाये, तैं असें नाहीं हें कें आहे।
म्हणऊनि पुढती तूं पाहें, हा ऐश्वर्ययोगु ॥ ९२ ॥
ऐसिया प्रतीतिबोधसागरीं, तूं आपणपेयातें कल्लोळु एक करीं।
मग जंव पाहासी चराचरीं, तंव तूचि आहासी ॥ ९३ ॥
या जाणणेयाचा चेवो, तुज आला ना म्हणती देवो।
तरी आतां द्वैतस्वप्न वावो, जालें कीं ना ॥ ९४ ॥
तरी पुढती जरी विपायें, बुद्धीसि कल्पनेची झोंप ये।
तरी अभेदबोधु जाये, जैं स्वप्नीं पडिजे ॥ ९५ ॥
म्हणोनि ये निद्रेची वाट मोडे, निखळ उद्बोधाचेंचि आपणपें घडे।
ऐसें वर्म जें आहे फुडें, तें दावो आतां ॥ ९६ ॥
तरी धनुर्धरा धैर्या, निकें अवधान देईं बा धनंजया।
पैं सर्व भूतांतें माया, करि हरि गा ॥ ९७ ॥
सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्।
कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥ ७ ॥
जिये नांव गा प्रकृती, जे द्विविध सांगितली तुजप्रती।
एकी अष्टधा भेदव्यक्ती, दुजी जीवरुपा।। ९८ ॥
हा प्रकृतीविखो आघवा, तुंवा मागां परिसिलासे पांडवा।
म्हणोनि असो काइ सांगावा, पुढतपुढती ॥ ९९ ॥
तरी ये माझिये प्रकृती, महाकल्पाचां अंती।
सर्व भूतें अव्यक्तीं, ऐक्यासी येती।। १०० ॥
ग्रीष्माचां अतिरसीं, सबीजे तृणें जैसीं।
मागुती भूमीसी, सुलीनें होती ॥ १०१ ॥
कां वार्षिये ढेंढें फिटे, जेव्हां शारदीयेचा अनुघडु फुटे।
तेव्हां घनजात आटे, गगनींचें गगनीं ॥ १०२ ॥
नातरी आकाशाचिये खोंपे, वायु निवांतुचि लोपे।
कां तरंगता हारपे, जळीं जेवीं ॥ १०३ ॥
अथवा जागिनलिये वेळे, स्वप्न मनींचें मनीं मावळे।
तैसें प्राकृत प्रकृती मिळे, कल्पक्षयीं ॥ १०४ ॥
मग कल्पादीं पुढती, मीचि सृजीं ऐसी वदंती।
तरी इयेविषयीं निरुती, उपपत्ती आइक ॥ १०५ ॥
प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः।
भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् ॥ ८ ॥
तरी हेचि प्रकृति किरिटी, मी स्वकीया सहजें अधिष्ठीं।
तेथ तंतुसमवायपटीं, जेविं विणावणी दिसे ॥ १०६ ॥
मग तिये विणावणीचेनि आधारें, लहानां चौकडियां पटत्व भरे।
तैसी पंचात्मके आकारें, प्रकृतिचि होये ॥ १०७ ॥
जैसें विरजणियाचेनि संगें, दूधचि आटेजों लागे।
तैशी प्रकृति आंगा रिगे, सृष्टिपणाचिया ॥ १०८ ॥
बीज जळाचि जवळीक लाहे, आणि तेंचि शाखोपशाखीं होये।
तैसें मज करणें आहे, भूतांचे हें ॥ १०९ ॥
अगा नगर हें रायें केलें, या म्हणणया साचपण कीर आलें।
परि निरुतें पाहतां काय शिणले, रायाचे हात ॥ ११० ॥
आणि मी प्रकृति अधिष्ठीं तें कैसें, जैसा स्वप्नीं जो असे।
मग तोचि प्रवेशे, जागृतावस्थे ॥ १११ ॥
तरि स्वप्नौनि जागृती येतां, काय पाय दुखती पंडुसुता ।
कीं स्वप्नामाजीं असतां, प्रवासु होय ॥ ११२ ॥
या आघवियाचा अभिप्रावो कायी, जे हें भूतसृष्टीचें कांहीं।
मज एकही करणें नाहीं, ऐसाचि अर्थु ॥ ११३ ॥
जैशी रायें अधिष्ठिली प्रजा, व्यापारे आपुलालिया काजा।
तैसा प्रकृतिसंगु माझा, येर करणें तें इयेचें ॥ ११४ ॥
पाहें पां पूर्णचंद्राचिये भेटी, समुद्र भरतें अपार दाटी।
तेथ चंद्रासि काय किरीटी, उपखा पडे ॥ ११५ ॥
जड परि जवळिका, लोह चळे तरि चळो कां।
कवणु शीणु भ्रामका, सन्निधानाचा ॥ ११६ ॥
किंबहुना यापरी, मी निजप्रकृति अंगीकारीं।
आणि भूतसृष्टी एकसरी, प्रसवोंचि लागे ॥ ११७ ॥
जो हा भूतग्रामु आघवा, असे प्रकृतिआधीन पांडवा।
जैसी बीजाचिया वेलपालवा, समर्थ भूमि ॥ ११८ ॥
नातरि बाळादिकां वयसां, गोसावी देहसंगु जैसा।
अथवा घनावळी आकाशा, वार्षियें जेवीं ॥ ११९ ॥
कां स्वप्नासि कारण निद्रा, तैसी प्रकृति हे नरेंद्रा।
या अशेषाहि भूतसमुद्रा, गोसाविणी गा ॥ १२० ॥
स्थावरा आणि जंगमा, स्थूळा अथवा सूक्ष्मा।
हे असो भूतग्रामा, प्रकृतिचि मूळ ॥ १२१ ॥
म्हणोनि भूतें हन सृजावीं, कां सृजिलीं प्रतिपाळावीं।
इयें करणीं न येती आघवीं, आमुचिया आंगा ॥ १२२ ॥
जळीं चंद्रिकेचिया पसरती वेली, ते वाढी चंद्रे नाहीं वाढविली।
तेवि मातें पावोनि ठेलीं, दुरी कर्में ॥ १२३ ॥
न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय।
उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥ ९ ॥
आणि सुटलिया सिंधुजळाचा लोटु, न शके धरुं सैंधवाचा घाटु।
तेवि सकळ कर्मा मीच शेवटु, ती काइ बांधती मातें ॥ १२४ ॥
धूम्ररजांची पिंजरी, वाजतिया वायुतें जरी होकारी।
कां सूर्यबिंबामाझारीं, आंधारे रिगे ॥ १२५ ॥
हें असो पर्वताचिये हृदयींचें, जेविं पर्जन्यधारास्तव न खोंचे।
तेविं कर्मजात प्रकृतीचें, न लगे मज ॥ १२६ ॥
एऱ्हवीं इये प्राकृतीं विकारीं, एकु मीचि आहे अवधारीं।
परि उदासीनाचिया परि, करीं ना करवी ॥ १२७ ॥
दीपु ठेविला परिवरीं, कवणातें नियमी ना निवारी।
आणि कवण कवणिये व्यापारीं, राहाटे तेंहि नेणे ॥ १२८ ॥
तो जैसा का साक्षिभूतु, गृहव्यापारप्रवृत्तिहेतु।
तैसा भूतकर्मीं अनासक्तु, मी भूतीं असें ॥ १२९ ॥
हा एकचि अभिप्रावो पुढतपुढती, काय सांगो बहुतां उपपत्तीं, येथ एकवेळां सुभद्रापती, येतुलें जाण पां ॥ १३० ॥
मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम्।
हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥ १० ॥
जे लोकचेष्टां समस्तां, जैसा निमित्तमात्र कां सविता।
तैसा जगत्प्रभवीं पंडुसुता, हेतु मी जाणें ॥ १३१ ॥
कां जें मियां अधिष्ठिलिया प्रकृती, होती चराचराचिया संभूती, म्हणोनि मी हेतु हें उपपत्ती, घडे यया ॥ १३२ ॥
आतां येणें उजिवडें निरुतें, न्याहाळीं पां ऐश्वर्ययोगातें।
जे माझां ठायीं भूतें, परी भूतीं मी नसें ॥ १३३ ॥
अथवा भूतें ना माझां ठायीं, आणि भूतांमाजि मी नाहीं।
या खुणा तुं कही, चुकों नको ॥ १३४ ॥
हें सर्वस्व आमुचें गूढ, परि दाविलें तुज उघड।
आतां इंद्रियां देऊनि कवाड, हृदयीं भोगीं ॥ १३५ ॥
हा दंशु जंव नये हातां, तंव माझें साचोकारेपण पार्था।
न संपडे गा सर्वथा , जेविं भुसीं कणु ॥ १३६ ॥
एऱ्हवीं अनुमानाचेनि पैसें, आवडे कीर कळलें ऐसें।
परि मृगजळाचेनि वोलांशें, काय भूमि तिमे ॥ १३७ ॥
जें जाळ जळीं पांगिलें, तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडलें।
परि थडिये काढूनि झाडिलें, तेव्हां बिंब कें सांगे ॥ १३८ ॥
तैसें बोलवरि वाचाबळें, वायांचि झकविजती प्रतीतीचे डोळे।
मग साचोकारें बोधावेळे, आथि ना होईजे ॥ १३९ ॥
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्।
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ ११ ॥
किंबहुना भवा बिहा या, आणि साचें चाड आथि जरी मियां।
तरि तुम्हीं गा उपपत्ती इया, जतन कीजे ॥ १४० ॥
एऱ्हवीं वेधली दिठी कवळें, ते चांदणियाते म्हणे पिंवळें।
तेविं माझां स्वरुपीं निर्मळे, देखाल दोष ॥ १४१ ॥
नातरी ज्वरें विटाळले मुख, ते दुधातें म्हणे कडू विख।
तेविं अमानुषा मानुष, मानाल मातें ॥ १४२ ॥
म्हणऊनि पुढती तूं धनंजया, झणें विसंबसी या अभिप्राया।
जे इया स्थूलदृष्टी वायां, जाइजेल गा ॥ १४३ ॥
पैं स्थूलदृष्टी देखती मातें, तेंचि न देखणें जाण निरुतें।
जैसें स्वप्नींचेनि अमृतें, अमरा नोहिजे ॥ १४४ ॥
एऱ्हवीं स्थूलदृष्टी मूढ, मातें जाणती कीर दृढ।
परि तें जाणणेंचि जाणणेया आड, रिगोनि ठाके ॥ १४५ ॥
जैसा नक्षत्राचिया आभासा-, साठीं घातु झाला तया हंसा।
माजीं रत्नबुद्धीचिया आशा, रिगोनियां ॥ १४६ ॥
सांगे गंगा या बुद्धी मृगजळ, ठाकोनि आलियाचें कवण फळ ।
काय सुरतरु म्हणोनि बाबुळ , सेविली करी ॥ १४७ ॥
हा निळयाचा दुसरा , या बुद्धी हातु घातला विखारा।
कां रत्ने म्हणोनि गारा, वेंची जेविं ॥ १४८ ॥
अथवा निधान हें प्रगटलें, म्हणोनि खदिरांगार खोळे भरिले।
कां साउली नेणतां घातलें, कुहां सिंहें ॥ १४९ ॥
तेविं मी म्हणोनि प्रपंचीं, जिहीं बुडी दिधली कृतनिश्चयाची।
तिहीं चंद्रासाठीं जेविं जळींची, प्रतिमा धरिली ॥ १५० ॥
तैसा कृतनिश्चय वायां गेला, जैसा कोण्ही एकु कांजी प्याला।
मग परिणाम पाहों लागला, अमृताचा ॥ १५१ ॥
तैसें स्थूलाकारीं नाशिवंते, भरंवसा बांधोनि चित्तें।
पाहती मज अविनाशातें, तरी कैंचा दिसें ॥ १५२ ॥
काइ पश्चिमसमुद्राचिया तटा, निघिजत आहे पूर्विलिया वाटा।
कां कोंडा कांडतां सुभटा, कणु आतुडे ॥ १५३ ॥
तैसें विकारलें हें स्थूळ, जाणितलेया मी जाणवतसें केवळ।
काइ फेण पितां जळ, सेविलें होय ॥ १५४ ॥
म्हणोनि मोहिलेनि मनोधर्में, हेंचि मी मानूनि संभ्रमें।
मग येथिंचीं जियें जन्मकर्में, तियें मजचि म्हणती ॥ १५५ ॥
येतुलेनि अनामा नाम, मज अक्रियासि कर्म।
विदेहासि देहधर्म, आरोपिती ॥ १५६ ॥
मज आकारशून्या आकारु, निरुपाधिका उपचारु।
मज विधिविवर्जिता व्यवहारु, आचारादिक ॥ १५७ ॥
मज वर्णहीना वर्णु, गुणातीतासि गुणु।
मज अचरणा चरणु, अपाणिया पाणी ॥ १५८ ॥
मज अमेया मान, सर्वगतासी स्थान।
जैसें सेजेमाजी वन, निदेला देखे ॥ १५९ ॥
तैसें अश्रवणा श्रोत्र, मज अचक्षूसी नेत्र।
अगोत्रा गोत्र, अरुपा रुप ॥ १६० ॥
मज अव्यक्तासि व्यक्ती, अनार्तासी आर्ती।
स्वयंतृप्ता तृप्ती, भाविती गा ॥ १६१ ॥
मज अनावरणा प्रावरण, भूषणातीतासि भूषण।
मज सकळकारणा कारण, देखती ते ॥ १६२ ॥
मज सहजातें करिती, स्वंयभातें प्रतिष्ठिती।
निरंतराते आव्हानिती, विसर्जिती गा ॥ १६३ ॥
मी सर्वदा स्वतःसिद्धु, तो कीं बाळ तरुण वृद्धु।
मज एकरुपा संबंधु, जाणती ऐसे ॥ १६४ ॥
मज अद्वैतासि दुजें, मज अकर्तायासि काजें।
मी अभोक्ता कीं भुंजें, ऐसें म्हणती ॥ १६५ ॥
मज अकुळाचें कुळ वानिती, मज नित्याचेनि निधनें शिणती।
मज सर्वांतराते कल्पिती, अरि मित्र गा ॥ १६६ ॥
मी स्वानंदाभिरामु, तया मज अनेकां सुखांचा कामु।
अवघाची मी असे समु, कीं म्हणती एकदेशी ॥ १६७ ॥
मी आत्मा एक चराचरीं, म्हणती एकाचा कैंपक्ष करीं।
आणि कोपोनि एकातें मारीं, हेंचि वाढविती ॥ १६८ ॥
किंबहुना ऐसे समस्त, जे हे मनुष्यधर्म प्राकृत।
तयाचि नांव मी ऐसें विपरीत, ज्ञान तयांचें ॥ १६९ ॥
जंव आकारु एक पुढां देखती, तंव हा देव येणें भावें भजती।
मग तोचि बिघडलिया टाकिती, नाहीं म्हणोनि ॥ १७० ॥
मातें येणें येणें प्रकारें, जाणती मनुष्य ऐसेनि आकारें।
म्हणऊनि ज्ञानचि तें आंधारें, ज्ञानासि करी ॥ १७१ ॥
मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतस:।
राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिता: ॥ १२ ॥
यालागीं जन्मलेचि ते मोघ, जैसें वार्षियेवीण मेघ।
कां मृगजळाचे तरंग, दुरुनीचि पाहावे ॥ १७२ ॥
अथवा कोल्हेरीचे असिवार, नातरीं वोडंबरीचे अळंकार।
कीं गंधर्वनगरीचे आवार, आभासती कां ॥ १७३ ॥
सांवरी वाढिन्नल्या सरळा, वरि फळ ना आंतु पोकळा।
कां स्तन जाले गळां, शेळिये जैसे ॥ १७४ ॥
तैसें मूर्खाचें तयां जियालें, आणि धिक् कर्म तयांचें निपजलें।
जैसें सांवरी फळ आलें, घेपे ना दीजे ॥ १७५ ॥
मग जें कांहीं ते पढिन्नले, तें मर्कटें नारळ तोडिले।
कां आंधळ्या हातीं पडिलें, मोती जैसें ॥ १७६ ॥
किंबहुना तयांचीं शास्त्रें, जैशी कुमारींहाती दिधलीं शस्त्रें।
कां अशौच्या मंत्रें, बीजें कथिलीं ॥ १७७ ॥
तैसें ज्ञानजात तयां, आणि जें कांहीं आचरलें गा धनंजया।
तें आघवेंचि गेलें वायां, जे चित्तहीन ॥ १७८ ॥
पैं तमोगुणाची राक्षसी, जे सद्बुद्धीतें ग्रासी।
विवेकाचा ठावोचि पुसी, निशाचरी ॥ १७९ ॥
तिये प्रकृती वरपडे जाले, म्हणऊनि चिंतेचेनि कपोलें गेले।
वरि तामसीयेचिये पडिले, मुखामाजीं ॥ १८० ॥
जेथ आशेचिये लाळे, आंतु हिंसा जीभ लोळे।
तेवींचि संतोषाचे चाकळे, अखंड चघळी ॥ १८१ ॥
जे अनर्थाचे कानवेरी, आवाळुवें चाटीत निघे बाहेरी।
जे प्रमादपर्वतींचि दरी, सदाचि मातली ॥ १८२ ॥
जेथ द्वेषाचिया दाढा, खसखसां ज्ञानाचा करिती रगडा।
जे अगस्तीगवसणी मूढां, स्थूलबुद्धी ॥ १८३ ॥
ऐसे आसुरिये प्रकृतीचां तोंडीं, जे जाले गा भूतोंडीं।
ते बुडोनि गेले कुंडीं, व्यामोहाचां ॥ १८४ ॥
एवं तमाचिये पडिले गर्ते, न पविजतीचि विचाराचेनि हातें।
हें असो ते गेले जेथें, ते शुद्धीचि नाहीं ॥ १८५ ॥
म्हणोनि असोतु इयें वायाणीं, कायशीं मूर्खाचीं बोलणीं।
वायां वाढवितां वाणी, शिणेल हन ॥ १८६ ॥
ऐसें बोलिले देवें, तेथ जी म्हणितलें पांडवें।
आइकें जेथ वाचा विसवे, ते साधुकथा ॥ १८७ ॥
महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता:।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥ १३ ॥
तरी जयांचिये चोखटे मानसीं, मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी।
जयां निजेलियांतें उपासी, वैराग्य गा ॥ १८८ ॥
जयांचिया आस्थेचिया सद्भावा, आंतु धर्म करि राणिवा।
जयांचें मन ओलावा, विवेकासी ॥ १८९ ॥
जे ज्ञानगंगे नाहाले, पूर्णता जेऊनि धाले।
जे शांतीसि आले, पालव नवे ॥ १९० ॥
जे परिणामा निघाले कोंभ, जे धैर्यमंडपाचे स्तंभ।
जे आंनदसमुद्रीं कुंभ, चुबकळोनि भरिले ॥ १९१ ॥
जयां भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्यातें परौतें सर म्हणती, जयांचिये लीलेमाजीं नीति, जियाली दिसे ॥ १९२ ॥
जे आघवांचि करणीं, लेइले शांतीची लेणीं।
जयांचें चित्त गवसणी, व्यापका मज ॥ १९३ ॥
ऐसे जे महानुभाव, जे दैविये प्रकृतीचें दैव।
जे जाणोनियां सर्व, स्वरुप माझे ॥ १९४ ॥
मग वाढतेनि प्रेमें, मातें भजती जे महात्मे।
परि दुजेपण मनोधर्में, शिवतलें नाही ॥ १९५ ॥
ऐसें मीच होऊनि पांडवा, करिती माझी सेवा।
परि नवलावो तो सांगावा, असे आइक ॥ १९६ ॥
सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता: ॥
नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥ १४ ॥
तरी कीर्तनाचेनि नटनाचें, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे।
जे नामचि नाहीं पापाचें, ऐसें केलें ॥ १९७ ॥
यमदमा अवकळा आणिली, तीर्थें ठायावरुनि उठविली।
यमलोकीं खुंटिली, राहाटी आघवी ॥ १९८ ॥
यमु म्हणे काय यमावें, दमु म्हणे कवणातें दमावें।
तीर्थें म्हणती काय खावें, दोष ओखदासि नाहीं ॥ १९९ ॥
ऐसे माझेनि नामघोषें, नाहीं करिती विश्वाचीं दुःखें।
अवघें जगचि महासुखें, दुमदुमित भरलें ॥ २०० ॥
ते पाहांटेवीण पाहावित, अमृतेंवीण जीववित।
योगेंवीण दावित, कैवल्य डोळां ॥ २०१ ॥
परि राया रंका पाड धरुं, नेणती सानेयां थोरां कडसणी करुं।
एकसरें आंनदाचे आवारु, होत जगा ॥ २०२ ॥
कहीं एकाधेनि वैकुंठा जावें, तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें।
ऐसें नामघोषगौरवें, धवळलें विश्व ॥ २०३ ॥
तेजें सूर्य तैसे सोज्वळ, परि तोहि अस्तवे हें किडाळ।
चंद्र संपूर्ण एखादे वेळ, हे सदा पुरते।। २०४ ॥
मेघ उदार परि वोसरे, म्हणऊनि उपमेसी न पुरे।
हे निःशंकपणें सपांखरे , पंचानन ॥ २०५ ॥
जयांचे वाचेपुढां भोजे, नाम नाचत असे माझें,
जें जन्मसहस्त्रीं वोळगिजे, एकवेळ मुखासि यावया ॥ २०६ ॥
तो मी वैकुंठीं नसें, एक वेळ भानुबिंबींही न दिसें।
वरी योगियांचींही मानसें, उमरडोनि जाय ॥ २०७ ॥
परि तयांपाशीं पांडवा, मी हारपला गिंवसावा।
जेथ नामघोषु बरवा, करिती ते माझे ॥ २०८ ॥
कैसे माझां गुणीं धाले, देशकाळातें विसरले।
कीर्तनसुखें झाले, आपणपांचि।। २०९ ॥
कृष्ण विष्णु हरि गोविंद, या नामाचे निखळ प्रबंध।
माजी आत्मचर्चा विशद, उदंड गाती ॥ २१० ॥
हें बहु असो यापरी, कीर्तित मातें अवधारीं।
एक विचरती चराचरीं, पांडुकुमरा ॥ २११ ॥
मग आणिक ते अर्जुना, साविया बहुवा जतना।
पंचप्राणा मना, पाढाऊ घेउनी ॥ २१२ ॥
बाहेरी यमनियमांची कांटी लाविली, आंतु वज्रासनाची पौळी पन्नासिली।
वरी प्राणायामांची मांडिलीं, वाहातीं यंत्रें ॥ २१३ ॥
तेथ उल्हाटशक्तीचेनि उल्हाटशक्तीचेनि, मनपवनाचेनि सुरवाडें।
सतरावियेचें पाणियांडे, बळियाविलें ॥ २१४ ॥
तेव्हां प्रत्याहारें ख्याति केली, विकारांची संपिली बोहली।
इंद्रियें बांधोनि आणिलीं, हृदयाआंतु ॥ २१५ ॥
तंव धारणावारु दाटिले, महाभूतांतें एकवटिलें।
मग चतुरंग सैन्य निवटिलें, संकल्पाचें ॥ २१६ ॥
तयावरी जैत रे जैत, म्हणोनि ध्यानाचें जैत रे जैत वाजत।
दिसे तन्मयाचें झळकत, एकछत्र ॥ २१७ ॥
पांटी समाधिश्रियेचा अशेखा, आत्मानुभवराज्यसुखा।
पट्टाभिषेकु देखां, समरसें जाहला ॥ २१८ ॥
ऐसें हें गहन, अर्जुना माझें भजन।
आतां ऐकें सांगेन, जे करिती एक ॥ २१९ ॥
तरी दोन्ही पालववेरी, जैसा एक तंतु अंबरीं।
तैसा मीवांचूनि चराचरीं, जाणती ना ॥ २२० ॥
आदि ब्रह्मा करुनी, शेवटीं मशक धरुनी।
माजी समस्त हें जाणोनी, स्वरुप माझें ॥ २२१ ॥
मग वाड धाकुटें न म्हणती, सजीव निर्जीव नेणती।
देखिलिये वस्तू उजू लुंटिती, मीचि म्हणोनि ॥ २२२ ॥
आपुलें उत्तमत्व नाठवे, पुढील योग्यायोग्य नेणवे।
एकसरें व्यक्तिमात्राचेनि नांवें , नमूंचि आवडे ॥ २२३ ॥
जैसें उंचीं उदक पडिलें, तें तळवटवरी ये उगेलें।
तैसें नमिजे भूतजात देखिलें, ऐसा स्वभावोचि तयांचा ॥ २२४ ॥
कां फळलिया तरुची शाखा, सहजें भूमीसी उतरे देखा।
तैसें जीवमात्रां अशेखां, खालावती ते ॥ २२५ ॥
अखंड अगर्वता होऊनि असती, तयांतें विनयो हेचि संपत्ती।
जे जयजयमंत्रें अर्पिती, माझांचि ठायीं ॥ २२६ ॥
नमितां मानापमान गळाले, म्हणोनि अवचितें ते मीचि जहाले।
ऐसे निरंतर मिसळले, उपासिती ॥ २२७ ॥
अर्जुना हे गुरुवी भक्ती, सांगितली तुजप्रती।
आतां ज्ञानयज्ञें यजिती, ते भक्त आइकें ॥ २२८ ॥
परि भजन करिती हातवटी, तूं जाणत आहासि किरीटी।
जे मागां इया गोष्टी, केलिया आम्हीं ॥ २२९ ॥
तंव आथि जी अर्जुन म्हणे, तें दैविकिया प्रसादाचें करणें।
तरि काय अमृताचें आरोगणें, पुरे म्हणवे ॥ २३० ॥
या बोला अनंतें, लागटा देखिलें तयातें।
कीं सुखावलेनि चित्तें, डोलतु असे ॥ २३१ ॥
म्हणे भलें केलें पार्था, एऱ्हवीं हा अनवसरु सर्वथा।
परि बोलवीतसे आस्था, तुझी मातें ॥ २३२ ॥
तंव अर्जुन म्हणे हें कायी, चकोरेंवीण चांदिणेंचि नाहीं।
जग निवविजे हा तयाचां ठायीं, स्वभावो कीं जी ॥ २३३ ॥
येरें चकोरें तियें आपुलिये चाडे, चांचु करिती चंद्राकडे।
तेविं आम्ही विनवुं तें थोकडे, देवो कृपासिंधु ॥ २३४ ॥
जी मेघ आपुलिये प्रौढी, जगाची आर्ति दवडी।
वांचूनि चातकाची ताहान केवढी, तो वर्षावो पाहुनी ॥ २३५ ॥
परि चुळा एकाचिया चाडे, जेविं गंगेतेंचि ठाकावें पडे।
तेंविं आर्त का बहु कां थोडें, तरि सांगावें देवा ॥ २३६ ॥
तेथें देवें म्हणितलें राहें, जो संतोषु आम्हां जाहला आहे।
तयावरी स्तुति साहे, ऐसें उरलें नाही ॥ २३७ ॥
पैं परिसतु आम्हासि निकियापरी, तेंचि वक्तृत्वा वऱ्हाडीक करी, ऐसें पुरस्करोनि श्रीहरी, आदरिलें बोलों ॥ २३८ ॥
ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते।
एकत्वेन पृथक्त्वेन बहुदा विश्वतोमुखम् ॥ १५ ॥
तरी ज्ञानयज्ञु तो एवंरुपु, तेथ आदिसंकल्पु हा यूपु।
महाभूतें मंडपु, भेदु तो पशु ॥ २३९ ॥
मग पांचांचे जे विशेष गुण, अथवा इंद्रियें आणि प्राण।
हेचि यज्ञोपचारभरण, अज्ञान धृत ॥ २४० ॥
तेथ मनबुद्धीचिया कुंडा-, आंतु ज्ञानाग्नि धडफुडा।
साम्य तेचि सुहाडा, वेदि जाणें ॥ २४१ ॥
सविवेकमतिपाटव, तेचि मंत्रविद्यागौरव।
शांति स्त्रुकस्त्रुव, जीव यज्वा।। २४२ ॥
तो प्रतीतीचेनि पात्रें, विवेकमहामंत्रें।
ज्ञानाग्निहोत्रें, भेदु नाशी ॥ २४३ ॥
तेथ अज्ञान सरोनि जाये, आणि यजिता यजन हें ठाये।
आत्मसमरसीं न्हाये, अवभृथीं जेव्हां ॥ २४४ ॥
तेव्हां भूतें विषय करणें , हें वेगळालें काहीं न म्हणे।
आघवें एकचि ऐसें जाणे, आत्मबुद्धी ॥ २४५ ॥
जैसा चेइला तो अर्जुना, म्हणे स्वप्नींची हें विचित्र सेना।
मीचि जाहालों होतों ना, निद्रावशें ॥ २४६ ॥
आतां सेना ते सेना नव्हे, हें मीच एक आघवें।
ऐसें एकत्वें मानवे, विश्व तया ॥ २४७ ॥
मग तो जीवु हे भाष सरे, आब्रह्म परमात्मबोधें भरे।
ऐसे भजती ज्ञानाध्वरें, एकत्वें येणें ॥ २४८ ॥
अथवा अनादि हें अनेक, जे आनासारिखें एका एक।
आणि नामरुपादिक , तेंही विषम ॥ २४९ ॥
म्हणोनि विश्व भिन्न, परि न भेदे तयांचें ज्ञान।
जैसे अवयव तरी आन आन, परि एकेचि देहींचे ॥ २५० ॥
कां शाखा सानिया थोरा, परि आहाति एकाचिये तरुवरा।
बहु रश्मि परि दिनकरा, एकाचे जेवीं ॥ २५१ ॥
तेविं नानाविधा व्यक्ती, आनानें नामें आनानी वृत्ती।
ऐसें जाणती भेदलां भूतीं, अभेदा मातें ॥ २५२ ॥
येणें वेगळालेपणें पांडवा, करिती ज्ञानयज्ञु बरवा।
जे न भेंदतीं जाणिवा, जाणते म्हणउनि ॥ २५३ ॥
ना तरी जेधवां जिये ठायीं, देखती कां जें जें कांहीं।
तें मीवांचूनि नाहीं, ऐसाचि बोधु ॥ २५४ ॥
पाहें पां बुडबुडा जेउता जाये, तेउतें जळचि एक तया आहे।
मग विरे अथवा राहे , तऱ्ही जळाचिमाजि ॥ २५५ ॥
कां पवनें परमाणु उचलले, ते पृथ्वीपणावेगळे नाहीं गेले।
आणि माघौतें जरी पडले, तरी पृथ्वीचिवरी ॥ २५६ ॥
तैसें भलतेथ भलतेणें भावें, भलतेंही न हो अथवा होआवें।
परि तें मी ऐसें आघवें, होऊनि ठेलें ॥ २५७ ॥
अगा हे जेव्हडी माझी व्याप्ति, तेव्हडीचि तयांचि प्रतीति।
ऐसे बहुधाकारीं वर्तती, बहुचि होउनि ॥ २५८ ॥
हें भानुबिंब आवडेतया, सन्मुख जैसें धनंजया।
तैसें ते विश्वा या, समोर सदा ॥ २५९ ॥
अगा तयांचिया ज्ञाना, पाठी पोट नाहीं अर्जुना।
वायु जैसा गगना, सर्वांगी असे ॥ २६० ॥
तैसा मी जेतुला आघवा, तेंचि तुक तयांचिया सद्भावा।
तरी न करितां पांडवा, भजन जहालें ॥ २६१ ॥
एऱ्हवीं तरी सकळ मीचि आहें, तरी कवणीं कें उपासिला नोहें।
एथ एकें जाणणेवीण ठाये, अप्राप्तासी ॥ २६२ ॥
परि तें असो येणें उचितें, ज्ञानयज्ञें यजितसांते।
उपासिती मातें, ते सांगितले ॥ २६३ ॥
अखंड सकळ हें सकळां मुखीं, सहज अर्पत असे मज एकीं।
कीं नेणणेयासाठीं मूर्खीं, न पविजेचि मातें ॥ २६४ ॥
अहं क्रतुरहं यज्ञ: स्वधाहमहमौषधम्।
मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् ॥ १६ ॥
तोचि जाणिवेचा उदयो जरी होये, तरी मुदल वेदु मीचि आहें।
आणि तो विधानातें जया विये, तो क्रतुही मीचि ॥ २६५ ॥
मग तया कर्मापासूनि बरवा, जो सांगोपांगु आघवा।
यज्ञु प्रगटे पांडवा, तोही मी गा ॥ २६६ ॥
स्वाहा मी स्वधा, सोमादि औषधी विविधा।
आज्य मी समिधा, मंत्रु मी हवि ॥ २६७ ॥
होता मी हवन कीजे, तेथ अग्नि तो स्वरुप माझें।
आणि हुतक वस्तू जें जें, तेही मीचि ॥ २६८ ॥
पिताहमस्य जगतो माता धाता पितामह:।
वेद्यं पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेव च ॥ १७ ॥
पैं जयाचेनि अंगेसंगें, इये प्रकृतीस्तव अष्टांगे।
जन्म पाविजत असे जगें, तो पिता मी गा ॥ २६९ ॥
अर्धनारीनटेश्वरीं, जो पुरुष तोचि नारी।
तेविं मी चराचरीं, माताही होय ॥ २७० ॥
आणि जाहालें जग जेथ राहे, जेंणे जित वाढत आहे।
तें मीचि वाचूनि नोहे, आन निरुतें ॥ २७१ ॥
इयें प्रकृतिपुरुषें दोन्ही, उपजलीं जयाचिया अमनमनीं।
तो पितामह त्रिभुवनीं, विश्वाचा मी ॥ २७२ ॥
आणि आघवेयां जाणणेयांचिया वाटा, जया गांवा येती गा सुभटा।
जे वेदांचियां चोहटां, वेद्य जें म्हणिजे ॥ २७३ ॥
जेथ नाना मतां बुझावणी जाहाली, एकमेकां शास्त्रांची अनोळखी फिटली ।
चुकलीं ज्ञानें जेथ मिळों आलीं, जे पवित्र म्हणिजे ॥ २७४ ॥
पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरु, घोषध्वनीनादाकारु।
तयांचें गा भुवन जो ॐकारु, तोही मी गा ॥ २७५ ॥
जया ॐकाराचिये कुशी, अक्षरें होती अउमकारेंसीं।
जियें उपजत वेदेंसीं, उठलीं तिन्हीं ॥ २७६ ॥
म्हणोनि ऋग्यजुःसामु, हे तिन्ही म्हणे मी आत्मारामु।
एंव मीचि कुलक्रमु, शब्दब्रह्माचा ॥ २७७ ॥
गतिर्भर्ता प्रभु: साक्षी निवास: शरणं सुहृत्।
प्रभव: प्रलय: स्थानं निधानं बीजमव्ययम् ॥ १८ ॥
हें चराचर आघवें, जिये प्रकृती आंत साठवे।
ते शिणली जेथ विसवे, ते परमगती मी ॥ २७८ ॥
आणि जयाचेनि प्रकृति जिये, जेणें अधिष्ठिली विश्व विये।
जो येऊनि प्रकृती इये, गुणातें भोगी ॥ २७९ ॥
तो विश्वश्रियेचा भर्ता, मीचि गा पंडुसुता।
मी गोसावी समस्ता, त्रैलोक्याचा ॥ २८० ॥
आकाशें सर्वत्र वसावें, वायूनें नावभरी उगें नसावें।
पावकें दहावें, वर्षावें जळें ॥ २८१ ॥
पर्वतीं बैसका न संडावी, समुद्रीं रेखा नोलांडावी।
पृथ्वीया भूतें वाहावीं, हे आज्ञा माझी ॥ २८२ ॥
म्या बोलविल्या वेदु बोले, म्यां चालविल्या सूर्यु चाले।
म्यां हालविल्या प्राणु हाले, जो जगातें चाळिता ॥ २८३ ॥
मियांचि नियमिलासांता, काळु ग्रासितसे भूतां।
इयें म्हणियागतें पंडुसुता, सकळें जयाचीं ॥ २८४ ॥
ऐसा जो समर्थु, तो मी जगाचा नाथु।
आणि गगनाऐसा साक्षिभूतु, तोहि मीचि ॥ २८५ ॥
इहीं नामरुपीं आघवा, जो भरला असे पांडवा।
आणि नामरुपांहि वोल्हावा, आपणचि जो ॥ २८६ ॥
जैसे जळाचे कल्लोळ, आणि कल्लोळ आथी जळ।
ऐसेनि वसवितसे सकळ, तो निवासु मी ॥ २८७ ॥
जो मज होय अनन्य शरण, त्याचें निवारीं मी जन्म मरण।
यालागीं शरणागता शरण्य, मीचि एकु ॥ २८८ ॥
मीचि एक अनेकपणें, वेगळालेनि प्रकृतीगुणें।
जीत जगाचेनि प्राणें, वर्तत असे ॥ २८९ ॥
जैसा समुद्र थिल्लर न म्हणतां, भलतेथ बिंबे सविता।
तैसा ब्रह्मादि सर्वां भूता, सुहृद तो मी ॥ २९० ॥
मीचि गा पांडवा, या त्रिभुवनासी वोलावा।
सृष्टिक्षयप्रभावा, मूळ तें मी ॥ २९१ ॥
बीज शाखांतें प्रसवे, मग तें रुखपण बीजीं सामावे।
तैसे संकल्पें होय आघवें, पाठीं संकल्पीं मिळे ॥ २९२ ॥
ऐसें जगाचें बीज जो संकल्पु, अव्यक्त वासनारुपु।
तया कल्पांतीं जेथ निक्षेपु, होय तें मी ॥ २९३ ॥
इयें नामरुपें लोटती, वर्णव्यक्ती आटती।
जातींचे भेद फिटती, जैं आकाश नाहीं ॥ २९४ ॥
तैं संकल्पु वासनासंस्कार, माघौतें रचावया आकार।
जेथ राहोनि असती अमर, तें निधान मी ॥ २९५ ॥
तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च।
अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ॥ १९ ॥
मी सूर्याचेनि वेषें, तपें तैं हें शोषे।
पाठीं इंद्र होऊनि वर्षें, तैं पुढती भरे ॥ २९६ ॥
अग्नि काष्ठें खाये, तें काष्ठचि अग्नि होये।
तेवि मरतें मारितें पाहें, स्वरुप माझें ॥ २९७ ॥
यालागीं मृत्यूचां भागीं जें जें, तेंही पैं रुप माझें।
आणि न मरतें तंव सहजें, अविनाशु मी ॥ २९८ ॥
आता बहु बोलोनि सांगावें, तें एकिहेळां घे पां आघवें।
तरी सतासतही जाणावें, मीचि पैं गा ॥ २९९ ॥
म्हणोनि अर्जुना मी नसें, ऐसा कवणु ठाव असे।
परि प्राणियांचें दैव कैसे, जे न देखती मातें ॥ ३०० ॥
तरंग पाणियेंवीण सुकती, रश्मि वातीवीण न देखती।
तैसे मीचि ते मी नव्हती, विस्मो देखे ॥ ३०१ ॥
हें आतबाहेर मियां कोंदलें, जग निखिल माझेंचि वोतिलें।
कीं कैसें कर्म तयां आलें , जे मींचि नाही म्हणती ॥ ३०२ ॥
परि अमृतकुहां पडिजे, कां आपणयातें कडिये काढिजे।
ऐसें आथी काय कीजे, अप्राप्तासि ॥ ३०३ ॥
ग्रासा एका अन्नासाठीं, अंधु धांवताहे किरीटी।
आडळला चिंतामणि पायें लोटी, आंधळेपणे ॥ ३०४ ॥
तैसें ज्ञान जैं सांडुनि जाये, तैं ऐसी हे दशा आहे।
म्हणोनि कीजे तें केलें नोहे, ज्ञानेंवीण ॥ ३०५ ॥
आंधळेया गरुडाचे पांख आहाती, ते कवणा उपेगा जाती।
तैसें सत्कर्माचे उपखे ठाती, ज्ञानेंवीण ॥ ३०६ ॥
त्रैविद्या मां सोमपा: पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते।
ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ॥ २० ॥
देख पां गा किरीटी, आश्रमधर्माचिया राहाटी।
विधिमार्गा कसवटी, जे आपणचि होती ॥ ३०७ ॥
यजन करितां कौतुकें, तिहीं वेदांचा माथा तुके।
क्रिया फळेंसि उभी ठाके, पुढां जयां ॥ ३०८ ॥
ऐसे दीक्षित जे सोमप, जे आपणचि यज्ञाचें स्वरुप।
तींहीं तया पुण्याचेनि नांवें पाप, जोडिलें देखें ॥ ३०९ ॥
जे श्रुतित्रयांते जाणोनि, शतवरी यज्ञ करुनि।
यजिलिया मातें चुकोनि, स्वर्गु वरिती ॥ ३१० ॥
जैसें कल्पतरुतळवटीं, बैसोनि झोळिये पाडी गांठी।
मग निदैव निघे किरीटी, दैन्यचि करुं ॥ ३११ ॥
तैसे शतक्रतूं यजिलें मातें, कीं ईप्सिताति स्वर्गसुखांतें।
आतां पुण्य कीं हें निरुतें, पाप नोहे ॥ ३१२ ॥
म्हणोनि मजवीण पाविजे स्वर्गु, तो अज्ञानाचा पुण्यमार्गु।
ज्ञानिये तयातें उपसर्गु, हानि म्हणती ॥ ३१३ ॥
एऱ्हवीं तरी नरकींचें दुःख, पावोनि स्वर्गा नाम कीं सुख, वांचूनि नित्यानंद गा निर्दोष, तें स्वरुप माझें ॥ ३१४ ॥
मज येतां पैं सुभटा, या द्विविधा गा अव्हांटा।
स्वर्गु नरकु या वाटा, चोरांचिया ॥ ३१५ ॥
स्वर्गा पुण्यात्मकें पापें येईजे, पापात्मकें पापें नरका जाइजे।
मग मातें जेणें पाविजे, तें शुद्ध पुण्य ॥ ३१६ ॥
आणि मजचिमाजीं असतां, जेणें मी दूरी होय पांडुसुता।
तें पुण्य ऐसें म्हणतां, जीभ न तुटे काई ॥ ३१७ ॥
परि हें असो आतां प्रस्तुत, ऐकें यापरि ते दीक्षित।
यजुनि मातें याचित, स्वर्गभोगु ॥ ३१८ ॥
मग मी न पविजे ऐसें, जें पापरुप पुण्य असे।
तेणें लाधलेनि सौरसें, स्वर्गा येती ॥ ३१९ ॥
जेथ अमरत्व हेंचि सिंहासन, ऐरावतासारिखें वाहन।
राजधानीभुवन, अमरावती ॥ ३२० ॥
जेथ महासिद्धींची भांडारें, अमृताचीं कोठारें।
जियें गांवीं खिल्लारें, कामधेनूंचीं ॥ ३२१ ॥
जेथ वोळगे देव पाइका, सैघं चिंतामणीचिया भूमिका, विनोदवनवाटिका, सुरतरुंचिया ॥ ३२२ ॥
गंधर्वगान गाणीं, जेथ रंभेऐशिया नाचणी।
उर्वशी मुख्य विलासिनी, अंतौरिया ॥ ३२३ ॥
मदन वोळगे शेजारे, जेथ चंद्र शिंपे सांबरें।
पवना ऐसें म्हणियारें, धांवणें जेथ ॥ ३२४ ॥
पैं बृहस्पति आपण, ऐसे स्वस्तीश्रियेचे ब्राह्मण।
ताटियेचे सुरगण, विकार जेथें ॥ ३२५ ॥
लोकपाळरांगेचे, राउत जिये पदीचे।
उचैःश्रवा खांचे, खोलणिये।। ३२६ ॥
हें बहु असो जे ऐसे, भोग इंद्रसुखासरिसे।
ते भोगिजती जंव असे, पुण्यलेशु ॥ ३२७ ॥
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति।
एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥ २१ ॥
मग तया पुण्याची पाउटी सरे, सवेंचि इंद्रपणाची उटी उतरे।
आणि येऊं लागती माघारें, मृत्युलोका ॥ ३२८ ॥
जैसा वेश्याभोगीं कवडा वेंचे, मग दारही चेपूं न ये तियेचें।
तैसें लाजिरवाणें दीक्षितांचें, काय सांगो ॥ ३२९ ॥
एवं थितिया मातें चुकले, जीहीं पुण्यें स्वर्ग कामिले।
तयां अमरपण तें वावों जालें, आतां मृत्युलोकु ॥ ३३० ॥
मातेचिया उदरकुहरीं, पचूनि विष्ठेचां दाथरीं।
उकडूनि नवमासवरी, जन्मजन्मोनि मरती ॥ ३३१ ॥
अगा स्वप्नीं निधान फावे, परि चेइलिया हारपे आघवें।
तैसें स्वर्गसुख जाणावें, वेदज्ञाचें ॥ ३३२ ॥
अर्जुना वेदु जऱ्ही जाहला, तरी मातें नेणतां वायां गेला।
कणु सांडूनि उपणिला, कोंडा जैसा ॥ ३३३ ॥
म्हणऊनि मज एकेंविण, हे त्रयीधर्म अकारण।
आतां मातें जाणोनि कांहीं नेण, तूं सुखिया होसी ॥ ३३४ ॥
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ २२ ॥
पैं सर्वभावेंसी उखितें, जे वोपिले मज चित्तें।
जैसा गर्भगोळु उद्यमातें , कोणाही नेणे ॥ ३३५ ॥
तैसा मीवाचूनि कांही, आणिक गोमटेंचि नाहीं।
मजचि नाम पाहीं, जिणेया ठेविलें ॥ ३३६ ॥
ऐसे अनन्यगतिकें चित्तें, चिंतितसांते मातें।
जे उपासिती तयांतें, मीचि सेवीं ॥ ३३७ ॥
ते एकवटूनि जिये क्षणीं, अनुसरले गा माझिये वाहणी।
तेव्हांचि तयांची चिंतवणी, मजचि पडली ॥ ३३८ ॥
मग तीहीं जें जें करावे, तें मजचि पडिलें आघवें।
जैशी अजातपक्षांचेनि जीवें, पक्षिणी जिये ॥ ३३९ ॥
आपुली तहानभूक नेणे, तान्हया निकें तें माउलीसीचि करणें।
तैसे अनुसरले जे मज प्राणें, तयांचेन काइसेनिहि न लजें मी ॥ ३४० ॥
तया माझिया सायुज्याची चाड, तरि तेंचि पुरवीं कोड।
कां सेवा म्हणती तरी आड, प्रेम सुयें ॥ ३४१ ॥
ऐसा मनीं जो जो भावो, तो तो पुढां पुढां लागें तयां देवों।
आणि दिधलियाचा निर्वाहो, तोहि मीचि करीं ॥ ३४२ ॥
हा योगक्षेमु आघवा, तयांचा मजचि पडिला पांडवा।
जयांचियां सर्वभावां, आश्रयो मी ॥ ३४३ ॥
येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता:।
तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् ॥ २३ ॥
आतां आणिकही संप्रदायें, परि मातें नेणती समवायें।
जे अग्नि-इंद्र-सूर्य-सोमाये, म्हणऊनि यजिती ॥ ३४४ ॥
तेंही कीर मातेंचि होये, कां जे हें आघवें मीचि आहें।
परि ते भजती उजरी नव्हे, विषम पडे ॥ ३४५ ॥
पाहे पां शाखा पल्लव वृक्षाचे, हे काय नव्हती एकाचि बीजाचे।
परि पाणी घेणें मुळाचें, तें मुळींचि घापे ॥ ३४६ ॥
कां दहाहीं इंद्रियें आहाती, इयें जरी एकेचि देहींचीं होती।
आणि इहीं सेविले विषयो जाती, एकाचि ठाया ॥ ३४७ ॥
तरि करोनि रससोय बरवी, कानीं केविं भरावी।
फुलें आणोनि बांधावीं, डोळां केविं ॥ ३४८ ॥
तो रसु तो मुखेंचि सेवावा, परिमळु तो घ्राणेंचि घ्यावा।
तैसा मी तो यजावा, मीचि म्हणोनि ॥ ३४९ ॥
येर मातें नेणोनि भजन, तें वायांचि गा आनेंआन।
म्हणोनि कर्माचे डोळे ज्ञान, तें निर्दोष होआवें ॥ ३५० ॥
एऱ्हवीं पाहें पां पंडुसुता, या यज्ञोपहारां समस्तां।
मीवांचूनि भोक्ता, कवणु आहे ॥ ३५१ ॥
मी सकळां यज्ञांचा आदि, आणि यजना या मीचि अवधि।
कीं मातें चुकोनि दुर्बुद्धि, देवां भजले ॥ ३५२ ॥
गंगेचे उदक गंगे जैसें, अर्पिंजे देवपित्तरोद्देशें।
माझे मज देती तैसें, परि आनानीं भावीं ॥ ३५३ ॥
म्हणऊनि ते पार्था, मातें न पवतीचि सर्वथा।
मग मनीं वाहिली जे आस्था, तेथ आले ॥ ३५४ ॥
यान्ति देवव्रता देवान्पितॄन्यान्ति पितृव्रता:।
भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥ २५ ॥
मनें वाचा करणीं, जयांचीं भजनें देवांचिया वाहणी।
ते शरीर जातियेक्षणीं, देवचि जाले ॥ ३५५ ॥
अथवा पितरांचीं व्रतें, वाहती जयांचीं चित्तें।
जीवित सरलिया तयांतें, पितृत्व वरी ॥ ३५६ ॥
कां क्षुद्रदेवतादि भूतें, तियेंचि जयांचीं परमदैवतें।
जींहीं अभिचारिकीं तयांतें, उपासिलें ॥ ३५७ ॥
तयां देहांची जवनिक फिटली, आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली।
एवं संकल्पवशें फळलीं, कर्में तयां ॥ ३५८ ॥
मग मीचि डोळां देखिला, जींहीं कानीं मीचि ऐकिला।
मनीं मी भाविला, वानिला वाचा ॥ ३५९ ॥
सर्वांगीं सर्वाठायीं, मीचि नमस्कारिला जिहीं।
दानपुण्यादिकें जें कांहीं, तें माझियाचि मोहरा ॥ ३६० ॥
जिहीं मातेंचि अध्ययन केलें, जे आंतबाहेर मियांचि धाले।
जयांचे जीवित्व जोडलें , मजचिलागीं ॥ ३६१ ॥
जे अहंकारु वाहत आंगीं, आम्ही हरीचे भूषावयालागीं।
जे लोभिये एकचि जगीं, माझेनि लोभें ॥ ३६२ ॥
जे माझेनि कामें सकाम, जे माझेनि प्रेमें सप्रेम।
जे माझिया भुली सभ्रम, नेणती लोक ॥ ३६३ ॥
जयांचीं जाणती मज शास्त्रें, मी जोडें जयाचेनि मंत्रें।
ऐसे जे चेष्टामात्रें, भजले मज ॥ ३६४ ॥
ते मरणाऐलीचकडे, मज मिळोनि गेले फुडे।
मग मरणीं आणिकीकडे, जातील केविं ॥ ३६५ ॥
म्हणोनि मद्याजी जे जाहाले, ते माझिया सायुज्या आले।
जिहीं उपचारमिषें दिधलें, आपणपें मज ॥ ३६६ ॥
पैं अर्जुना माझां ठायीं , आपणपेवीण सौरसु नाहीं।
मी उपचारीं कवणाही, नाकळें गा ॥ ३६७ ॥
एथ जाणिव करी तोचि नेणे, आथिलेंपण मिरवी तेंचि उणें।
आम्ही जाहलों ऐसें जो म्हणे, तो कांहींचि नव्हे ॥ ३६८ ॥
अथवा यज्ञदानादि किरीटी, कां तपें हन जे हुटहुटी।
ते तृणा एकासाठीं, न सरे एथ ॥ ३६९ ॥
पाहें पां जाणिवेचेनि बळें, कोण्ही वेदापासूनि असे आगळें।
कीं शेषाहूनि तोंडागळें, बोलकें आथी ॥ ३७० ॥
तोही आंथरुणातळवटी दडे, येरु नेति नेति म्हणोनि बहुडे।
एथ सनकादिक वेडे, पिसे जाहले ॥ ३७१ ॥
करितां तापसांची कडसणी, कवणु जवळां ठेविजैल शूळपाणी।
तोहि अभिमानु सांडूनि पायवणी, माथां वाहे ॥ ३७२ ॥
नातरी आथिलेपणें सरिसी, कवणी आहे लक्ष्मियेऐसी, श्रियेसारिखिया दासी, घरीं जियेतें ॥ ३७३ ॥
तियां खेळतां करिती घरकुली, तयां नामें अमरपुरें जरि ठेविलीं, तरि न होती काय बाहुलीं, इंद्रादिक तयांचीं ॥ ३७४ ॥
तयां नावडोनि जेव्हां मोडती, तेव्हां महेंद्राचे रंक होती।
तियां झाडां येउते जयां पाहती, ते कल्पवृक्ष ॥ ३७५ ॥
ऐसें जियेचियां जवळिकां, सामर्थ्य घरींचियां पाइकां।
ते लक्ष्मी मुख्यनायका, न मनेचि एथ ॥ ३७६ ॥
मग सर्वस्वें करुनि सेवा, अभिमान सांडूनि पांडवा,
ते पाय धुवावयाचिया दैवा, पात्र जाहाली ॥ ३७७ ॥
म्हणोनि थोरपण पऱ्हांचि सांडिजे, व्युत्पत्ति आघवी विसरिजे।
जैं जगा धाकुटें होइजे , तैं जवळीक माझी ॥ ३७८ ॥
अगा सहस्त्रकिरणाचिये दिठी, पुढा चंद्रुही लोपे किरीटी।
तेथ खद्योत का हुटहुटी, आपुलेनि तेजें ॥ ३७९ ॥
तैसें लक्ष्मियेचें थोरपण न सरे, जेथ शंभूचेंही तप न पुरे।
तेथ येर प्राकृत हेंदरें, केविं जाणों लाहे ॥ ३८० ॥
यालागीं शरीरसांडोवा कीजे, सकळगुणांचें लोण उतरिजे, संपत्तिमदु सांडिजे, कुरवंडी करुनी ॥ ३८१ ॥
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ २६ ॥
मग निस्सीमभावउल्हासें, मज अर्पावयाचेनि मिसें।
फळ आवडे तैसें, भलतयाचें हो ॥ ३८२ ॥
भक्तु माझियाकडे दावी, आणि मी दोन्ही हात वोडवीं।
मग देठुं न फेडितां सेवीं, आदरेंशी ॥ ३८३ ॥
पैं गा भक्तीचेनि नांवें , फूल एक मज द्यावें।
तें लेखें तरि म्यां तुरंबावें, परि मुखींचि घालीं ॥ ३८४ ॥
हें असो कायसीं फुलें, पानचि एक आवडे तें जाहलें।
तें साजुकही न हो सुकलें, भलतैसें ॥ ३८५ ॥
परि सर्वभावें भरलें देखें, आणि भुकेला अमृतें तोखे।
तैसें पत्रचि परि तेणें सुखें , आरोगूं लागें ॥ ३८६ ॥
अथवा ऐसेंही एक घडे, जे पालाही परि न जोडे।
तरि उदकाचें तंव सांकडें, नव्हेल कीं ॥ ३८७ ॥
तें भलतेथ निमोलें, न जोडितां आहे जोडलें।
तेंचि सर्वस्व करुनि अर्पिलें, जेणें मज ॥ ३८८ ॥
तेणें वैकुठापासोनि विशाळें, मजलागीं केलीं राऊळें।
कौस्तुभाहोनि निर्मळें, लेणीं दिधलीं ॥ ३८९ ॥
दूधाचीं शेजारें, क्षीराब्धीऐसीं मनोहरे।
मजलागीं अपारें, सृजिलीं तेणें ॥ ३९० ॥
कर्पूर चंदन अगरु, ऐसेया सुगंधाचा महामेरु।
मज हातीं लाविला दिनकरु, दीपमाळे ॥ ३९१ ॥
गरुडासारिखीं वाहनें, मज सुरतंरुचीं उद्यानें।
कामधेनूंचीं गोधनें, अर्पिलीं तेणें ॥ ३९२ ॥
मज अमृताहूनि सुरसें, बोनीं वोगरिलीं बहुवसें।
ऐसा भक्तांचेनि उदकलेशें, परितोषें गा ॥ ३९३ ॥
हें सांगावें काय किरीटी, तुम्हींचि देखिलें आपुलिया दिठी।
मी सुदामयाचिया सोडीं गाठीं, पव्हयालागीं ॥ ३९४ ॥
पैं भक्ति एकी मी जाणें, तेथ सानें थोर न म्हणें।
आम्ही भावाचे पाहुणे, भलतेया ॥ ३९५ ॥
येर पत्र पुष्प फळ, तें भजावया मिस केवळ।
वांचूनि आमुचा लाग निष्फळ , भक्तितत्व ॥ ३९६ ॥
म्हणोनि अर्जुना अवधारीं, तूं बुद्धि एकी सोपारी करीं।
तरी सहजें आपुलिया मनोमंदिरीं, न विसंबें मातें ॥ ३९७ ॥
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥ २७ ॥
जे जे कांहीं व्यापार करिसी, कां भोग हन भोगिसी।
अथवा यज्ञीं यजसी, नानाविधीं ॥ ३९८ ॥
नातरी पात्रविशेषें दानें, कां सेवकां देसी जीवनें।
तपादि साधनें, व्रतें करिसी ॥ ३९९ ॥
तें क्रियाजात आघवें, जें जैसें निपजेल स्वभावें।
तें भावना करोनि करावें, माझिया मोहरा ॥ ४०० ॥
परि सर्वथा आपुलां जीवीं, केलियाची शंका कांहींचि नुरवीं।
ऐसीं धुवोनि कर्मे द्यावीं, माझियां हातीं ॥ ४०१ ॥
शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनै:।
संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥ २८ ॥
मग अग्निकुंडी बीजें घातलीं, तियें अंकुरदशे जेविं मुकलीं।
तेवि न फळतीचि मज अर्पिलीं, शुभाशुभें ॥ ४०२ ॥
अगा कर्मे जैं उरावें, तैं तिहीं सुखदुःखीं फळावें।
आणि तयातें भोगावया यावें, देहा एका ॥ ४०३ ॥
तें उगाणिलें मज कर्म, तेव्हांचि पुसिलें मरण जन्म।
जन्मासवें श्रम, वरचिलही गेले ॥ ४०४ ॥
म्हणऊनि अर्जुना यापरि, पाहेचा वेळु नव्हेल भारी,
हे संन्यासयुक्ति सोपारी, दिधली तुज ॥ ४०५ ॥
या देहाचिया बांदोडी न पडिजे, सुखदुःखाचिया सागरीं न बुडिजे, सुखें सुखरुपा घडिजे, माझियाचि अंगा ॥ ४०६ ॥
समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रिय:।
ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ॥ २९ ॥
तो मी पुससी कैसा, तरि जो सर्वभूतीं सदा सरिसा।
जेथ आपपरु ऐसा, भागु नाहीं ॥ ४०७ ॥
जे ऐसिया मातें जाणोनि, अहंकाराचा कुरुठा मोडोनि।
जे जीवें कर्मे करुनि, भजती मातें ॥ ४०८ ॥
ते वर्तत दिसती देहीं, परि ते देहीं ना माझां ठायीं।
आणि मी तयांचा हृदयीं, समग्र असें ॥ ४०९ ॥
सविस्तर वटत्व जैसें, बीजकणिकेमाजीं असे।
आणि बीजकणु वसे, वटीं जेवीं ॥ ४१० ॥
तेवीं आम्हां तयां परस्परें, बाहेरी नामाचींचि अंतरें।
वांचुनि आंतुवट वस्तुविचारें, मी तेचि ते ॥ ४११ ॥
आतां जायांचें लेणें, जैसें आंगावरी आहाचवाणें।
तैसें देह धरणें, उदास तयांचें ॥ ४१२ ॥
परिमळु निघालिया पवनापाठीं, मागें वोस फूल राहे देठीं।
तैसें आयुष्याचिये मुठी, केवळ देह ॥ ४१३ ॥
येर अवष्टंभु जो आघवा, तो आरुढोनि मद्भावा।
मजचि आंतु पांडवा, पैठा जाहला ॥ ४१४ ॥
अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥ ३० ॥
ऐसें भजतेनि प्रेमभावें, जयां शरीरही पाठीं न पवे।
तेणें भलतया व्हावें, जातीचिया ॥ ४१५ ॥
आणि आचरण पाहातां सुभटा, तो दुष्कृताचा सेल वांटा।
परि जीवित वेचिलें चोहटां, भक्तीचिया कीं ॥ ४१६ ॥
अगा अंतींचिया मती, साचपण पुढिले गती।
म्हणोनि जीवित जेणें भक्ती, दिधलें शेखीं ॥ ४१७ ॥
तो आधीं जरी अनाचारी, तरी सर्वोत्तमुचि अवधारीं।
जैसा बुडाला महापूरीं, न मरतु निघाला ॥ ४१८ ॥
तयाचें जीवित ऐलथडिये आलें, म्हणोनि बुडालेपण जेवीं वायां गेलें,
तेवीं नुरेचि पाप केलें, शेवटलिये भक्ती ॥ ४१९ ॥
यालागीं दुष्कृती जऱ्ही जाहला, तरि अनुतापतीर्थीं न्हाला।
न्हाऊनि मजआंतु आला, सर्वभावें ॥ ४२० ॥
तरि आतां पवित्र तयाचेंचि कुळ, अभिजात्य तेंचि निर्मळ।
जन्मलेया फळ, तयासीच जोडलें ॥ ४२१ ॥
तो सकळही पढिन्नला, तपें तोचि तपिन्नला।
अष्टांग अभ्यासिला, योगु तेणें ॥ ४२२ ॥
हें असो बहुत पार्था, तो उतरला कर्मे सर्वथा।
जयाची अखंड गा आस्था, मजचिलागीं ॥ ४२३ ॥
अवघिया मनोबुद्धीचिया राहटी, भरोनि एकनिष्ठेचिया पेटी।
जेणें मजमाजीं किरीटी, निक्षेपिली ॥ ४२४ ॥
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति।
कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्त: प्रणश्यति ॥ ३१ ॥
तो आतां अवसरें मजसारिखा होइल, ऐसाही भाव तुज जाइल।
हां गा अमृताआंत राहील, तया मरण कैचें ॥ ४२५ ॥
पै सूर्य जो वेळु नुदैजे, तया वेळा कीं रात्र म्हणिजे।
तेवीं माझिये भक्तीविण जें कीजे, तें महापाप नोहे ॥ ४२६ ॥
म्हणोनि तयाचिया चित्ता, माझी जवळीक पांडुसुता।
तेव्हांचि तो तत्वता, स्वरुप माझें ॥ ४२७ ॥
जैसा दीपें दीपु लाविजे, तेथ आदील कोण हें नोळखिजे।
तैसा सर्वस्वें जो मज भजे, तो मी होऊनि ठाके ॥ ४२८ ॥
मग माझी नित्य शांती, तया दशा तेचि कांती।
किंबहुना जिती, माझेनि जीवें, ४२९ ॥
एथ पार्था पुढतपुढती, तेंचि तें सांगो किती।
जरी मियां चाड तरी भक्ती, न विसंबिजे गा ॥ ४३० ॥
अगा कुळाचिया चोखटपणा नलगा, अभिजात्य झणीं श्लाघा, व्युत्पत्तीचा वाउगा, सोसु कां वहावा ॥ ४३१ ॥
कां रुपे वयसा माजा, आथिलेपणें कां गाजा।
एक भाव नाहीं माझा, तरी पाल्हाळ तें ॥ ४३२ ॥
कणेंविण सोपटें, कणसें लागलीं आथी एक दाटें।
काय करावें गोमटें, वोस नगर ॥ ४३३ ॥
नातरी सरोवर आटलें, रानीं दुःखिया दुःखी भेटलें।
कां वांझ फुलीं फुललें, झाड जैसें ॥ ४३४ ॥
तैसें सकळ तें वैभव, अथवा कुळजातीगौरव।
जैसें शरीर आहे सावेव, परि जीवचि नाहीं ॥ ४३५ ॥
तैसें माझिये भक्तीविण, जळो तें जियालेंपण।
अगा पृथ्वीवरी पाषाण, नसती काई ॥ ४३६ ॥
पैं हिंवराची दाट साउली, सज्जनीं जैसी वाळिली।
तैसीं पुण्यें डावलूनि गेलीं, अभक्तांतें ॥ ४३७ ॥
निंब निंबोळियां मोडोनि आला, तरी तो काउळियांसीचि सुकाळु जाहला।
तैसा भक्तिहीनु वाढिन्नला, दोषांचिलागीं ॥ ४३८ ॥
कां षड्रस खापरीं वाढिले, वाढूनि चोहटां रात्री सांडिले।
ते सुणियांचेचि ऐसे झाले, जियापरी ॥ ४३९ ॥
तैसें भक्तीहीनाचें जिणें, जो स्वप्नींही परि सुकृत नेणे।
तेणे संसारदुःखासी आवंतणें, वोगरिलें गा ॥ ४४० ॥
म्हणोनि कुळ उत्तम नोहावें, जाती अंत्याही व्हावें।
वरि देहाचेनि नांवें, पशूचेंही लाभो ॥ ४४१ ॥
पाहें पां सावजें हातिरुं धरिलें, तेणें तया काकुळती मातें स्मरिलें।
कीं तयाचें पशुत्व वावो जाहलें, पातलिया मातें ॥ ४४२ ॥
मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्यु: पापयोनय:।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ॥ ३२ ॥
अगा नांवें घेता वोखटीं, जे आघवेया अधमांचिये शेवटीं।
तिये पापयोनीही किरीटी, जन्मले जे ॥ ४४३ ॥
ते पापयोनि मूढ, मूर्ख ऐसे जे दगड।
परि माझां ठायीं दृढ, सर्वभावें ॥ ४४४ ॥
जयांचिये वाचे माझे आलाप, दृष्टी भोगी माझेंचि रुप।
जयांचें मन संकल्प, माझाचि वाहे ॥ ४४५ ॥
माझिया कीर्तीविण, जयांचे रिते नाहीं श्रवण।
जयां सर्वांगीं भूषण, माझी सेवा ॥ ४४६ ॥
जयांचें नाव विषो नेणे, जाणीव मजचि एकातें जाणे।
जया ऐसें लाभे तरी जिणें, एऱ्हवीं मरण ॥ ४४७ ॥
ऐसा आघवाचि परि पांडवा , जिहीं आपुलिया सर्वभावा, जियावयालागीं वोलावा, मीचि केला ॥ ४४८ ॥
ते पापयोनीही होतु कां, ते श्रुताधीतही न होतुं कां।
परि मजसीं तुकितां तुका, तुटी नाहीं ॥ ४४९ ॥
पाहें पां भक्तिचेनि आथिलेपणें, दैत्यीं देवां आणिलें उणें।
माझें नृसिंहत्व लेणें, जयाचिये महिमे ॥ ४५० ॥
तो प्रल्हादु गा मजसाठीं, घेतां बहुतें सदा किरीटी।
कां जें मियां द्यावें ते गोष्टी, तयाचिया जोडे ॥ ४५१ ॥
एऱ्हवीं दैत्यकुळ साचोकारें, परि इंद्रिही सरी न लाहे उपरें।
म्हणोनि भक्ति गा एथ सरे, जाति अप्रमाण ॥ ४५२ ॥
राजाज्ञेचीं अक्षरें आहाती, तियें चामा एका जया पडती।
तया चामासाठीं जोडती, सकळ वस्तु ॥ ४५३ ॥
वांचूनि सोनें रुपें प्रमाण नोहे, एथ राजाज्ञाचि समर्थ आहे।
तेंचि चाम एक जैं लाहे, तेणें विकती आघवीं ॥ ४५४ ॥
तैसें उत्तमत्व तैंचि तरे, तैंचि सर्वज्ञता सरे।
जैं मनोबुद्धि भरे, माझेनि प्रेमें ॥ ४५५ ॥
म्हणोनि कुळ जाति वर्ण, हें आघवेंचि गा अकारण।
एथ अर्जुना माझेपण, सार्थक एक ॥ ४५६ ॥
तेंचि भलतेणें भावें, मन मजाआंतु येतें होआवें।
आलें तरी आघवें, मागील वावो ॥ ४५७ ॥
जैसे तवंचि वहाळ वोहळ, जंव न पवती गंगाजळ।
मग होऊनि ठाकती केवळ, गंगारुप ॥ ४५८ ॥
कां खैर चंदन काष्ठें, हे विवंचना तंवचि घटे।
जंव न घापती एकवटें, अग्नीमाजीं ॥ ४५९ ॥
तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया, कां शूद्र अंत्यादि इया।
जाती तंवचि वेगळालिया, जंव न पवती मातें ॥ ४६० ॥
मग जाती व्यक्ती पडे बिंदुलें, जेव्हां भाव होती मज मीनले।
जैसे लवणकण घातले, सागरामाजीं ॥ ४६१ ॥
तंववरी नदानदींचीं नांवें, तंवचि पूर्वपश्चिमेचे यावे।
जंव न येती आघवे, समुद्रामाजीं ॥ ४६२ ॥
हेंचि कवणें एकें मिसें, चित्त माझां ठायीं प्रवेशे।
येतुलें हो मग आपैसें, मी होणे असे ॥ ४६३ ॥
अगा वरी फोडावयाचि लागीं, लोहो मिळो कां परिसाचां आंगीं।
कां जे मिळतिये प्रसंगीं, सोनेंचि होईल ॥ ४६४ ॥
पाहें पां वालभाचेनि व्याजें, तिया व्रजांगनांचीं निजें।
मज मीनलिया काय माझें, स्वरुप नव्हतीचि ॥ ४६५ ॥
नातरी भयाचेनि मिसें, मातें न पविजेचि काय कंसें।
कीं अखंड वैरवशें, चैद्यादिकीं ॥ ४६६ ॥
अगा सोयरेपणेंचि पांडवा, माझें सायुज्य यादवां।
कीं ममत्वें वासुदेवा-, दिकां सकळां ॥ ४६७ ॥
नारदा ध्रुवा अक्रूरा, शुका हन सनत्कुमारा।
यां भक्ती मी धनुर्धरा, प्राप्यु जैसा ॥ ४६८ ॥
तैसाचि गोपीसी कामें, तया कंसा भयसंभ्रमें।
येरा घातकेयां मनोधर्में, शिशुपालादिकां।। ४६९ ॥
अगा मी एकुलाणीचें खागें, मज येवों ये भलतेनि मार्गे।
भक्ती कां विषयें विरागें, अथवा वैरें ॥ ४७० ॥
म्हणोनि पार्था पाहीं, प्रवेशावया माझां ठायीं।
उपायांची नाहीं, केणि एथ ॥ ४७१ ॥
आणि भलतिया जाती जन्मावें, मग भजिजे कां विरोधावें।
परि भक्त कां वैरिया व्हावें, माझियाचि ॥ ४७२ ॥
अगा कवणें एके बोलें, माझेपण जऱ्ही जाहालें।
तरी मी होणें आलें, हाता निरुतें।। ४७३ ॥
यापरि पापयोनीही अर्जुना, कां वैश्य शूद्र अंगना।
मातें भजतां सदना, माझिया येती ॥ ४७४ ॥
किं पुनर्ब्राह्मणा: पुण्या भक्ता राजर्षयस्तथा।
अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥ ३३ ॥
मग वर्णांमाजीं छत्रचामर, स्वर्ग जयांचें अग्रहार।
मंत्रविद्येसि माहेर, ब्राह्मण जे ॥ ४७५ ॥
जेथ अखंड वसिजे यागीं, जे वेदांची वज्रांगी।
जयाचिये दिठीचां उत्संगीं , मंगळ वाढे ॥ ४७६ ॥
जे पृथ्वीतळींचे देव, जे तपोवतार सावयव।
सकळ तीर्थांसी दैव, उदयलें जे ॥ ४७७ ॥
जयाचिये आस्थेचिये वोले, सत्कर्म पाल्हाळीं गेलें।
संकल्पें सत्य जियालें, जयांचेनि ॥ ४७८ ॥
जयांचेनि गा बोलें, अग्नीसि आयुष्या जाहालें ।
म्हणोनि समुद्रें पाणी आपुलें, दिधलें यांचिया प्रीती ॥ ४७९ ॥
मियां लक्ष्मी डावलोनि केली परौती, फेडोनि कौस्तुभ घेतला हातीं, मग वोढविली वक्षस्थळाची वाखती, चरणरजां ॥ ४८० ॥
आझूनि पाउलांची मुद्रा, मी हृदयीं वाहें गा सुभद्रा।
जे आपुलिया दैवसमुद्रा, जतनेलागीं ॥ ४८१ ॥
जयांचा कोप सुभटा, काळाग्निरुद्राचा वसौटा।
जयांचां प्रसादीं फुकटा, जोडती सिद्धी ॥ ४८२ ॥
ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण, आणि माझां ठायीं आर्तिंनिपुण।
आतां मातें पावती हें कवण, समर्थणें ॥ ४८३ ॥
पाहें पां चंदनाचेनि अंगानिळें, शिवतिले निंब होते जे जवळे।
तिंहीं निर्जिवींही देवांची निडळें, बैसणीं केलीं ॥ ४८४ ॥
मग तो चंदनु तेथ न पवे, ऐसें मनीं कैसेनि धरावें।
अथवा पातला हें समर्थावें, तेव्हां कायि साच ॥ ४८५ ॥
जेथ निववील ऐसिया आशा, हरें चंद्रमा आधा ऐसा।
वाहिजत असे शिरसा, निरंतर ॥ ४८६ ॥
तेथ निवविता आणि सगळा, परिमळें चंद्राहूनि आगळा।
तो चंदनु केविं अवलीळा, सर्वांगी न बैसे ॥ ४८७ ॥
कां रथ्योदकें जियेचिये कासे, लागलिया समुद्र जालीं अनायासें।
तिये गंगेसि काय अनारिसें, गत्यंतर असे ॥ ४८८ ॥
म्हणोनि राजर्षि कां ब्राह्मण, जयां गती मती मीचि शरण।
तयां त्रिशुद्धी मीच निर्वाण, स्थितिही मीचि ॥ ४८९ ॥
यालागीं शतजर्जरे नावे, रिगोनि केविं निश्चिंत होआवें।
कैसेनि उघडिया असावें, शस्त्रवर्षीं ॥ ४९० ॥
अंगावरी पडतां पाषाण, न सुवावें केविं वोडण।
रोगें दाटलिया आणि उदासपण, वोखदेंसीं ॥ ४९१ ॥
जेथ चहूंकडे जळत वणवा, तेथूनि न निगिजे केविं पांडवा।
तेविं लोका येऊनिया सोपद्रवा, केविं न भजिजे मातें ॥ ४९२ ॥
अगा मातें न भजावयालागीं, कवण बळ पां आपुलां आंगीं।
काइ घरीं कीं भोगीं, निश्चिंती केली ॥ ४९३ ॥
नातरी विद्या कीं वयसा, यां प्राणियांसि हा ऐसा।
मज न भजतां भरवसां, सुखाचा कोण ॥ ४९४ ॥
तरी भोग्यजात जेतुलें, तें एका देहाचिया निकिया लागलें।
आणि येथ देह तंव असे पडिलें, काळाचां तोंडीं ॥ ४९५ ॥
बाप दुःखाचें केणें सुटलें, जेथ मरणाचे भरे लोटले।
तिये मृत्युलोकींचिये शेवटिले, येणें जाहालें हाटवेळे ॥ ४९६ ॥
आतां सुखेंसि जीविता, कैची ग्राहिकी कीजेल पांडुसुता।
काय राखोंडी फुंकिता, दीपु लागे ॥ ४९७ ॥
अगा विषाचे कांदे वाटुनी, जो रसु घेइजे पिळुनी।
तया नाम अमृत ठेउनी, जैसें अमर होणें ॥ ४९८ ॥
तेविं विषयांचें जें सुख, तें केवळ परम दुःख।
परि काय कीजे मूर्ख, न सेवितां न सरे ॥ ४९९ ॥
कां शीस खांडूनि आपुलें, पायींचां खतीं बांधिलें।
तैसें मृत्युलोकींचें भलें, आहे आघवें ॥ ५०० ॥
म्हणोनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी, ऐकिजेल कवणाचां श्रवणीं, कैंची सुखनिद्रा आंथरुणीं, इंगळाचां ॥ ५०१ ॥
जिये लोकीचा चंद्र क्षयरोगी, जेथ उदयो होय अस्तालागीं।
दुःख लेऊनि सुखाची आंगी, सळित जगातें ॥ ५०२ ॥
जेथे मंगळाचां अंकुरीं, सवेंचि अमंगळाची पडे पोरी।
मृत्यु उदराचां परिवरीं, गर्भु गिंवसी ॥ ५०३ ॥
जें नाहीं तयांतें चिंतवी, तंव तेंचि नेइजे गंधर्वीं।
गेलियाची कवणे गांवीं , शुद्धी न लभे ॥ ५०४ ॥
अगा गिंवसितां आघवा वाटी, परतलें पाउलचि नाहीं किरीटी।
सैंघ निमालियांचियाचि गोठी, तिंये पुराणें जेथिंचीं ॥ ५०५ ॥
जेथींचिये अनित्यतेची थोरी, करितया ब्रह्मयाचें आयुष्यवेरी।
कैसें नाहीं होणें अवधारीं, निपटूनियां ॥ ५०६ ॥
ऐसी लोकींची जिये नांदणूक, तेथ जन्मले आथि जे लोक।
तयांचिये निश्चिंतीचे कौतुक, दिसत असे ॥ ५०७ ॥
पैं दृष्टादृष्टीचिये जोडी, लागीं भांडवल न सुटे कवडी।
जेथ सर्वस्वें हानि तेथ कोडी, वेंचिती गा ॥ ५०८ ॥
जो बहुवें विषयविलासें गुफें, तो म्हणती उवायें पडिला सापें।
जो अभिलाषभारें दडपे, तयातें सज्ञान म्हणती ॥ ५०९ ॥
जयाचें आयुष्य धाकुटें होय, बळ प्रज्ञा जिरौनि जाय।
तयाचे नमस्कारिती पाय, वडिल म्हणुनि ॥ ५१० ॥
जंव जंव बाळ बळिया वाढे, तंव तंव भोजें नाचती कोडें।
आयुष्य निमालें आंतुलियेकडे, ते ग्लानीचि नाहीं ॥ ५११ ॥
जन्मलिया दिवसदिवसें, हों लागे काळाचियाचि ऐसें।
कीं वाढती करिती उल्हासें, उभविती गुढिया ॥ ५१२ ॥
अगा मर हा बोलु न साहती, आणि मेलिया तरी रडती।
परि असतें जात न गणिती, गहिंसपणें ॥ ५१३ ॥
दर्दुर सापें गिळिजतु आहे उभा, कीं तो मासिया वेटाळी जिभा।
तैसे प्राणिये कवणा, वाढविती तृष्णा ॥ ५१४ ॥
अहा कटा हें वोखटें, मृत्युलोकींचें उफराटें।
एथ अर्जुना जरी अवचटें, जन्मलासी तूं ॥ ५१५ ॥
तरि झडझडोनि वहिला निघ, इये भक्तीचिये वाटे लाग।
जिया पावसी अव्यंग, निजधाम माझें ॥ ५१६ ॥
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु।
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण: ॥ ३४ ॥
तूं मन हें मीचि करीं, माझां भजनीं प्रेम धरीं।
सर्वत्र नमस्कारीं, मज एकातें ॥ ५१७ ॥
माझेनि अनुसंधानें देख, संकल्पु जाळणें निःशेख।
मद्याजी चोख, याचि नांव ॥ ५१८ ॥
ऐसा मियां आथिला होसी, तेथ माझियाचि स्वरुपा पावसी।
हें अंतःकरणींचें तुजपासीं, बोलिजत असे ॥ ५१९ ॥
अगा आवघिया चोरिया आपुलें, जें सर्वस्व आम्ही असे ठेविलें।
तें पावोनि सुख संचले, होऊनि ठासी ॥ ५२० ॥
ऐसें सांवळेनि परब्रह्में, भक्तकामकल्पद्रुमें।
बोलिलें आत्मारामें, संजयो म्हणे ॥ ५२१ ॥
अहो ऐकिजत असे कीं अवधारा, तंव इया बोला निवांत म्हातारा, जैसा म्हैसा नुठी कां पुरा, तैसा उगाचि असे ॥ ५२२ ॥
तेथ संजयें माथा तुकिला, अहा अमृताचा पाऊस वर्षला।
कीं हा एथ असतुचि गेला, सेजिया गांवा ॥ ५२३ ॥
तऱ्ही दातारु हा आमुचा, म्हणोनि हें बोलतां मैळेल वाचा।
काइ झालें ययाचा, स्वभावोचि ऐसा ॥ ५२४ ॥
परि बाप भाग्य माझें, जे वृत्तांतु सांगावयाचेनि व्याजें।
कैसा रक्षिलों मुनिराजें, श्रीव्यासदेवें ॥ ५२५ ॥
येतुलें हें वाडें सायासें, जंव बोलत असे दृढें मानसें।
तंव न धरवेचि आपुलिया ऐसें, सात्विकें केलें ॥ ५२६ ॥
चित्त चाकाटलें आटु घेत, वाचा पांगुळली जेथिंची तेथ, आपादकंचुकित, रोमांच आले ॥ ५२७ ॥
अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें।
आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें, बाहेरि कांपे ॥ ५२८ ॥
पै आघवांचि रोममूळीं, आली स्वेदकणिका निर्मळी।
लेइला मोतियांचीं कडियाळीं, आवडे तैसा ॥ ५२९ ॥
ऐसा महासुखाचेनि आर्तिंरसे, जेथ आटणी होईल जीवदशे।
तेथे निरोविलें व्यासें, तें नेदीच हों ॥ ५३० ॥
आणि कृष्णार्जुनाचें बोलणें, घों करी आलें श्रवणें।
कीं देहस्मृतीचा तेणें, वापसा केला ॥ ५३१ ॥
तेव्हां नेत्रींचें जळ विसर्जी, सर्वांगींचा स्वेदु परिमार्जी।
तेवींचि अवधान म्हणे हो जी, धृतराष्ट्रातें।। ५३२ ॥
आतां कृष्णवाक्यबीजा निवाडु, आणि संजय सात्विकाचा बिवडु, म्हणोनि श्रोतया होईल सुरवाडु, प्रमेयपिकाचा ॥ ५३३ ॥
अहो अळुमाळु अवधान देयावें, येतुलेनि आनंदाचे राशीवर बैसावें, बाप श्रवणेंद्रिया दैवें, घातली माळ ॥ ५३४ ॥
म्हणोनि विभूतींचा ठावो, अर्जुना दावील सिद्धांचा रावो।
तो ऐका म्हणे ज्ञानदेवो, निवृत्तीचा ॥ ५३५ ॥
ज्ञानेश्वरी / अध्याय दहावा : संत ज्ञानेश्वर
नमो विशदबोधविदग्धा, विद्यारविंदप्रबोधा,पराप्रमेयप्रमदा, विलासिया ॥ १ ॥
नमो संसारतमसूर्या, अप्रतिमपरमवीर्या,
तरुणतरतूर्या, लालनलीला ॥ २ ॥
नमो जगदखिलपालना, मंगळमणिनिधाना,
सज्जनवनचंदना, आराध्यलिंगा ॥ ३ ॥
नमो चतुरचित्तचकोरचंद्रा, आत्मानुभवनरेंद्रा,
श्रुतिसारसमुद्रा, मन्मथमन्मथा ॥ ४ ॥
नमो सुभावभजनभाजना, भवेभकुंभभंजना,
विश्वोद्भसवभुवना, श्रीगुरुराया ॥ ५ ॥
तुमचा अनुग्रहो गणेशु, जैं दे आपुला सौरसु,
तैं सारस्वतीं प्रवेशु, बाळकाही आथी ॥ ६ ॥
जी दैविकीं उदार वाचा, जैं उद्देशु दे नाभिकाराचा,
तैं नवरससुधाब्धीचा, थावो लाभे ॥ ७ ॥
जी आपुलिया स्ने,हाची वागेश्वरी, जरी मुकेयातें अंगिकारी,
तो वाचस्पतीशीं करी, प्रबंधुहोडा ॥ ८ ॥
हें असो दिठी जयावरी झळके, कीं हा पद्मकरु माथां पारुखे,
तो जीवचि परि तुके, महेशेंसीं ॥ ९ ॥
एवढें जिये महिमेचें करणें, तें वाचाबळें वानूं मी कवणें,
कां सूर्याचिया आंगा उटणें, लागत असे ? ॥ १० ॥
केउता कल्पतरुवरी फुलौरा ?, कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा ?,
कवणें वासीं कापुरा, सुवासु देवों ? ॥ ११ ॥
चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें,
गगनावरी उभवावें, घडे केवीं ? ॥ १२ ॥
तैसें श्रीगुरूचें महिमान, आकळितें कें असे साधन ?,
हें जाणोनि मियां नमन, निवांत केलें ॥ १३ ॥
जरी प्रज्ञेचेनि आथिलेपणें, श्रीगुरूसामर्थ्या रूप करूं म्हणे,
तरि तें मोतियां भिंग देणें, तैसें होईल ॥ १४ ॥
कां साडेपंधरया रजतवणी, तैशीं स्तुतींचीं बोलणीं,
उगियाचि माथा ठेविजे चरणीं, हेंचि भलें ॥ १५ ॥
मग म्हणितलें जी स्वामी, भलेनि ममत्वें देखिलें तुम्हीं,
म्हणौनि कृष्णार्जुनसंगमीं, प्रयागवटु जाहलों ॥ १६ ॥
मागां दूध दे म्हणतलियासाठीं, आघविया क्षीराब्धीची करूनि वाटी,
उपमन्यूपुढें धूर्जटी, ठेविली जैसी ॥ १७ ॥
ना तरी वैकुंठपीठनायकें, रुसला ध्रुव कवतिकें,
बुझाविला देऊनि भातुकें, ध्रुवपदाचें ॥ १८ ॥
तैसी जे ब्रह्मविद्यारावो, सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो,
ते भगवद्गीनता वोंविये गावों, ऐसें केलें ॥ १९ ॥
जे बोलणियाचे रानीं हिंडतां, नायकिजे फळलिया अक्षराची वार्ता,
परि ते वाचाचि केली कल्पलता, विवेकाची ॥ २० ॥
होती देहबुद्धी एकसरी, ते आनंदभांडारा केली वोवरी।
मन गीतार्थसागरीं, जळशयन जालें ॥ २१ ॥
ऐसें एकेक देवांचें करणें, तें अपार बोलों केवीं मी जाणें।
तऱ्ही अनुवादलों धीटपणें, ते उपसाहिजो जी ॥ २२ ॥
आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मियां भगवद्गीरता वोंवीप्रबंधें।
पूर्वखंड विनोदें, वाखाणिलें ॥ २३ ॥
प्रथमीं अर्जुनाचा विषादु, दुजीं बोलिला योगु विशदु।
परि सांख्यबुद्धीसि भेदु, दाऊनियां ॥ २४ ॥
तिजीं केवळ कर्म प्रतिष्ठिलें, तेंचि चतुर्थीं ज्ञानेंशीं प्रगटिलें।
पंचमीं गव्हरिलें, योगतत्त्व ॥ २५ ॥
तेचि षष्ठामाजीं प्रगट, आसनालागोनि स्पष्ट।
जीवात्मभाव एकवट, होती जेणें ॥ २६ ॥
तैसी जे योगस्थिती, आणि योगभ्रष्टां जे गती।
तें आघवीचि उपपत्ती, सांगितली षष्ठीं ॥ २७ ॥
तयावरी सप्तमीं, प्रकृतिपरिहार उपक्रमीं।
करूनि भजती जे पुरुषोत्तमीं, ते बोलिले चाऱ्ही ॥ २८ ॥
पाठीं सप्तमींची प्रश्नसिद्धी, बोलोनि प्रयाणसमयसिद्धी।
एवं ते सकळवाक्यअवधि, अष्टमाध्यायीं ॥ २९ ॥
मग शब्दब्रह्मीं असंख्याकें, जेतुला कांहीं अभिप्राय पिके।
तेतुला महाभारतें एकें, लक्षें जोडे ॥ ३० ॥
तिये आघवांचि जें महाभारतीं, तें लाभे कृष्णार्जुनवाचोक्तीं।
आणि जो अभिप्रावो सातेंशतीं, तो एकलाचि नवमीं ॥ ३१ ॥
म्हणौनि नवमींचिया अभिप्राया, सहसा मुद्रा लावावया।
बिहाला मग मी वायां, गर्व कां करूं ? ॥ ३२ ॥
अहो गूळासाखरे मालयाचे, हे बांधे तरी एकाचि रसाचे।
परि स्वाद गोडियेचे, आनआन जैसे ॥ ३३ ॥
एक जाणोनियां बोलती, एक ठायें ठावो जाणविती।
एक जाणों जातां हारपती, जाणते गुणेंशीं ॥ ३४ ॥
हें ऐसें अध्याय गीतेचे, परि अनिर्वाच्यपण नवमाचें।
तो अनुवादलों हें तुमचें, सामर्थ्य प्रभू ॥ ३५ ॥
अहो एकाचि शाटी तपिन्नली, एकीं सृष्टीवरी सृष्टी केली।
एकीं पाषाणीं वाऊनि उतरलीं, समुद्रीं कटकें ॥ ३६ ॥
एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं चुळींचि सागरातें भरिलें।
तैसें मज मुकयाकरवीं बोलविलें, अनिर्वाच्य तुम्हीं ॥ ३७ ॥
परि हें असो एथ ऐसें, राम रावण झुंजिन्नले कैसे।
राम रावण जैसे, मीनले समरीं ॥ ३८ ॥
तैसें नवमीं कृष्णाचें बोलणें, तें नवमीचियाचि ऐसें मी म्हणें।
या निवाडा तत्त्वज्ञु जाणें, जया गीतार्थु हातीं ॥ ३९ ॥
एवं नवही अध्याय पहिले, मियां मतीसारिखे वाखाणिले।
आतां उत्तरखंड उवाइलें, ग्रंथाचें ऐका ॥ ४० ॥
जेथ विभूति प्रतिविभूती, प्रस्तुत अर्जुना सांगिजेती।
ते विदग्धा रसवृत्ती, म्हणिपैल कथा ॥ ४१ ॥
देशियेचेनि नागरपणें, शांतु शृंगारातें जिणें।
तरि ओंविया होती लेणें, साहित्यासि ॥ ४२ ॥
मूळ ग्रंथींचिया संस्कृता, वरि मऱ्हाठी नीट पढतां।
अभिप्राय मानलिया उचिता, कवण भूमी हें न चोजवे ॥ ४३ ॥
जैसें अंगाचेनि सुंदरपणें, लेणिया आंगचि होय लेणें।
तेथ अळंकारिलें कवण कवणें, हें निर्वचेना ॥ ४४ ॥
तैसी देशी आणि संस्कृत वाणी, एका भावार्थाच्या सोकासनीं।
शोभती आयणी, चोखट आइका ॥ ४५ ॥
उठावलिया भावा रूप, करितां रसवृत्तीचें लागे वडप।
चातुर्य म्हणे पडप, जोडलें आम्हां ॥ ४६ ॥
तैसें देशियेचें लावण्य, हिरोनि आणिलें तारुण्य।
मग रचिलें अगण्य, गीतातत्त्व ॥ ४७ ॥
जो चराचर परमगुरु, चतुर चित्तचमत्कारु।
तो ऐका यादवेश्वरु, बोलता जाहला ॥ ४८ ॥
ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे, ऐसें बोलिलें श्रीहरी तेणें।
अर्जुना आघवियाची मातु अंतःकरणें, धडौता आहासि ॥ ४९ ॥
श्रीभगवानुवाचः भूय एव महाबाहो श्रृणु मे परमं वचः।
यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १॥
आम्हीं मागील जें निरूपण केलें, तें तुझें अवधानचि पाहिलें।
तवं टाचें नव्हें भलें, पुरतें आहे ॥ ५० ॥
घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे।
ऐसा परिसौनि पाहिलासि तंव परिसविजे, ऐसेंचि होतसे ॥ ५१ ॥
अवचितयावरी सर्वस्व सांडिजे, मग चोख तरी तोचि भांडारी कीजे।
तैसा किरीटी तूं आतां माझें, निजधाम कीं ॥ ५२ ॥
ऐसें अर्जुना येउतें सर्वेश्वरें, पाहोनि बोलिलें अत्यादरें।
गिरी देखोनि सुभरें, मेघु जैसा ॥ ५३ ॥
तैसा कृपाळुवांचा रावो, म्हणे आइकें गा महाबाहो।
सांगितलाचि अभिप्रावो, सांगेन पुढती ॥ ५४ ॥
पैं प्रतिवर्षीं क्षेत्र पेरिजे, पिकाची जंव जंव वाढी देखिजे।
यालागीं नुबगिजे, वाहो करितां ॥ ५५ ॥
पुढतपुढती पुटें देतां, जोडे वानियेची अधिकता।
म्हणौनि सोनें पंडुसुता, शोधूंचि आवडे ॥ ५६ ॥
तैसें एथ पार्था, तुज आभार नाहीं सर्वथा।
आम्ही आपुलियाचि स्वार्था, बोलों पुढती ॥ ५७ ॥
जैसें बाळका लेवविजे लेणें, तया शृंगारा बाळ काइ जाणे ?।
परि ते सुखाचे सोहळे भोगणें, माउलिये दिठी ॥ ५८ ॥
तैसें तुझें हित आघवें, जंव जंव कां तुज फावे।
तंव तंव आमुचें सुख दुणावे, ऐसें आहे ॥ ५९ ॥
आतां अर्जुना असो हे विकडी, मज उघड तुझी आवडी।
म्हणौनि तृप्तीची सवडी, बोलतां न पडे ॥ ६० ॥
आम्हां येतुलियाचि कारणें, तेंचि तें तुजशीं बोलणें।
परि असो हें अंतःकरणें, अवधान देईं ॥ ६१ ॥
तरी ऐकें गा सुवर्म, वाक्य माझें परम।
जें अक्षरें लेऊनी परब्रह्म, तुज खेंवासि आलें ॥ ६२ ॥
परी किरीटी तूं मातें, नेणसी ना निरुतें।
तरि तो गा जो मी एथें, तें विश्वचि हें ॥ ६३ ॥
न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः।
अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥ २॥
एथ वेद मुके जाहाले, मन पवन पांगुळले।
रातीविण मावळले, रविशशी जेथ ॥ ६४ ॥
अगा उदरींचा गर्भु जैसा, न देखें आपुलिये मातेची वयसा।
मी आघवेया देवां तैसा, नेणवे कांहीं ॥ ६५ ॥
आणि जळचरां उदधीचें मान, मशका नोलांडवेचि गगन।
तेवीं महर्षींचें ज्ञान, न देखेचि मातें ॥ ६६ ॥
मी कवण पां केतुला, कवणाचा कैं जाहला।
या निरुती करितां बोला, कल्प गेले ॥ ६७ ॥
कां जे महर्षीं आणि या देवां, येरां भूतजातां सर्वां।
मी आदि म्हणौनि पांडवा, अवघड जाणतां ॥ ६८ ॥
उतरलें उदक पर्वत वळघे, जरी झाड वाढत मुळीं लागे।
तरी मियां जालेनि जगें, जाणिजे मातें ॥ ६९ ॥
कां गाभेवनें वटु गिंवसवे, जरी तरंगीं सागरू सांठवे।
कां परमाणूमाजीं सामावे, भूगोलु हा ॥ ७० ॥
तरी मियां जालिया जीवां, महर्षीं अथवा देवां।
मातें जाणावया होआवा, अवकाशु गा ॥ ७१ ॥
ऐसाही जरी विपायें, सांडूनि पुढीले पाये।
सर्वेंद्रियांसि होये, पाठिमोरा जो ॥ ७२ ॥
प्रवर्तलाही वेगीं बहुडे, देह सांडूनि मागलीकडे।
महाभूतांचिया चढे, माथयावरी ॥ ७३ ॥
यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम्।
असंमूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ३॥
तैसा राहोनि ठायठिके, स्वप्रकाशें चोखें।
अजत्व माझें देखे, आपुलिया डोळां ॥ ७४ ॥
मी आदीसिं परु, सकळलोकमहेश्वरु।
ऐसिया मातें जो नरु, यापरी जाणें ॥ ७५ ॥
तो पाषाणांमाजीं परिसु, रसांमाजी सिद्धरसु।
तैसा मनुष्याकृति अंशु, तो माझाचि जाण ॥ ७६ ॥
तो चालतें ज्ञानाचें बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ,
परि माणुसपणाची भांब, लोकाचि भागु ॥ ७७ ॥
अगा अवचिता कापुरा-, माजीं सांपडला हिरा।
वरी पडिलिया नीरा, न निगे केवीं ॥ ७८ ॥
तैसा मनुष्यलोकाआंतु, तो जरी जाहला प्राकृतु।
तऱ्ही प्रकृतिदोषाची मातु, नेणिजे तेथ ॥ ७९ ॥
तो आपसयेंचि सांडिजे पापीं, जैसा जळत चंदनु सर्पीं,
तैसा मातें जाणें तो संकल्पीं, वर्जूनि घालिजे ॥ ८० ॥
तेंचि मातें कैसें जाणिजे, ऐसें कल्पी जरी चित्त तुझें।
तरी मी ऐसा हें माझें, भाव ऐकें ॥ ८१ ॥
जे वेगळालां भूतीं, सारिखे होऊनि प्रकृती।
विखुरले आहेती त्रिजगतीं, आघविये ॥ ८२ ॥
बुद्धिर्ज्ञानमसंमोहः क्षमा सत्यं दमः शमः।
सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ ४॥
अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः।
भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ ५॥
ते प्रथम जाण बुद्धी, मग ज्ञान जें निरवधी।
असंमोह सहनसिद्धी, क्षमा सत्य ॥ ८३ ॥
मग शम दम दोन्ही, सुख दुःख वर्तत जनीं।
अर्जुना भावाभाव मानीं, भावाचिमाजीं ॥ ८४ ॥
आतां भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता,
हे मम रुपची पांडुसुता, ओळख तू ॥ ८५ ॥
दान यश अपकीर्ती, ते जे भाव सर्वत्र वसती।
ते मजचि पासूनि होती, भूतांचा ठायीं ॥ ८६ ॥
जैसीं भूतें आहाति सिनानीं, तैसेचि हेही वेगळाले मानीं।
एक उपजती माझां ज्ञानीं, एक नेणती मातें ॥ ८७ ॥
अगा प्रकाश आणि कडवसें, हें सूर्याचिस्तव जैसें।
प्रकाश उदयीं दिसे, तम अस्तुसीं ॥ ८८ ॥
आणि माझें जे जाणणें नेणणें, तें तंव भूतांचिया दैवाचें करणें।
म्हणौनि भूतीं भावाचें होणें, विषम पडे ॥ ८९ ॥
यापरी माझां भावीं, हे जीवसृष्टि आहे आघवी।
गुंतली असे जाणावी, पंडुकुमरा ॥ ९० ॥
आतां इये सृष्टीचे पालक, तयां आधीन वर्तती लोक।
ते अकरा भाव आणिक, सांगेन तुज ॥ ९१ ॥
महर्षयः सप्त पूर्वे चत्वारी मनवस्तथा।
मद्भषवा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ ६॥
तरी आघवांचि गुणीं वृद्ध, जे महर्षींमाजीं प्रबुद्ध।
कश्यपादि प्रसिद्ध, सप्त ऋषी ॥ ९२ ॥
आणिकही सांगिजतील, जे चौदा आंतील ।
स्वायंभू मुख्य मुद्दल, चारी मनु ॥ ९३ ॥
ऐसें हे अकरा, माझां मनीं जाहाले धनुर्धरा।
सृष्टीचिया व्यापारा-, लागोनियां ॥ ९४ ॥
जैं लोकांची व्यवस्था न पडे, जैं या त्रिभुवनाचे कांहीं न मांडे।
तैं महाभूतांचे दळवाडें, अचुंबित असे ॥ ९५ ॥
तैंचि हे जाहाले, इहीं लोकपाळ केले,
अध्यक्ष रचूनि ठेविले, इहीं जन ॥ ९६ ॥
म्हणौनि अकरा हे राजा, मग येर लोक यांचिया प्रजा।
ऐसा हा विस्तारु माझा, ओळख तूं ॥ ९७ ॥
पाहें पां आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बूड जाहालें, बुडीं कोंभ निघाले, खांदियांचे ॥ ९८ ॥
खांदियांपासूनि अनेका, पसरलिया शाखोपशाखा,
शाखांस्तव देखा, पल्लवपानें ॥ ९९ ॥
पल्लवीं फूल फळ, एवं वृक्षत्व जाहालें सकळ।
तें निर्धारितां केवळ, बीजचि तें ॥ १०० ॥
ऐसें मी एकचि पहिलें, मग मी तें मनातें व्यालें।
तेथ सप्तऋषि जाहाले, आणि चारी मनु ॥ १०१ ॥
इहीं लोकपाळ केले, लोकपाळीं विविध लोक सृजिले।
लोकांपासूनि निपजले, प्रजाजात ॥ १०२ ॥
ऐसेनि हें विश्व येथें, मीचि प्रसवला ना निरुतें।
परी भावाचेनि हातें, माने जया ॥ १०३ ॥
एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः।
सोऽविकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥ ७॥
यालागीं सुभद्रापती, हे भाव इया माझिया विभूती।
आणि यांचिया व्याप्ती, व्यापिलें विश्व ॥ १०४ ॥
म्हणोनि गा यापरी, ब्रह्मादिपिपीलिकावरी।
मीवांचूनि दुसरी, गोठी नाहीं ॥ १०५ ॥
ऐसें जाणे जो साचें, तया चेइरें जाहालें ज्ञानाचें।
म्हणोनि उत्तम मध्यम भेदाचें, दुःस्वप्न तयां ॥ १०६ ॥
मी माझिया विभूती, विभूतीं अधिष्ठिलिया व्यक्ती।
हें आघवें योगप्रतीती, एकचि मानी ॥ १०७ ॥
म्हणोनि निःशंकें येणें महायोगें, मज मीनला मनाचेनि आंगें।
एथ संशय करणें न लगे, तो त्रिशुद्धी जाहला ॥ १०८ ॥
कां जे ऐसें किरीटी, मातें भजे जो अभेदा दिठी।
तयाचिये भजनाचिये नाटीं, सूती मज ॥ १०९ ॥
म्हणऊनि अभेदें जो भक्तियोगु, तेथ शंका नाहीं नये खंगु।
करितां ठेला तरी चांगु, तें सांगितलें षष्ठीं ॥ ११० ॥
तोचि अभेदु कैसा, हें जाणावया मानसा।
साद जाली तरी परियेसा, बोलिजेल ॥ १११ ॥
अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥ ८॥
तरि मीचि एक सर्वां, या जगा जन्म पांडवा।
आणि मजचिपासूनि आघवा, निर्वाहो यांचा ॥ ११२ ॥
कल्लोळमाळा अनेगा, जन्म जळींचि पैं गा।
आणि तयां जळचि आश्रयो तरंगा, जीवनही जळ ॥ ११३ ॥
ऐसें आघवांचि ठायीं, तया जळचि जेविं पाहीं।
तैसा मीवांचूनि नाहीं, विश्वीं इये ॥ ११४ ॥
ऐसिया व्यापका मातें, मानूनि जे भजती भलतेथें।
परि साचोकारें उदितें, प्रेमभावें ॥ ११५ ॥
देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न।
जैसा वायु होऊन गगन, गगनींचि विचरे ॥ ११६ ॥
ऐसेनि जे निजज्ञानी, खेळत सुखें त्रिभुवनीं।
जगद्रूपा मनीं, सांठऊनि मातें ॥ ११७ ॥
जें जें भेटे भूत, तें तें मानिजे भगवंत।
हा भक्तियोगु निश्चित, जाण माझा ॥ ११८ ॥
मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम्।
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥ ९॥
चित्तें मीचि जाहाले, मियांचि प्राणें धाले।
जीवों मरों विसरले, बोधाचिया भुली ॥ ११९ ॥
मग तया बोधाचेनि माजे, नाचती संवादसुखाचीं भोजें।
आतां एकमेकां घेपे दीजे, बोधचि वरी ॥ १२० ॥
जैशीं जवळिकेंचीं सरोवरें, उचंबळलिया कालवती परस्परें।
मग तरंगासि धवळारें, तरंगचि होती ॥ १२१ ॥
तैसी येरयेरांचिये मिळणी, पडत आनंदकल्लोळांची वेणी।
तेथ बोध बोधाचीं लेणीं, बोधेंचि मिरवी ॥ १२२ ॥
जैसें सूर्यें सूर्यातें वोंवाळिलें, कीं चंद्रें चंद्रम्या क्षेम दिधलें।
ना तरी सरिसेनि पाडें मीनले, दोनी वोघ ॥ १२३ ॥
तैसें प्रयाग होत सामरस्याचें, वरी वोसाण तरत सात्त्विकाचें।
ते संवादचतुष्पथींचे, गणेश जाहले ॥ १२४ ॥
तेव्हां तया महासुखाचेनि भरें, धांवोनि देहाचिये गांवाबाहेरें।
मियां धाले तेणें उद्गारें, लागती गाजों ॥ १२५ ॥
पैं गुरुशिष्यांचां एकांतीं, जे अक्षरा एकाची वदंती।
ते मेघाचियापरी त्रिजगतीं, गर्जती सैंघ ॥ १२६ ॥
जैसी कमळकळिका जालेपणें, हृदयींचिया मकरंदातें राखों नेणें।
दे राया रंका पारणें, आमोदाचें ॥ १२७ ॥
तैसेंचि मातें विश्वीं कथित, कथितेनि तोषें कथूं विसरत।
मग तया विसरामाजीं विरत, आंगें जीवें ॥ १२८ ॥
ऐसें प्रेमाचेनि बहुवसपणें, नाहीं राती दिवो जाणणें।
केलें माझें सुख अव्यंगवाणें, आपणपेयां जिहीं ॥ १२९ ॥
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १०॥
तयां मग जें आम्ही कांहीं, द्यावें अर्जुना पाहीं।
ते ठायींचीच तिहीं, घेतली सेल ॥ १३० ॥
कां जे ते जिया वाटा, निगाले गा सुभटा।
ते सोय पाहोनि अव्हांटा, स्वर्गापवर्ग ॥ १३१ ॥
म्हणोनि तिहीं जें प्रेम धरिलें, तेंचि आमुचें देणें उपाइलें।
परि आम्हीं देयावें हेंहि केलें, तिहींची म्हणियें ॥ १३२ ॥
आतां यावरी येतुलें घडे, जें तेंचि सुख आगळें वाढें।
आणि काळाची दिठी न पडे, हें आम्हां करणें ॥ १३३ ॥
लळेयाचिया बाळका किरीटी, गवसणी करूनि स्नेआहाचिया दिठी, जैसी खेळतां पाठोपाठीं, माउली धांवे ॥ १३४ ॥
तें जो जो खेळ दावी, तो तो पुढें सोनयाचा करूनि ठेवी।
तैसी उपास्तीची पदवी, पोषित मी जायें ॥ १३५ ॥
जिये पदवीचेनि पोषकें, ते मातें पावती यथासुखें।
हे पाळती मज विशेखें, आवडे करूं ॥ १३६ ॥
पैं गा भक्तासि माझें कोड, मज तयाचे अनन्यगतीची चाड।
कां जे प्रेमळांचें सांकड, आमुते घरीं ॥ १३७ ॥
पाहें पां स्वर्ग मोक्ष उपायिले, दोन्ही मार्ग तयाचिये वाहणी केले, आम्हीं आंगही शेखीं वेंचिलें, लक्ष्मियेसीं ॥ १३८ ॥
परि आपणपेंवीण जें एक, तें तैसेंचि सुख साजुक।
सप्रेमळालागीं देख, ठेविलें जतन ॥ १३९ ॥
हा ठायवरी किरीटी, आम्ही प्रेमळु घेवों आपणपयासाठीं।
या बोलीं बोलिजत गोष्टी, तैसिया नव्हती गा ॥ १४० ॥
तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः।
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥ ११॥
म्हणोनि मज आत्मयाचा भावो, जिहीं जियावया केला ठावो।
एक मीवांचूनि वावो, येर मानिलें जिहीं ॥ १४१ ॥
तयां तत्त्वज्ञां चोखटां, दिवी पोतासाची सुभटा।
मग मीचि होऊनि दिवटा, पुढां पुढां चालें ॥ १४२ ॥
अज्ञानाचिये राती-, माजीं तमाचि मिळणी दाटती।
ते नाशूनि घालीं परौती, करीं नित्योदयो ॥ १४३ ॥
ऐसें प्रेमळाचेनि प्रियोत्तमें, बोलिलें जेथ पुरुषोत्तमें।
तेथ अर्जुन मनोधर्में, निवालों म्हणतसे ॥ १४४ ॥
अहो जी अवधारा, भला केरु फेडिला संसारा।
जाहलों जननीजठरजोहरा-, वेगळा प्रभू ॥ १४५ ॥
जी जन्मलेपण आपुलें, हें आजि मियां डोळां देखिलें।
जीवित हातां चढलें, आवडतसें ॥ १४६ ॥
आजि आयुष्या उजवण जाहली, माझिया दैवा दशा उदयली।
जे वाक्यकृपा लाधली, दैविकेनि मुखें ॥ १४७ ॥
आतां येणें वचन तेजाकारें, फिटलें आंतील बाहेरील आंधारें।
म्हणोनि देखतसें साचोकारें, स्वरूप तुझें ॥ १४८ ॥
अर्जुन उवाच, परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान्।
पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥ १२॥
तरी होसी गा तूं परब्रह्म, जें या महाभूतां विसंवतें धाम।
पवित्र तूं परम, जगन्नाथा ॥ १४९ ॥
तूं परम दैवत तिहीं देवां, तूं पुरुष जी पंचविसावा।
दिव्य तूं प्रकृतिभावा-, पैलीकडील ॥ १५० ॥
अनादिसिद्ध तूं स्वामी, जो नाकळिजसी जन्मधर्मीं।
तो तूं हें आम्ही, जाणितलें आतां ॥ १५१ ॥
तूं या कालयंत्रासि सूत्री, तूं जीवकळेची अधिष्ठात्री।
तूं ब्रह्मकटाहधात्री, हें कळलें फुडें ॥ १५२ ॥
आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिनारदस्तथा।
असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥ १३॥
पैं आणिकही एक परी, इये प्रतीतीची येतसे थोरी।
जे मागें ऐसेंचि ऋषीश्वरीं, सांगितलें तूंतें ॥ १५३ ॥
परि तया सांगितलियाचें साचपण, हें आतां माझें देखतसे अंतःकरण, जे कृपा केली आपण, म्हणोनि देवा ॥ १५४ ॥
एऱ्हवीं नारदु अखंड जवळां ये, तोही ऐसेंचि वचनीं गाये।
परि अर्थ न बुजोनि ठाये, गीतसुखचि ऐकों ॥ १५५ ॥
जी आंधळेयांचां गांवीं, आपणपें प्रगटलें रवी।
तरी तिहीं वोतपलीचि घ्यावी, वांचूनि प्रकाशु कैंचा ? ॥ १५६ ॥
येरवीं देवर्षि अध्यात्म गातां, आहाच रागांगेंसीं जे मधुरता।
तेचि फावे येर चित्ता, नलगेचि कांहीं ॥ १५७ ॥
पैं असिता देवलाचेनिहि मुखें, मी एवंविधा तूंतें आइकें।
परी तैं बुद्धि विषयविखें, घारिली होती ॥ १५८ ॥
विषयविषाचा पडिपाडू, गोड परमार्थु लागे कडू।
कडू विषय तो गोडू, जीवासी जाहला ॥ १५९ ॥
आणि हें आणिकांचें काय सांगावें, राउळा आपणचि येऊनि व्यासदेवें, तुझें स्वरूप आघवें, सर्वदा सांगिजे ॥ १६० ॥
परि तो अंधारीं चिंतामणि देखिला, जेवीं नव्हे या बुद्धी उपेक्षिला, पाठीं दिनोदयीं वोळखिला, होय म्हणौनि ॥ १६१ ॥
तैसीं व्यासादिकांचीं बोलणीं, तिया मजपाशीं चिद्रत्नांंचिया खाणी, परि उपेक्षिल्या जात होतीया तरणी, तुजवीण कृष्णा ॥ १६२ ॥
सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव।
न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥ १४॥
ते आतां वाक्यसूर्यकर तुझे फांकले, आणि ऋषीं मार्ग होते जे कथिले।
तयां आघवियांचेंचि फिटलें, अनोळखपण ॥ १६३ ॥
जी ज्ञानाचें बीज तयांचे बोल, माजीं हृदयभूमिके पडिले सखोल, वरि इये कृपेची जाहाली वोल, म्हणोनि संवादफळेंशीं उठलें ॥ १६४ ॥
अहो नारदादिकां संतां, त्यांचिया उक्तिरूप सरिता।
मी महोदधीं जालां अनंता, संवादसुखाचा ॥ १६५ ॥
प्रभु आघवेनि येणें जन्में, जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें।
तयांचीं न ठकतीचि अंगीं कामें, सद्गुुरु तुवां ॥ १६६ ॥
एऱ्हवीं वडिलवडिलांचेनि मुखें, मी सदां तूंतें कानीं आइकें।
परि कृपा न कीजेचि तुवां एकें, तंव नेणवेचि कांहीं ॥ १६७ ॥
म्हणोनि भाग्य जैं सानुकूळ, जालिया केले उद्यम सदां सफळ।
तैसें श्रुताधीत सकळ, गुरुकृपा साच ॥ १६८ ॥
जी बनकरु झाडें सिंपी जीवेंसाटीं, पाडूनि जन्में काढी आटी।
परि फळेंसी तैंचि भेटी, जैं वसंतु पावे ॥ १६९ ॥
अहो विषमा जैं वोहट पडे, तैं मधुर तें मधुर आवडे।
पैं रसायनें तैं गोडें, जैं आरोग्य देहीं ॥ १७० ॥
कां इंद्रियें वाचा प्राण, यां जालियांचे तैंचि सार्थकपण।
जैं चैतन्य येऊनि आपण, संचरे माजीं ॥ १७१ ॥
तैसें शब्दजात आलोडिलें, अथवा योगादिक जें अभ्यासिलें।
तें तैंचि म्हणों ये आपुलें, जैं सानुकूल गुरु ॥ १७२ ॥
ऐसिये जालिये प्रतीतीचेनि माजें, अर्जुन निश्चयाचि नाचतुसें भोजें, तेवींचि म्हणे देवा तुझें, वाक्य मज मानलें ॥ १७३ ॥
तरि साचचि हें कैवल्यपती, मज त्रिशुद्धी आली प्रतीती।
जे तूं देवदानवांचिये मती-, जोगा नव्हसी ॥ १७४ ॥
तुझें वाक्य व्यक्ती न येतां देवा, जो आपुलिया जाणे जाणिवा।
तो कहींचि नोहे हें सद्भा वा, भरंवसेनि आलें ॥ १७५ ॥
स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम।
भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ॥ १५॥
एथ आपुलें वाडपण जैसें, आपणचि जाणिजे आकाशें।
कां मी येतुली घनवट ऐसें, पृथ्वीचि जाणे ॥ १७६ ॥
तैसा आपुलिये सर्वशक्ती, तुज तूंचि जाणूं लक्ष्मीपती।
येर वेदादिक मती, मिरवती वायां ॥ १७७ ॥
हां गा मनातें मागां सांडावें, पवनातें वावीं मवावें।
आदिशून्य उतरोनि जावें, केउतें बाहीं ॥ १७८ ॥
तैसें हें तुझें जाणणें आहे, म्हणोनि कोणाही ठाकतें नोहे।
आतां तुझें ज्ञान होये, तुजचिजोगें ॥ १७९ ॥
जी आपणपयातें तूंचि जाणसी, आणिकातें सांगावयाही तूं समर्थ होसी।
तरी आतां एक वेळ घाम पुसीं, आर्तीचिये निडळींचा ॥ १८० ॥
हें आइकिलें कीं भूतभावना, त्रिभुवनगजपंचानना, सकळदेवदेवतार्चना, जगन्नायका ॥ १८१ ॥
जरी थोरी तुझी पाहात आहों, तरी पासीं उभे ठाकावयाही योग्य नोहों।
या शोच्यता जरी विनवूं बिहों, तरी आन उपायो नाहीं ॥ १८२ ॥
भरले समुद्रसरिता चहूंकडे, परि ते बापियासि कोरडे।
कां जैं मेघौनि थेंबुटा पडे, तैं पाणी कीं तया ॥ १८३ ॥
तैसे गुरु जी सर्वत्र आथी, परि कृष्णा आम्हां तूंचि गती।
हें असो मजप्रती, विभूती सांगें ॥ १८४ ॥
वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः।
याभिर्विभूतिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥ १६॥
जी तुझिया विभूती आघविया, परि व्यापिती शक्ति दिव्या जिया, तिया आपुलिया दावाविया, आपण मज ॥ १८५ ॥
जिहीं विभूतीं ययां समस्तां, लोकांतें व्यापूनि आहाती अनंता।
तिया प्रधाना नामांकिता, प्रगटा करीं ॥ १८६ ॥
कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन्।
केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १७॥
जी कैसें मियां तूंतें जाणावें, काय जाणोनि सदा चिंतावें।
जरी तूंचि म्हणों आघवें, तरि चिंतनचि न घडे ॥ १८७ ॥
म्हणोनि मागां भाव जैसे, आपुले सांगितले तुवां उद्देशें।
आतां विस्तारोनि तैसे, एक वेळ बोलें ॥ १८८ ॥
जयां जयां भावाचां ठायीं, तूंतें चिंतितां मज सायासु नाहीं।
तो विवळ करूनि देईं, योगु आपुला ॥ १८९ ॥
विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन।
भूयः कथय तृप्तिर्हि श्रृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥ १८॥
आणि पुसलिया जिया विभूती, त्याही बोलाविया भूतपती।
येथ म्हणसी जरी पुढती, काय सांगों ॥ १९० ॥
तरी हा भाव मना, झणें जाय हो जनार्दना।
पैं प्राकृताही अमृतपाना, ना न म्हणवे जी ॥ १९१ ॥
जे काळकूटाचें सहोदर, जें मृत्यूभेणें प्याले अमर।
तरि दिहाचे पुरंदर, चौदा जाती ॥ १९२ ॥
ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसु, जया वायांचि अमृतपणाचा आभासु, तयाचाही मीठांशु, जे पुरे म्हणों नेदी ॥ १९३ ॥
तया पाबळेयाही येतुलेवरी, गोडियेचि आथि थोरी।
मग हें तंव अवधारीं, परमामृत साचें ॥ १९४ ॥
जें मंदराचळु न ढाळितां, क्षीरसागरु न डहुळितां।
अनादि स्वभावता, आइतें आहे ॥ १९५ ॥
जें द्रव ना नव्हे बद्ध, जेथ नेणिजती रस गंध।
जें भलतयांही सिद्ध, आठवलेंचि फावे ॥ १९६ ॥
जयाची गोठीचि ऐकतखेंवो, आघवा संसारु होय वावो।
बळिया नित्यता लागे येवों, आपणपेंया ॥ १९७ ॥
जन्ममृत्यूची भाख, हारपोनि जाय निःशेख।
आंत बाहेरी महासुख, वाढोंचि लागे ॥ १९८ ॥
मग दैवगत्या जरी सेविजे, तरी तें आपणचि होऊनि ठाकिजे।
तें तुज देतां चित्त माझें, पुरें म्हणों न शके ॥ १९९ ॥
तवं तुझें नामचि आम्हां आवडे, वरि भेटी होय आणि जवळिक जोडे, पाठीं गोठी सांगसी सुरवाडें, आनंदाचेनी ॥ २०० ॥
आतां हें सुख कायिसयासारिखें, कांहीं निर्वचेना मज परितोखें।
तरि येतुलें जाणें जे येणें मुखें, पुनरुक्तही हो ॥ २०१ ॥
हां गा सूर्य काय शिळा ?, अग्नि म्हणों येत आहे वोंविळा।
कां नित्य वाहातया गंगाजळा, पारसेपण असे ॥ २०२ ॥
तुंवा स्वमुखें जें बोलिलें, हें आम्हीं नादासि रूप देखिलें।
आजि चंदनतरूचीं फुलें, तुरंबीत आहों मां ॥ २०३ ॥
या पार्थाचिया बोला, सर्वांगें कृष्ण डोलला।
म्हणे भक्तिज्ञानासि जाहला, आगरु हा ॥ २०४ ॥
ऐसा पतिकराचिया तोषा आंतु, प्रेमाचा वेगु उचंबळतु।
सायासें सांवरूनि अनंतु, काय बोले ॥ २०५ ॥
श्रीभगवानुवाच, हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः,
प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥ १९॥
मी पितामहाचा पिता, हें आठवितांही नाठवे चित्ता।
कीं म्हणतसे बा पंडुसुता, भलें केलें ॥ २०६ ॥
अर्जुनातें बा म्हणे एथ कांहीं, आम्हां विस्मो करावया कारण नाहीं, आंगें तो लेंकरूं काई, नव्हेचि नंदाचें ॥ २०७ ॥
परि प्रस्तुत ऐसें असो, हें करवी आवडीचा अतिसो।
मग म्हणे आइकें सांगतसों, धनुर्धरा ॥ २०८ ॥
तरी तुवां पुसलिया विभूती, तयांचें अपारपण सुभद्रापती।
ज्या माझियाचि परि माझिये मती, आकळती ना ॥ २०९ ॥
आंगींचिया रोमा किती, जयाचिया तयासि न गणवती।
तैसिया माझिया विभूती, असंख्य मज ॥ २१० ॥
एऱ्हवीं तरी मी कैसा केवढा, म्हणोनि आपणपयांही नव्हेचि फुडा, यालागीं प्रधाना जिया रूढा, तिया विभूती आइकें ॥ २११ ॥
जिया जाणतलियासाठीं, आघवीया जाणितलिया होती किरीटी, जैसें बीज आलिया मुठीं, तरूचि आला होय ॥ २१२ ॥
कां उद्यान हाता चढिलें, तरी आपैसीं सांपडलीं फळें फुलें।
तेवीं देखिलिया जिया देखवलें, विश्व सकळ ॥ २१३ ॥
एऱ्हवीं साचचि गा धनुर्धरा, नाहीं शेवटु माझिया विस्तारा।
पैं गगना ऐशिया अपारा, मजमाजीं लपणें ॥ २१४ ॥
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः।
अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥ २०॥
आइकें कुटिलालकमस्तका, धनुर्वेदत्र्यंबका।
मी आत्मा असें एकैका, भूतमात्राचां ठायीं ॥ २१५ ॥
आंतुलीकडे मीचि यांचा अंतःकरणीं, भूतांबाहेरी माझीच गंवसणी, आदि मी निर्वाणीं, मध्यही मीचि ॥ २१६ ॥
जैसें मेघां या तळीं वरी, एक आकाशचि आंत बाहेरी।
आणि आकाशींचि जाले अवधारीं, असणेंही आकाशीं ॥ २१७ ॥
पाठीं लया जे वेळीं जाती, ते वेळीं आकाशचि होऊनि ठाती।
तेवीं आदि स्थिती अंतगती, भूतांसि मी ॥ २१८ ॥
ऐसें बहुवस आणि व्यापकपण, माझें विभूतियोगें जाण।
तरी जीवचि करूनि श्रवण, आइकोनि आइक ॥ २१९ ॥
याहीवरी त्या विभूती, सांगणें ठेलें तुजप्रति।
सांगेन म्हणितलें तुज प्रीती, त्या प्रधाना आइकें ॥ २२० ॥
आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान।
मरीचिर्मरुतानामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥ २१॥
हें बोलोनि तो कृपावंतु, म्हणे विष्णु मी आदित्यांआंतु।
रवी मी रश्मिवंतु, सुप्रभांमाजीं ॥ २२१ ॥
मरूद्गीणांच्या वर्गीं, मरीचि म्हणे मी शारङ्गी।
चंद्र मी गगनरंगीं, तारांमाजीं ॥ २२२ ॥
वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः।
इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥ २२॥
वेदांआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु।
देवांमाजी मरुद्बंसधु, महेंद्र तो मी ॥ २२३ ॥
इंद्रियांआंतु अकरावें, मन तें मी हें जाणावें।
भूतांमाजी स्वभावें, चेतना ते मी ॥ २२४ ॥
रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम्।
वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥ २३॥
अशेषांही रुद्रांमाझारीं, शंकर जो मदनारी।
तो मी येथ न धरीं , भ्रांति कांहीं ॥ २२५ ॥
यक्षरक्षोगणांआंतु, शंभूचा सखा जो धनवंतु।
तो कुबेरु मी हें अनंतु, म्हणता जाहला ॥ २२६ ॥
मग आठांही वसूंमाझारीं, पावकु तो मी अवधारीं।
शिखराथिलियां सर्वोपरी, मेरु तो मी ॥ २२७ ॥
पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम्।
सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥ २४॥
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥ २५॥
जो स्वर्गसिंहासना सावावो, सर्वज्ञते आदीचा ठावो।
तो पुरोहितांमाजीं रावो, बृहस्पती मी ॥ २२८ ॥
त्रिभुवनींचिया सेनापतीं-, आंत स्कंदु तो मी महामती।
जो हरवीर्यें अग्निसंगती, कृत्तिकाआंतु जाहला ॥ २२९ ॥
सकळिकां सरोवरांसी, माजीं समुद्र तो मी जळराशी।
महर्षींआंतु तपोराशी, भृगु तो मी ॥ २३० ॥
अशेषांही वाचा, आंतु नटनाच सत्याचा।
तें अक्षर एक मी वैकुंठींचा, वेल्हाळु म्हणे ॥ २३१ ॥
समस्तांही यज्ञांचा पैकीं, जपयज्ञु तो मी ये लोकीं।
जो कर्मत्यागें प्रणवादिकीं, निफजविजे ॥ २३२ ॥
नामजपयज्ञु तो परम, बाधूं न शके स्ना नादि कर्म।
नामें पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थें ॥ २३३ ॥
स्थावरां गिरीवरां आंतु, पुण्यपुंज जो हिमवंतु।
तो मी म्हणे कांतु, लक्ष्मियेचा ॥ २३४ ॥
अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः।
गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ॥ २६॥
उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भिवम्।
ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ॥ २७॥
कल्पद्रुम हन पारिजातु, गुणें चंदनुही वाड विख्यातु।
तरि ययां वृक्षजातां आंतु, अश्वत्थु तो मी ॥ २३५ ॥
देवऋषींआंतु पांडवा, नारदु तो मी जाणावा।
चित्ररथु मी गंधर्वां, सकळिकांमाजीं ॥ २३६ ॥
ययां अशेषांही सिद्धां-, माजीं कपिलाचार्यु मी प्रबुद्धा।
तुरंगजातां प्रसिद्धां-, आंत उचैःश्रवा मी ॥ २३७ ॥
राजभूषण गजांआंतु, अर्जुना मी गा ऐरावतु।
पयोराशी सुरमथितु, अमृतांशु तो मी ॥ २३८ ॥
ययां नरांमाजीं राजा, तो विभूतिविशेष माझा।
जयातें सकळ लोक प्रजा, होऊनि सेविती ॥ २३९ ॥
आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक्।
प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥ २८॥
अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम्।
पितृणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥ २९॥
पैं आघवेयां हातियेरां, आंत वज्र तें मी धनुर्धरा।
जें शतमखोत्तीर्णकरा, आरूढोनि असे ॥ २४० ॥
धेनूंमध्यें कामधेनु, तें मी म्हणे विष्वक्सेनु।
जन्मवितयांआंत मदनु, तो मी जाणें ॥ २४१ ॥
सर्पकुळाआंत अधिष्ठाता, वासुकी गा मी कुंतीसुता।
नागांमाजीं समस्तां, अनंतु तो मी ॥ २४२ ॥
अगा यादसांआंतु, जो पश्चिमप्रमदेचा कांतु।
तो वरुण मी हें अनंतु, सांगत असे ॥ २४३ ॥
आणि पितृगणां समस्तां-, माजीं अर्यमा जो पितृदेवता।
तो मी हें तत्त्वता, बोलत आहें ॥ २४४ ॥
जगाचीं शुभाशुभें लिहिती, प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती।
मग केलियानुरूप होती, भोगनियम जे ॥ २४५ ॥
तयां नियमितयांमाजीं यमु, जो कर्मसाक्षी धर्मु।
तो मी म्हणे रामु, रमापती ॥ २४६ ॥
प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम्।
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥ ३०॥
अगा दैत्यांचिया कुळीं, प्रल्हादु तो मी न्याहाळीं।
म्हणौनि दैत्यभावादिमेळीं, लिंपेचिना ॥ २४७ ॥
पैं कळितयांमाजीं महाकाळु, तो मी म्हणे गोपाळु।
श्वापदांमाजीं शार्दूळु, तो मी जाण ॥ २४८ ॥
पक्षिजातिमाझारीं, गरुड तो मी अवधारीं।
यालागीं जो पाठीवरी, वाहों शके मातें ॥ २४९ ॥
पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम्।
झषाणां मकरश्चास्मि स्त्रोतसामस्मि जान्हवी ॥ ३१॥
पृथ्वीचिया पैसारा-, माजीं घडीं न लगतां धनुर्धरा।
एकेचि उड्डाणें सातांहि सागरां, प्रदक्षिणा करी जो ॥ २५० ॥
तयां वहिलियां गतिमंतां-, आंत पवनु तो मी पांडुसुता।
शस्त्रधरां समस्तां-, माजीं श्रीराम तो मी ॥ २५१ ॥
जेणें सांकडलिया धर्माचेन कैवारें, आपणपयां धनुष्य करूनि दुसरें।
विजयलक्ष्मीये एक मोहरें, केलें त्रेतीं ॥ २५२ ॥
पाठीं उभे ठाकूनि सुवेळीं, प्रतापलंकेश्वराचीं सिसाळीं।
गगनीं उदो म्हणतया हस्तबळीं, दिधली भूतां ॥ २५३ ॥
जेणें देवांचा मानु गिंवसिला, धर्मासि जीर्णोद्धारु केला।
सूर्यवंशीं उदेला, सूर्य जो कां ॥ २५४ ॥
तो हातियेरुपरजितया आंतु, रामचंद्र मी जानकीकांतु।
मकर मी पुच्छवंतु, जळचरांमाजीं ॥ २५५ ॥
पैं समस्तांही वोघां-, मध्यें जे भगीरथें आणितां गंगा।
जन्हूनें गिळिली मग जंघा, फाडूनि दिधली ॥ २५६ ॥
ते त्रिभूवनैकसरिता, जान्हवी मी पांडुसुता।
जळप्रवाहां समस्तां-, माझारीं जाणें ॥ २५७ ॥
ऐसेनि वेगळालां सृष्टीपैकीं, विभूती नाम सूतां एकेकीं।
सगळेन जन्मसहस्रें अवलोकीं, अर्ध्या नव्हती ॥ २५८ ॥
सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन।
अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥ ३२॥
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च।
अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥ ३३॥
जैसीं अवघींचि नक्षत्रें वेंचावीं, ऐसी चाड उपजेल जैं जीवीं।
तैं गगनाची बांधावी, लोथ जेवीं ॥ २५९ ॥
कां पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा, तरि भूगोलुचि काखे सुवावा।
तैसा विस्तारु माझा पहावा, तरि जाणावें मातें ॥ २६० ॥
जैसें शाखांसी फूल फळ, एकिहेळां वेटाळूं म्हणिजे सकळ।
तरी उपडूनियां मूळ, जेवीं हातीं घेपे ॥ २६१ ॥
तेवीं माझें विभूतिविशेष, जरी जाणों पाहिजेती अशेष।
तरी स्वरूप एक निर्दोष, जाणिजे माझें ॥ २६२ ॥
एऱ्हवीं वेगळालिया विभूती, कायिएक परिससी किती।
म्हणोनि एकिहेळां महामती, सर्व मी जाण ॥ २६३ ॥
मी आघवियेचि सृष्टी, आदिमध्यांतीं किरीटी।
ओतप्रोत पटीं, तंतु जेवीं ॥ २६४ ॥
ऐसिया व्यापका मातें जैं जाणावें, तैं विभूतिभेदें काय करावें।
परि हे तुझी योग्यता नव्हे, म्हणोनि असो ॥ २६५ ॥
कां जे तुवां पुसिलिया विभूती, म्हणोनि तिया आईक सुभद्रापती।
तरी आतां विद्यांमाजीं प्रस्तुतीं, अध्यात्मविद्या ते मी ॥ २६६ ॥
अगा बोलतयांचिया ठायीं, वादु तो मी पाहीं।
जो सकलशास्त्रसंमतें कहीं, सरेचिना ॥ २६७ ॥
जो निर्वचूं जातां वाढे, आइकतयां उत्प्रेक्षे सळु चढे।
जयावरी बोलतयांचीं गोडें, बोलणीं होतीं ॥ २६८ ॥
ऐसा प्रतिपादनामाजीं वादु, तो मी म्हणे गोविंदु।
अक्षरांमाजीं विशदु, अकारु तो मी ॥ २६९ ॥
पैं गा समासांमाझारीं, द्वंद्व तो मी अवधारीं।
मशकालागोनि ब्रह्मावेरीं, ग्रासिता तो मी ॥ २७० ॥
मेरुमंदरादिकीं सर्वीं, सहित पृथ्वीतें विरवी।
जो एकार्णवातेंही जिरवी, जेथिंचा तेथें ॥ २७१ ॥
जो प्रळयतेजा देत मिठी, सगळिया पवनातें गिळी किरीटी।
आकाश जयाचिया पोटीं, सामावलें ॥ २७२ ॥
ऐसा अपार जो काळु, तो मी म्हणे लक्ष्मीलीळु।
मग पुढती सृष्टीचा मेळु, सृजिता तो मी ॥ २७३ ॥
मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भमवश्च भविष्यताम्।
कीर्तिः श्रीर्वाक् च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥ ३४॥
आणि सृजिलिया भूतांतें मीचि धरीं, सकळां जीवनही मीचि अवधारीं।
शेखीं सर्वांतें या संहारीं, तेव्हां मृत्युही मीचि ॥ २७४ ॥
आतां स्त्रीगणांचां पैकीं, माझिया विभूती सात आणिकी।
तिया ऐक कवतिकीं, सांगिजतील ॥ २७५ ॥
तरी नीच नवी जे कीर्ति, अर्जुना ते माझी मूर्ती।
आणि औदार्येंसी जे संपत्ती, तेही मीचि जाणें ॥ २७६ ॥
आणि ते गा मी वाचा, जे सुखासनीं न्यायाचा।
आरूढोनि विवेकाचा, मार्गीं चाले ॥ २७७ ॥
देखिलेनि पदार्थें, जे आठवूनि दे मातें।
ते स्मृतिही पैं एथें, त्रिशुद्धी मी ॥ २७८ ॥
पैं स्वहिता अनुजायिनी, मेधा ते गा मी इये जनीं।
धृती मी त्रिभुवनीं, क्षमा ते मी ॥ २७९ ॥
एवं नारींमाझारीं, या सातही शक्ति मीचि अवधारीं।
ऐसें संसारगजकेसरी, म्हणता जाहला ॥ २८० ॥
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥ ३५॥
वेदराशीचिया सामा-, आंत बृहत्साम जें प्रियोत्तमा।
तें मी म्हणे रमा-, प्राणेश्वरु ॥ २८१ ॥
गायत्रीछंद जें म्हणिजे, तें सकळां छंदांमाजीं माझें।
स्वरूप हें जाणिजे, निभ्रांत तुवां ॥ २८२ ॥
मासांआंत मार्गशीरु, तो मी म्हणे शारङ्गधरु।
ऋतूंमाजीं कुसुमाकरु, वसंतु तो मी ॥ २८३ ॥
द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥ ३६॥
वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनंजयः।
मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥ ३७॥
छळितयां विंदाणा-, माजीं जूं तें मी विचक्षणा।
म्हणोनि चोहटां चोरी परी कवणा, निवारूं न ये ॥ २८४ ॥
अगा अशेषांही तेजसां-, आंत तेज तें मी भरंवसा।
विजयो मी कार्योद्देशां, सकळांमाजीं ॥ २८५ ॥
जेणें चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसायांत व्यवसाय।
माझें स्वरूप हें राय, सुरांचा म्हणे ॥ २८६ ॥
सत्त्वाथिलियांआंतु, सत्त्व मी म्हणे अनंतु।
यादवांमाजीं श्रीमंतु, तोचि तो मी ॥ २८७ ॥
जो देवकी-वसुदेवास्तव जाहला, कुमारीसाठीं गोकुळीं गेला।
तो मी प्राणासकट पियाला, पूतनेतें ॥ २८८ ॥
नुघडतां बाळपणाची फुली, जेणें मियां अदानवीं सृष्टि केली।
करीं गिरि धरूनि उमाणिली, महेंद्रमहिमा ॥ २८९ ॥
कालिंदीचें हृदयशल्य फेडिलें, जेणें मियां जळत गोकुळ राखिलें।
वासरुवांसाठीं लाविलें, विरंचीस पिसें ॥ २९० ॥
प्रथमदशेचिये पहांटे-, माजीं कंसा ऐशीं अचाटें।
महाधेंडीं अवचटें, लीळाचि नासिलीं ॥ २९१ ॥
हें काय कितीएक सांगावें, तुवांही देखिलें ऐकिलें असे आघवें।
तरि यादवांमाजीं जाणावें, हेंचि स्वरूप माझें ॥ २९२ ॥
आणि सोमवंशीं तुम्हां पांडवां-, माजीं अर्जुन तो मी जाणावा।
म्हणोनि एकमेकांचिया प्रेमभावा, विघडु न पडे ॥ २९३ ॥
संन्यासी तुवां होऊनि जनीं, चोरूनि नेली माझी भगिनी।
तऱ्ही विकल्पु नुपजे मनीं, मी तूं दोन्ही स्वरूप एक ॥ २९४ ॥
मुनीआंत व्यासदेवो, तो मी म्हणे यादवरावो।
कवीश्वरांमाजीं धैर्या ठावो, उशनाचार्य तो मी ॥ २९५ ॥
दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम्।
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥ ३८॥
अगा दमितयांमाझारीं, अनिवार दंडु तो मी अवधारीं।
जो मुंगियेलागोनि ब्रह्मावेरीं, नियमित पावे ॥ २९६ ॥
पैं सारासार निर्धारितयां, धर्मज्ञानाचा पक्षु धरितयां।
सकळ शास्त्रांमाजीं ययां, नीतिशास्त्र तें मी ॥ २९७ ॥
आघवियाचि गूढां-, माजीं मौन तें मी सुहाडा।
म्हणोनि न बोलतयां पुढां, स्त्रष्टाही नेण होय ॥ २९८ ॥
अगा ज्ञानियांचिया ठायीं, ज्ञान तें मी पाहीं।
आतां असो हें ययां कांहीं, पार न देखों ॥ २९९ ॥
यच्चाऽपि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन।
न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ॥ ३९॥
नान्तोऽस्ति मम दिव्यांना विभूतीनां परंतप।
एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥ ४०॥
पैं पर्जन्याचिया धारां, वरी लेख करवेल धनुर्धरा।
कां पृथ्वीचिया तृणांकुरां, होईल ठी ॥ ३०० ॥
पैं महोदधीचिया तरंगां, व्यवस्था धरूं नये जेवीं गा।
तेवीं माझिया विशेष लिंगां, नाहीं मिती ॥ ३०१ ॥
ऐशियाही सातपांच प्रधाना, विभूती सांगितलिया तुज अर्जुना।
तो हा उद्देशु जो गा मना, आहाच गमला ॥ ३०२ ॥
येरां विभूतिविस्तारांसि कांहीं, एथ सर्वथा लेख नाहीं।
म्हणौनि परिससीं तूं काई, आम्हीं सांगों किती ॥ ३०३ ॥
यालागीं एकिहेळां तुज, दाऊं आतां वर्म निज,
सर्वभूतांकुरें बीज, विरूढत असे तें मी ॥ ३०४ ॥
म्हणोनि सानें थोर न म्हणावें, उंच नीच भाव सांडावे।
एक मीचि ऐसें मानावें, वस्तुजातातें ॥ ३०५ ॥
तरी यावरी साधारण, आईक पां आणिकही खूण।
तरी अर्जुना तें तूं जाण, विभूति माझी ॥ ३०६ ॥
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम् ॥ ४१॥
जेथ जेथ संपत्ति आणि दया, दोन्ही वसती आलिया असती ठाया।
ते ते जाण धनंजया, विभूति माझी ॥ ३०७ ॥
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन।
विष्टभ्याहमिदं कृत्स्नजमेकांशेन स्थितो जगत् ॥ ४२॥
अथवा एकलें एक बिंब गगनीं, तरी प्रभा फांके त्रिभुवनीं।
तेवीं एकाकियाची सकळ जनीं, आज्ञा पाळिजे ॥ ३०८ ॥
तयांतें एकलें झणीं म्हण, ते निर्धन या भाषा नेण।
काय कामधेनूसवें सर्व साहान, चालत असे ॥ ३०९ ॥
तियेतें जें जेधवां जो मागे, तें ते एकसरेंचि प्रसवों लागे।
तेवीं विश्वविभव तया अंगें, होऊनि आहाति ॥ ३१० ॥
तयातें वोळखावया हेचि संज्ञा, जे जगें नमस्कारिजे आज्ञा।
ऐसें आथि तें जाण प्राज्ञा, अवतार माझे ॥ ३११ ॥
आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष।
कां जे मीचि एक अशेष, विश्व आहे म्हणोनि ॥ ३१२ ॥
तरी आतां साधारण आणि चांगु, ऐसा कैसेनि पां कल्पावा विभागु।
वायां आपुलियेचि मती वंगु, भेदाचा लावावा ॥ ३१३ ॥
एऱ्हवीं तरी तूप कासया घुसळावें, अमृत कां रांधूनि अर्धें करावें।
हां गा वायूसि काय पां डावें, उजवें अंग आहे ॥ ३१४ ॥
पैं सूर्यबिंबासि पोट पाठीं, पाहतां नासेल आपुली दिठी।
तेवीं माझ्या स्वरूपीं गोठी, सामान्यविशेषाची नाहीं ॥ ३१५ ॥
आणि सिनाना इहीं विभूतीं, मज अपारातें मविसील किती।
म्हणोनि किंबहुना सुभद्रापती, असो हें जाणणें ॥ ३१६ ॥
आतां पैं माझेनि एकें अंशें, हें जग व्यापिलें असे।
यालागीं भेदू सांडूनि सरिसें, साम्यें भज ॥ ३१७ ॥
ऐसें विबुधवनवसंतें, तेणें विरक्तांचेनि एकांतें।
बोलिलें जेथ श्रीमंतें, श्रीकृष्णदेवें ॥ ३१८ ॥
तेथ अर्जुन म्हणे स्वामी, येतुलें हें राभस्य बोलिलेती तुम्हीं।
जे भेदु एक आणि आम्हीं, सांडावा एकीं ॥ ३१९ ॥
हां हो सूर्य म्हणे काय जगातें, अंधारें दवडा कां परौतें।
तेवीं धसाळ म्हणों देवा तूंतें, तरी अधिक हा बोलु ॥ ३२० ॥
तुझें नांवचि एक कोण्ही वेळे, जयांचिये मुखासि कां कानां मिळे।
तयांचिया हृदयातें सांडूनि पळे, भेदु जी साच ॥ ३२१ ॥
तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें।
तरी आतां भेदु कायसा कें, देखावा कवणें ॥ ३२२ ॥
जी चंद्रबिंबाचा गाभारां, रिगालियावरीही उबारा।
परी राणेपणें शारङ्गधरा, बोला हें तुम्हीं ॥ ३२३ ॥
तेथ सावियाचि परितोषोनि देवें, अर्जुनातें आलिंगिलें जीवें।
मग म्हणे तुवां न कोपावें, आमुचिया बोला ॥ ३२४ ॥
आम्हीं तुज भेदाचिया वाहाणीं, सांगितली जे विभूतींची कहाणी।
ते अभेदें काय अंतःकरणीं, मानिली कीं न मनें ॥ ३२५ ॥
हेंचि पाहावयालागीं, नावेक बोलिलों बाहेरिसवडिया भंगीं।
तंव विभूती तुज चांगी, आलिया बोधा ॥ ३२६ ॥
येथ अर्जुन म्हणे देवें, हें आपुलें आपण जाणावें।
परी देखतसें विश्व आघवें, तुवां भरलें ॥ ३२७ ॥
पैं राया तो पांडुसुतु, ऐसिये प्रतीतीसि जाहला वरैतु।
या संजयाचिया बोला निवांतु, धृतराष्ट्र राहे ॥ ३२८ ॥
कीं संजयो दुखवलेनि अंतःकरणें, म्हणतसे नवल नव्हे दैव दवडणें।
हा जीवें धाडसा आहे मी म्हणें, तंव आंतुही आंधळा ॥ ३२९ ॥
परी असो हें तो अर्जुनु, स्वहिताचा वाढवितसे मानु।
कीं याहीवरी तया आनु, धिंवसा उपनला ॥ ३३० ॥
म्हणे हेचि हृदयाआंतुली प्रतीती, बाहेरी अवतरो कां डोळ्यांप्रती।
इये आर्तीचां पाउलीं मती, उठती जाहली ॥ ३३१ ॥
मियां इहींच दोहीं डोळां, झोंबावें विश्वरूपा सकळा।
एवढी हांव तो दैवाआगळा, म्हणऊनि करी ॥ ३३२ ॥
आजि तो कल्पतरूची शाखा, म्हणोनि वांझोळें न लगती देखा।
जें जें येईल तयाचि मुखा, तें तें साचचि करितसे येरु ॥ ३३३ ॥
जो प्रल्हादाचिया बोला, विषाहीसकट आपणचि जाहला।
तो सद्गुहरु असे जोडला, किरीटीसी ॥ ३३४ ॥
म्हणोनि विश्वरूप पुसावयालागीं, पार्थ रिगता होईल कवणें भंगीं।
तें सांगेन पुढिलिये प्रसंगीं, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ॥ ३३५
ज्ञानेश्वरी / अध्याय अकरावा : संत ज्ञानेश्वर
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ एकादशोऽध्यायः - अध्याय अकरावा,।
। विश्वरूपदर्शनयोगः।
आतां यावरी एकादशीं, कथा आहे दोहीं रसीं,
येथ पार्था विश्वरूपेंसीं, होईल भेटी ॥ १ ॥
जेथ शांताचिया घरा, अद्भुत आला आहे पाहुणेरा,
आणि येरांही रसां पांतिकरां, जाहला मानु ॥ २ ॥
अहो वधुवरांचिये मिळणीं, जैशी वराडियां लुगडीं लेणीं,
तैसे देशियेच्या सुखासनीं, मिरविले रस ॥ ३ ॥
परी शांताद्भुत बरवे, जे डोळियांच्या अंजुळीं घ्यावें,
जैसे हरिहर प्रेमभावें, आले खेंवा ॥ ४ ॥
ना तरी अंवसेच्या दिवशीं, भेटलीं बिंबें दोनी जैशीं,
तेवीं एकवळा रसीं, केला एथ ॥ ५ ॥
मीनले गंगेयमुनेचे ओघ, तैसें रसां जाहलें प्रयाग,
म्हणौनि सुस्नात होत जग, आघवें एथ ॥ ६ ॥
माजीं गीता सरस्वती गुप्त, आणि दोनी रस ते ओघ मूर्त,
यालागीं त्रिवेणी हे उचित, फावली बापा ॥ ७ ॥
एथ श्रवणाचेनि द्वारें, तीर्थीं रिघतां सोपारें,
ज्ञानदेवो म्हणे दातारें, माझेनि केलें ॥ ८ ॥
तीरें संस्कृताचीं गहनें, तोडोनि मऱ्हाठियां शब्दसोपानें,
रचिली धर्मनिधानें, श्रिइनिवृत्तिदेवें ॥ ९ ॥
म्हणौनि भलतेणें एथ सद्भावें नाहावें, प्रयागमाधव विश्वरूप पहावें,
येतुलेनि संसारासि द्यावें, तिळोदक ॥ १० ॥
हें असो ऐसें सावयव, एथ सासिन्नले आथी रसभाव,
तेथ श्रवणसुखाची राणीव, जोडली जगा ॥ ११ ॥
जेथ शांताद्भुत रोकडे, आणि येरां रसां पडप जोडे,
हें अल्पचि परी उघडें, कैवल्य एथ ॥ १२ ॥
तो हा अकरावा अध्यायो, जो देवाचा आपणपें विसंवता ठावो,
परी अर्जुन सदैवांचा रावो, जो एथही पातला ॥ १३ ॥
एथ अर्जुनचि काय म्हणों पातला, आजि आवडतयाही सुकाळु जाहला,
जे गीतार्थु हा आला, मऱ्हाठिये ॥ १४ ॥
याचिलागीं माझें, विनविलें आइकिजे,
तरी अवधान दीजे, सज्जनीं तुम्ही ॥ १५ ॥
तेवींचि तुम्हां संतांचिये सभे, ऐसी सलगी कीर करूं न लभे,
परी मानावें जी तुम्ही लोभें, अपत्या मज ॥ १६ ॥
अहो पुंसा आपणचि पढविजे, मग पढे तरी माथा तुकिजे,
कां करविलेनि चोजें न रिझे, बाळका माय ॥ १७ ॥
तेवीं मी जें जें बोलें, तें प्रभु तुमचेंचि शिकविलें,
म्हणौनि अवधारिजो आपुलें, आपण देवा ॥ १८ ॥
हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड,
तरी आतां अवधानामृतें वाड, सिंपोनि कीजे ॥ १९ ॥
मग हें रसभाव फुलीं फुलेल, नानार्थ फळभारें फळा येईल,
तुमचेनि धर्में होईल, सुरवाडु जगा ॥ २० ॥
या बोला संत रिझले, म्हणती तोषलों गा भलें केलें,
आतां सांगैं जें बोलिलें, अर्जुनें तेथ ॥ २१ ॥
तंव निवृत्तिदास म्हणे, जी कृष्णार्जुनांचें बोलणें,
मी प्राकृत काय सांगों जाणें, परी सांगवा तुम्ही ॥ २२ ॥
अहो रानींचिया पालेखाइरा, नेवाणें करविले लंकेश्वरा,
एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा, न जिणेचि काई ? ॥ २३ ॥
म्हणौनि समर्थ जें जें करी, तें न हो न ये चराचरीं,
तुम्ही संत तयापरी, बोलवा मातें ॥ २४ ॥
आतां बोलिजतसें आइका, हा गीताभाव निका,
जो वैकुंठनायका-, मुखौनि निघाला ॥ २५ ॥
बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदीं प्रतिपाद्य देवता,
तो श्रीकृष्ण वक्ता, जिये ग्रंथीं ॥ २६ ॥
तेथिंचे गौरव कैसें वानावें, जें श्रीशंभूचिये मती नागवे,
तें आतां नमस्कारिजे जीवेंभावें, हेंचि भलें ॥ २७ ॥
मग आइका तो किरीटी, घालूनि विश्वरूपीं दिठी,
पहिली कैसी गोठी, करिता जाहला ॥ २८ ॥
हें सर्वही सर्वेश्वरु, ऐसा प्रतीतिगत जो पतिकरु,
तो बाहेरी होआवा गोचरु, लोचनांसी ॥ २९ ॥
हे जिवाआंतुली चाड, परी देवासि सांगतां सांकड,
कां जें विश्वरूप गूढ, कैसेनि पुसावें ? ॥ ३० ॥
म्हणे मागां कवणीं कहीं, जें पढियंतेनें पुसिलें नाहीं,
ते सहसा कैसें काई, सांगा म्हणों ? ॥ ३१ ॥
मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहूनी अंतरंगु,
परी तेही हा प्रसंगु, बिहाली पुसों ॥ ३२ ॥
माझी आवडे तैसी सेवा जाहली, तरी काय होईल गरुडाचिया येतुली ?,
परी तोही हें बोली, करीचिना ॥ ३३ ॥
मी काय सनकादिकांहूनि जवळां, परी तयांही नागवेचि हा चाळा,
मी आवडेन काय प्रेमळां, गोकुळींचिया ऐसा ? ॥ ३४ ॥
तयांतेंही लेकुरपणें झकविलें, एकाचे गर्भवासही साहिले,
परी विश्वरूप हें राहविलें, न दावीच कवणा ॥ ३५ ॥
हा ठायवरी गुज, याचिये अंतरीचें हें निज,
केवीं उराउरी मज, पुसों ये पां ? ॥ ३६ ॥
आणि न पुसेंचि जरी म्हणे, तरी विश्वरूप देखिलियाविणें,
सुख नोहेचि परी जिणें, तेंही विपायें ॥ ३७ ॥
म्हणौनि आतां पुसों अळुमाळसें, मग करूं देवा आवडे तैसें,
येणें प्रवर्तला साध्वसें, पार्थु बोलों ॥ ३८ ॥
परी तेंचि ऐसेनि भावें, जें एका दों उत्तरांसवें,
दावी विश्वरूप आघवें, झाडा देउनी ॥ ३९ ॥
अहो वांसरूं देखिलियाचिसाठीं, धेनु खडबडोनि मोहें उठी,
मग स्तनामुखाचिये भेटी, काय पान्हा धरे ? ॥ ४० ॥
पाहा पां तया पांडवाचेनि नांवें, जो कृष्ण रानींही प्रतिपाळूं धावे,
तयांतें अर्जुनें जंव पुसावें, तंव साहील काई ? ॥ ४१ ॥
तो सहजेंचि स्नेहाचें अवतरण, आणि येरु स्नेहा घातलें आहे माजवण,
ऐसिये मिळवणी वेगळेपण, उरे हेंचि बहु ॥ ४२ ॥
म्हणौनि अर्जुनाचिया बोलासरिसा, देव विश्वरूप होईल आपैसा,
तोचि पहिला प्रसंगु ऐसा, ऐकिजे तरी ॥ ४३ ॥
अर्जुन उवाच।
मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम्।
यत्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ॥ १॥
मग पार्थु देवातें म्हणे, जी तुम्ही मजकारणें,
वाच्य केलें जें न बोलणें, कृपानिधे ॥ ४४ ॥
जैं महाभूतें ब्रह्मीं आटती, जीव महदादींचे ठाव फिटती,
तैं जें देव होऊनि ठाकती, तें विसवणें शेषींचें ॥ ४५ ॥
होतें हृदयाचिये परिवरीं, रोंविलें कृपणाचिये परी,
शब्दब्रह्मासही चोरी, जयाची केली ॥ ४६ ॥
तें तुम्हीं आजि आपुलें, मजपुढां हियें फोडिलें,
जया अध्यात्मा वोवाळिलें, ऐश्वर्य हरें ॥ ४७ ॥
ते वस्तु मज स्वामी, एकिहेळां दिधली तुम्ही,
हें बोलों तरी आम्ही, तुज पावोनि कैंचे ॥ ४८ ॥
परी साचचि महामोहाचिये पुरीं, बुडालेया देखोनि सीसवरी,
तुवां आपणपें घालोनि श्रीहरी, मग काढिलें मातें ॥ ४९ ॥
एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं,
कीं आमुचें कर्म पाहीं, जे आम्हीं आथी म्हणों ॥ ५० ॥
मी जगीं एक अर्जुनु, ऐसा देहीं वाहे अभिमानु,
आणि कौरवांतें इयां स्वजनु, आपुलें म्हणें ॥ ५१ ॥
याहीवरी यांतें मी मारीन, म्हणें तेणें पापें कें रिगेन,
ऐसें देखत होतों दुःस्वप्न, तों चेवविला प्रभु ॥ ५२ ॥
देवा गंधर्वनगरीची वस्ती, सोडूनि निघालों लक्ष्मीपती,
होतों उदकाचिया आर्ती, रोहिणी पीत ॥ ५३ ॥
जी किरडूं तरी कापडाचें, परी लहरी येत होतिया साचें,
ऐसें वायां मरतया जीवाचें, श्रेय तुवां घेतलें ॥ ५४ ॥
आपुलें प्रतिबिंब नेणता, सिंह कुहां घालील देखोनि आतां,
ऐसा धरिजे तेवीं अनंता, राखिलें मातें ॥ ५५ ॥
एऱ्हवीं माझा तरी येतुलेवरी, एथ निश्चय होता अवधारीं,
जें आतांचि सातांही सागरीं, एकत्र मिळिजे ॥ ५६ ॥
हें जगचि आघवें बुडावें, वरी आकाशहि तुटोनि पडावें,
परी झुंजणें न घडावें, गोत्रजेशीं मज ॥ ५७ ॥
ऐसिया अहंकाराचिये वाढी, मियां आग्रहजळीं दिधली होती बुडी,
चांगचि तूं जवळां एऱ्हवीं काढी, कवणु मातें ॥ ५८ ॥
नाथिलें आपण पां एक मानिलें, आणि नव्हतया नाम गोत्र ठेविलें,
थोर पिसें होतें लागलें, परि राखिलें तुम्ही ॥ ५९ ॥
मागां जळत काढिलें जोहरीं, तैं तें देहासीच भय अवधारीं,
आतां हे जोहरवाहर दुसरी, चैतन्यासकट ॥ ६० ॥
दुराग्रह हिरण्याक्षें, माझी बुद्धि वसुंधरा सूदली काखे,
मग माहार्णव गवाक्षें, रिघोनि ठेला ॥ ६१ ॥
तेथ तुझेनि गोसावीपणें, एकवेळ बुद्धीचिया ठाया येणें,
हें दुसरें वराह होणें, पडिलें तुज ॥ ६२ ॥
ऐसें अपार तुझें केलें, एकी वाचा काय मी बोलें,
परी पांचही पालव मोकलिले, मजप्रती ॥ ६३ ॥
तें कांहीं न वचेचि वायां, भलें यश फावलें देवराया,
जे साद्यंत माया, निरसिली माझी ॥ ६४ ॥
आजीं आनंदसरोवरींचीं कमळें, तैसे हे तुझे डोळे,
आपुलिया प्रसादाचीं राउळें, जयालागीं करिती ॥ ६५ ॥
हां हो तयाही आणि मोहाची भेटी, हे कायसी पाबळी गोठी ?,
केउती मृगजळाची वृष्टी, वडवानळेंसीं ? ॥ ६६ ॥
आणि मी तंव दातारा, ये कृपेचिये रिघोनि गाभारां,
घेत आहें चारा, ब्रह्मरसाचा ॥ ६७ ॥
तेणें माझा जी मोह जाये, एथ विस्मो कांहीं आहे ?,
तरी उद्धरलों कीं तुझे पाये, शिवतले आहाती ॥ ६८ ॥
भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया।
त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥ २॥
पैं कमलायतडोळसा, सूर्यकोटितेजसा,
मियां तुजपासोनि महेशा, परिसिलें आजीं ॥ ६९ ॥
इयें भूतें जयापरी होती, अथवा लया हन जैसेनि जाती,
ते मजपुढां प्रकृती, विवंचिली देवें ॥ ७० ॥
आणि प्रकृती कीर उगाणा दिधला, वरि पुरुषाचाही ठावो दाविला,
जयाचा महिमा पांघरोनि जाहला, धडौता वेदु ॥ ७१ ॥
जी शब्दराशी वाढे जिये, कां धर्मा{ऐ}शिया रत्नांतें विये,
ते एथिंचे प्रभेचे पाये, वोळगे म्हणौनि ॥ ७२ ॥
ऐसें अगाध माहात्म्य, जें सकळमार्गैकगम्य,
जें स्वात्मानुभवरम्य, तें इयापरी दाविलें ॥ ७३ ॥
जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं,
कां हातें सारूनि बाबुळीं, जळ देखिजे ॥ ७४ ॥
नातरी उकलतया सापाचे वेढे, जैसें चंदना खेंव देणें घडे,
अथवा विवसी पळे मग चढे, निधान हातां ॥ ७५ ॥
तैसी प्रकृती हे आड होती, ते देवेंचि सारोनि परौती,
मग परतत्त्व माझिये मती, शेजार केलें ॥ ७६ ॥
म्हणौनि इयेविषयींचा मज देवा, भरंवसा कीर जाहला जीवा,
परी आणीक एक हेवा, उपनला असे ॥ ७७ ॥
तो भिडां जरी म्हणों राहों, तरी आना कवणा पुसों जावों,
काय तुजवांचोनि ठावो, जाणत आहों आम्ही ? ॥ ७८ ॥
जळचरु जळाचा आभारु धरी, बाळक स्तनपानीं उपरोधु करी,
तरी तया जिणया श्रीहरी, आन उपायो असे ? ॥ ७९ ॥
म्हणौनि भीड सांकडी न धरवे, जीवा आवडे तेंही तुजपुढां बोलावें,
तंव राहें म्हणितलें देवें, चाड सांगैं ॥ ८० ॥
एवमेतद्यथाऽऽत्थ त्वमात्मानं परमेश्वर।
द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम ॥ ३॥
मग बोलिला तो किरीटी, म्हणे तुम्हीं केली जे गोठी,
तिया प्रतीतीची दिठी, निवाली माझी ॥ ८१ ॥
आतां जयाचेनि संकल्पें, हे लोकपरंपरा होय हारपे,
जया ठायातें आपणपें, मी ऐसें म्हणसी ॥ ८२ ॥
तें मुद्दल रूप तुझें, जेथूनि इयें द्विभुजें हन चतुर्भुजें,
सुरकार्याचेनि व्याजें, घेवों घेवों येसी ॥ ८३ ॥
पैं जळशयनाचिया अवगणिया, कां मत्स्य कूर्म इया मिरवणिया,
खेळु सरलिया तूं गुणिया, सांठविसी जेथ ॥ ८४ ॥
उपनिषदें जें गाती, योगिये हृदयीं रिगोनि पाहाती,
जयातें सनकादिक आहाती, पोटाळुनियां ॥ ८५ ॥
ऐसें अगाध जें तुझें, विश्वरूप कानीं ऐकिजे,
तें देखावया चित्त माझें, उतावीळ देवा ॥ ८६ ॥
देवें फेडूनियां सांकड, लोभें पुसिली जरी चाड,
तरी हेंचि एकीं वाड, आर्तीं जी मज ॥ ८७ ॥
तुझें विश्वरूपपण आघवें, माझिये दिठीसि गोचर होआवें,
ऐसी थोर आस जीवें, बांधोनि आहें ॥ ८८ ॥
मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो।
योगेश्वर ततो मे त्वं दर्शयाऽत्मानमव्ययम् ॥ ४॥
परी आणीक एक एथ शारङ्गी, तुज विश्वरूपातें देखावयालागीं,
पैं योग्यता माझिया आंगीं, असे कीं नाहीं ॥ ८९ ॥
हें आपलें आपण मी नेणें, तें कां नेणसी जरी देव म्हणे,
तरी सरोगु काय जाणे, निदान रोगाचें ? ॥ ९० ॥
आणि जी आर्तीचेनि पडिभरें, आर्तु आपुली ठाकी पैं विसरे,
जैसा तान्हेला म्हणे न पुरे, समुद्र मज ॥ ९१ ॥
ऐशा सचाडपणाचिये भुली, न सांभाळवे समस्या आपुली,
यालागीं योग्यता जेवीं माउली, बालकाची जाणे ॥ ९२ ॥
तयापरी श्रीजनार्दना, विचारिजो माझी संभावना,
मग विश्वरूपदर्शना, उपक्रम कीजे ॥ ९३ ॥
तरी ऐसी ते कृपा करा, एऱ्हवीं नव्हे हें म्हणा अवधारा,
वायां पंचमालापें बधिरा, सुख केउतें देणें ? ॥ ९४ ॥
एऱ्हवीं येकले बापियाचे तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे ?,
परी जहालीही वृष्टि उपखे, जऱ्ही खडकीं होय ॥ ९५ ॥
चकोरा चंद्रामृत फावलें, येरा आण वाहूनि काय वारिलें ?,
परी डोळ्यांवीण पाहलें, वायां जाय ॥ ९६ ॥
म्हणौनि विश्वरूप तूं सहसा, दाविसी कीर हा भरवंसा,
कां जे कडाडां आणि गहिंसा-, माजी नीत्य नवा तूं कीं ॥ ९७ ॥
तुझें औदार्य जाणों स्वतंत्र, देतां न म्हणसी पात्रापात्र,
पैं कैवल्या ऐसें पवित्र, जें वैरियांही दिधलें ॥ ९८ ॥
मोक्षु दुराराध्यु कीर होय, परी तोही आराधी तुझे पाय,
म्हणौनि धाडिसी तेथ जाय, पाइकु जैसा ॥ ९९ ॥
तुवां सनकादिकांचेनि मानें, सायुज्यीं सौरसु दिधला पूतने,
जे विषाचेनि स्तनपानें, मारूं आली ॥ १०० ॥
हां गा राजसूय यागाचिया सभासदीं, देखतां त्रिभुवनाची मांदी,
कैसा शतधा दुर्वाक्य शब्दीं, निस्तेजिलासी ॥ १०१ ॥
ऐशिया अपराधिया शिशुपाळा, आपणपें ठावो दिधला गोपाळा,
आणि उत्तानचरणाचिया बाळा, काय ध्रुवपदीं चाड ? ॥ १०२ ॥
तो वना आला याचिलागीं, जे बैसावें पितयाचिया उत्संगीं,
कीं तो चंद्रसूर्यादिकांपरिस जगीं, श्लाघ्यु केला ॥ १०३ ॥
ऐसा वनवासिया सकळां, देतां एकचि तूं धसाळा,
पुत्रा आळवितां अजामिळा, आपणपें देसी ॥ १०४ ॥
जेणें उरीं हाणितलासि पांपरा, तयाचा चरणु वाहासी दातारा,
अझुनी वैरियांचिया कलेवरा, विसंबसीना ॥ १०५ ॥
ऐसा अपकारियां तुझा उपकारु, तूं अपात्रींही परी उदारु,
दान म्हणौनि दारवंठेकरु, जाहलासी बळीचा ॥ १०६ ॥
तूंतें आराधी ना आयकें, होती पुंसा बोलावित कौतुकें,
तिये वैकुंठीं तुवां गणिके, सुरवाडु केला ॥ १०७ ॥
ऐसीं पाहूनि वायाणीं मिषें, आपणपें देवों लागसी वानिवसें,
तो तूं कां अनारिसें, मजलागीं करिसी ॥ १०८ ॥
हां गा दुभतयाचेनि पवाडें, जे जगाचें फेडी सांकडें,
तिये कामधेनूचे पाडे, काय भुकेले ठाती ? ॥ १०९ ॥
म्हणौनि मियां जें विनविलें कांहीं, तें देव न दाखविती हें कीर नाहीं,
परी देखावयालागीं देईं, पात्रता मज ॥ ११० ॥
तुझें विश्वरूप आकळे, ऐसे जरी जाणसी माझे डोळे,
तरी आर्तीचे डोहळे, पुरवीं देवा ॥ १११ ॥
ऐसी ठायेंठावो विनंती, जंव करूं सरला सुभद्रापती,
तंव तया षड्गुणचक्रवर्ती, साहवेचिना ॥ ११२ ॥
तो कृपापीयूषसजळु, आणि येरु जवळां आला वर्षाकाळु,
नाना कृष्ण कोकिळु, अर्जुन वसंतु ॥ ११३ ॥
नातरी चंद्रबिंब वाटोळें, देखोनि क्षीरसागर उचंबळे,
तैसा दुणेंही वरी प्रेमबळें, उल्लसितु जाहला ॥ ११४ ॥
मग तिये प्रसन्नतेचेनि आटोपें, गाजोनि म्हणितलें सकृपें,
पार्था देख देख अमुपें, स्वरूपें माझीं ॥ ११५ ॥
एक विश्वरूप देखावें, ऐसा मनोरथु केला पांडवें,
कीं विश्वरूपमय आघवें, करूनि घातलें ॥ ११६ ॥
बाप उदार देवो अपरिमितु, याचक स्वेच्छा सदोदितु,
असे सहस्रवरी देतु, सर्वस्व आपुलें ॥ ११७ ॥
अहो शेषाचेहि डोळे चोरिले, वेद जयालागीं झकविले,
लक्ष्मीयेही राहविलें, जिव्हार जें ॥ ११८ ॥
तें आतां प्रकटुनी अनेकधा, करीत विश्वरूपदर्शनाचा धांदा,
बाप भाग्या अगाधा, पार्थाचिया ॥ ११९ ॥
जो जागता स्वप्नावस्थे जाये, तो जेवीं स्वप्नींचें आघवें होये,
तेवीं अनंत ब्रह्मकटाह आहे, आपणचि जाहला ॥ १२० ॥
ते सहसा मुद्रा सोडिली, आणि स्थूळदृष्टीची जवनिका फेडिली,
किंबहुना उघडिली, योगऋद्धी ॥ १२१ ॥
परी हा हें देखेल कीं नाहीं, ऐसी सेचि न करी कांहीं,
एकसरां म्हणतसे पाहीं, स्नेहातुर ॥ १२२ ॥
श्रीभगवानुवाच।
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः।
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥ ५॥
अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें, आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें,
आतां देखें आघवें भरिलें, माझ्याचि रूपीं ॥ १२३ ॥
एकें कृशें एकें स्थूळें, एकें ऱ्हस्वें एकें विशाळें,
पृथुतरें सरळें, अप्रांतें एकें ॥ १२४ ॥
एकें अनावरें प्रांजळें, सव्यापारें एकें निश्चळें,
उदासीनें स्नेहाळें, तीव्रें एकें ॥ १२५ ॥
एके घूर्णितें सावधें, असलगें एकें अगाधें,
एकें उदारें अतिबद्धें, क्रुद्धें एकें ॥ १२६ ॥
एकें शांतें सन्मदें, स्तब्धें एकें सानंदें,
गर्जितें निःशब्दें, सौम्यें एकें ॥ १२७ ॥
एकें साभिलाषें विरक्तें, उन्निद्रितें एकें निद्रितें,
परितुष्टें एकें आर्तें, प्रसन्नें एकें ॥ १२८ ॥
एकें अशस्त्रें सशस्त्रें, एकें रौद्रें अतिमित्रें,
भयानकें एकें पवित्रें, लयस्थें एकें ॥ १२९ ॥
एकें जनलीलाविलासें, एकें पालनशीलें लालसें,
एकें संहारकें सावेशें, साक्षिभूतें एकें ॥ १३० ॥
एवं नानाविधें परी बहुवसें, आणि दिव्यतेजप्रकाशें,
तेवींचि एक{ए}का ऐसें, वर्णेंही नव्हे ॥ १३१ ॥
एकें तातलें साडेपंधरें, तैसीं कपिलवर्णें अपारें,
एकें सर्वांगीं जैसें सेंदुरें, डवरलें नभ ॥ १३२ ॥
एकें सावियाचि चुळुकीं, जैसें ब्रह्मकटाह खचिलें माणिकीं,
एकें अरुणोदयासारिखीं, कुंकुमवर्णें ॥ १३३ ॥
एकें शुद्धस्फटिकसोज्वळें, एकें इंद्रनीळसुनीळें,
एकें अंजनवर्णें सकाळें, रक्तवर्णें एकें ॥ १३४ ॥
एकें लसत्कांचनसम पिंवळीं, एकें नवजलदश्यामळीं,
एकें चांपेगौरीं केवळीं, हरितें एकें ॥ १३५ ॥
एकें तप्तताम्रतांबडीं, एकें श्वेतचंद्र चोखडीं,
ऐसीं नानावर्णें रूपडीं, देखें माझीं ॥ १३६ ॥
हे जैसे कां आनान वर्ण, तैसें आकृतींही अनारिसेपण,
लाजा कंदर्प रिघाला शरण, तैसीं सुंदरें एकें ॥ १३७ ॥
एकें अतिलावण्यसाकारें, एकें स्निग्धवपु मनोहरें,
शृंगारश्रियेचीं भांडारें, उघडिली जैसीं ॥ १३८ ॥
एकें पीनावयवमांसाळें, एकें शुष्कें अति विक्राळें,
एकें दीर्घकंठें विताळें, विकटें एकें ॥ १३९ ॥
एवं नानाविधाकृती, इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती,
ययांच्या एकेकीं अंगप्रांतीं, देख पां जग ॥ १४० ॥
पश्यादित्यान्वसून्रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा।
बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत ॥ ६॥
जेथ उन्मीलन होत आहे दिठी, तेथ पसरती आदित्यांचिया सृष्टी,
पुढती निमीलनीं मिठीं, देत आहाती ॥ १४१ ॥
वदनींचिया वाफेसवें, होत ज्वाळामय आघवें,
जेथ पावकादिक पावे, समूह वसूंचा ॥ १४२ ॥
आणि भ्रूलतांचे शेवट, कोपें मिळों पाहतीं एकवट,
तेथ रुद्रगणांचे संघाट, अवतरत देखें ॥ १४३ ॥
पैं सौम्यतेचा बोलावा, मिती नेणिजे अश्विनौदेवां,
श्रोत्रीं होती पांडवा, अनेक वायु ॥ १४४ ॥
यापरी एकेकाचिये लीळे, जन्मती सुरसिद्धांचीं कुळें,
ऐसीं अपारें आणि विशाळें, रूपें इयें पाहीं ॥ १४५ ॥
जयांतें सांगावया वेद बोबडे, पहावया काळाचेंही आयुष्य थोकडें,
धातयाही परी न सांपडे, ठाव जयांचा ॥ १४६ ॥
जयांतें देवत्रयी कधीं नायके, तियें इयें प्रत्यक्ष देख अनेकें,
भोगीं आश्चर्याची कवतिकें, महासिद्धी ॥ १४७ ॥
इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम्।
मम देहे गुडाकेश यच्चान्यद्दृष्टुमिच्छसि ॥ ७॥
इया मूर्तीचिया किरीटी, रोममूळीं देखें पां सृष्टी,
सुरतरुतळवटीं, तृणांकुर जैसे ॥ १४८ ॥
चंडवाताचेनि प्रकाशें, उडत परमाणु दिसती जैसे,
भ्रमत ब्रह्मकटाह तैसें, अवयवसंधीं ॥ १४९ ॥
एथ एकैकाचिया प्रदेशीं, विश्व देख विस्तारेंशी,
आणि विश्वाही परौतें मानसीं, जरी देखावें वर्ते ॥ १५० ॥
तरी इयेही विषयींचें कांहीं, एथ सर्वथा सांकडें नाहीं,
सुखें आवडे तें माझिया देहीं, देखसी तूं ॥ १५१ ॥
ऐसें विश्वमूर्ती तेणें, बोलिलें कारुण्यपूर्णें,
तंव देखत आहे कीं नाहीं न म्हणे, निवांतुचि येरु ॥ १५२ ॥
एथ कां पां हा उगला ?, म्हणौनि श्रीकृष्णें जंव पाहिला,
तंव आर्तीचें लेणें लेइला, तैसाचि आहे ॥ १५३ ॥
न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा।
दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् ॥ ८॥
मग म्हणें उत्कंठे वोहट न पडे, अझुनी सुखाची सोय न सांपडे,
परी दाविलें तें फुडें, नाकळेचि यया ॥ १५४ ॥
हे बोलोनि देवो हांसिले, हांसोनि देखणियातें म्हणितलें,
आम्हीं विश्वरूप तरी दाविलें, परी न देखसीच तूं ॥ १५५ ॥
यया बोला येरें विचक्षणें, म्हणितलें हां जी कवणासी तें उणें ?,
तुम्ही बकाकरवीं चांदिणें, चरऊं पहा मा ॥ १५६ ॥
हां हो उटोनियां आरिसा, आंधळिया दाऊं बैसा,
बहिरियापुढें हृषीकेशा, गाणीव करा ॥ १५७ ॥
मकरंदकणाचा चारा, जाणतां घालूनि दर्दुरा,
वायां धाडा शारङ्गधरा, कोपा कवणा ॥ १५८ ॥
जें अतींद्रिय म्हणौनि व्यवस्थिलें, केवळ ज्ञानदृष्टीचिया भागा फिटलें,
तें तुम्हीं चर्मचक्षूंपुढें सूदलें, मी कैसेनि देखें ॥ १५९ ॥
परी हें तुमचें उणें न बोलावें, मीचि साहें तेंचि बरवें,
एथ आथि म्हणितलें देवें, मानूं बापा ॥ १६० ॥
साच विश्वरूप जरी आम्ही दावावें, तरी आधीं देखावया सामर्थ्य कीं द्यावें,
परी बोलत बोलत प्रेमभावें, धसाळ गेलों ॥ १६१ ॥
काय जाहलें न वाहतां भुई पेरिजे, तरी तो वेलु विलया जाइजे,
तरी आतां माझें निजरूप देखिजे, तें दृष्टी देवों तुज ॥ १६२ ॥
मग तिया दृष्टी पांडवा, आमुचा ऐश्वर्ययोगु आघवा,
देखोनियां अनुभवा, माजिवडा करीं ॥ १६३ ॥
ऐसें तेणें वेदांतवेद्यें, सकळ लोक आद्यें,
बोलिलें आराध्यें, जगाचेनि ॥ १६४ ॥
संजय उवाच।
एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः।
दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् ॥ ९॥
पैं कौरवकुलचक्रवर्ती, मज हाचि विस्मयो पुढतपुढती,
जे श्रियेहूनि त्रिजगतीं, सदैव असे कवणी ? ॥ १६५ ॥
ना तरी खुणेचें वानावयालागीं, श्रुतीवांचूनि दावा पां जगीं,
ना सेवकपण तरी आंगीं, शेषाच्याचि आथी ॥ १६६ ॥
हां हो जयाचेनि सोसें, शिणत आठही पहार योगी जैसे,
अनुसरलें गरुडा{ऐ}सें, कवण आहे ? ॥ १६७ ॥
परी तें आघवेंचि एकीकडे ठेलें, सापें कृष्णसुख एकंदरें जाहलें,
जिये दिवूनि जन्मले, पांडव हे ॥ १६८ ॥
परी पांचांही आंतु अर्जुना, श्रीकृष्ण सावियाचि जाहला अधीना,
कामुक कां जैसा अंगना, आपैता कीजे ॥ १६९ ॥
पढविलें पाखरूं ऐसें न बोले, यापरी क्रीडामृगही तैसा न चले,
कैसें दैव एथें सुरवाडलें, तें जाणों न ये ॥ १७० ॥
आजि हें परब्रह्म सगळें, भोगावया सदैव याचेचि डोळे,
कैसे वाचेनि हन लळे, पाळीत असे ॥ १७१ ॥
हा कोपे कीं निवांतु साहे, हा रुसे तरी बुझावीत जाये,
नवल पिसें लागलें आहे, पार्थाचें देवा ॥ १७२ ॥
एऱ्हवीं विषय जिणोनि जन्मले, जे शुकादिक दादुले,
ते विषयोचि वानितां जाहले, भाट ययाचें ॥ १७३ ॥
हा योगियांचें समाधिधन, कीं होऊनि ठेले पार्थाआधीन,
यालागीं विस्मयो माझें मन, करीतसे राया ॥ १७४ ॥
तेवींचि संजय म्हणे कायसा, विस्मयो एथें कौरवेशा,
श्रीकृष्णें स्वीकारिजे तया ऐसा, भाग्योदय होय ॥ १७५ ॥
म्हणौनि तो देवांचा रावो, म्हणे पार्थाते तुज दृष्टि देवों,
जया विश्वरूपाचा ठावो, देखसी तूं ॥ १७६ ॥
ऐसी श्रीमुखौनि अक्षरें, निघती ना जंव एकसरें,
तंव अविद्येचे आंधारें, जावोंचि लागे ॥ १७७ ॥
तीं अक्षरें नव्हती देखा, ब्रह्मसाम्राज्यदीपिका,
अर्जुनालागीं चित्कळिका, उजळलिया श्रीकृष्णें ॥ १७८ ॥
मग दिव्यचक्षुप्रकाशु प्रगटला, तया ज्ञानदृष्टी फांटा फुटला,
ययापरी दाविता जाहला, ऐश्वर्य आपुलें ॥ १७९ ॥
हे अवतार जे सकळ, ते जिये समुद्रींचे कां कल्लोळ,
विश्व हें मृगजळ, जया रश्मीस्तव दिसे ॥ १८० ॥
जिये अनादिभूमिके निटे, चराचर हें चित्र उमटे,
आपणपें श्रीवैकुंठें, दाविलें तया ॥ १८१ ॥
मागां बाळपणीं येणें श्रीपती, जैं एक वेळ खादली होती माती,
तैं कोपोनियां हातीं, यशोदां धरिला ॥ १८२ ॥
मग भेणें भेणें जैसें, मुखीं झाडा द्यावयाचेनि मिसें,
चवदाही भुवनें सावकाशें, दाविलीं तिये ॥ १८३ ॥
ना तरी मधुवनीं ध्रुवासि केलें, जैसें कपोल शंखें शिवतलें,
आणि वेदांचियेही मतीं ठेलें, तें लागला बोलों ॥ १८४ ॥
तैसा अनुग्रहो पैं राया, श्रीहरी केला धनंजया,
आतां कवणेकडेही माया, ऐसी भाष नेणेंचि तो ॥ १८५ ॥
एकसरें ऐश्वर्यतेजें पाहलें, तया चमत्काराचें एकार्णव जाहलें,
चित्त समाजीं बुडोनि ठेलें, विस्मयाचिया ॥ १८६ ॥
जैसा आब्रह्म पूर्णोदकीं, पव्हे मार्कंडेय एकाकीं,
तैसा विश्वरूप कौतुकीं, पार्थु लोळे ॥ १८७ ॥
म्हणे केवढें गगन एथ होतें, तें कवणें नेलें पां केउतें,
तीं चराचर महाभूतें, काय जाहलीं ? ॥ १८८ ॥
दिशांचे ठावही हारपले, आधोर्ध्व काय नेणों जाहले,
चेइलिया स्वप्न तैसे गेले, लोकाकार ॥ १८९ ॥
नाना सूर्यतेजप्रतापें, सचंद्र तारांगण जैसें लोपे,
तैसीं गिळिलीं विश्वरूपें, प्रपंचरचना ॥ १९० ॥
तेव्हां मनासी मनपण न स्फुरे, बुद्धि आपणपें न सांवरें,
इंद्रियांचे रश्मी माघारे, हृदयवरी भरले ॥ १९१ ॥
तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडिलें, टकासी टक लागले,
जैसें मोहनास्त्र घातलें, विचारजातां ॥ १९२ ॥
तैसा विस्मितु पाहे कोडें, तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें,
तेंचि नानारूप चहूंकडे, मांडोनि ठेलें ॥ १९३ ॥
जैसें वर्षाकाळींचे मेघौडे, कां महाप्रळयींचें तेज वाढे,
तैसें आपणावीण कवणीकडे, नेदीचि उरों ॥ १९४ ॥
प्रथम स्वरूपसमाधान, पावोनि ठेला अर्जुन,
सवेचि उघडी लोचन, तंव विश्वरूप देखें ॥ १९५ ॥
इहींचि दोहीं डोळां, पाहावें विश्वरूपा सकळा,
तो श्रीकृष्णें सोहळा, पुरविला ऐसा ॥ १९६ ॥
अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम्।
अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् ॥ १०॥
मग तेथ सैंघ देखे वदनें, जैसी रमानायकाचीं राजभुवनें,
नाना प्रगटलीं निधानें, लावण्यश्रियेचीं ॥ १९७ ॥
कीं आनंदाची वनें सासिन्नलीं, जैसी सौंदर्या राणीव जोडली,
तैसीं मनोहरें देखिलीं, हरीचीं वक्त्रें ॥ १९८ ॥
तयांही माजीं एकैकें, सावियाचि भयानकें,
काळरात्रीचीं कटकें, उठवलीं जैसीं ॥ १९९ ॥
कीं मृत्यूसीचि मुखें जाहलीं, हो कां जें भयाचीं दुर्गें पन्नासिलीं,
कीं महाकुंडें उघडलीं, प्रळयानळाचीं ॥ २०० ॥
तैसीं अद्भुतें भयासुरें, तेथ वदनें देखिलीं वीरें,
आणिकें असाधारणें साळंकारें, सौम्यें बहुतें ॥ २०१ ॥
पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें, परी वदनांचा शेवटु न टके,
मग लोचन तें कवतिकें, लागला पाहों ॥ २०२ ॥
तंव नानावर्णें कमळवनें, विकासिलीं तैसे अर्जुनें,
डोळे देखिले पालिंगनें, आदित्यांचीं ॥ २०३ ॥
तेथेंचि कृष्णमेघांचिया दाटी-, माजीं कल्पांत विजूंचिया स्फुटी,
तैसिया वन्हि पिंगळा दिठी, भ्रूभंगातळीं ॥ २०४ ॥
हें एकैक आश्चर्य पाहतां, तिये एकेचि रूपीं पंडुसुता,
दर्शनाची अनेकता, प्रतिफळली ॥ २०५ ॥
मग म्हणे चरण ते कवणेकडे, केउते मुकुट कें दोर्दंडें,
ऐसी वाढविताहे कोडें, चाड देखावयाची ॥ २०६ ॥
तेथ भाग्यनिधि पार्था, कां विफलत्व होईल मनोरथा,
काय पिनाकपाणीचिया भातां, वायकांडीं आहाती ? ॥ २०७ ॥
ना तरी चतुराननाचिये वाचे, काय आहाती लटिकिया अक्षरांचे साचे ?,
म्हणौनि साद्यंतपण अपारांचे, देखिलें तेणें ॥ २०८ ॥
जयाची सोय वेदां नाकळे, तयाचे सकळावयव एकेचि वेळे,
अर्जुनाचे दोन्ही डोळे, भोगिते जाहले ॥ २०९ ॥
चरणौनि मुकुटवरी, देखत विश्वरूपाची थोरी,
जे नाना रत्न अळंकारीं, मिरवत असे ॥ २१० ॥
परब्रह्म आपुलेनि आंगें, ल्यावया आपणचि जाहला अनेगें,
तियें लेणीं मी सांगें, काइसयासारिखीं ॥ २११ ॥
जिये प्रभेचिये झळाळा, उजाळु चंद्रादित्यमंडळा,
जे महातेजाचा जिव्हाळा, जेणें विश्व प्रगटे ॥ २१२ ॥
तो दिव्यतेज शृंगारु, कोणाचिये मतीसी होय गोचरु,
देव आपणपेंचि लेइले ऐसें वीरु, देखत असे ॥ २१३ ॥
मग तेथेंचि ज्ञानाचिया डोळां, पहात करपल्लवां जंव सरळा,
तंव तोडित कल्पांतींचिया ज्वाळा, तैसीं शस्त्रें झळकत देखे ॥ २१४ ॥
आपण आंग आपण अलंकार, आपण हात आपण हतियार,
आपण जीव आपण शरीर, देखें चराचर कोंदलें देवें ॥ २१५ ॥
जयाचिया किरणांचे निखरपणें, नक्षत्रांचे होत फुटाणे,
तेजें खिरडला वन्हि म्हणे, समुद्रीं रिघों ॥ २१६ ॥
मग कालकूटकल्लोळीं कवळिलें, नाना महाविजूंचें दांग उमटलें,
तैसे अपार कर देखिले, उदितायुधीं ॥ २१७ ॥
दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम्।
सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ॥ ११॥
कीं भेणें तेथूनि काढिली दिठी, मग कंठमुगुट पहातसे किरीटी,
तंव सुरतरूची सृष्टी, जयांपासोनि कां जाहली ॥ २१८ ॥
जिये महासिद्धींचीं मूळपीठें, शिणली कमळा जेथ वावटे,
तैसीं कुसुमें अति चोखटें, तुरंबिलीं देखिलीं ॥ २१९ ॥
मुगुटावरी स्तबक, ठायीं ठायीं पूजाबंध अनेक,
कंठीं रुळताति अलौकिक, माळादंड ॥ २२० ॥
स्वर्गें सूर्यतेज वेढिलें, जैसें पंधरेनें मेरूतें मढिलें,
तैसें नितंबावरी गाढिलें, पीतांबरु झळके ॥ २२१ ॥
श्रीमहादेवो कापुरें उटिला, कां कैलासु पारजें डवरिला,
नाना क्षीरोदकें पांघरविला, क्षीरार्णवो जैसा ॥ २२२ ॥
जैसी चंद्रमयाची घडी उपलविली, मग गगनाकरवीं बुंथी घेवविली,
तैसीं चंदनपिंजरी देखिली, सर्वांगीं तेणें ॥ २२३ ॥
जेणें स्वप्रकाशा कांतीं चढे, ब्रह्मानंदाचा निदाघु मोडे,
जयाचेनि सौरभ्यें जीवित जोडे, वेदवतीये ॥ २२४ ॥
जयाचे निर्लेप अनुलेपु करी, जे अनंगुही सर्वांगीं धरी,
तया सुगंधाची थोरी, कवण वानी ? ॥ २२५ ॥
ऐसी एकैक शृंगारशोभा, पाहतां अर्जुन जातसें क्षोभा,
तेवींचि देवो बैसला कीं उभा, का शयालु हें नेणवें ॥ २२६ ॥
बाहेर दिठी उघडोनि पाहे, तंव आघवें मूर्तिमय देखत आहे,
मग आतां न पाहें म्हणौनि उगा राहे, तरी आंतुही तैसेंचि ॥ २२७ ॥
अनावरें मुखें समोर देखे, तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके,
तंव तयाहीकडे श्रीमुखें, करचरण तैसेचि ॥ २२८ ॥
अहो पाहतां कीर प्रतिभासे, एथ नवलावो काय असे ?,
परि न पाहतांही दिसे, चोज आइका ॥ २२९ ॥
कैसें अनुग्रहाचें करणें, पार्थाचें पाहणें आणि न पाहणें,
तयाही सकट नारायणें, व्यापूनि घेतलें ॥ २३० ॥
म्हणौनि आश्चर्याच्या पुरीं एकीं, पडिला ठायेठाव थडीं ठाकी,
तंव चमत्काराचिया आणिकीं, महार्णवीं पडे ॥ २३१ ॥
तैसा अर्जुनु असाधारणें, आपुलिया दर्शनाचेनि विंदाणें,
कवळूनि घेतला तेणें, अनंतरूपें ॥ २३२ ॥
तो विश्वतोमुख स्वभावें, आणि तेचि दावावयालागीं पांडवें,
प्रार्थिला आतां आघवें, होऊनि ठेला ॥ २३३ ॥
आणि दीपें कां सूर्यें प्रगटे, अथवा निमुटलिया देखावेंचि खुंटे,
तैसी दिठी नव्हे जे वैकुंठें, दिधली आहे ॥ २३४ ॥
म्हणौनि किरीटीसि दोहीं परी, तें देखणें देखें अंधारी,
हें संजयो हस्तिनापुरीं, सांगतसे राया ॥ २३५ ॥
म्हणे किंबहुना अवधारिलें, पार्थें विश्वरूप देखिलें,
नाना आभरणीं भरलें, विश्वतोमुख ॥ २३६ ॥
दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता।
यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥ १२॥
तिये अंगप्रभेचा देवा, नवलावो काइसया ऐसा सांगावा,
कल्पांतीं एकुचि मेळावा, द्वादशादित्यांचा होय ॥ २३७ ॥
तैसे ते दिव्यसूर्य सहस्रवरी, जरी उदयजती कां एकेचि अवसरीं,
तऱ्ही तया तेजाची थोरी, उपमूं नये ॥ २३८ ॥
आघवयाचि विजूंचा मेळावा कीजे, आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे,
तेवींचि दशकुही मेळविजे, महातेजांचा ॥ २३९ ॥
तऱ्ही तिये अंगप्रभेचेनि पाडें, हें तेज कांहीं कांहीं होईल थोडें,
आणि तया ऐसें कीर चोखडें, त्रिशुद्धी नोहे ॥ २४० ॥
ऐसें महात्म्य या श्रीहरीचें सहज, फांकतसे सर्वांगीचें तेज,
तें मुनिकृपा जी मज, दृष्ट जाहलें ॥ २४१ ॥
तत्रैकस्थं जगत्कृत्स्नम् प्रविभक्तमनेकधा ॥
अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा ॥ १३॥
आणि तिये विश्वरूपीं एकीकडे, जग आघवें आपुलेनि पवाडें,
जैसे महोदधीमाजीं बुडबुडे, सिनानें दिसती ॥ २४२ ॥
कां आकाशीं गंधर्वनगर, भूतळीं पिपीलिका बांधे घर,
नाना मेरुवरी सपूर, परमाणु बैसले ॥ २४३ ॥
विश्व आघवेंचि तयापरी, तया देवचक्रवर्तीचिया शरीरीं,
अर्जुन तिये अवसरीं, देखता जाहला ॥ २४४ ॥
ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः।
प्रणम्य शिरसा देवं कृताझ्जलिरभाषत ॥ १४॥
तेथ एक विश्व एक आपण, ऐसें अळुमाळ होतें जें दुजेपण,
तेंही आटोनि गेलें अंतःकरण, विरालें सहसा ॥ २४५ ॥
आंतु आनंदा चेइरें जाहलें, बाहेरि गात्रांचें बळ हारपोनि गेलें,
आपाद पां गुंतलें, पुलकांचलें ॥ २४६ ॥
वार्षिये प्रथमदशे, वोहळलया शैलांचें सर्वांग जैसें,
विरूढे कोमलांकुरीं तैसे, रोमांच जाहले ॥ २४७ ॥
शिवतला चंद्रकरीं, सोमकांतु द्रावो धरी,
तैसिया स्वेदकणिका शरीरीं, दाटलिया ॥ २४८ ॥
माजीं सापडलेनि अलिकुळें, जळावरी कमळकळिका जेवीं आंदोळे,
तेवीं आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें, बाहेरि कांपे ॥ २४९ ॥
कर्पूरकर्दळीचीं गर्भपुटें, उकलतां कापुराचेनि कोंदाटें,
पुलिका गळती तेवीं थेंबुटें, नेत्रौनि पडती ॥ २५० ॥
उदयलेनि सुधाकरें, जैसा भरलाचि समुद्र भरे,
तैसा वेळोवेळां उर्मिभरें, उचंबळत असे ॥ २५१ ॥
ऐसा सात्त्विकांही आठां भावां, परस्परें वर्ततसे हेवा,
तेथ ब्रह्मानंदाची जीवा, राणीव फावली ॥ २५२ ॥
तैसाचि तया सुखानुभवापाठीं, केला द्वैताचा सांभाळु दिठी,
मग उसासौनि किरीटी, वास पाहिली ॥ २५३ ॥
तेथ बैसला होता जिया सवा, तियाचिया कडे मस्तक खालविला देवा,
जोडूनि करसंपुट बरवा, बोलतु असे ॥ २५४ ॥
अर्जुन उवाच।
पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूतविशेषसंघान् ॥
ब्रह्माणमीशं कमलासनस्थ मृषींश्चसर्वानुरगांश्च दिव्यान् ॥ १५॥
म्हणे जयजयाजी स्वामी, नवल कृपा केली तुम्हीं,
जें हें विश्वरूप कीं आम्हीं, प्राकृत देखों ॥ २५५ ॥
परि साचचि भलें केलें गोसाविया, मज परितोषु जाहला साविया,
जी देखलासि जो इया, सृष्टीसी तूं आश्रयो ॥ २५६ ॥
देवा मंदराचेनि अंगलगें, ठायीं ठायीं श्वापदांचीं दांगें,
तैसीं इयें तुझ्या देहीं अनेगें, देखतसें भुवनें ॥ २५७ ॥
अहो आकाशचिये खोळे, दिसती ग्रहगणांचीं कुळें,
कां महावृक्षीं अविसाळें, पक्षिजातीचीं ॥ २५८ ॥
तयापरी श्रीहरी, तुझिया विश्वात्मकीं इये शरीरीं,
स्वर्गु देखतसें अवधारीं, सुरगणेंसीं ॥ २५९ ॥
प्रभु महाभूतांचें पंचक, येथ देखत आहे अनेक,
आणि भूतग्राम एकेक, भूतसृष्टीचें ॥ २६० ॥
जी सत्यलोकु तुजमाजीं आहे, देखिला चतुराननु हा नोहे ?,
आणि येरीकडे जंव पाहें, तंव कैलासुही दिसे ॥ २६१ ॥
श्रीमहादेव भवानियेशीं, तुझ्या दिसतसे एके अंशीं,
आणि तूंतेंही गा हृषीकेशी, तुजमाजीं देखे ॥ २६२ ॥
पैं कश्यपादि ऋषिकुळें, इयें तुझिया स्वरूपीं सकळें,
देखतसें पाताळें, पन्नगेंशीं ॥ २६३ ॥
किंबहुना त्रैलोक्यपती, तुझिया एकेकाचि अवयवाचिये भिंती,
इयें चतुर्दशभुवनें चित्राकृती, अंकुरलीं जाणों ॥ २६४ ॥
आणि तेथिंचे जे जे लोक, ते चित्ररचना जी अनेक,
ऐसें देखतसे अलोकिक, गांभीर्य तुझें ॥ २६५ ॥
अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनंतरूपम्।
नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम् ॥ १६॥
त्या दिव्यचक्षूंचेनि पैसें, चहुंकडे जंव पाहात असें,
तंव दोर्दंडीं कां जैसें, आकाश कोंभैलें ॥ २६६ ॥
तैसे एकचि निरंतर, देवा देखत असें तुझे कर,
करीत आघवेचि व्यापार, एकेचि काळीं ॥ २६७ ॥
मग महाशून्याचेनि पैसारें, उघडलीं ब्रह्मकटाहाचीं भांडारें,
तैसीं देखतसें अपारें, उदरें तुझीं ॥ २६८ ॥
जी सहस्रशीर्षयाचें देखिलें, कोडीवरी होताति एकीवेळें,
कीं परब्रह्मचि वदनफळें, मोडोनि आलें ॥ २६९ ॥
तैसीं वक्त्रें जी जेउतीं तेउतीं, तुझीं देखितसे विश्वमूर्ती,
आणि तयाचिपरी नेत्रपंक्ती, अनेका सैंघ ॥ २७० ॥
हें असो स्वर्ग पाताळ, कीं भूमी दिशा अंतराळ,
हे विवक्षा ठेली सकळ, मूर्तिमय देखतसें ॥ २७१ ॥
हें तुजवीण एकादियाकडे, परमाणूहि एतुला कोडें,
अवकाशु पाहतसें परि न सांपडे, ऐसें व्यापिलें तुवां ॥ २७२ ॥
इये नानापरी अपरिमितें, जेतुलीं साठविलीं होतीं महाभूतें,
तेतुलाहि पवाडु तुवां अनंतें, कोंदला देखतसें ॥ २७३ ॥
ऐसा कवणें ठायाहूनि तूं आलासी, एथ बैसलासि कीं उभा आहासि,
आणि कवणिये मायेचिये पोटीं होतासी, तुझें ठाण केवढें ॥ २७४ ॥
तुझें रूप वय कैसें, तुजपैलीकडे काय असे,
तूं काइसयावरी आहासि ऐसें, पाहिलें मियां ॥ २७५ ॥
तंव देखिलें जी आघवेंचि, तरि आतां तुज ठावो तूंचि,
तूं कवणाचा नव्हेसि ऐसाचि, अनादि आयता ॥ २७६ ॥
तूं उभा ना बैठा, दिघडु ना खुजटा,
तुज तळीं वरी वैकुंठा, तूंचि आहासी ॥ २७७ ॥
तूं रूपें आपणयांचि ऐसा, देवा तुझी तूंचि वयसा,
पाठीं पोट परेशा, तुझें तूं गा ॥ २७८ ॥
किंबहुना आतां, तुझें तूंचि आघवें अनंता,
हें पुढत पुढती पाहतां, देखिलें मियां ॥ २७९ ॥
परि या तुझिया रूपाआंतु, जी उणीव एक असे देखतु,
जे आदि मध्य अंतु, तिन्हीं नाहीं ॥ २८० ॥
एऱ्हवीं गिंवसिलें आघवां ठायीं, परि सोय न लाहेचि कहीं,
म्हणौनि त्रिशुद्धी हे नाहीं, तिन्ही एथ ॥ २८१ ॥
एवं आदिमध्यांतरहिता, तूं विश्वेश्वरा अपरिमिता,
देखिलासि जी तत्त्वतां, विश्वरूपा ॥ २८२ ॥
तुज महामूर्तीचिया आंगी, उमटलिया पृथक् मूर्ती अनेगी,
लेइलासी वानेपरींची आंगीं, ऐसा आवडतु आहासी ॥ २८३ ॥
नाना पृथक् मूर्ती तिया द्रुमवल्ली, तुझिया स्वरूपमहाचळीं,
दिव्यालंकार फुलीं फळीं, सासिन्नलिया ॥ २८४ ॥
हो कां जे महोदधीं तूं देवा, जाहलासि तरंगमूर्ती हेलावा,
कीं तूं एक वृक्षु बरवा, मूर्तिफळीं फळलासी ॥ २८५ ॥
जी भूतीं भूतळ मांडिलें, जैसें नक्षत्रीं गगन गुढलें,
तैसें मूर्तिमय भरलें, देखतसें तुझें रूप ॥ २८६ ॥
जी एकेकीच्या अंगप्रांतीं, होय जाय हें त्रिजगती,
एवढियाही तुझ्या आंगीं मूर्ती, कीं रोमा जालिया ॥ २८७ ॥
ऐसा पवाडु मांडूनि विश्वाचा, तूं कवण पां एथ कोणाचा,
हें पाहिलें तंव आमुचा, सारथी तोचि तूं ॥ २८८ ॥
तरी मज पाहतां मुकुंदा, तूं ऐसाचि व्यापकु सर्वदा,
मग भक्तानुग्रहें तया मुग्धा, रूपातें धरिसी ॥ २८९ ॥
कैसें चहूं भुजांचें सांवळें, पाहतां वोल्हावती मन डोळे,
खेंव देऊं जाइजे तरी आकळे, दोहींचि बाहीं ॥ २९० ॥
ऐसी मूर्ति कोडिसवाणी कृपा, करूनि होसी ना विश्वरूपा,
कीं अमुचियाचि दिठी सलेपा, जें सामान्यत्वें देखिती ॥ २९१ ॥
तरी आतां दिठीचा विटाळु गेला, तुवां सहजें दिव्यचक्षू केला,
म्हणौनि यथारूपें देखवला, महिमा तुझा ॥ २९२ ॥
परी मकरतुंडामागिलेकडे, तोचि होतासि तूं एवढें,
रूप जाहलासि हें फुडें, वोळखिलें मियां ॥ २९३ ॥
किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम्।
पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ताद्दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् ॥ १७॥
नोहे तोचि हा शिरीं ?, मुकुट लेइलासि श्रीहरी,
परी आतांचें तेज आणि थोरी, नवल कीं बहु हें ॥ २९४ ॥
तेंचि हें वरिलियेचि हातीं, चक्र परिजितया आयती,
सांवरितासि विश्वमूर्ती, ते न मोडे खूण ॥ २९५ ॥
येरीकडे तेचि हे नोहे गदा, आणि तळिलिया दोनी भुजा निरायुधा,
वागोरे सांवरावया गोविंदा, संसरिलिया ॥ २९६ ॥
आणि तेणेंचि वेगें सहसा, माझिया मनोरथासरिसा,
जाहलासि विश्वरूपा विश्वेशा, म्हणौनि जाणें ॥ २९७ ॥
परी कायसें बा हें चोज, विस्मयो करावयाहि पाडू नाहीं मज,
चित्त होऊनि जातसें निर्बुज, आश्चर्यें येणें ॥ २९८ ॥
हें एथ आथि कां येथ नाहीं, ऐसें श्वसोंही नये कांहीं,
नवल अंगप्रभेची नवाई, कैसी कोंदलीं सैंघ ॥ २९९ ॥
एथ अग्नीचीही दिठी करपत, सूर्य खद्योतु तैसा हारपत,
ऐसें तीव्रपण अद्भुत, तेजाचें यया ॥ ३०० ॥
हो कां महातेजाचिया महार्णवीं, बुडोनि गेली सृष्टी आघवी,
कीं युगांतविजूंच्या पालवीं, झांकलें गगन ॥ ३०१ ॥
नातरी संहारतेजाचिया ज्वाळा, तोडोनि माचू बांधला अंतराळां,
आतां दिव्य ज्ञानाचिया डोळां, पाहवेना ॥ ३०२ ॥
उजाळु अधिकाधिक बहुवसु, धडाडीत आहे अतिदाहसु,
पडत दिव्यचक्षुंसही त्रासु, न्याहाळितां ॥ ३०३ ॥
हो कां जे महाप्रळयींचा भडाडु, होता काळाग्निरुद्राचिया ठायीं गूढु,
तो तृतीयनयनाचा मढू, फुटला जैसा ॥ ३०४ ॥
तैसें पसरलेनि प्रकाशें, सैंघ पांचवनिया ज्वाळांचे वळसे,
पडतां ब्रह्मकटाह कोळिसे, होत आहाती ॥ ३०५ ॥
ऐसा अद्भुत तेजोराशी, जन्मा नवल म्यां देखिलासी,
नाहीं व्याप्ती आणि कांतीसी, पारु जी तुझिये ॥ ३०६ ॥
त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम्।
त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ॥ १८॥
देवा तूं अक्षर, औटाविये मात्रेसि पर,
श्रुती जयाचें घर, गिंवसीत आहाती ॥ ३०७ ॥
जें आकाराचें आयतन, जें विश्वनिक्षेपैकनिधान,
तें अव्यय तूं गहन, अविनाश जी ॥ ३०८ ॥
तूं धर्माचा वोलावा, अनादिसिद्ध तूं नित्य नवा,
जाणें मी सदतिसावा, पुरुष विशेष तूं ॥ ३०९ ॥
अनादिमध्यान्तमनन्तवीर्यं अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम्।
पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ॥ १९॥
तूं आदिमध्यांतरहितु, स्वसामर्थ्यें तूं अनंतु,
विश्वबाहु अपरिमितु, विश्वचरण तूं ॥ ३१० ॥
पैं चंद्र चंडांशु डोळां, दावितासि कोपप्रसाद लीळा,
एकां रुससी तमाचिया डोळां, एकां पाळितोसि कृपादृष्टी ॥ ३११ ॥
जी एवंविधा तूंतें, मी देखतसें हें निरुतें,
पेटलें प्रळयाग्नीचें उजितें, तैसें वक्त्र हें तुझें ॥ ३१२ ॥
वणिवेनि पेटले पर्वत, कवळूनि ज्वाळांचे उभड उठत,
तैसी चाटीत दाढा दांत, जीभ लोळे ॥ ३१३ ॥
इये वदनींचिया उबा, आणि जी सर्वांगकांतीचिया प्रभा,
विश्व तातलें अति क्षोभा, जात आहे ॥ ३१४ ॥
द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः।
दृष्ट्वाऽद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् ॥ २०॥
कां जे द्यौर्लोक आणि पाताळ, पृथिवी आणि अंतराळ,
अथवा दशदिशा समाकुळ, दिशाचक्र ॥ ३१५ ॥
हें आघवेंचि तुंवा एकें, भरलें देखत आहे कौतुकें,
परि गगनाहीसकट भयानकें, आप्लविजे जेवीं ॥ ३१६ ॥
नातरी अद्भुतरसाचिया कल्लोळीं, जाहली चवदाही भुवनांसि कडियाळीं,
तैसें आश्चर्यचि मग मी आकळीं, काय एक ? ॥ ३१७ ॥
नावरे व्याप्ती हे असाधारण, न साहवे रूपाचें उग्रपण,
सुख दूरी गेलें परि प्राण, विपायें धरीजे ॥ ३१८ ॥
देवा ऐसें देखोनि तूंतें, नेणों कैसें आलें भयाचें भरितें,
आतां दुःखकल्लोळीं झळंबतें, तिन्हीं भुवनें ॥ ३१९ ॥
एऱ्हवीं तुज महात्मयाचें देखणें, तरि भयदुःखासि कां मेळवणें ?,
परि हें सुख नव्हेचि जेणें गुणें, तें जाणवत आहे मज ॥ ३२० ॥
जंव तुझें रूप नोहे दिठें, तंव जगासि संसारिक गोमटें,
आतां देखिलासि तरी विषयविटें, उपनला त्रासु ॥ ३२१ ॥
तेवींचि तुज देखिलियासाठीं, काय सहसा तुज देवों येईल मिठी,
आणि नेदीं तरी शोकसंकटीं, राहों केवीं ? ॥ ३२२ ॥
म्हणौनि मागां सरों तंव संसारु, आडवीत येतसे अनिवारु,
आणि पुढां तूं तंव अनावरु, न येसि घेवों ॥ ३२३ ॥
ऐसा माझारलिया सांकडां, बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा,
हा ध्वनि जी फुडा, चोजवला मज ॥ ३२४ ॥
जैसा आरंबळला आगीं, तो समुद्रा ये निवावयालागीं,
तंव कल्लोळपाणियाचिया तरंगीं, आगळा बिहे ॥ ३२५ ॥
तैसें या जगासि जाहलें, तूंतें देखोनि तळमळित ठेलें,
यामाजीं पैल भले, ज्ञानशूरांचे मेळावे ॥ ३२६ ॥
अमी हि त्वां सुरसंघा विशन्ति केचिद्भीताः प्राञ्जलयो गृणन्ति।
स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घाः स्तुवन्ति त्वां सुतिभिः पुष्कलाभिः ॥ २१॥
हे तुझेनि आंगिकें तेजें, जाळूनि सर्व कर्मांचीं बीजें,
मिळत तुज आंतु सहजें, सद्भावेसीं ॥ ३२७ ॥
आणिक एक सावियाचि भयभीरु, सर्वस्वें धरूनि तुझी मोहरु,
तुज प्रार्थिताति करु, जोडोनियां ॥ ३२८ ॥
देवा अविद्यार्णवीं पडिलों, जी विषयवागुरें आंतुडलों,
स्वर्गसंसाराचिया सांकडलों, दोहीं भागीं ॥ ३२९ ॥
ऐसें आमुचें सोडवणें, तुजवांचोनि कीजेल कवणें ?,
तुज शरण गा सर्वप्राणें, म्हणत देवा ॥ ३३० ॥
आणि महर्षी अथवा सिद्ध, कां विद्याधरसमूह विविध,
हे बोलत तुज स्वस्तिवाद, करिती स्तवन ॥ ३३१ ॥
रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेऽश्विनौ मरुतश्चोश्मपाश्च।
गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥ २२॥
हे रुद्रादित्यांचे मेळावे, वसु हन साध्य आघवे,
अश्विनौ देव विश्वेदेव विभवें, वायुही हे जी ॥ ३३२ ॥
अवधारा पितर हन गंधर्व, पैल यक्षरक्षोगण सर्व,
जी महेंद्रमुख्य देव, कां सिद्धादिक ॥ ३३३ ॥
हे आघवेचि आपुलालिया लोकीं, सोत्कंठित अवलोकीं,
हे महामूर्ती दैविकी, पाहात आहाती ॥ ३३४ ॥
मग पाहात पाहात प्रतिक्षणीं, विस्मित होऊनि अंतःकरणीं,
करित निजमुकटीं वोवाळणी, प्रभुजी तुज ॥ ३३५ ॥
ते जय जय घोष कलरवें, स्वर्ग गाजविताती आघवे,
ठेवित ललाटावरी बरवे, करसंपुट ॥ ३३६ ॥
तिये विनयद्रुमाचिये आरवीं, सुरवाडली सात्त्विकांची माधवी,
म्हणौनि करसंपुटपल्लवीं, तूं होतासि फळ ॥ ३३७ ॥
रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहूरुपादम्।
बहूदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाऽहम् ॥ २३॥
जी लोचनां भाग्य उदेलें, मना सुखाचें सुयाणें पाहलें,
जे अगाध तुझें देखिलें, विश्वरूप इहीं ॥ ३३८ ॥
हें लोकत्रयव्यापक रूपडें, पाहतां देवांही वचक पडे,
याचें सन्मुखपण जोडें, भलतयाकडुनी ॥ ३३९ ॥
ऐसें एकचि परी विचित्रें, आणि भयानकें वक्त्रें,
बहुलोचन हे सशस्त्रें, अनंतभुजा ॥ ३४० ॥
अनंत चारु बाहु चरण, बहूदर आणि नानावर्ण,
कैसें प्रतिवदनीं मातलेपण, आवेशाचें ॥ ३४१ ॥
हो कां महाकल्पाचिया अंतीं, तवकलेनि यमें जेउततेउतीं,
प्रळयाग्नीचीं उजितीं, आंबुखिलीं जैसीं ॥ ३४२ ॥
नातरी संहारत्रिपुरारीचीं यंत्रें, कीं प्रळयभैरवाचीं क्षेत्रें,
नाना युगांतशक्तीचीं पात्रें, भूतखिचा वोढविलीं ॥ ३४३ ॥
तैसीं जियेतियेकडे, तुझीं वक्त्रें जीं प्रचंडें,
न समाती दरीमाजीं सिंव्हाडे, तैसे दशन दिसती रागीट ॥ ३४४ ॥
जैसें काळरात्रीचेनि अंधारें, उल्हासत निघतीं संहारखेंचरें,
तैसिया वदनीं प्रळयरुधिरें, काटलिया दाढा ॥ ३४५ ॥
हें असो काळें अवंतिलें रण, कां सर्व संहारें मातलें मरण,
तैसें अतिभिंगुळवाणेंपण, वदनीं तुझिये ॥ ३४६ ॥
हे बापुडी लोकसृष्टी, मोटकीये विपाइली दिठी,
आणि दुःखकालिंदीचिया तटीं, झाड होऊनि ठेली ॥ ३४७ ॥
तुज महामृत्यूचिया सागरीं, आतां हे त्रैलोक्य जीविताची तरी,
शोकदुर्वातलहरी, आंदोळत असे ॥ ३४८ ॥
एथ कोपोनि जरी वैकुंठें, ऐसें हन म्हणिपैल अवचटें,
जें तुज लोकांचें काई वाटे ?, तूं ध्यानसुख हें भोगीं ॥ ३४९ ॥
तरी जी लोकांचें कीर साधारण, वायां आड सूतसे वोडण,
केवीं सहसा म्हणे प्राण, माझेचि कांपती ॥ ३५० ॥
ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे,
तो मी एथें अहाळबाहळीं कांपें, ऐसें तुवां केलें ॥ ३५१ ॥
परि नवल बापा हे महामारी, इया नाम विश्वरूप जरी,
हे भ्यासुरपणें हारी, भयासि आणी ॥ ३५२ ॥
नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम्।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥ २४॥
ठेलीं महाकाळेंसि हटेंतटें, तैसी किती{ए}कें मुखें रागिटें,
इहीं वाढोनियां धाकुटें, आकाश केलें ॥ ३५३ ॥
गगनाचेंनि वाडपणें नाकळे, त्रिभुवनींचियाही वारिया न वेंटाळे,
ययाचेनि वाफा आगी जळे, कैसें धडाडीत असे ॥ ३५४ ॥
तेवींचि एकसारिखें एक नोहे, एथ वर्णावर्णाचा भेदु आहे,
हो कां जें प्रळयीं सावावो लाहे, वन्ह्ं ययाचा ॥ ३५५ ॥
जयाचिये आंगींची दीप्ती येवढी, जे त्रैलोक्य कीजे राखोंडी,
कीं तयाही तोंडें आणि तोंडीं, दांत दाढा ॥ ३५६ ॥
कैसा वारया धनुर्वात चढला, समुद्र कीं महापुरीं पडिला,
विषाग्नि मारा प्रवर्तला, वडवानळासी ॥ ३५७ ॥
हळाहळ आगी पियालें, नवल मरण मारा प्रवर्तलें,
तैसें संहारतेजा या जाहलें, वदन देखा ॥ ३५८ ॥
परी कोणें मानें विशाळ, जैसें तुटलिया अंतराळ,
आकाशासि कव्हळ, पडोनि ठेलें ॥ ३५९ ॥
नातरी काखे सूनि वसुंधरी, जैं हिरण्याक्षु रिगाला विवरीं,
तैं उघडले हाटकेश्वरीं, जेवीं पाताळकुहर ॥ ३६० ॥
तैसा वक्त्रांचा विकाशु, माजीं जिव्हांचा आगळाचि आवेशु,
विश्व न पुरे म्हणौनि घांसु, न भरीचि कोंडें ॥ ३६१ ॥
आणि पाताळव्याळांचिया फूत्कारीं, गरळज्वाळा लागती अंबरीं,
तैसी पसरलिये वदनदरी-, माजीं हे जिव्हा ॥ ३६२ ॥
काढूनि प्रळयविजूंचीं जुंबाडें, जैसें पन्नासिलें गगनाचे हुडे,
तैसे आवाळुवांवरी आंकडे, धगधगीत दाढांचे ॥ ३६३ ॥
आणि ललाटपटाचिये खोळे, कैसें भयातें भेडविताती डोळे,
हो कां जे महामृत्यूचे उमाळे, कडवसां राहिले ॥ ३६४ ॥
ऐसें वाऊनि भयाचें भोज, एथ काय निपजवूं पाहातोसि काज,
तें नेणों परी मज, मरणभय आलें ॥ ३६५ ॥
देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे, केले तिये पावलों प्रतिफळें,
बापा देखिलासि आतां डोळे, निवावे तैसे निवाले ॥ ३६६ ॥
अहो देहो पार्थिव कीर जाये, ययाची काकुळती कवणा आहे,
परि आतां चैतन्य माझें विपायें, वांचे कीं न वांचे ॥ ३६७ ॥
एऱ्हवीं भयास्तव आंग कांपे, नावेक आगळें तरी मन तापे,
अथवा बुद्धिही वासिपे, अभिमानु विसरिजे ॥ ३६८ ॥
परी येतुलियाही वेगळा, जो केवळ आनंदैककळा,
तया अंतरात्मयाही निश्चळा, शियारी आली ॥ ३६९ ॥
बाप साक्षात्काराचा वेधु, कैसा देशधडी केला बोधु,
हा गुरुशिष्यसंबंधु, विपायें नांदे ॥ ३७० ॥
देवा तुझ्या ये दर्शनीं, जें वैकल्य उपजलें आहे अंतःकरणीं,
तें सावरावयालागीं गंवसणी, धैर्याची करितसें ॥ ३७१ ॥
तंव माझेनि नामें धैर्य हारपलें, कीं तयाहीवरी विश्वरूपदर्शन जाहलें,
हें असो परि मज भलें आतुडविलें, उपदेशा इया ॥ ३७२ ॥
जीव विसंवावयाचिया चाडा, सैंघ धांवाधांवी करितसे बापुडा,
परि सोयही कवणेंकडां, न लभे एथ ॥ ३७३ ॥
ऐसें विश्वरूपाचिया महामारी, जीवित्व गेलें आहें चराचरीं,
जी न बोलें तरि काय करीं, कैसेनि राहें ? ॥ ३७४ ॥
दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि।
दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास ॥ २५॥
पैं अखंड डोळ्यांपुढें, फुटलें जैसें महाभयाचें भांडें,
तैशीं तुझीं मुखें वितंडें, पसरलीं देखें ॥ ३७५ ॥
असो दांत दाढांची दाटी, न झांकवे मा दों दों वोठीं,
सैंघ प्रळयशस्त्रांचिया दाट कांटी, लागलिया जैशा ॥ ३७६ ॥
जैसें तक्षका विष भरलें, हो कां जे काळरात्रीं भूत संचरलें,
कीं आग्नेयास्त्र परजिलें, वज्राग्नि जैसें ॥ ३७७ ॥
तैशीं तुझीं वक्त्रें प्रचंडें, वरि आवेश हा बाहेरी वोसंडे,
आले मरणरसाचे लोंढे, आम्हांवरी ॥ ३७८ ॥
संहारसमयींचा चंडानिळु, आणि महाकल्पांत प्रळयानळु,
या दोहीं जैं होय मेळु, तैं काय एक न जळे ? ॥ ३७९ ॥
तैसीं संहारकें तुझीं मुखें, देखोनि धीरु कां आम्हां पारुखे ?,
आतां भुललों मी दिशा न देखें, आपणपें नेणें ॥ ३८० ॥
मोटकें विश्वरूप डोळां देखिलें, आणि सुखाचें अवर्षण पडिलें,
आतां जापाणीं जापाणीं आपुलें, अस्ताव्यस्त हें ॥ ३८१ ॥
ऐसें करिसी म्हणौनि जरी जाणें, तरी हे गोष्टी सांगावीं कां मी म्हणें,
आतां एक वेळ वांचवी जी प्राणें, या स्वरूपप्रळयापासोनि ॥ ३८२ ॥
जरी तूं गोसावी आमुचा अनंता, तरी सुईं वोडण माझिया जीविता,
सांटवीं पसारा हा मागुता, महामारीचा ॥ ३८३ ॥
आइकें सकळ देवांचिया परदेवते, तुवां चैतन्यें गा विश्व वसतें,
तें विसरलासी हें उपरतें, संहारूं आदरिलें ॥ ३८४ ॥
म्हणौनि वेगीं प्रसन्न होईं देवराया, संहरीं संहरीं आपुली माया,
काढीं मातें महाभया-, पासोनियां ॥ ३८५ ॥
हा ठायवरी पुढतपुढतीं, तूंतें म्हणिजे बहुवा काकुळती,
ऐसा मी विश्वमूर्ती, भेडका जाहलों ॥ ३८६ ॥
जैं अमरावतीये आला धाडा, तैं म्यां एकलेनि केला उवेडा,
जो मी काळाचियाही तोंडा, वासिपु न धरीं ॥ ३८७ ॥
परी तया आंतुल नव्हे हें देवा, एथ मृत्यूसही करूनि चढावा,
तुवां आमुचाचि घोटू भरावा, या सकळ विश्वेंसीं ॥ ३८८ ॥
कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु,
बापुडा हा त्रिभुवनगोळु, अल्पायु जाहला ॥ ३८९ ॥
अहा भाग्या विपरीता, विघ्न उठिलें शांत करितां,
कटाकटा विश्व गेलें आतां, तूं लागलासि ग्रासूं ॥ ३९० ॥
हें नव्हे मा रोकडें, सैंघ पसरूनियां तोंडें,
कवळितासि चहूंकडे, सैन्यें इयें ॥ ३९१ ॥
अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः।
भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथाऽसौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ॥ २६॥
नोहेति ? हे कौरवकुळींचे वीर, आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर,
हे गेले गेले सहपरिवार, तुझिया वदनीं ॥ ३९२ ॥
आणि जे जे यांचेनि सावायें, आले देशोदेशींचे राये,
तयांचें सांगावया जावों न लाहे, ऐसें सरकटित आहासी ॥ ३९३ ॥
मदमुखाचिया संघटा, घेत आहासि घटघटां,
आरणीं हन थाटा, देतासि मिठी ॥ ३९४ ॥
जंत्रावरिचील मार, पदातींचे मोगर,
मुखाआंत भार, हारपताति मा ॥ ३९५ ॥
कृतांताचिया जावळी, जें एकचि विश्वातें गिळी,
तियें कोटीवरी सगळीं, गिळितासि शस्त्रें ॥ ३९६ ॥
चतुरंगा परिवारा, संजोडियां रहंवरां,
दांत न लाविसी मा परमेश्वरा, कसा तुष्टलासि बरवा ॥ ३९७ ॥
हां गा भीष्मा{ऐ}सा कवणु, सत्यशौर्यनिपुणु,
तोही आणि ब्राह्मण द्रोणु, ग्रासिलासि कटकटा ॥ ३९८ ॥
अहा सहस्रकराचा कुमरु, एथ गेला गेला कर्णवीरु,
आणि आमुचिया आघवयांचा केरु, फेडिला देखें ॥ ३९९ ॥
कटकटा धातया, कैसें जाहलें अनुग्रहा यया,
मियां प्रार्थूनि जगा बापुडिया, आणिलें मरण ॥ ४०० ॥
मागां थोडिया बहुवा उपपत्ती, येणें सांगितलिया विभूती,
तैसा नसेचि मा पुढती, बैसलों पुसों ॥ ४०१ ॥
म्हणौनि भोग्य तें त्रिशुद्धी न चुके, आणि बुद्धिही होणारासारिखी ठाके,
माझ्या कपाळीं पिटावें लोकें, तें लोटेल कांह्यां ॥ ४०२ ॥
पूर्वीं अमृतही हातां आलें, परी देव नसतीचि उगले,
मग काळकूट उठविलें, शेवटीं जैसें ॥ ४०३ ॥
परी तें एकबगीं थोडें, केलिया प्रतिकारामाजिवडें,
आणि तिये अवसरीचें तें सांकडें, निस्तरविलें शंभू ॥ ४०४ ॥
आतां हा जळतां वारा कें वेंटाळे ?, कोणा हे विषा भरलें गगन गिळे ?,
महाकाळेंसि कें खेळें ?, आंगवत असे ॥ ४०५ ॥
ऐसा अर्जुन दुःखें शिणतु, शोचित असे जिवाआंतु,
परी न देखें तो प्रस्तुतु, अभिप्राय देवाचा ॥ ४०६ ॥
जे मी मारिता हे कौरव मरते, ऐसेनि वेंटाळिला होता मोहें बहुतें,
तो फेडावयालागीं अनंतें, हें दाखविलें निज ॥ ४०७ ॥
अरे कोण्ही कोणातें न मारी, एथ मीचि हो सर्व संहारीं,
हें विश्वरूपव्याजें हरी, प्रकटित असे ॥ ४०८ ॥
परी वायांचि व्याकुलता, ते न चोजवेचि पंडुसुता,
मग अहा कंपु नव्हता, वाढवित असे ॥ ४०९ ॥
वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि।
केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः ॥ २७॥
तेथ म्हणे पाहा हो एके वेळे, सासिकवचेंसि दोन्ही दळें,
वदनीं गेलीं आभाळें, गगनीं कां जैसीं ॥ ४१० ॥
कां महाकल्पाचिया शेवटीं, जैं कृतांतु कोपला होय सृष्टी,
तैं एकविसांही स्वर्गां मिठी, पाताळासकट दे ॥ ४११ ॥
नातरी उदासीनें दैवें, संचकाचीं वैभवें,
जेथींचीं तेथ स्वभावें, विलया जाती ॥ ४१२ ॥
तैसीं सासिन्नलीं सैन्यें एकवटें, इये मुखीं जाहलीं प्रविष्टें,
परी एकही तोंडौनि न सुटे, कैसें कर्म देखा ॥ ४१३ ॥
अशोकाचे अंगवसे, चघळिले कऱ्हेनि जैसे,
लोक वक्त्रामाजीं तैसे, वायां गेले ॥ ४१४ ॥
परि सिसाळें मुकुटेंसीं, पडिली दाढांचे सांडसीं,
पीठ होत कैसीं, दिसत आहाती ॥ ४१५ ॥
तियें रत्नें दांतांचिये सवडीं, कूट लागलें जिभेच्या बुडीं,
कांहीं कांहीं आगरडीं, द्रंष्ट्रांचीं माखलीं ॥ ४१६ ॥
हो कां जे विश्वरूपें काळें, ग्रासिलीं लोकांचीं शरीरें बळें,
परि जीवित्व देहींचीं सिसाळें, अवश्य कीं राखिलीं ॥ ४१७ ॥
तैसीं शरीरामाजीं चोखडीं, इयें उत्तमांगें होतीं फुडीं,
म्हणौनि महाकाळाचियाही तोंडीं, परि उरलीं शेखीं ॥ ४१८ ॥
मग म्हणे हें काई, जन्मलयां आन मोहरचि नाहीं,
जग आपैसेंचि वदनडोहीं, संचारताहे ॥ ४१९ ॥
यया आपेंआप आघविया सृष्टी, लागलिया आहाति वदनाच्या वाटीं,
आणि हा जेथिंचिया तेथ मिठी, देतसे उगला ॥ ४२० ॥
ब्रह्मादिक समस्त, उंचा मुखामाजीं धांवत,
येर सामान्य हे भरत, ऐलीच वदनीं ॥ ४२१ ॥
आणीकही भूतजात, तें उपजलेचि ठायीं ग्रासित,
परि याचिया मुखा निभ्रांत, न सुटेचि कांहीं ॥ ४२२ ॥
यथा नदीनाम् बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति।
तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥ २८॥
जैसे महानदीचे वोघ, वहिले ठाकिती समुद्राचें आंग,
तैसें आघवाचिकडूनि जग, प्रवेशत मुखीं ॥ ४२३ ॥
आयुष्यपंथें प्राणिगणी, करोनि अहोरात्रांची मोवणी,
वेगें वक्त्रामिळणीं, साधिजत आहाती ॥ ४२४ ॥
यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः।
तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः ॥ २९॥
जळतया गिरीच्या गवखा-, माजीं घापती पतंगाचिया झाका,
तैसे समग्र लोक देखा, इये वदनीं पडती ॥ ४२५ ॥
परि जेतुलें येथ प्रवेशलें, तें तातलिया लोहें पाणीचि पां गिळिलें,
वहवटींहि पुसिलें, नामरूप तयांचें ॥ ४२६ ॥
लेलिह्यसे ग्रसमानः समन्ताल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वद्भिः।
तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो ॥ ३०॥
आणि येतुलाही आरोगण, करितां भुके नाहीं उणेपण,
कैसें दीपन असाधारण, उदयलें यया ॥ ४२७ ॥
जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला, का भणगा दुकाळु पाहला,
तैसा जिभांचा लळलळाटु देखिला, आवाळुवें चाटितां ॥ ४२८ ॥
तैसें आहाराचे नांवें कांहीं, तोंडापासूनि उरलेंचि नाहीं,
कैसी समसमीत नवाई, भुकेलेपणाची ॥ ४२९ ॥
काय सागराचा घोंटु भरावा ?, कीं पर्वताचा घांसु करावा ?,
ब्रह्मकटाहो घालावा, आघवाचि दाढे ॥ ४३० ॥
दिशा सगळियाचि गिळाविया, चांदिणिया चाटूनि घ्याविया,
ऐसें वर्तत आहे साविया, लोलुप्य बा तुझें ॥ ४३१ ॥
जैसा भोगीं कामु वाढे, कां इंधनें आगीसि हाकाक चढे,
तैसी खातखातांचि तोंडें, खाखांतें ठेलीं ॥ ४३२ ॥
कैसें एकचि केवढें पसरलें, त्रिभुवन जिव्हाग्रीं आहे टेकलें,
जैसें कां कवीठ घातलें, वडवानळीं ॥ ४३३ ॥
ऐसीं अपार वदनें, आतां येतुलीं कैंचीं त्रिभुवनें,
कां आहारु न मिळतां येणें मानें, वाढविलीं सैंघ ॥ ४३४ ॥
अगा हा लोकु बापुडा, जाहला वदनज्वाळां वरपडा,
जैसी वणवेयाचिया वेढां, सांपडती मृगें ॥ ४३५ ॥
आतां तैसें यां विश्वा जाहालें, देव नव्हे हें कर्म आलें,
कां जग चळचळां पांगिलें, काळजाळें ॥ ४३६ ॥
आतां इये अंगप्रभेचिये वागुरे, कोणीकडूनि निगिजैल चराचरें,
हीं वक्त्रें नोहेती जोहारें, वोडवलीं जगा ॥ ४३७ ॥
आगी आपुलेनि दाहकपणें, कैसेनि पोळिजे तें नेणे,
परी जया लागे तया प्राणें, सुटिकाची नाहीं ॥ ४३८ ॥
नातरी माझेनि तिखटपणें, कैसें निवटे हें शस्त्र कायि जाणें,
कां आपुलियां मारा नेणें, विष जैसें ॥ ४३९ ॥
तैसी तुज कांहीं, आपुलिया उग्रपणाची सेचि नाहीं,
परी ऐलीकडिले मुखीं खाई, हो सरली जगाची ॥ ४४० ॥
अगा आत्मा तूं एकु, सकळ विश्वव्यापकु,
तरी कां आम्हां अंतकु, तैसा वोडवलासी ? ॥ ४४१ ॥
तरी मियां सांडिली जीवित्वाची चाड, आणि तुवांही न धरावी भीड,
मनीं आहे तें उघड, बोल पां सुखें ॥ ४४२ ॥
किती वाढविसी या उग्ररूपा, आंगींचें भगवंतपण आठवीं बापा,
नाहीं तरी कृपा, मजपुरती पाही ॥ ४४३ ॥
आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद।
विज्ञातुमिच्छामिभवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् ॥ ३१॥
तरी एक वेळ वेदवेद्या, जी त्रिभुवनैक आद्या,
विनवणी विश्ववंद्या, आइकें माझी ॥ ४४४ ॥
ऐसें बोलोनि वीरें, चरण नमस्कारिलें शिरें,
मग म्हणें तरी सर्वेश्वरें, अवधारिजो ॥ ४४५ ॥
मियां होआवया समाधान, जी पुसिलें विश्वरूपध्यान,
आणि एकेंचि काळें त्रिभुवन, गिळितुचि उठिलासी ॥ ४४६ ॥
तरी तूं कोण कां येतुलीं, इयें भ्यासुरें मुखें कां मेळविलीं,
आघवियाचि करीं परिजिलीं, शस्त्रें कांह्या ॥ ४४७ ॥
जी जंव तंव रागीटपणें, वाढोनि गगना आणितोसि उणें,
कां डोळे करूनि भिंगुळवाणे, भेडसावीत आहासी ॥ ४४८ ॥
एथ कृतांतेंसि देवा, कासया किजतसे हेवा,
हा आपुला तुवां सांगावा, अभिप्राय मज ॥ ४४९ ॥
या बोला म्हणे अनंतु, मी कोण हें आहासी पुसतु,
आणि कायिसयालागीं असे वाढतु, उग्रतेसी ॥ ४५० ॥
श्रीभगवानुवाच।
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ॥
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥ ३२॥
तरी मी काळु गा हें फुडें, लोक संहारावयालागीं वाढें,
सैंघ पसरिलीं आहातीं तोंडें, आतां ग्रासीन हें आघवें ॥ ४५१ ॥
एथ अर्जुन म्हणे कटकटा, उबगिलों मागिल्या संकटा,
म्हणौनि आळविला तंव वोखटा, उवाइला हा ॥ ४५२ ॥
तेवींचि कठिण बोलें आसतुटी, अर्जुन होईल हिंपुटी,
म्हणौनि सवेंचि म्हणे किरीटी, परि आन एक असे ॥ ४५३ ॥
तरी आतांचिये संहारवाहरे, तुम्हीं पांडव असा बाहिरे,
तेथ जातजातां धनुर्धरें, सांवरिले प्राण ॥ ४५४ ॥
होता मरणमहामारीं गेला, तो मागुता सावधु जाहला,
मग लागला बोला, चित्त देऊं ॥ ४५५ ॥
ऐसें म्हणिजत आहे देवें, अर्जुना तुम्ही माझें हें जाणावें,
येर जाण मी आघवें, सरलों ग्रासूं ॥ ४५६ ॥
वज्रानळीं प्रचंडीं, जैसी घापे लोणियाची उंडी,
तैसें जग हें माझिया तोंडीं, तुवां देखिलें जें ॥ ४५७ ॥
तरी तयामाझारीं कांहीं, भरंवसेनि उणें नाहीं,
इये वायांचि सैन्यें पाहीं, बरवतें आहाती ॥ ४५८ ॥
ऐसा चतुरंगाचिया संपदा, करित महाकाळेंसीं स्पर्धा,
वांटिवेचिया मदा, वघळले जे ॥ ४५९ ॥
हे जे मिळोनियां मेळे, कुंथती वीरवृत्तीचेनि बळें,
यमावरी गजदळें, वाखाणिजताती ॥ ४६० ॥
म्हणती सृष्टीवरी सृष्टी करूं, आण वाहूनि मृत्यूतें मारूं,
आणि जगाचा भरूं, घोंटु यया ॥ ४६१ ॥
पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरी जाळूं,
कां बाणवरी खिळूं, वारयातें ॥ ४६२ ॥
बोल हतियेराहूनि तिखट, दिसती अग्निपरिस दासट,
मारकपणें काळकूट, महुर म्हणत ॥ ४६३ ॥
तरी हे गंधर्वनगरींचे उमाळे, जाण पोकळीचे पेंडवळें,
अगा चित्रीव फळें, वीर हे देखें ॥ ४६४ ॥
हां गा मृगजळाचा पूर आला, दळ नव्हे कापडाचा साप केला,
इया शृंगारूनियां खाला, मांडिलिया पैं ॥ ४६५ ॥
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुंक्ष्व राज्यं समृद्धम्।
मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥ ३३॥
येर चेष्टवितें जें बळ, तें मागांचि मियां ग्रासिलें सकळ,
आतां कोल्हारिचे वेताळ, तैसे निर्जीव हे आहाती ॥ ४६६ ॥
हालविती दोरी तुटली, तरी तियें खांबावरील बाहुलीं,
भलतेणें लोटिलीं, उलथोनि पडती ॥ ४६७ ॥
तैसा सैन्याचा यया बगा, मोडतां वेळू न लगेल पैं गा,
म्हणौनि उठीं उठीं वेगां, शाहाणा होईं ॥ ४६८ ॥
तुवां गोग्रहणाचेनि अवसरें, घातलें मोहनास्त्र एकसरें,
मग विराटाचेनि महाभेडें उत्तरें, आसडूनि नागाविलें ॥ ४६९ ॥
आतां हें त्याहूनि निपटारें जहालें, निवटीं आयितें रण पडिलें,
घेईं यश रिपु जिंतिले, एकलेनि अर्जुनें ॥ ४७० ॥
आणि कोरडें यशचि नोहे, समग्र राज्यही आलें आहे,
तूं निमित्तमात्रचि होयें, सव्यसाची ॥ ४७१ ॥
द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णां तथान्यानपि योधवीरान्।
मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् ॥ ३४॥
द्रोणाचा पाडु न करीं, भीष्माचें भय न धरीं,
कैसेनि कर्णावरी, परजूं हें न म्हण ॥ ४७२ ॥
कोण उपायो जयद्रथा कीजे, हें न चिंतूं चित्त तुझें,
आणिकही आथि जे जे, नावाणिगे वीर ॥ ४७३ ॥
तेही एक एक आघवें, चित्रींचे सिंहाडे मानावे,
जैसे वोलेनि हातें घ्यावें, पुसोनियां ॥ ४७४ ॥
यावरी पांडवा, काइसा युद्धाचा मेळावा ?,
हा आभासु गा आघवा, येर ग्रासिलें मियां ॥ ४७५ ॥
जेव्हां तुवां देखिले, हे माझिया वदनीं पडिले,
तेव्हांचि यांचें आयुष्य सरलें, आतां रितीं सोपें ॥ ४७६ ॥
म्हणौनि वहिला उठीं, मियां मारिले तूं निवटीं,
न रिगे शोकसंकटीं, नाथिलिया ॥ ४७७ ॥
आपणचि आडखिळा कीजे, तो कौतुकें जैसा विंधोनि पाडिजे,
तैसें देखें गा तुझें, निमित्त आहे ॥ ४७८ ॥
बापा विरुद्ध जें जाहलें, तें उपजतांचि वाघें नेलें,
आतां राज्येंशीं संचलें, यश तूं भोगीं ॥ ४७९ ॥
सावियाचि उतत होते दायाद, आणि बळिये जगीं दुर्मद,
ते वधिले विशद, सायासु न लागतां ॥ ४८० ॥
ऐसिया इया गोष्टी, विश्वाच्या वाक्पटीं,
लिहूनि घाली किरीटी, जगामाजीं ॥ ४८१ ॥
संजय उवाच।
एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी ॥
नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य ॥ ३५॥
ऐसी आघवीचि हे कथा, तया अपूर्ण मनोरथा,
संजयो सांगे कुरुनाथा, ज्ञानदेवो म्हणे ॥ ४८२ ॥
मग सत्यलोकौनि गंगाजळ, सुटलिया वाजत खळाळ,
तैशी वाचा विशाळ, बोलतां तया ॥ ४८३ ॥
नातरी महामेघांचे उमाळे, घडघडीत एके वेळे,
कां घुमघुमिला मंदराचळें, क्षीराब्धी जैसा ॥ ४८४ ॥
तैसें गंभीरें महानादें, हें वाक्य विश्वकंदें,
बोलिलें अगाधें, अनंतरूपें ॥ ४८५ ॥
तें अर्जुनें मोटकें ऐकिलें, आणि सुख कीं भय दुणावलें,
हें नेणों परि कांपिन्नलें, सर्वांग तयाचें ॥ ४८६ ॥
सखोलपणें वळली मोट, आणि तैसेचि जोडले करसंपुट,
वेळोवेळां ललाट, चरणीं ठेवी ॥ ४८७ ॥
तेवींचि कांहीं बोलों जाये, तंव गळा बुजालाचि ठाये,
हें सुख कीं भय होये, हें विचारा तुम्हीं ॥ ४८८ ॥
परि तेव्हां देवाचेनि बोलें, अर्जुना हें ऐसें जाहलें,
मियां पदांवरूनि देखिलें, श्लोकींचिया ॥ ४८९ ॥
मग तैसाचि भेणभेण, पुढती जोहारूनि चरण,
मग म्हणे जी आपण, ऐसें बोलिलेती ॥ ४९० ॥
अर्जुन उवाच।
स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च ॥
रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः ॥ ३६॥
ना तरी अर्जुना मी काळु, आणि ग्रासिजे तो माझा खेळु,
हा बोलु तुझा कीर अढळु, मानूं आम्ही ॥ ४९१ ॥
परि तुवां जी काळें, आजि स्थितीचिये वेळे,
ग्रासिजे हें न मिळे, विचारासी ॥ ४९२ ॥
कैसेनि आंगींचें तारुण्य काढावें ?, कैचें नव्हे तें वार्धक्य आणावें ?,
म्हणौनि करूं म्हणसी तें नव्हे, बहुतकरुनी ॥ ४९३ ॥
हां जी चौपाहारी न भरतां, कोणेही वेळे श्रीअनंता,
काय माध्यान्हीं सविता, मावळतु आहे ? ॥ ४९४ ॥
पैं तुज अखंडिता काळा, तिन्ही आहाती जी वेळा,
त्या तिन्ही परी सबळा, आपुलालिया समयीं ॥ ४९५ ॥
जे वेळीं हों लागे उत्पत्ती, ते वेळीं स्थिति प्रळयो हारपती,
आणि स्थितिकाळीं न मिरविती, उत्पत्ति प्रळयो ॥ ४९६ ॥
पाठीं प्रळयाचिये वेळे, उत्पत्ति स्थिति मावळे,
हें कायसेनही न ढळे, अनादि ऐसें ॥ ४९७ ॥
म्हणौनि आजि तंव भरें भोगें, स्थिति वर्तिजत आहे जगें,
एथ ग्रसिसी तूं हें न लगे, माझ्या जीवीं ॥ ४९८ ॥
तंव संकेतें देव बोले, अगा या दोन्ही सैन्यांसीचि मरण पुरलें,
तें प्रत्यक्षचि तुज दाविलें, येर यथाकाळें जाण ॥ ४९९ ॥
हा संकेतु जंव अनंता, वेळु लागला बोलतां,
तंव अर्जुनें लोकु मागुता, देखिला यथास्थिति ॥ ५०० ॥
मग म्हणतसे देवा, तूं सूत्रीं विश्वलाघवा,
जग आला मा आघवा, पूर्वस्थिति पुढती ॥ ५०१ ॥
परी पडिलिया दुःखसागरीं, तूं काढिसी कां जयापरी,
ते कीर्ति तुझी श्रीहरी, आठवित असे ॥ ५०२ ॥
कीर्ति आठवितां वेळोवेळां, भोगितसें महासुखाचा सोहळा,
तेथ हर्षामृतकल्लोळा, वरी लोळत आहें ॥ ५०३ ॥
देवा जियालेपणें जग, धरी तुझ्या ठायीं अनुराग,
आणि दुष्टां तयां भंग, अधिकाधिक ॥ ५०४ ॥
पैं त्रिभुवनींचिया राक्षसां, महाभय तूं हृषीकेशा,
म्हणौनि पळताती दाही दिशां, पैलीकडे ॥ ५०५ ॥
येथ सुर नर सिद्ध किन्नर, किंबहुना चराचर,
ते तुज देखोनि हर्षनिर्भर, नमस्कारित असती ॥ ५०६ ॥
कस्माच्च ते न नमेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे।
अनन्त देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् ॥ ३७॥
एथ गा कवणा कारणा, राक्षस हे नारायणा,
न लगतीचि चरणा, पळते जाहले ॥ ५०७ ॥
आणि हें काय तूंतें पुसावें, येतुलें आम्हांसिही जाणवे,
तरी सूर्योदयीं राहावें, कैसेनि तमें ? ॥ ५०८ ॥
जी तूं प्रकाशाचा आगरु, आणि जाहला आम्हासि गोचरू,
म्हणौनिया निशाचरां केरु, फिटला सहजें ॥ ५०९ ॥
हें येतुले दिवस आम्हां, कांहीं नेणवेचि श्रीरामा,
आतां देखतसों महिमा, गंभीर तुझा ॥ ५१० ॥
जेथूनि नाना सृष्टींचिया वोळी, पसरती भूतग्रामाचिया वेली,
तया महद्ब्रह्मातें व्याली, दैविकी इच्छा ॥ ५११ ॥
देवो निःसीम तत्त्व सदोदितु, देवो निःसीम गुण अनंतु,
देवो निःसीम साम्य सततु, नरेंद्र देवांचा ॥ ५१२ ॥
जी तूं त्रिजगतिये वोलावा, अक्षर तूं सदाशिवा,
तूंचि सदसत् देवा, तयाही अतीत तें तूं ॥ ५१३ ॥
त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परं निधानम्।
वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप ॥ ३८॥
तूं प्रकृतिपुरुषांचिया आदी, जी महत्तत्वां तूंचि अवधी,
स्वयें तूं अनादि, पुरातनु ॥ ५१४ ॥
तूं सकळ विश्वजीवन, जीवांसि तूंचि निधान,
भूतभविष्याचें ज्ञान, तुझ्याचि हातीं ॥ ५१५ ॥
जी श्रुतीचियां लोचनां, स्वरूपसुख तूंचि अभिन्ना,
त्रिभुवनाचिया आयतना, आयतन तूं ॥ ५१६ ॥
म्हणौनि जी परम, तूंतें म्हणिजे महाधाम,
कल्पांतीं महद्ब्रह्म, तुजमाजीं रिगे ॥ ५१७ ॥
किंबहुना तुवां देवें, विश्व विस्तारिलें आहे आघवें,
तरि अनंतरूपा वानावें, कवणें तूंतें ॥ ५१८ ॥
वायुर्यमोग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च।
नमो नमस्तेऽस्तुसहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥ ३९॥
नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व।
अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥ ४०॥
जी काय एक तूं नव्हसी, कवणे ठायीं नससी,
हें असो जैसा आहासी, तैसिया नमो ॥ ५१९ ॥
वायु तूं अनंता, यम तूं नियमिता,
प्राणिगणीं वसता, अग्नि तो तूं ॥ ५२० ॥
वरुण तूं सोम, स्रष्टा तूं ब्रह्म,
पितामहाचाही परम, आदि जनक तूं ॥ ५२१ ॥
आणिकही जें जें कांहीं, रूप आथि अथवा नाहीं,
तया नमो तुज तैसयाही, जगन्नाथा ॥ ५२२ ॥
ऐसें सानुरागें चित्तें, नमन केलें पंडुसुतें,
मग पुढती म्हणे नमस्ते, नमस्ते प्रभो ॥ ५२३ ॥
पाठीं तिये साद्यंते, न्याहाळी श्रीमूर्तीतें,
आणि पुढती म्हणे नमस्ते, नमस्ते प्रभो ॥ ५२४ ॥
पाहतां पाहतां प्रांतें, समाधान पावे चित्तें,
आणि पुढती म्हणे नमस्ते, नमस्ते प्रभो ॥ ५२५ ॥
इये चराचरीं जीं भूतें, सर्वत्र देखे तयांतें,
आणि पुढती म्हणे नमस्ते, नमस्ते प्रभो ॥ ५२६ ॥
ऐसीं रूपें तियें अद्भुतें, आश्चर्यें स्फुरती अनंतें,
तंव तंव नमस्ते, नमस्तेचि म्हणे ॥ ५२७ ॥
आणिक स्तुतिही नाठवे, आणि निवांतुही न बैसवे,
नेणें कैसा प्रेमभावें, गाजोंचि लागे ॥ ५२८ ॥
किंबहुना इयापरी, नमन केलें सहस्रवरी,
कीं पुढती म्हणे श्रीहरी, तुज सन्मुखा नमो ॥ ५२९ ॥
देवासि पाठी पोट आथि कीं नाहीं, येणें उपयोगु आम्हां काई,
तरि तुज पाठिमोरेयाही, नमो स्वामी ॥ ५३० ॥
उभा माझिये पाठीसीं, म्हणौनि पाठीमोरें म्हणावें तुम्हांसी,
सन्मुख विन्मुख जगेंसीं, न घडें तुज ॥ ५३१ ॥
आतां वेगळालिया अवयवां, नेणें रूप करूं देवा,
म्हणौनि नमो तुज सर्वा, सर्वात्मका ॥ ५३२ ॥
जी अनंतबळसंभ्रमा, तुज नमो अमित विक्रमा,
सकळकाळीं समा, सर्वरूपा ॥ ५३३ ॥
आघविया आकाशीं जैसें, अवकाशचि होऊनि आकाश असे,
तूं सर्वपणें तैसें, पातलासि सर्व ॥ ५३४ ॥
किंबहुना केवळ, सर्व हें तूंचि निखिळ,
परी क्षीरार्णवीं कल्लोळ, पयाचे जैसे ॥ ५३५ ॥
म्हणौनिया देवा, तूं वेगळा नव्हसी सर्वां,
हें आलें मज सद्भावा, आतां तूंचि सर्व ॥ ५३६ ॥
सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति।
अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात्प्रणयेन वापि ॥ ४१॥
परि ऐसिया तूतें स्वामी, कहींच नेणों जी आम्ही,
म्हणौनि सोयरे संबंधधर्मीं, राहाटलों तुजसीं ॥ ५३७ ॥
अहा थोर वाउर जाहलें, अमृतें संमार्जन म्यां केलें,
वारिकें घेऊनि दिधलें, कामधेनूतें ॥ ५३८ ॥
परिसाचा खडवाचि जोडला, कीं फोडोनि आम्ही गाडोरा घातला,
कल्पतरू तोडोनि केला, कूंप शेता ॥ ५३९ ॥
चिंतामणीची खाणी लागली, तेणें करें वोढाळें वोल्हांडिली,
तैसी तुझी जवळिक धाडिली, सांगातीपणें ॥ ५४० ॥
हें आजिचेंचि पाहें पां रोकडें, कवण झुंज हें केवढें,
एथ परब्रह्म तूं उघडें, सारथी केलासी ॥ ५४१ ॥
यया कौरवांचिया घरा, शिष्टाई धाडिलासि दातारा,
ऐसा वणिजेसाठीं जागेश्वरा, विकलासि आम्हीं ॥ ५४२ ॥
तूं योगियांचें समाधिसुख, कैसा जाणेचिना मी मूर्ख,
उपरोधु जी सन्मुख, तुजसीं करूं ॥ ५४३ ॥
यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु।
एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् ॥ ४२॥
तूं या विश्वाची अनादि आदी, बैससी जिये सभासदीं,
तेथें सोयरीकीचिया संबंधीं, रळीं बोलों ॥ ५४४ ॥
विपायें राउळा येवों, तरि तुझेनि अंगें मानु पावों,
न मानिसी तरी जावों, रुसोनि सलगी ॥ ५४५ ॥
पायां लागोनि बुझावणी, तुझ्या ठायीं शारङ्गपाणी,
पाहिजे ऐशी करणी, बहु केली आम्हीं ॥ ५४६ ॥
सजणपणाचिया वाटा, तुजपुढें बैसें उफराटा,
हा पाडु काय वैकुंठा ?, परि चुकलों आम्हीं ॥ ५४७ ॥
देवेंसि कोलकाठी धरूं, आखाडा झोंबीलोंबी करूं,
सारी खेळतां आविष्करूं, निकरेंही भांडों ॥ ५४८ ॥
चांग तें उराउरीं मागों, देवासि कीं बुद्धि सांगों,
तेवींचि म्हणों काय लागों, तुझें आम्ही ॥ ५४९ ॥
ऐसा अपराधु हा आहे, जो त्रिभुवनीं न समाये,
जी नेणतांचि कीं पाये, शिवतिले तुझे ॥ ५५० ॥
देवो बोनयाच्या अवसरीं, लोभें कीर आठवण करी,
परी माझा निसुग गर्व अवधारीं, जे फुगूनचि बैसें ॥ ५५१ ॥
देवाचिया भोगायतनीं, खेळतां आशंकेना मनीं,
जी रिगोनियां शयनीं, सरिसा पहुडें ॥ ५५२ ॥
'कृष्ण म्हणौनि हाकारिजे, यादवपणें तूंतें लेखिजे,
आपली आण घालिजे, जातां तुज ॥ ५५३ ॥
मज एकासनीं बैसणें, कां तुझा बोलु न मानणें,
हें वोतटीचेनि दाटपणें, बहुत घडलें ॥ ५५४ ॥
म्हणौनि काय काय आतां, निवेदिजेल अनंता,
मी राशि आहें समस्तां, अपराधांचि ॥ ५५५ ॥
यालागीं पुढां अथवा पाठीं, जियें राहटलों बहुवें वोखटीं,
तियें मायेचिया परी पोटीं, सामावीं प्रभो ॥ ५५६ ॥
जी कोण्ही एके वेळे, सरिता घेऊन येती खडुळें,
तियें सामाविजेति सिंधुजळें, आन उपायो नाहीं ॥ ५५७ ॥
तैसी प्रीती कां प्रमादें, देवेंसीं मज विरुद्धें,
बोलविलीं तियें मुकुंदें, उपसाहावीं जी ॥ ५५८ ॥
आणि देवाचेनि क्षमत्वें क्षमा, आधारु जाली आहे या भूतग्रामा,
म्हणौनि जी पुरुषोत्तमा, विनवूं तें थोडें ॥ ५५९ ॥
तरी आतां अप्रमेया, मज शरणागता आपुलिया,
क्षमा कीजो जी यया, अपराधांसि ॥ ५६० ॥
पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान्।
न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभावः ॥ ४३॥
जी जाणितलें मियां साचें, महिमान आतां देवाचें,
जे देवो होय चराचराचें, जन्मस्थान ॥ ५६१ ॥
हरिहरादि समस्तां, देवा तूं परम देवता,
वेदांतेंही पढविता, आदिगुरु तूं ॥ ५६२ ॥
गंभीर तूं श्रीरामा, नाना भूतैकसमा,
सकळगुणीं अप्रतिमा, अद्वितीया ॥ ५६३ ॥
तुजसी नाहीं सरिसें, हें प्रतिपादनचि कायसें ?,
तुवां जालेनि आकाशें, सामाविलें जग ॥ ५६४ ॥
तया तुझेनि पाडें दुजें, ऐसें बोलतांचि लाजिजे,
तेथ अधिकाची कीजे, गोठी केवीं ॥ ५६५ ॥
म्हणौनि त्रिभुवनीं तूं एकु, तुजसरिखा ना अधिकु,
तुझा महिमा अलौकिकु, नेणिजे वानूं ॥ ५६६ ॥
तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यम्।
पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायाऱसि देव सोढुम् ॥ ४४॥
ऐसें अर्जुनें म्हणितलें, मग पुढती दंडवत घातलें,
तेथें सात्त्विकाचें आलें, भरतें तया ॥ ५६७ ॥
मग म्हणतसे प्रसीद प्रसीद, वाचा होतसे सद्गद,
काढी जी अपराध-, समुद्रौनि मातें ॥ ५६८ ॥
तुज विश्वसुहृदातें कहीं, सोयरेपणें न मनूंचि पाहीं,
तुज विईश्वेश्वराचिया ठायीं, ऐश्वर्य केलें ॥ ५६९ ॥
तूं वर्णनीय परी लोभें, मातें वर्णिसी पां सभे,
तरि मियां वल्गिजे क्षोभें, अधिकाधिक ॥ ५७० ॥
आतां ऐसिया अपराधां, मर्यादा नाहीं मुकुंदा,
म्हणौनि रक्ष रक्ष प्रमादा, पासोनियां ॥ ५७१ ॥
जी हेंचि विनवावयालागीं, कैंची योग्यता माझिया आंगीं,
परी अपत्य जैसें सलगी, बापेंसीं बोले ॥ ५७२ ॥
पुत्राचे अपराध, जरी जाहले अगाध,
तरी पिता साहे निर्द्वंद्व, तैसें साहिजो जी ॥ ५७३ ॥
सख्याचें उद्धत, सखा साहे निवांत,
तैसें तुवां समस्त, साहिजो जी ॥ ५७४ ॥
प्रियाचिया ठायीं सन्मान, प्रिय न पाहें सर्वथा जाण,
तेवीं उच्छिष्ट काढिलें आपण, ते क्षमा कीजो जी ॥ ५७५ ॥
नातरी प्राणाचें सोयरें भेटे, मग जीवें भूतलीं जियें संकटें,
तियें निवेदितां न वाटे, संकोचु कांहीं ॥ ५७६ ॥
कां उखितें आंगें जीवें, आपणपें दिधलें जिया मनोभावें,
तिया कांतु मिनलिया न राहवें, हृदय जेवीं ॥ ५७७ ॥
तयापरी जी मियां, हें विनविलें तुमतें गोसाविया,
आणि कांहीं एक म्हणावया, कारण असे ॥ ५७८ ॥
अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे।
तदेव मे दर्शय देव रूपं प्रसीद देवेश जगन्निवास ॥ ४५॥
तरी देवेंसीं सलगी केली, जे विश्वरूपाची आळी घेतली,
ते मायबापें पुरविली, स्नेहाळाचेनि ॥ ५७९ ॥
सुरतरूंची झाडें, आंगणीं लावावीं कोडें,
देयावें कामधेनुचें पाडें, खेळावया ॥ ५८० ॥
मियां नक्षत्रीं डाव पाडावा, चंद्र चेंडुवालागीं आणावा,
हा छंदु सिद्धी नेला आघवा, माउलिये तुवां ॥ ५८१ ॥
जिया अमृतलेशालागीं सायास, तयाचा पाऊस केला चारी मास,
पृथ्वी वाहून चासेचास, चिंतामणी पेरिले ॥ ५८२ ॥
ऐसा कृतकृत्य केला स्वामी, बहुवे लळा पाळिला तुम्हीं,
दाविलें जें हरब्रह्मीं, नायकिजे कानीं ॥ ५८३ ॥
मा देखावयाची केउती गोठी, जयाची उपनिषदां नाहीं भेटी,
ते जिव्हारींची गांठी, मजलागीं सोडिली ॥ ५८४ ॥
जी कल्पादीलागोनि, आजिची घडी धरुनी,
माझीं जेतुलीं हौनी, गेलीं जन्में ॥ ५८५ ॥
तयां आघवियांचि आंतु, घरडोळी घेऊनि असें पाहतु,
परि ही देखिली ऐकिली मातु, आतुडेचिना ॥ ५८६ ॥
बुद्धीचें जाणणें, कहीं न वचेचि याचेनि आंगणें,
हे सादही अंतःकरणें, करवेचिना ॥ ५८७ ॥
तेथा डोळ्यां देखी होआवी, ही गोठीचि कायसया करावी,
किंबहुना पूर्वीं, दृष्ट ना श्रुत ॥ ५८८ ॥
तें हें विश्वरूप आपुलें, तुम्हीं मज डोळां दाविलें,
तरी माझें मन झालें, हृष्ट देवा ॥ ५८९ ॥
परि आतां ऐसी चाड जीवीं, जे तुजसीं गोठी करावी,
जवळीक हे भोगावी, आलिंगावासी ॥ ५९० ॥
ते याचि रूपीं करूं म्हणिजे, तरि कोणे एके मुखेंसी चावळिजे,
आणि कवणा खेंव देईजे, तुज लेख नाहीं ॥ ५९१ ॥
म्हणौनि वारियासवें धावणें, न ठके गगना खेंव देणें,
जळकेली खेळणें, समुद्रीं केउतें ? ॥ ५९२ ॥
यालागीं जी देवा, एथिंचें भय उपजतसे जीवा,
म्हणौनि येतुला लळा पाळावा, जे पुरे हें आतां ॥ ५९३ ॥
पैं चराचर विनोदें पाहिजे, मग तेणें सुखें घरीं राहिजे,
तैसें चतुर्भुज रूप तुझें, तो विसांवा आम्हां ॥ ५९४ ॥
आम्हीं योगजात अभ्यासावें, तेणें याचि अनुभवा यावें,
शास्त्रांतें आलोडावें, परि सिद्धांतु तो हाचि ॥ ५९५ ॥
आम्हीं यजनें किजती सकळें, परि तियें फळावीं येणेंचि फळें,
तीर्थें होतु सकळें, याचिलागीं ॥ ५९६ ॥
आणीकही कांहीं जें जें, दान पुण्य आम्हीं कीजे,
तया फळीं फळ तुझें, चतुर्भुज रूप ॥ ५९७ ॥
ऐसी तेथिंची जीवा आवडी, म्हणौनि तेंचि देखावया लवडसवडी,
वर्तत असे ते सांकडी, फेडीजे वेगीं ॥ ५९८ ॥
अगा जीवींचें जाणतेया, सकळ विश्ववसवितेया,
प्रसन्न होईं पूजितया, देवांचिया देवा ॥ ५९९ ॥
किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव।
तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते ॥ ४६॥
कैसें नीलोत्पलातें रांवित, आकाशाही रंगु लावित,
तेजाची वोज दावित, इंद्रनीळा ॥ ६०० ॥
जैसा परिमळ जाहला मरगजा, कां आनंदासि निघालिया भुजा,
ज्याचे जानुवरी मकरध्वजा, जोडली बरव ॥ ६०१ ॥
मस्तकीं मुकुटातें ठेविलें, कीं मुकुटा मुकुट मस्तक झालें,
शृंगारा लेणें लाधलें, आंगाचेनि जया ॥ ६०२ ॥
इंद्रधनुष्याचिये आडणी, माजीं मेघ गगनरंगणीं,
तैसें आवरिलें शारङ्गपाणी, वैजयंतिया ॥ ६०३ ॥
आतां कवणी ते उदार गदा, असुरां देत कैवल्य पदा,
कैसें चक्र हन गोविंदा, सौम्यतेजें मिरवे ॥ ६०४ ॥
किंबहुना स्वामी, तें देखावया उत्कंठित पां मी,
म्हणौनि आतां तुम्हीं, तैसया होआवें ॥ ६०५ ॥
हे विश्वरूपाचे सोहळे, भोगूनि निवाले जी डोळे,
आतां होताति आंधले, कृष्णमूर्तीलागीं ॥ ६०६ ॥
तें साकार कृष्णरूपडें, वांचूनि पाहों नावडे,
तें न देखतां थोडें, मानिताती हे ॥ ६०७ ॥
आम्हां भोगमोक्षाचिया ठायीं, श्रीमूर्तीवांचूनि नाहीं,
म्हणौनि तैसाचि साकारु होईं, हें सांवरीं आतां ॥ ६०८ ॥
श्रीभगवानुवाच।
मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात्।
तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् ॥ ४७॥
या अर्जुनाचिया बोला, विश्वरूपा विस्मयो जाहला,
म्हणे ऐसा नाहीं देखिला, धसाळ कोणी ॥ ६०९ ॥
कोण हे वस्तु पावला आहासी, तया लाभाचा तोषु न घेसी,
मा भेणें काय नेणों बोलसी, हेकाडु ऐसा ॥ ६१० ॥
आम्हीं सावियाचि जैं प्रसन्न होणें, तैं आंगचिवरी म्हणें देणें,
वांचोनि जीव असे वेंचणें, कवणासि गा ॥ ६११ ॥
तें हें तुझिये चाडे, आजि जिवाचेंचि दळवाडें,
कामऊनियां येवढें, रचिलें ध्यान ॥ ६१२ ॥
ऐसी काय नेणों तुझिये आवडी, जाहली प्रसन्नता आमुची वेडी,
म्हणौनि गौप्याचीही गुढी, उभविली जगीं ॥ ६१३ ॥
तें हें अपारां अपार, स्वरूप माझें परात्पर,
एथूनि ते अवतार, कृष्णादिक ॥ ६१४ ॥
हें ज्ञानतेजाचें निखिळ, विश्वात्मक केवळ,
अनंत हे अढळ, आद्य सकळां ॥ ६१५ ॥
हें तुजवांचोनि अर्जुना, पूर्वीं श्रुत दृष्ट नाहीं आना,
जे जोगें नव्हे साधना, म्हणौनियां ॥ ६१६ ॥
न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः।
एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर ॥ ४८॥
याची सोय पातले, आणि वेदीं मौनचि घेतलें,
याज्ञिकी माघौते आले, स्वर्गौनियां ॥ ६१७ ॥
साधकीं देखिला आयासु, म्हणौनि वाळिला योगाभ्यासु,
आणि अध्ययनें सौरसु, नाहीं एथ ॥ ६१८ ॥
सीगेचीं सत्कर्मे, धाविन्नलीं संभ्रमें,
तिहीं बहुतेकीं श्रमें, सत्यलोकु ठाकिला ॥ ६१९ ॥
तपीं ऐश्वर्य देखिलें, आणि उग्रपण उभयांचि सांडिलें,
एक तपसाधन जें ठेलें, अपारांतरें ॥ ६२० ॥
तें हें तुवां अनायासें, विश्वरूप देखिलें जैसें,
इये मनुष्यलोकीं तैसें, न फवेचि कवणा ॥ ६२१ ॥
आजि ध्यानसंपत्तीलागीं, तूंचि एकु आथिला जगीं,
हें परम भाग्य आंगीं, विरंचीही नाहीं ॥ ६२२ ॥
मा ते व्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदम्।
व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य ॥ ४९॥
म्हणौनि विश्वरूपलाभें श्लाघ, एथिचें भय नेघ नेघ,
हें वांचूनि अन्य चांग, न मनीं कांहीं ॥ ६२३ ॥
हां गा समुद्र अमृताचा भरला, आणि अवसांत वरपडा जाहला,
मग कोणीही आथि वोसंडिला, बुडिजैल म्हणौनि ? ॥ ६२४ ॥
नातरी सोनयाचा डोंगरु, येसणा न चले हा थोरु,
ऐसें म्हणौनि अव्हेरु, करणें घडे ? ॥ ६२५ ॥
दैवें चिंतामणी लेईजे, कीं हें ओझें म्हणौनि सांडिजे ?,
कामधेनु दवडिजे, न पोसवे म्हणौनि ? ॥ ६२६ ॥
चंद्रमा आलिया घरा, म्हणिजे निगे करितोसि उबारा,
पडिसायि पाडितोसि दिनकरा, परता सर ॥ ६२७ ॥
तैसें ऐश्वर्य हें महातेज, आजि हातां आलें आहे सहज,
कीं एथ तुज गजबज, होआवी कां ? ॥ ६२८ ॥
परि नेणसीच गांवढिया, काय कोपों आतां धनंजया,
आंग सांडोनि छाया, आलिंगितोसि मा ? ॥ ६२९ ॥
हें नव्हे जो मी साचें, एथ मन करूनियां काचें,
प्रेम धरिसी अवगणियेचें, चतुर्भुज जें ॥ ६३० ॥
तरि अझुनिवरी पार्था, सांडीं सांडीं हे व्यवस्था,
इयेविषयीं आस्था, करिसी झणें ॥ ६३१ ॥
हें रूप जरी घोर, विकृति आणि थोर,
तरी कृतनिश्चयाचें घर, हेंचि करीं ॥ ६३२ ॥
कृपण चित्तवृत्ति जैसी, रोंवोनि घालीं ठेवयापासीं,
मग नुसधेनि देहेंसीं, आपण असे ॥ ६३३ ॥
कां अजातपक्षिया जवळा, जीव बैसवूनि अविसाळां,
पक्षिणी अंतराळा-, माजीं जाय ॥ ६३४ ॥
नाना गाय चरे डोंगरीं, परि चित्त बांधिलें वत्सें घरीं,
प्रेम एथिंचें करीं, स्थानपती ॥ ६३५ ॥
येरें वरिचिलेनि चित्तें, बाह्य सख्य सुखापुरतें,
भोगिजो कां श्रीमूर्तींतें, चतुर्भुज ॥ ६३६ ॥
परि पुढतपुढती पांडवा, हा एक बोलु न विसरावा,
जे इये रूपींहूनि सद्भावा, नेदावें निघों ॥ ६३७ ॥
हें कहीं नव्हतेंचि देखिलें, म्हणौनि भय जें तुज उपजलें,
तें सांडीं एथ संचलें, असों दे प्रेम ॥ ६३८ ॥
आतां करूं तुजयासारखें, ऐसें म्हणितलें विश्वतोमुखें,
तरि मागील रूप सुखें, न्याहाळीं पां तूं ॥ ६३९ ॥
संजय उवाच।
इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः ॥
आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥ ५०॥
ऐसें वाक्य बोलतखेंवो, मागुता मनुष्य जाहला देवो,
हें ना परि नवलावो, आवडीचा तिये ॥ ६४० ॥
श्रीकृष्णचि कैवल्य उघडें, वरि सर्वस्व विश्वरूपायेवढें,
हातीं दिधलें कीं नावडे, अर्जुनासि ॥ ६४१ ॥
वस्तु घेऊनि वाळिजे, जैसें रत्नासि दूषण ठेविजे,
नातरी कन्या पाहूनियां म्हणिजे, मना न ये हे ॥ ६४२ ॥
तया विश्वरूपायेवढी दशा, करितां प्रीतीचा वाढू कैसा,
सेल दीधलीसे उपदेशा, किरीटीसिं देवें ॥ ६४३ ॥
मोडोनि भांगाराचा रवा, लेणें घडिलें आपलिया सवा,
मग नावडे जरी जीवा, तरी आटिजे पुढती ॥ ६४४ ॥
तैसें शिष्याचिये प्रीती जाहलें, कृष्णत्व होतें तें विश्वरूप केलें,
तें मना नयेचि मग आणिलें, कृष्णपण मागुतें ॥ ६४५ ॥
हा ठाववरी शिष्याची निकसी, सहातें गुरु आहाती कवणे देशीं ?,
परि नेणिजे आवडी कैशी, संजयो म्हणे ॥ ६४६ ॥
मग विश्वरूप व्यापुनि भोंवतें, जें दिव्य तेज प्रगटलें होतें,
तेंचि सामावलें मागुतें, कृष्णरूपीं तये ॥ ६४७ ॥
जैसें त्वंपद हें आघवें, तत्पदीं सामावे,
अथवा द्रुमाकारु सांठवे, बीजकणिके जेवीं ॥ ६४८ ॥
नातरी स्वप्नसंभ्रमु जैसा, गिळी चेइली जीवदशा,
श्रीकृष्णें योगु हा तैसा, संहारिला तो ॥ ६४९ ॥
जैसी प्रभा हारपली बिंबीं, कीं जळदसंपत्ती नभीं,
नाना भरतें सिंधुगर्भीं, रिगालें राया ॥ ६५० ॥
हो कां जे कृष्णाकृतीचिये मोडी, होती विश्वरूपपटाची घडी,
ते अर्जुनाचिये आवडी, उकलूनि दाविली ॥ ६५१ ॥
तंव परिमाणा रंगु, तेणें देखिलें साविया चांगु,
तेथ ग्राहकीये नव्हेचि लागु, म्हणौनि घडी केली पुढती ॥ ६५२ ॥
तैसें वाढीचेनि बहुवसपणें, रूपें विश्व जिंतिलें जेणें,
तें सौम्य कोडिसवाणें, साकार जाहलें ॥ ६५३ ॥
किंबहुना अनंतें, धरिलें धाकुटपण मागुतें,
परि आश्वासिलें पार्थातें, बिहालियासी ॥ ६५४ ॥
जो स्वप्नीं स्वर्गा गेला, तो अवसांत जैसा चेइला,
तैसा विस्मयो जाहला, किरीटीसी ॥ ६५५ ॥
नातरी गुरुकृपेसवें, वोसरलेया प्रपंचज्ञान आघवें,
स्फुरे तत्त्व तेवीं पांडवें, श्रीमूर्ति देखिली ॥ ६५६ ॥
तया पांडवा ऐसें चित्तीं, आड विश्वरूपाची जवनिका होती,
ते फिटोनि गेली परौती, हें भलें जाहलें ॥ ६५७ ॥
काय काळातें जिणोनि आला, कीं महावातु मागां सांडिला,
आपुलिया बाही उतरला, सातही सिंधु ॥ ६५८ ॥
ऐसा संतोष बहु चित्तें, घेइजत असे पंडुसुतें,
विश्वरूपापाठीं कृष्णातें, देखोनियां ॥ ६५९ ॥
मग सूर्याचिया अस्तमानीं, मागुती तारा उगवती गगनीं,
तैसी देखों लागला अवनीं, लोकांसहित ॥ ६६० ॥
पाहे तंव तेंचि कुरुक्षेत्र, तैसेंचि देखे दोहीं भागीं गोत्र,
वीर वर्षताती शस्त्रास्त्र, संघाटवरी ॥ ६६१ ॥
तया बाणांचिया मांडवाआंतु, तैसाचि रथु देखे निवांतु,
धुरे बैसला लक्ष्मीकांतु, आपण तळीं ॥ ६६२ ॥
अर्जुन उवाच।
दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन।
इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृउतिं गतः ॥ ५१॥
एवं मागील जैसें तैसें, तेणें देखिलें वीरविलासें,
मग म्हणे जियालों ऐसें, जाहलें आतां ॥ ६६३ ॥
बुद्धीतें सांडोनि ज्ञान, भेणें वळघलें रान,
अहंकारेंसी मन, देशोधडी जाहलें ॥ ६६४ ॥
इंद्रियें प्रवृत्ती भुललीं, वाचा प्राणा चुकली,
ऐसें आपांपरी होती जाली, शरीरग्रामीं ॥ ६६५ ॥
तियें आघवींचि मागुतीं, जिवंत भेटलीं प्रकृती,
आतां जिताणें श्रीमूर्ती, जाहलें मियां ॥ ६६६ ॥
ऐसें सुख जीवीं घेतलें, मग श्रीकृष्णातें म्हणितलें,
मियां तुमचें रूप देखिलें, मानुष हें ॥ ६६७ ॥
हें रूप दाखवणें देवराया, कीं मज अपत्या चुकलिया,
बुझावोनि तुवां माया, स्तनपान दिधलें ॥ ६६८ ॥
जी विश्वरूपाचिया सागरीं, होतों तरंग मवित वांवेवरी,
तो इये निजमूर्तीच्या तीरीं, निगालों आतां ॥ ६६९ ॥
आइकें द्वारकापुरसुहाडा, मज सुकतिया जी झाडा,
हे भेटी नव्हे बहुडा, मेघाचा केला ॥ ६७० ॥
जी सावियाची तृषा फुटला, तया मज अमृतसिंधु हा भेटला,
आतां जिणयाचा जाहला, भरंवसा मज ॥ ६७१ ॥
माझिया हृदयरंगणीं, होताहे हरिखलतांची लावणी,
सुखेंसीं बुझावणी, जाहली मज ॥ ६७२ ॥
श्रीभगवानुवाच।
सुदुदर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम।
देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शकाङ्क्षिणः ॥ ५२॥
यया पार्थाचिया बोलासवें, हें काय म्हणितलें देवें,
तुवां प्रेम ठेवूनि यावें, विश्वरूपीं कीं ॥ ६७३ ॥
मग इये श्रीमूर्ती, भेटावें सडिया आयती,
ते शिकवण सुभद्रापती, विसरलासि मा ॥ ६७४ ॥
अगा आंधळिया अर्जुना, हाता आलिया मेरूही होय साना,
ऐसा आथी मना, चुकीचा भावो ॥ ६७५ ॥
तरी विश्वात्मक रूपडें, जें दाविलें आम्ही तुजपुढें,
तें शंभूही परि न जोडे, तपें करितां ॥ ६७६ ॥
आणि अष्टांगादिसंकटीं, योगी शिणताति किरीटी,
परि अवसरु नाहीं भेटी, जयाचिये ॥ ६७७ ॥
तें विश्वरूप एकादे वेळ, कैसेनि देखों अळुमाळ,
ऐसें स्मरतां काळ, जातसे देवां ॥ ६७८ ॥
आशेचिये अंजुळी, ठेऊनि हृदयाचिया निडळीं,
चातक निराळीं, लागले जैसे ॥ ६७९ ॥
तैसे उत्कंठा निर्भर, होऊनियां सुरवर,
घोकीत आठही पाहार, भेटी जयाची ॥ ६८० ॥
परि विश्वरूपासारिखें, स्वप्नींही कोण्ही न देखे,
तें प्रत्यक्ष तुवां सुखें, देखिलें हें ॥ ६८१ ॥
नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया।
शक्यं एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ॥ ५३॥
पैं उपायांसि वाटा, न वाहती एथ सुभटा,
साहीसहित वोहटा, वाहिला वेदीं ॥ ६८२ ॥
मज विश्वरूपाचिया मोहरा, चालावया धनुर्धरा,
तपांचियाही संभारा, नव्हेचि लागु ॥ ६८३ ॥
आणि दानादि कीर कानडें, मी यज्ञींही तैसा न सांपडें,
जैसेनि कां सुरवाडें, देखिला तुवां ॥ ६८४ ॥
तैसा मी एकीचि परि, आंतुडें गा अवधारीं,
जरी भक्ति येऊनि वरी, चित्तातें गा ॥ ६८५ ॥
भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन।
ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥ ५४॥
परि तेचि भक्ति ऐसी, पर्जन्याची सुटिका जैसी,
धरावांचूनि अनारिसी, गतीचि नेणें ॥ ६८६ ॥
कां सकळ जळसंपत्ती, घेऊनि समुद्रातें गिंवसिती,
गंगा जैसी अनन्यगती, मिळालीचि मिळे ॥ ६८७ ॥
तैसें सर्वभावसंभारें, न धरत प्रेम एकसरें,
मजमाजीं संचरे, मीचि होऊनि ॥ ६८८ ॥
आणि तेवींचि मी ऐसा, थडिये माझारीं सरिसा,
क्षीराब्धि कां जैसा, क्षीराचाचि ॥ ६८९ ॥
तैसें मजलागुनि मुंगीवरी, किंबहुना चराचरीं,
भजनासि कां दुसरी, परीचि नाहीं ॥ ६९० ॥
तयाचि क्षणासवें, एवंविध मी जाणवें,
जाणितला तरी स्वभावें, दृष्टही होय ॥ ६९१ ॥
मग इंधनीं अग्नि उद्दीपें, आणि इंधन हें भाष हारपे,
तें अग्निचि होऊनि आरोपें, मूर्त जेवीं ॥ ६९२ ॥
कां उदय न कीजे तेजाकारें, तंव गगनचि होऊनि असे आंधारें,
मग उदईलिया एकसरें, प्रकाशु होय ॥ ६९३ ॥
तैसें माझिये साक्षात्कारीं, सरे अहंकाराची वारी,
अहंकारलोपीं अवधारीं, द्वैत जाय ॥ ६९४ ॥
मग मी तो हें आघवें, एक मीचि आथी स्वभावें,
किंबहुना सामावे, समरसें तो ॥ ६९५ ॥
मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः ॥
निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥ ५५॥
ॐ इति श्रीमद्भग्वद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगोनाम एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
जो मजचि एकालागीं, कर्में वाहातसे आंगीं,
जया मीवांचोनि जगीं, गोमटें नाहीं ॥ ६९६ ॥
दृष्टादृष्ट सकळ, जयाचें मीचि केवळ,
जेणें जिणयाचें फळ, मजचि नाम ठेविलें ॥ ६९७ ॥
मग भूतें हे भाष विसरला, जे दिठी मीचि आहें सूदला,
म्हणौनि निर्वैर जाहला, सर्वत्र भजे ॥ ६९८ ॥
ऐसा जो भक्तु होये, तयाचें त्रिधातुक हें जैं जाये,
तैं मीचि हौनि ठायें, पांडवा गा ॥ ६९९ ॥
ऐसें जगदुदरदोंदिलें, तेणें करुणारसरसाळें,
संजयो म्हणे बोलिलें, श्रीकृष्णदेवें ॥ ७०० ॥
ययावरी तो पंडुकुमरु, जाहला आनंदसंपदा थोरु,
आणि कृष्णचरणचतुरु, एक तो जगीं ॥ ७०१ ॥
तेणें देवाचिया दोनही मूर्ती, निकिया न्याहाळिलिया चित्तीं,
तंव विश्वरूपाहूनि कृष्णाकृतीं, देखिला लाभु ॥ ७०२ ॥
परि तयाचिये जाणिवे, मानु न कीजेचि देवें,
जें व्यापकाहूनि नव्हे, एकदेशी ॥ ७०३ ॥
हेंचि समर्थावयालागीं, एक दोन चांगी,
उपपत्ती शारङ्गी, दाविता जाहला ॥ ७०४ ॥
तिया ऐकोनि सुभद्राकांतु, चित्तीं आहे म्हणतु,
तरि होय बरवें दोन्हीं आंतु, तें पुढती पुसों ॥ ७०५ ॥
ऐसा आलोचु करूनि जीवीं, आतां पुसती वोज बरवी,
आदरील ते परिसावी, पुढें कथा ॥ ७०६ ॥
प्रांजळ ओंवीप्रबंधें, गोष्टी सांगिजेल विनोदें,
तें परिसा आनंदें, ज्ञानदेवो म्हणे ॥ ७०७ ॥
भरोनि सद्भावाची अंजुळी, मियां वोंवियाफुलें मोकळीं,
अर्पिलीं अंघ्रियुगुलीं, विश्वरूपाच्या ॥ ७०८ ॥
ज्ञानेश्वरी / अध्याय बारावा : संत ज्ञानेश्वर
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ द्वादशोऽध्यायः - अध्याय बारावा,।
। भक्तियोगः।
जय जय वो शुद्धे, उदारे प्रसिद्धे,
अनवरत आनंदे, वर्षतिये ॥ १ ॥
विषयव्याळें मिठी, दिधलिया नुठी ताठी,
ते तुझिये गुरुकृपादृष्टी, निर्विष होय ॥ २ ॥
तरी कवणातें तापु पोळी, कैसेनि वो शोकु जाळी,
जरी प्रसादरसकल्लोळीं, पुरें येसि तूं ॥ ३ ॥
योगसुखाचे सोहळे, सेवकां तुझेनि स्नेहाळे,
सोऽहंसिद्धीचे लळे, पाळिसी तूं ॥ ४ ॥
आधारशक्तीचिया अंकीं, वाढविसी कौतुकीं,
हृदयाकाशपल्लकीं, परीये देसी निजे ॥ ५ ॥
प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी, करिसी मनपवनाचीं खेळणीं,
आत्मसुखाची बाळलेणीं, लेवविसी ॥ ६ ॥
सतरावियेचें स्तन्य देसी, अनुहताचा हल्लरू गासी,
समाधिबोधें निजविसी, बुझाऊनि ॥ ७ ॥
म्हणौनि साधकां तूं माउली, पिके सारस्वत तुझिया पाउलीं,
या कारणें मी साउली, न संडीं तुझी ॥ ८ ॥
अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी, तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी,
तो सकलविद्यांचिये सृष्टीं, धात्रा होय ॥ ९ ॥
म्हणौनि अंबे श्रीमंते, निजजनकल्पलते,
आज्ञापीं मातें, ग्रंथनिरूपणीं ॥ १० ॥
नवरसीं भरवीं सागरु, करवीं उचित रत्नांचे आगरु,
भावार्थाचे गिरिवरु, निफजवीं माये ॥ ११ ॥
साहित्यसोनियाचिया खाणी, उघडवीं देशियेचिया क्षोणीं,
विवेकवल्लीची लावणी, हों देई सैंघ ॥ १२ ॥
संवादफळनिधानें, प्रमेयाचीं उद्यानें,
लावीं म्हणे गहनें, निरंतर ॥ १३ ॥
पाखांडाचे दरकुटे, मोडीं वाग्वाद अव्हांटे,
कुतर्कांचीं दुष्टें, सावजें फेडीं ॥ १४ ॥
श्रीकृष्णगुणीं मातें, सर्वत्र करीं वो सरतें,
राणिवे बैसवी श्रोते, श्रवणाचिये ॥ १५ ॥
ये मराठीयेचिया नगरीं, ब्रह्मविद्येचा सुकाळु करी,
घेणें देणें सुखचिवरी, हो देई या जगा ॥ १६ ॥
तूं आपुलेनि स्नेहपल्लवें, मातें पांघुरविशील सदैवें,
तरी आतांचि हें आघवें, निर्मीन माये ॥ १७ ॥
इये विनवणीयेसाठीं, अवलोकिलें गुरु कृपादृष्टी,
म्हणे गीतार्थेंसी उठी, न बोलें बहु ॥ १८ ॥
तेथ जी जी महाप्रसादु, म्हणौनि साविया जाहला आनन्दु,
आतां निरोपीन प्रबंधु, अवधान दीजे ॥ १९ ॥
अर्जुन उवाच।
एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते,
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॥ १॥
तरी सकलवीराधिराजु, जो सोमवंशीं विजयध्वजु,
तो बोलता जाहला आत्मजु, पंडुनृपाचा ॥ २० ॥
कृष्णातें म्हणे अवधारिलें, आपण विश्वरूप मज दाविलें,
तें नवल म्हणौनि बिहालें, चित्त माझें ॥ २१ ॥
आणि इये कृष्णमूर्तीची सवे, यालागीं सोय धरिली जीवें,
तंव नको म्हणोनि देवें, वारिलें मातें ॥ २२ ॥
तरी व्यक्त आणि अव्यक्त, हें तूंचि एक निभ्रांत,
भक्ती पाविजे व्यक्त, अव्यक्त योगें ॥ २३ ॥
या दोनी जी वाटा, तूंतें पावावया वैकुंठा,
व्यक्ताव्यक्त दारवंठां, रिगिजे येथ ॥ २४ ॥
पैं जे वानी श्यातुका, तेचि वेगळिये वाला येका,
म्हणौनि एकदेशिया व्यापका, सरिसा पाडू ॥ २५ ॥
अमृताचिया सागरीं, जे लाभे सामर्थ्याची थोरी,
तेचि दे अमृतलहरी, चुळीं घेतलेया ॥ २६ ॥
हे कीर माझ्या चित्तीं, प्रतीति आथि जी निरुती,
परि पुसणें योगपती, तें याचिलागीं ॥ २७ ॥
जें देवा तुम्हीं नावेक, अंगिकारिलें व्यापक,
तें साच कीं कवतिक, हें जाणावया ॥ २८ ॥
तरी तुजलागीं कर्म, तूंचि जयांचें परम,
भक्तीसी मनोधर्म, विकोनि घातला ॥ २९ ॥
इत्यादि सर्वीं परीं, जे भक्त तूंतें श्रीहरी,
बांधोनियां जिव्हारीं, उपासिती ॥ ३० ॥
आणि जें प्रणवापैलीकडे, वैखरीयेसी जें कानडें,
कायिसयाहि सांगडें, नव्हेचि जें वस्तु ॥ ३१ ॥
तें अक्शर जी अव्यक्त, निर्देश देशरहित,
सोऽहंभावें उपासित, ज्ञानिये जे ॥ ३२ ॥
तयां आणि जी भक्तां, येरयेरांमाजी अनंता,
कवणें योगु तत्त्वतां, जाणितला सांगा ॥ ३३ ॥
इया किरीटीचिया बोला, तो जगद्बंधु संतोषला,
म्हणे हो प्रश्नु भला, जाणसी करूं ॥ ३४ ॥
श्री भगवानुवाच।
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते।
श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥ २॥
तरी अस्तुगिरीचियां उपकंठीं, रिगालिया रविबिंबापाठीं,
रश्मी जैसे किरीटी, संचरती ॥ ३५ ॥
कां वर्षाकाळीं सरिता, जैसी चढों लागें पांडुसुता,
तैसी नीच नवी भजतां, श्रद्धा दिसे ॥ ३६ ॥
परी ठाकिलियाहि सागरु, जैसा मागीलही यावा अनिवारु,
तिये गंगेचिये ऐसा पडिभरु, प्रेमभावा ॥ ३७ ॥
तैसें सर्वेंद्रियांसहित, मजमाजीं सूनि चित्त,
जे रात्रिदिवस न म्हणत, उपासिती ॥ ३८ ॥
इयापरी जे भक्त, आपणपें मज देत,
तेचि मी योगयुक्त, परम मानीं ॥ ३९ ॥
ये त्वक्षर्मनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते।
सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं ॥ ३॥
आणि येर तेही पांडवा, जे आरूढोनि सोऽहंभावा,
झोंबती निरवयवा, अक्षरासी ॥ ४० ॥
मनाची नखी न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे,
ते इंद्रियां कीर जोगें, कायि होईल ? ॥ ४१ ॥
परी ध्यानाही कुवाडें, म्हणौनि एके ठायीं न संपडे,
व्यक्तीसि माजिवडें, कवणेही नोहे ॥ ४२ ॥
जया सर्वत्र सर्वपणें, सर्वांही काळीं असणें,
जें पावूनि चिंतवणें, हिंपुटी जाहलें ॥ ४३ ॥
जें होय ना नोहे, जें नाहीं ना आहे,
ऐसें म्हणौनि उपाये, उपजतीचि ना ॥ ४४ ॥
जें चळे ना ढळे, सरे ना मैळे,
तें आपुलेनीचि बळें, आंगविलें जिहीं ॥ ४५ ॥
सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥ ४॥
पैं वैराग्यमहापावकें, जाळूनि विषयांचीं कटकें,
अधपलीं तवकें, इंद्रियें धरिलीं ॥ ४६ ॥
मग संयमाची धाटी, सूनि मुरडिलीं उफराटीं,
इंद्रियें कोंडिलीं कपाटीं, हृदयाचिया ॥ ४७ ॥
अपानींचिया कवाडा, लावोनि आसनमुद्रा सुहाडा,
मूळबंधाचा हुडा, पन्नासिला ॥ ४८ ॥
आशेचे लाग तोडिले, अधैर्याचे कडे झाडिले,
निद्रेचें शोधिलें, काळवखें ॥ ४९ ॥
वज्राग्नीचिया ज्वाळीं, करूनि सप्तधातूंची होळी,
व्याधींच्या सिसाळीं, पूजिलीं यंत्रें ॥ ५० ॥
मग कुंडलिनियेचा टेंभा, आधारीं केला उभा,
तया चोजवलें प्रभा, निमथावरी ॥ ५१ ॥
नवद्वारांचिया चौचकीं, बाणूनि संयतीची आडवंकी,
उघडिली खिडकी, ककारांतींची ॥ ५२ ॥
प्राणशक्तिचामुंडे, प्रहारूनि संकल्पमेंढे,
मनोमहिषाचेनि मुंडें, दिधलीं बळी ॥ ५३ ॥
चंद्रसूर्यां बुझावणी, करूनि अनुहताची सुडावणी,
सतरावियेचें पाणी, जिंतिलें वेगीं ॥ ५४ ॥
मग मध्यमा मध्य विवरें, तेणें कोरिवें दादरें,
ठाकिलें चवरें, ब्रह्मरंध्र ॥ ५५ ॥
वरी मकारांत सोपान, ते सांडोनिया गहन,
काखे सूनियां गगन, भरले ब्रह्मीं ॥ ५६ ॥
ऐसे जे समबुद्धी, गिळावया सोऽहंसिद्धी,
आंगविताती निरवधी, योगदुर्गें ॥ ५७ ॥
आपुलिया साटोवाटी, शून्य घेती उठाउठीं,
तेही मातेंचि किरीटी, पावती गा ॥ ५८ ॥
वांचूनि योगचेनि बळें, अधिक कांहीं मिळे,
ऐसें नाहीं आगळें, कष्टचि तया ॥ ५९ ॥
क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम्।
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥ ५॥
जिहीं सकळ भूतांचिया हितीं, निरालंबीं अव्यक्तीं,
पसरलिया आसक्ती, भक्तीवीण ॥ ६० ॥
तयां महेन्द्रादि पदें, करिताति वाटवधें,
आणि ऋद्धिसिद्धींचीं द्वंद्वें, पाडोनि ठाती ॥ ६१ ॥
कामक्रोधांचे विलग, उठावती अनेग,
आणि शून्येंसीं आंग, झुंजवावें कीं ॥ ६२ ॥
ताहानें ताहानचि पियावी, भुकेलिया भूकचि खावी,
अहोरात्र वावीं, मवावा वारा ॥ ६३ ॥
उनी दिहाचें पहुडणें, निरोधाचें वेल्हावणें,
झाडासि साजणें, चाळावें गा ॥ ६४ ॥
शीत वेढावें, उष्ण पांघुरावें,
वृष्टीचिया असावें, घरांआंतु ॥ ६५ ॥
किंबहुना पांडवा, हा अग्निप्रवेशु नीच नवा,
भातारेंवीण करावा, तो हा योगु ॥ ६६ ॥
एथ स्वामीचें काज, ना वापिकें व्याज,
परी मरणेंसीं झुंज, नीच नवें ॥ ६७ ॥
ऐसें मृत्यूहूनि तीख, कां घोंटे कढत विख,
डोंगर गिळितां मुख, न फाटे काई ? ॥ ६८ ॥
म्हणौनि योगाचियां वाटा, जे निगाले गा सुभटा,
तयां दुःखाचाचि शेलवांटा, भागा आला ॥ ६९ ॥
पाहें पां लोहाचे चणे, जैं बोचरिया पडती खाणें,
तैं पोट भरणें कीं प्राणें, शुद्धी म्हणों ॥ ७० ॥
म्हणौनि समुद्र बाहीं, तरणे आथि केंही,
कां गगनामाजीं पाईं, खोलिजतु असें ? ॥ ७१ ॥
वळघलिया रणाची थाटी, आंगीं न लागतां कांठी,
सूर्याची पाउटी, कां होय गा ॥ ७२ ॥
यालागीं पांगुळा हेवा, नव्हे वायूसि पांडवा,
तेवीं देहवंता जीवां, अव्यक्तीं गति ॥ ७३ ॥
ऐसाही जरी धिंवसा, बांधोनियां आकाशा,
झोंबती तरी क्लेशा, पात्र होती ॥ ७४ ॥
म्हणौनि येर ते पार्था, नेणतीचि हे व्यथा,
जे कां भक्तिपंथा, वोटंगले ॥ ७५ ॥
ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ ६॥
कर्मेंद्रियें सुखें, करिती कर्में अशेखें,
जियें कां वर्णविशेखें, भागा आलीं ॥ ७६ ॥
विधीतें पाळित, निषेधातें गाळित,
मज देऊनि जाळित, कर्मफळें ॥ ७७ ॥
ययापरी पाहीं, अर्जुना माझें ठाईं,
संन्यासूनि नाहीं, करिती कर्में ॥ ७८ ॥
आणीकही जे जे सर्व, कायिक वाचिक मानसिक भाव,
तयां मीवांचूनि धांव, आनौती नाहीं ॥ ७९ ॥
ऐसे जे मत्पर, उपासिती निरंतर,
ध्यानमिषें घर, माझें झालें ॥ ८० ॥
जयांचिये आवडी, केली मजशीं कुळवाडी,
भोग मोक्ष बापुडीं, त्यजिलीं कुळें ॥ ८१ ॥
ऐसे अनन्ययोगें, विकले जीवें मनें आंगें,
तयांचे कायि एक सांगें, जें सर्व मी करीं ॥ ८२ ॥
तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्।
भवामि न चिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥ ७॥
किंबहुना धनुर्धरा, जो मातेचिया ये उदरा,
तो मातेचा सोयरा, केतुला पां ॥ ८३ ॥
तेवीं मी तयां, जैसे असती तैसियां,
कळिकाळ नोकोनियां, घेतला पट्टा ॥ ८४ ॥
एऱ्हवीं तरी माझियां भक्तां, आणि संसाराची चिंता,
काय समर्थाची कांता, कोरान्न मागे ॥ ८५ ॥
तैसे ते माझें, कलत्र हें जाणिजे,
कायिसेनिही न लजें, तयांचेनि मी ॥ ८६ ॥
जन्ममृत्यूचिया लाटीं, झळंबती इया सृष्टी,
तें देखोनियां पोटीं, ऐसें जाहलें ॥ ८७ ॥
भवसिंधूचेनि माजें, कवणासि धाकु नुपजे,
तेथ जरी कीं माझे, बिहिती हन ॥ ८८ ॥
म्हणौनि गा पांडवा, मूर्तीचा मेळावा,
करूनि त्यांचिया गांवा, धांवतु आलों ॥ ८९ ॥
नामाचिया सहस्रवरी, नावा इया अवधारीं,
सजूनियां संसारीं, तारू जाहलों ॥ ९० ॥
सडे जे देखिले, ते ध्यानकासे लाविले,
परीग्रहीं घातले, तरियावरी ॥ ९१ ॥
प्रेमाची पेटी, बांधली एकाचिया पोटीं,
मग आणिले तटीं, सायुज्याचिया ॥ ९२ ॥
परी भक्तांचेनि नांवें, चतुष्पदादि आघवे,
वैकुंठींचिये राणिवे, योग्य केले ॥ ९३ ॥
म्हणौनि गा भक्तां, नाहीं एकही चिंता,
तयांतें समुद्धर्ता, आथि मी सदा ॥ ९४ ॥
आणि जेव्हांचि कां भक्तीं, दीधली आपुली चित्तवृत्ती,
तेव्हांचि मज सूति, त्यांचिये नाटीं ॥ ९५ ॥
याकारणें गा भक्तराया, हा मंत्र तुवां धनंजया,
शिकिजे जे यया, मार्गा भजिजे ॥ ९६ ॥
मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय।
निवसिष्यसि मय्येव अत उर्ध्वं न संशयः ॥ ८॥
अगा मानस हें एक, माझ्या स्वरूपीं वृत्तिक,
करूनि घालीं निष्टंक, बुद्धि निश्चयेंसीं ॥ ९७ ॥
इयें दोनीं सरिसीं, मजमाजीं प्रेमेसीं,
रिगालीं तरी पावसी, मातें तूं गा ॥ ९८ ॥
जे मन बुद्धि इहीं, घर केलें माझ्यां ठायीं,
तरी सांगें मग काइ, मी तू ऐसें उरे ? ॥ ९९ ॥
म्हणौनि दीप पालवे, सवेंचि तेज मालवे,
कां रविबिंबासवें, प्रकाशु जाय ॥ १०० ॥
उचललेया प्राणासरिसीं, इंद्रियेंही निगती जैसीं,
तैसा मनोबुद्धिपाशीं, अहंकारु ये ॥ १०१ ॥
म्हणौनि माझिया स्वरूपीं, मनबुद्धि इयें निक्षेपीं,
येतुलेनि सर्वव्यापी, मीचि होसी ॥ १०२ ॥
यया बोला कांहीं, अनारिसें नाहीं,
आपली आण पाहीं, वाहतु असें गा ॥ १०३ ॥
अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनन्जय ॥ ९॥
अथवा हें चित्त, मनबुद्धिसहित,
माझ्यां हातीं अचुंबित, न शकसी देवों ॥ १०४ ॥
तरी गा ऐसें करीं, यया आठां पाहारांमाझारीं,
मोटकें निमिषभरी, देतु जाय ॥ १०५ ॥
मग जें जें कां निमिख, देखेल माझें सुख,
तेतुलें अरोचक, विषयीं घेईल ॥ १०६ ॥
जैसा शरत्कालु रिगे, आणि सरिता वोहटूं लागे,
तैसें चित्त काढेल वेगें, प्रपंचौनि ॥ १०७ ॥
मग पुनवेहूनि जैसें, शशिबिंब दिसेंदिसें,
हारपत अंवसे, नाहींचि होय ॥ १०८ ॥
तैसें भोगाआंतूनि निगतां, चित्त मजमाजीं रिगतां,
हळूहळू पंडुसुता, मीचि होईल ॥ १०९ ॥
अगा अभ्यासयोगु म्हणिजे, तो हा एकु जाणिजे,
येणें कांहीं न निपजे, ऐसें नाहीं ॥ ११० ॥
पैं अभ्यासाचेनि बळें, एकां गति अंतराळे,
व्याघ्र सर्प प्रांजळे, केले एकीं ॥ १११ ॥
विष कीं आहारीं पडे, समुद्रीं पायवाट जोडे,
एकीं वाग्ब्रह्म थोकडें, अभ्यासें केलें ॥ ११२ ॥
म्हणौनि अभ्यासासी कांहीं, सर्वथा दुष्कर नाहीं,
यालागी माझ्या ठायीं, अभ्यासें मीळ ॥ ११३ ॥
अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव।
मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि ॥ १०॥
कां अभ्यासाही लागीं, कसु नाहीं तुझिया अंगीं,
तरी आहासी जया भागीं, तैसाचि आस ॥ ११४ ॥
इंद्रियें न कोंडीं, भोगातें न तोडीं,
अभिमानु न संडीं, स्वजातीचा ॥ ११५ ॥
कुळधर्मु चाळीं, विधिनिषेध पाळीं,
मग सुखें तुज सरळी, दिधली आहे ॥ ११६ ॥
परी मनें वाचा देहें, जैसा जो व्यापारु होये,
तो मी करीतु आहें, ऐसें न म्हणें ॥ ११७ ॥
करणें कां न करणें, हें आघवें तोचि जाणे,
विश्व चळतसे जेणें, परमात्मेनि ॥ ११८ ॥
उणयापुरेयाचें कांहीं, उरों नेदी आपुलिया ठायीं,
स्वजाती करूनि घेईं, जीवित्व हें ॥ ११९ ॥
माळियें जेउतें नेलें, तेउतें निवांतचि गेलें,
तया पाणिया ऐसें केलें, होआवें गा ॥ १२० ॥
म्हणौनि प्रवृत्ति आणि निवृत्ती, इयें वोझीं नेघे मती,
अखंड चित्तवृत्ती, माझ्या ठायीं ॥ १२१ ॥
एऱ्हवीं तरी सुभटा, उजू कां अव्हाटां,
रथु काई खटपटा, करितु असे ? ॥ १२२ ॥
आणि जें जें कर्म निपजे, तें थोडें बहु न म्हणिजे,
निवांतचि अर्पिजे, माझ्यां ठायीं ॥ १२३ ॥
ऐसिया मद्भावना, तनुत्यागीं अर्जुना,
तूं सायुज्य सदना, माझिया येसी ॥ १२४ ॥
अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः।
सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ॥ ११॥
ना तरी हेंही तूज, नेदवे कर्म मज,
तरी तूं गा बुझ, पंडुकुमरा ॥ १२५ ॥
बुद्धीचिये पाठीं पोटीं, कर्माआदि कां शेवटीं,
मातें बांधणें किरीटी, दुवाड जरी ॥ १२६ ॥
तरी हेंही असो, सांडीं माझा अतिसो,
परि संयतिसीं वसो, बुद्धि तुझी ॥ १२७ ॥
आणि जेणें जेणें वेळें, घडती कर्में सकळें,
तयांचीं तियें फळें, त्यजितु जाय ॥ १२८ ॥
वृक्ष कां वेली, लोटती फळें आलीं,
तैसीं सांडीं निपजलीं, कर्में सिद्धें ॥ १२९ ॥
परि मातें मनीं धरावें, कां मजौद्देशें करावें,
हें कांहीं नको आघवें, जाऊं दे शून्यीं ॥ १३० ॥
खडकीं जैसें वर्षलें, कां आगीमाजीं पेरिलें,
कर्म मानी देखिलें, स्वप्न जैसें ॥ १३१ ॥
अगा आत्मजेच्या विषीं, जीवु जैसा निरभिलाषी,
तैसा कर्मीं अशेषीं, निष्कामु होईं ॥ १३२ ॥
वन्हीची ज्वाळा जैसी, वायां जाय आकाशीं,
क्रिया जिरों दे तैसी, शून्यामाजी ॥ १३३ ॥
अर्जुना हा फलत्यागु, आवडे कीर असलगु,
परी योगामाजीं योगु, धुरेचा हा ॥ १३४ ॥
येणें फलत्यागें सांडे, तें तें कर्म न विरूढे,
एकचि वेळे वेळुझाडें, वांझें जैसीं ॥ १३५ ॥
तैसें येणेंचि शरीरें, शरीरा येणें सरे,
किंबहुना येरझारे, चिरा पडे ॥ १३६ ॥
पैं अभ्यासाचिया पाउटीं, ठाकिजे ज्ञान किरीटी,
ज्ञानें येइजे भेटी, ध्यानाचिये ॥ १३७ ॥
मग ध्यानासि खेंव, देती आघवेचि भाव,
तेव्हां कर्मजात सर्व, दूरी ठाके ॥ १३८ ॥
कर्म जेथ दुरावे, तेथ फलत्यागु संभवे,
त्यागास्तव आंगवे, शांति सगळी ॥ १३९ ॥
म्हणौनि यावया शांति, हाचि अनुक्रमु सुभद्रापती,
म्हणौनि अभ्यासुचि प्रस्तुतीं, करणें एथ ॥ १४० ॥
श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ञानाद् ध्यानं विशिष्यते।
ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिनिरन्तरम् ॥ १२॥
अभ्यासाहूनि गहन, पार्था मग ज्ञान,
ज्ञानापासोनि ध्यान, विशेषिजे ॥ १४१ ॥
मग कर्मफलत्यागु, तो ध्यानापासोनि चांगु,
त्यागाहूनि भोगु, शांतिसुखाचा ॥ १४२ ॥
ऐसिया या वाटा, इहींचि पेणा सुभटा,
शांतीचा माजिवटा, ठाकिला जेणें ॥ १४३ ॥
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च।
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥ १३॥
जो सर्व भूतांच्या ठायीं, द्वेषांतें नेणेंचि कहीं,
आपपरु नाहीं, चैतन्या जैसा ॥ १४४ ॥
उत्तमातें धरिजे, अधमातें अव्हेरिजे,
हें काहींचि नेणिजे, वसुधा जेवीं ॥ १४५ ॥
कां रायाचें देह चाळूं, रंकातें परौतें गाळूं,
हें न म्ह्णेचि कृपाळू, प्राणु पैं गा ॥ १४६ ॥
गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं,
ऐसें नेणेंचि गा करूं, तोय जैसें ॥ १४७ ॥
तैसी आघवियांचि भूतमात्रीं, एकपणें जया मैत्री,
कृपेशीं धात्री, आपणचि जो ॥ १४८ ॥
आणि मी हे भाष नेणें, माझें काहींचि न म्हणे,
सुख दुःख जाणणें, नाहीं जया ॥ १४९ ॥
तेवींचि क्षमेलागीं, पृथ्वीसि पवाडु आंगीं,
संतोषा उत्संगीं, दिधलें घर ॥ १५० ॥
सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १४॥
वार्षियेवीण सागरू, जैसा जळें नित्य निर्भरु,
तैसा निरुपचारु, संतोषी जो ॥ १५१ ॥
वाहूनि आपुली आण, धरी जो अंतःकरण,
निश्चया साचपण, जयाचेनि ॥ १५२ ॥
जीवु परमात्मा दोन्ही, बैसऊनि ऐक्यासनीं,
जयाचिया हृदयभुवनीं, विराजती ॥ १५३ ॥
ऐसा योगसमृद्धि, होऊनि जो निरवधि,
अर्पी मनोबुद्धी, माझ्या ठायीं ॥ १५४ ॥
आंतु बाहेरि योगु, निर्वाळलेयाहि चांगु,
तरी माझा अनुरागु, सप्रेम जया ॥ १५५ ॥
अर्जुना गा तो भक्तु, तोचि योगी तोचि मुक्तु,
तो वल्लभा मी कांतु, ऐसा पढिये ॥ १५६ ॥
हें ना तो आवडे, मज जीवाचेनि पाडें,
हेंही एथ थोकडें, रूप करणें ॥ १५७ ॥
तरी पढियंतयाची काहाणी, हे भुलीची भारणी,
इयें तंव न बोलणीं, परी बोलवी श्रद्धा ॥ १५८ ॥
म्हणौनि गा आम्हां, वेगां आली उपमा,
एऱ्हवीं काय प्रेमा, अनुवादु असे ? ॥ १५९ ॥
आतां असो हें किरीटी, पैं प्रियाचिया गोष्टी,
दुणा थांव उठी, आवडी गा ॥ १६० ॥
तयाही वरी विपायें, प्रेमळु संवादिया होये,
तिये गोडीसी आहे, कांटाळें मग ? ॥ १६१ ॥
म्हणौनि गा पंडुसुता, तूंचि प्रियु आणि तूंचि श्रोता,
वरी प्रियाची वार्ता, प्रसंगें आली ॥ १६२ ॥
तरी आतां बोलों, भलें या सुखा मीनलों,
ऐसें म्हणतखेंवीं डोलों, लागला देवो ॥ १६३ ॥
मग म्हणे जाण, तया भक्तांचे लक्षण,
जया मी अंतःकरण, बैसों घालीं ॥ १६४ ॥
यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १५॥
तरी सिंधूचेनि माजें, जळचरां भय नुपजे,
आणि जळचरीं नुबगिजे, समुद्रु जैसा ॥ १६५ ॥
तेवीं उन्मत्तें जगें, जयासि खंती न लगे,
आणि जयाचेनि आंगें, न शिणे लोकु ॥ १६६ ॥
किंबहुना पांडवा, शरीर जैसें अवयवां,
तैसा नुबगे जीवां, जीवपणें जो ॥ १६७ ॥
जगचि देह जाहलें, म्हणौनि प्रियाप्रिय गेलें,
हर्षामर्ष ठेले, दुजेनविण ॥ १६८ ॥
ऐसा द्वंद्वनिर्मुक्तु, भयोद्वेगरहितु,
याहीवरी भक्तु, माझ्यां ठायीं ॥ १६९ ॥
तरी तयाचा गा मज मोहो, काय सांगों तो पढियावो,
हें असे जीवें जीवो, माझेनि तो ॥ १७० ॥
जो निजानंदें धाला, परिणामु आयुष्या आला,
पूर्णते जाहला, वल्लभु जो ॥ १७१ ॥
अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः।
सर्वारंभपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १६॥
जयाचिया ठायीं पांडवा, अपेक्षे नाहीं रिगावा,
सुखासि चढावा, जयाचें असणें ॥ १७२ ॥
मोक्ष देऊनि उदार, काशी होय कीर,
परी वेचावें लागें शरीर, तिये गांवीं ॥ १७३ ॥
हिमवंतु दोष खाये, परी जीविताची हानि होये,
तैसें शुचित्व नोहे, सज्जनाचें ॥ १७४ ॥
शुचित्वें शुचि गांग होये, आणि पापतापही जाये,
परी तेथें आहे, बुडणें एक ॥ १७५ ॥
खोलिये पारु नेणिजे, तरी भक्तीं न बुडिजे,
रोकडाचि लाहिजे, न मरतां मोक्षु ॥ १७६ ॥
संताचेनि अंगलगें, पापातें जिणणें गंगे,
तेणें संतसंगें, शुचित्व कैसें ॥ १७७ ॥
म्हणौनि असो जो ऐसा, शुचित्वें तीर्थां कुवासा,
जेणें उल्लंघविलें दिशा, मनोमळ ॥ १७८ ॥
आंतु बाहेरी चोखाळु, सूर्य जैसा निर्मळु,
आणि तत्त्वार्थींचा पायाळु, देखणा जो ॥ १७९ ॥
व्यापक आणि उदास, जैसें कां आकाश,
तैसें जयाचें मानस, सर्वत्र गा ॥ १८० ॥
संसारव्यथे फिटला, जो नैराश्यें विनटला,
व्याधाहातोनि सुटला, विहंगु जैसा ॥ १८१ ॥
तैसा सतत जो सुखें, कोणीही टवंच न देखे,
नेणिजे गतायुषें, लज्जा जेवीं ॥ १८२ ॥
आणि कर्मारंभालागीं, जया अहंकृती नाही आंगीं,
जैसें निरिंधन आगी, विझोनि जाय ॥ १८३ ॥
तैसा उपशमुचि भागा, जयासि आला पैं गा,
जो मोक्षाचिया आंगा, लिहिला असे ॥ १८४ ॥
अर्जुना हा ठावोवरी, जो सोऽहंभावो सरोभरीं,
द्वैताच्या पैलतीरीं, निगों सरला ॥ १८५ ॥
कीं भक्तिसुखालागीं, आपणपेंचि दोही भागीं,
वांटूनियां आंगीं, सेवकै बाणी ॥ १८६ ॥
येरा नाम मी ठेवी, मग भजती वोज बरवी,
न भजतया दावी, योगिया जो ॥ १८७ ॥
तयाचे आम्हां व्यसन, आमुचें तो निजध्यान,
किंबहुना समाधान, तो मिळे तैं ॥ १८८ ॥
तयालागीं मज रूपा येणें, तयाचेनि मज येथें असणें,
तया लोण कीजे जीवें प्राणें, ऐसा पढिये ॥ १८९ ॥
यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥ १७॥
जो आत्मलाभासारिखें, गोमटें कांहींचि न देखे,
म्हणौनि भोगविशेखें, हरिखेजेना ॥ १९० ॥
आपणचि विश्व जाहला, तरी भेदभावो सहजचि गेला,
म्हणौनि द्वेषु ठेला, जया पुरुषा ॥ १९१ ॥
पैं आपुलें जें साचें, तें कल्पांतींहीं न वचे,
हें जाणोनि गताचें, न शोची जो ॥ १९२ ॥
आणि जयापरौतें कांहीं नाहीं, तें आपणपेंचि आपुल्या ठायीं,
जाहला यालागीं जो कांहीं, आकांक्षी ना ॥ १९३ ॥
वोखटें कां गोमटें, हें काहींचि तया नुमटे,
रात्रिदिवस न घटे, सूर्यासि जेवीं ॥ १९४ ॥
ऐसा बोधुचि केवळु, जो होवोनि असे निखळु,
त्याहीवरी भजनशीळु, माझ्या ठायीं ॥ १९५ ॥
तरी तया ऐसें दुसरें, आम्हां पढियंतें सोयरें,
नाहीं गा साचोकारें, तुझी आण ॥ १९६ ॥
समः शत्रौ च मित्रे च तथामानापमानयोः।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥ १८॥
पार्था जयाचिया ठायीं, वैषम्याची वार्ता नाहीं,
रिपुमित्रां दोहीं, सरिसा पाडु ॥ १९७ ॥
कां घरींचियां उजियेडु करावा, पारखियां आंधारु पाडावा,
हें नेणेचि गा पांडवा, दीपु जैसा ॥ १९८ ॥
जो खांडावया घावो घाली, कां लावणी जयानें केली,
दोघां एकचि साउली, वृक्षु दे जैसा ॥ १९९ ॥
नातरी इक्षुदंडु, पाळितया गोडु,
गाळितया कडु, नोहेंचि जेवीं ॥ २०० ॥
अरिमित्रीं तैसा, अर्जुना जया भावो ऐसा,
मानापमानीं सरिसा, होतु जाये ॥ २०१ ॥
तिहीं ऋतूं समान, जैसें कां गगन,
तैसा एकचि मान, शीतोष्णीं जया ॥ २०२ ॥
दक्षिण उत्तर मारुता, मेरु जैसा पंडुसुता,
तैसा सुखदुःखप्राप्तां, मध्यस्थु जो ॥ २०३ ॥
माधुर्यें चंद्रिका, सरिसी राया रंका,
तैसा जो सकळिकां, भूतां समु ॥ २०४ ॥
आघवियां जगा एक, सेव्य जैसें उदक,
तैसें जयातें तिन्ही लोक, आकांक्षिती ॥ २०५ ॥
जो सबाह्यसंग, सांडोनिया लाग,
एकाकीं असे आंग, आंगीं सूनी ॥ २०६ ॥
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १९॥
जो निंदेतें नेघे, स्तुति न श्लाघे,
आकाशा न लगे, लेपु जैसा ॥ २०७ ॥
तैसें निंदे आणि स्तुति, मानु करूनि एके पांती,
विचरे प्राणवृत्ती, जनीं वनीं ॥ २०८ ॥
साच लटिकें दोन्ही, बोलोनि न बोले जाहला मौनी,
जो भोगितां उन्मनी, आरायेना ॥ २०९ ॥
जो यथालाभें न तोखे, अलाभें न पारुखे,
पाउसेवीण न सुके, समुद्रु जैसा ॥ २१० ॥
आणि वायूसि एके ठायीं, बिढार जैसें नाहीं,
तैसा न धरीच कहीं, आश्रयो जो ॥ २११ ॥
आघवाची आकाशस्थिति, जेवीं वायूसि नित्य वसती,
तेवीं जगचि विश्रांती-, स्थान जया ॥ २१२ ॥
हें विश्वचि माझें घर, ऐसी मती जयाची स्थिर,
किंबहुना चराचर, आपण जाहला ॥ २१३ ॥
मग याहीवरी पार्था, माझ्या भजनीं आस्था,
तरी तयातें मी माथां, मुकुट करीं ॥ २१४ ॥
उत्तमासि मस्तक, खालविजे हें काय कौतुक,
परी मानु करिती तिन्ही लोक, पायवणियां ॥ २१५ ॥
तरी श्रद्धावस्तूसी आदरु, करितां जाणिजे प्रकारु,
जरी होय श्रीगुरु, सदाशिवु ॥ २१६ ॥
परी हे असो आतां, महेशातें वानितां,
आत्मस्तुति होतां, संचारु असे ॥ २१७ ॥
ययालागीं हें नोहे, म्हणितलें रमानाहें,
अर्जुना मी वाहें, शिरीं तयातें ॥ २१८ ॥
जे पुरुषार्थसिद्धि चौथी, घेऊनि आपुलिया हातीं,
रिगाला भक्तिपंथीं, जगा देतु ॥ २१९ ॥
कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी,
कीं जळाचिये परी, तळवटु घे ॥ २२० ॥
म्हणौनि गा नमस्कारूं, तयातें आम्ही माथां मुगुट करूं,
तयाची टांच धरूं, हृदयीं आम्हीं ॥ २२१ ॥
तयाचिया गुणांचीं लेणीं, लेववूं अपुलिये वाणी,
तयाची कीर्ति श्रवणीं, आम्हीं लेवूं ॥ २२२ ॥
तो पहावा हे डोहळे, म्हणौनि अचक्षूसी मज डोळे,
हातींचेनि लीलाकमळें, पुजूं तयातें ॥ २२३ ॥
दोंवरी दोनी, भुजा आलों घेउनि,
आलिंगावयालागुनी, तयाचें आंग ॥ २२४ ॥
तया संगाचेनि सुरवाडें, मज विदेहा देह धरणें घडे,
किंबहुना आवडे, निरुपमु ॥ २२५ ॥
तेणेंसीं आम्हां मैत्र, एथ कायसें विचित्र ?,
परी तयाचें चरित्र, ऐकती जे ॥ २२६ ॥
तेही प्राणापरौते, आवडती हें निरुतें,
जे भक्तचरित्रातें, प्रशंसिती ॥ २२७ ॥
जो हा अर्जुना साद्यंत, सांगितला प्रस्तुत,
भक्तियोगु समस्त-, योगरूप ॥ २२८ ॥
तया मी प्रीति करी, कां मनीं शिरसा धरीं,
येवढी थोरी, जया स्थितीये ॥ २२९ ॥
ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते।
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव प्रियाः ॥ २०॥
इति श्रीमद्भग्वद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगोनाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
ते हे गोष्टी रम्य, अमृतधारा धर्म्य,
करिती प्रतीतिगम्य, आइकोनि जे ॥ २३० ॥
तेसीचि श्रद्धेचेनि आदरें, जयांचे ठायीं विस्तरे,
जीवीं जयां थारे, जे अनुष्ठिती ॥२३१ ॥
परी निरूपली जैसी, तैसीच स्थिति मानसीं,
मग सुक्षेत्रीं जैसी, पेरणी केली ॥ २३२ ॥
परी मातें परम करूनि, इयें अर्थीं प्रेम धरूनि,
हेंचि सर्वस्व मानूनि, घेती जे पैं ॥ २३३ ॥
पार्था गा जगीं, तेचि भक्त तेचि योगी,
उत्कंठा तयांलागीं, अखंड मज ॥ २३४ ॥
तें तीर्थ तें क्षेत्र, जगीं तेंचि पवित्र,
भक्ति कथेसि मैत्र, जयां पुरुषां ॥ २३५ ॥
आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन,
ते वांचूनि आन, गोमटें नाहीं ॥ २३६ ॥
तयांचें आम्हां व्यसन, ते आमुचें निधिनिधान,
किंबहुना समाधान, ते मिळती तैं ॥ २३७ ॥
पैं प्रेमळाची वार्ता, जे अनुवादती पंडुसुता,
ते मानूं परमदेवता, आपुली आम्ही ॥ २३८ ॥
ऐसे निजजनानंदें, तेणें जगदादिकंदें,
बोलिलें मुकुंदें, संजयो म्हणे ॥ २३९ ॥
राया जो निर्मळु, निष्कलंक लोककृपाळु,
शरणागतां प्रतिपाळु, शरण्यु जो ॥ २४० ॥
पैं सुरसहायशीळु, लोकलालनलीळु,
प्रणतप्रतिपाळु, हा खेळु जयाचा ॥ २४१ ॥
जो धर्मकीर्तिधवलु, आगाध दातृत्वें सरळु,
अतुळबळें प्रबळु, बळिबंधनु ॥ २४२ ॥
जो भक्तजनवत्सळु, प्रेमळजन प्रांजळु,
सत्यसेतु सकळु, कलानिधी ॥ २४३ ॥
तो श्रीकृष्ण वैकुंठींचा, चक्रवर्ती निजांचा,
सांगे येरु दैवाचा, आइकतु असे ॥ २४४ ॥
आतां ययावरी, निरूपिती परी,
संजयो म्हणे अवधारीं, धृतराष्ट्रातें ॥ २४५ ॥
तेचि रसाळ कथा, मऱ्हाठिया प्रतिपथा,
आणिजेल आतां, आवधारिजो ॥ २४६ ॥
ज्ञानदेव म्हणे तुम्ही, संत वोळगावेति आम्ही,
हें पढविलों जी स्वामी, निवृत्तिदेवीं ॥ २४७ ॥
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें